चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी ‘मोकळा’च

एखाद्या शेतीमालाला चांगले दर मिळू लागले, की सरकार निर्यातबंदी किंवा साठ्यांवर मर्यादा घालून मोकळे होते. इकडे शेतकरी पिकासाठी खर्च करून मोकळा झालेला असतो अन् खिसा भरायची संधी आली की सरकार आडवे येते व हा कष्ट करून मोकळाच राहतो.
Anil Ghanwat
Anil GhanwatAgrowon

‘काय रामभाऊ, झाली का पेरणी? (Sowing) ’ रस्त्यात भेटलेल्या सरपंचांनी सहज रामभाऊला प्रश्‍न विचारला. ‘हो, कालच सोयाबीन पेरून (Soybean Sowing) मोकळा झालो.’ रामभाऊ म्हणाले. गावागावांत प्रत्येक चौकात, कट्ट्यावर अशी संभाषणे सुरू असतात. कोणी नांगरट (Cultivation) करून मोकळा झालेला असतो, कोणी कारखान्याला ऊस घालवून मोकळा झालेला असतो, कोणी बोर घेऊन, विहीर खांदून, कोणी कशाची लागवड करून मोकळा झालेला असतो. ‘मोकळा झालो,’ असे म्हणताना काम उरकून निवांत झालो असे सांगण्याचा शेतकऱ्याचा हेतू असेल; पण खऱ्या अर्थाने त्याचा खिसा मोकळा झालेला असतो. पेरणी करायची म्हटलं, की नांगरट, पाळी करून जमीन तयार करावी लागते, खते, बियाणे विकत आणावी लागतात, मजूर लागतात. असे अनेक अनिवार्य खर्च त्याला करावे लागतात.

मागच्या पिकातील शिल्लक शेतकऱ्याकडे नसेल, बँकेचे कर्ज मिळणे शक्य नसेल, तर पैशाचा शेवटचा स्रोत असतो बायकोचे दागिने. ‘‘कापूस विकला की एक तोळा जास्त टाकून तुझा डाग देतो ना.’’ सखाराम आपल्या बायकोला आश्‍वासन देण्याचा प्रयत्न करत असतो; पण बायको फणकारत अंगावर येते, ‘‘कांद्याचं बी आणायचं होतं तव्हा कानातले मोडले ते अजून नाही केले, आता हे डोरले पण मोडून मला लंकेची पार्वती करून टाका एकदाची.’’ हे बोलताना तिचा गळा दाटून येतो. पण काय करणार? कांदा चांगला आला पण भावच नाही मिळाला, खर्च पण नाही निघाला, तर डाग कसा करणार? पण नवऱ्याचा उदास चेहरा पाहून बिचारी आपला डाग त्याच्या हातावर ठेवते.

Anil Ghanwat
MSP Procurement : गुजरातमध्ये २१ जुलैपासून मुगाची हमीभावाने खरेदी

शेतकरी कुटुंबात थोड्याफार फरकाने असा संवाद सुरू असतो. पत्नीलाही सर्व समजत असते. मालकाचा काही दोष नाही, तो रात्रन् दिवस कष्ट करतो पण कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपिटीत कधी वीजपुरवठ्यातील खोळंब्यामुळे त्याचे पीक खराब होते. सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवस सलग पाऊस सुरू आहे. अति पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी खर्च करून बसला, मोकळा झाला. आता वर्ष कसे काढायचे हा प्रश्‍न त्याच्यापुढे थैमान घालत असेल. चांगले पीक आले तर परवडतील असे दर मिळत नाहीत. मग कशाची एक तोळ्याची भर अन् कसलं काय.

Anil Ghanwat
MSP : केंद्राच्या हमीभाव धोरण समितीवरून नवा वाद

शेतीत होणारे नैसर्गिक आघात, संकटे याची शेतकऱ्यांना आता सवय झाली असावी. पीक विकून हिशोब केल्यावर ‘खर्च भरून निघाला’ याच्यावर ही तो समाधान मानू लागला आहे. त्याला त्या पिकात काही उरो न उरो, खर्च निघाला म्हणजे बास!! अशी भावना तयार झाली आहे.

