भुकेचे भय

पीक लागवडीचे नियोजन हे आता जागतिक मागणी आणि आपल्या देशाची गरज यानुसार करावे लागणार आहे.
भुकेचे भय
Food SecurityAgrowon

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत जगभरातील नेत्यांनी अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मागील किमान पाच-सात दशकातील तरी ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. कारण आत्तापर्यंत काही गरीब देशांपुरती मर्यादित ही चिंता आता जागतिक झाली आहे. कोरोना महामारीचे दोन वर्षे, हवामान बदलाच्या (Climate Change) पार्श्वभुमीवर जगभर वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) विस्कळीत झालेला जागतिक व्यापार यामुळे अन्नसंकट (Food Crisis) वाढले आहे. भविष्यातील जागतिक बाजारातील अस्थिरता लक्षात घेता अनेक देश अन्नसुरक्षेसाठी धान्य साठे करून ठेवत आहेत. शेतीमालाच्या निर्यातीसाठी बहुतांश देशांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे अन्न असुरक्षितता वाढली आहे. जगभरातील वाढते तापमान, वादळांची वाढलेली संख्या, दुष्काळ, महापूर अशा आपत्तींमुळे अन्नधान्यासह इतरही पिकांची उत्पादकता आणि उत्पादन कमी झाले आहे, होत आहे. शिवाय कोरोना महामारीत विस्कळीत झालेली आयात-निर्यात पूर्वपदावर येऊ पाहत असतानाच रशिया-युक्रेन युद्धामुळे बंदरावर करण्यात आलेल्या नाकेबंदीचा परिणाम जागतिक व्यापारावर स्पष्ट दिसून येतोय. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने जागतिक बाजार (खासकरून शेतीमालाच्या बाबतीत) चांगलाच तेजीत आहे.

आपल्या देशाबाबत बोलायचे झाले तर २०२१ च्या जागतिक भूक निर्देशांकात ११६ देशांच्या यादीत आपण १०१ स्थानावर आहोत. भुकेच्या बाबबीत आपले सध्याचे हे स्थान गंभीर पातळीवर असून ते चिंताजनक परिस्थितीकडे सरकत आहे. महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती (Economic Condition) दिवसेंदिवस भीषण होतेय. रुपयाचे अवमूल्यन सातत्याने होत आहे. जागतिक बाजारच तेजीत असल्याने देशात महागाई प्रचंड वाढली आहे. मागील साडेतीन दशकांतील सर्वाधिक बेरोजगारी देश अनुभवतोय. सातत्याची तोट्याची शेती अन् बहुतांश युवकांच्या हाताला काम नसल्याने लोकांची क्रयशक्ती घटली आहे. मार्केटमध्ये कंपनी सेवा-उत्पादनांना उठाव नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा लवकर रुळावर येण्याची सुतराम शक्यता नाही. अशा अत्यंत भीषण परिस्थितीतून आपण जात असताना सुद्धा शासन-प्रशासन पातळीवर याबाबत कोणी काहीही बोलत नाही.

बदलत्या हवामानाच्या सर्वाधिक झळा आपल्याला (खासकरून शेतीला) बसत असल्या तरी याबाबत ठोस उपाय योजना अजूनही दिसत नाहीत. कृषी विद्यापीठांसह संशोधन केंद्र पातळीवर विविध पिकांबाबत तुटक तुटक प्रयोग चालू असून त्याबाबत केंद्र-राज्य शासन तसेच राष्ट्रीय-स्थानिक संशोधन संस्थात काहीही ताळमेळ नाही. अन्नधान्याच्या बाबतीत केवळ तृणधान्यात आपली स्वयंपूर्णतः होती, तिही आता धोक्यात असल्याचे दिसतेय. कडधान्ये (डाळी) आणि तेलबिया (खाद्यतेल) यांचा देशातील तुटवडा आणि त्यासाठी आपली होत असलेली फरफट जगजाहीर आहे. पीक लागवडीचे नियोजन हे आता जागतिक मागणी आणि आपल्या देशाची गरज यानुसार करावे लागणार आहे. आज खरीप हंगामाच्या तोंडावर मका, कापूस, सोयाबीन का भात, नेमकी कशाची लागवड केली म्हणजे पुढे त्यास केवळ देश नाही तर जागतिक पातळीवर मागणी राहून दर चांगले मिळतील, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले पाहिजेत, परंतु तसे होत नाही. आयात-निर्यातीच्या बाबतीतही धरसोडीचे नाही तर ठोस धोरण अंगिकारावे लागेल. लोकांची भूक भागविण्यासाठीचा अन्नधान्यांचा पुरवठा देखील देशात सुरळीत नाही. यासाठी केंद्र-राज्य पातळीवर काही योजना-अभियान आहेत. परंतु देशात कुणीही उपाशी पोटी झोपू नये, यासाठी त्यात व्यापक सुधारणा कराव्या लागतील. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोठ्या उद्योजकांपुढे रेड कार्पेट टाकत असताना लहान-मध्यम उद्योग-व्यवसाय उभे राहतील, ते टिकतील अशा धोरणांचा अवलंब करावा लागेल. या देशातील बहुसंख्य जनतेची क्रयशक्ती वाढवायची असेल तर शेतीमालास रास्त भाव आणि मोकळ्या हातांना काम मिळाले पाहिजेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com