Monsoon: चिंब भिजलेले, रूप सजलेले

जूनमधील पावसाच्या खंडाने मूग, उडीद या कमी कालावधीच्या कडधान्य पिकांच्या पेरणीला फटका बसला आहे. मात्र भात, कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, तेलबिया आणि भाजीपाला या पिकांच्या पेरण्यांना (Kharip Sowing) वेग आला आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

पेरलेले बियाणे चांगले अंकुरल्याने धरतीचे रुपडे पालटून गेले आहे. चिंब भिजलेले, धरतीचे रूप सजलेले पाहून बळीराजा चांगलाच सुखावला आहे. महाराष्ट्र राज्यात यावर्षी थोड्या उशिरानेच मॉन्सूनचे (Monsoon) आगमन झाले. त्यानंतर जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. पावसाच्या खंडाने पेरण्या खोळंबल्या. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवले. शेतकऱ्यांमध्ये पावसाविषयी चिंता वाढत असतानाच जूनच्या शेवटी दमदार पावसाने हजेरी लावली.

जुलै महिना सुरू झाल्यावर तर मागील दहा दिवसांपासून राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडत आहे. जूनमधील पावसाच्या खंडाने मूग, उडीद या कमी कालावधीच्या कडधान्य पिकांच्या पेरणीला फटका बसला आहे. मात्र भात, कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, तेलबिया आणि भाजीपाला या पिकांच्या पेरण्यांना (Kharip Sowing) वेग आला आहे.

कोकण, घाटमाथा, मराठवाड्यातील (Marathwada) परभणी, हिंगोली, नांदेड तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षाच आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने भूगर्भ तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी-नाले-ओहोळ खळखळ वाहत आहेत. पाऊस म्हणजे उत्साह, पाऊस म्हणजे ऊर्जा, पाऊस म्हणजे आनंद, चैतन्य, समृद्धी अन् भरभराटही! त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये सर्वाधिक सुखद आणि सुंदर ऋतू पावसाळा आहे.

राज्यात दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने याचा प्रत्यय आपणा सर्वांना आला असेलच. पेरलेले बियाणे चांगले अंकुरल्याने धरतीचे रुपडे पालटून गेले आहे. चिंब भिजलेले, धरतीचे रूप सजलेले पाहून बळीराजा चांगलाच सुखावला आहे. महाराष्ट्रासह देशांच्या इतर राज्यांतही चांगला पाऊस पडत असल्याने सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्याचे वैशिष्ट असे आहे की तो पूर्णपणे चार महिन्यांचा असतो. मागील दोन वर्षांपासून तर आपण सहा महिन्यांचा पावसाळा अनुभवतोय. पावसाळी चार महिन्यात मोजून १५ ते २० दिवसांतच पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढे आपल्याला आठ महिने पुरवायचे असते. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला, जिरविला पाहिजे, असे शासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत केवळ म्हटले जाते. प्रत्यक्ष कृती मात्र सर्वांकडून फार कमी होते.

विहीर आणि बोअरवेल पावसाळ्यानंतर लगेच आटताना दिसतात. त्यांच्या पुनर्भरणाचे चांगले तंत्र आहे. परंतु त्याचा वापर सर्वत्र दिसून येत नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर विहिरी, बोअरवेल कोरड्या ठाक पडलेल्या दिसतात.

शेतीचे तिन्ही हंगामाचे गणित तर मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या देशात, राज्यात शेतीची भरभराट म्हणजे बहुतांश उद्योग-व्यवसायाचीही भरभराट, असे सूत्र ठरलेले आहे. देशातील बहुतांश उद्योगधंद्यांना शेतीतूनच कच्चा माल पुरविला जातो. चांगल्या पावसाने या देशातील शेतकऱ्यांसह बहुतांश लोकसंख्येची क्रयशक्ती वाढते, हे त्यामागचे मुख्य कारण आहे.

त्यामुळे मॉन्सूनची (Monsoon)प्रतीक्षा ही सर्वांनाच असते. असे म्हटले जाते लवकर आलेला आणि सक्रिय मॉन्सून देशासाठी, शेतीसाठी चांगला असतो, तर उशिरा आलेला आणि दुर्बल मॉन्सून शेतकऱ्यांसाठी समस्या घेऊन येतो. या वर्षी मॉन्सूनने कच खातच सुरुवात केली आणि सध्या तो सक्रिय असला, तरी त्यास अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्यात भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस कमी-अधिक पडतो. तसेच, पावसाच्या वाटचालीत व्यत्यय आणणारे अनेक स्थानिक घटकसुद्धा आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तरी प्रत्येक टप्प्यावर सावधानता बाळगायला हवी. पावसाचे मोठे खंड, अवर्षण अथवा अतिवृष्टी अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शासनाचीही तयारी पाहिजे. अनेक वेळा शेतकरी आणि शासनाच्या नियोजनाअभावी अनुकूल मॉन्सून परिस्थितीचा लाभ घेता आलेला नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत तर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. तसे या वर्षी होणार नाही, याची काळजी शासन-प्रशासनाने घ्यायला हवी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com