शेतकरी पारंपरिक शेती सोडायला तयार नाही, नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही, आपला माल साठवून चांगल्या दरात विकत नाही म्हणून तो सुधरत नाही ही गोष्ट पूर्ण चुकीची आहे. शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास तत्पर असतो. त्याने हायब्रीड बियाणे स्वीकारले, ठिबक केले, शेततळी केली, कांदा चाळी बांधल्या, पॉलिहाउस केले, इतकेच नाही तर बंदी असलेले एचटीबीटी तंत्रज्ञानही स्वीकारून वापरतो आहे. दोष शेतकऱ्याचा नाही. दोष सरकारचा आहे, सरकारच्या धोरणाचा आहे.

वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. एका कोर्ट केसच्या कामासाठी मी नगरच्या कोर्टात गेलो होतो. माझ्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला पाहून एक तिशीतला तरुण माझ्याकडे आला व ओळख काढू लागला. तेव्हा शेतकरी संघटनेचे कर्जमुक्ती आंदोलन जोरात होते. त्याने सांगितले, की कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मी पॉलिहाउस केले, ठिबक केले, सर्व अद्ययावत तंत्रज्ञान वापरले. माझी यशोगाथा अनेक वर्तमानपत्र व मासिकांत छापली गेली. पण खर्चाचा अन् उत्पन्नाचा ताळमेळ काही बसला नाही व आज माझ्यावर खूप कर्ज झाले आहे. आता कर्जापाई माझ्या जमिनीचा बँकेने लिलाव काढला आहे. नाइलाजाने जमीन विकून मोकळा होण्याची वेळ आली आहे.

शेतकरी आळशी असता, प्रगत तंत्रज्ञान स्वीकारले नसते, तर देशाला पुरून उरेल इतके अन्नधान्य तयार झाले नसते. आपले पंतप्रधान, भारत हा जगाला अन्न पुरवू शकतो, अशी घोषणा करण्याची हिंमत कोणाच्या भरवशावर करतात? फक्त शेतकऱ्याच्या जिवावरच ना! पण सरकारने शेतकऱ्यांना कधीच मोकळ्या मनाने काम करू दिले नाही. एखाद्या शेतीमालाला चांगले दर मिळू लागले की सरकार निर्यातबंदी किंवा साठ्यांवर मर्यादा घालून मोकळे होते. इकडे शेतकरी पिकासाठी खर्च करून मोकळा झालेला असतो. आता खिसा भरायची संधी आली, की सरकार आडवे येते व हा कष्ट करून मोकळाचा मोकळाच राहतो.

सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे फक्त शेतकरीच मोकळा झाला नाहीतर राज्यांच्या व देशाच्या तिजोऱ्या मोकळ्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेची क्रयशक्ती संपल्यामुळे उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. रोजगार निर्माण होत नसल्यामुळे सुशिक्षित बेकार तरुणवर्ग मोकळाच फिरतो आहे.

देशाला या समस्यांतून मोकळे करण्यासाठी मोकळ्या तिजोऱ्या भरून घसरता रुपया सावरण्यासाठी, शेतकऱ्याचा मोकळा खिसा भरू द्या. देशाला चांगली सुपीक जमीन, शेतीला पोषक हवामान, कष्टाळू शेतकरी वर्ग आहे. याचा पुरेपूर फायदा घेऊ द्या. कधीकाळी भारतात एखादे सरकार निर्माण होऊन, शेती व्यवसायाला मोकळेपणाने काम करू देण्यासाठी, कृषी धोरणात आवश्यक त्या सुधारणा करेल व काही वर्षातच देशाचा कंगालपणा जाऊन भरभराट होईल, संपन्नता येईल अशी अपेक्षा करूया.

(लेखक स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com