
महाराष्ट्रत चार महिन्यांपूर्वी सुरू झालेला लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रसार थांबत तर नाही, उलट वाढतच आहे. २०२०-२१ मध्ये बाधित जनावरांचा आकडा पावणेतीन लाखांवर होता. परंतु त्या वेळी जनावरे मृत (Animal Death) पावण्याचे प्रमाण कमी होते. २०२२-२३ मध्ये सुरुवातीला ‘लम्पी स्कीन’बाधित जनावरांचा आकडा कमी असला तरी मृतांचे प्रमाण अधिक होते. आता बाधीत पशुधनाचा आकडा साडेतीन तीन लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे.
मृतांचे प्रमाण सुरुवातीपासूनच अधिक असल्याने ३ डिसेंबर २०२२ पर्यंत जवळपास २४ हजार जनावरे या आजाराने मृत पावले आहेत. लम्पी स्कीन आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सुद्धा पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या सूचना वेळोवेळी अपडेट केल्या जात आहेत. ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ अभियानही राज्यात राबविले जातेय. १३९ लाखांहून अधिक पशुधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, दूध संघांना सुद्धा लसीकरणाचे आदेश दिले आहेत. असे असताना राज्यात लम्पी स्कीन आजार वाढतच जात आहे.
चार महिन्यांच्या खालच्या लहान वासरांचे राज्यात लसीकरण झालेले नाही. केंद्र सरकारच्या तशा मार्गदर्शक सूचनाच होत्या. त्यामुळे १० ऑक्टोबरनंतर राज्यात लहान वासरांत लम्पी स्कीनचे प्रमाण वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वासरांत अधिक आहे. आता वासरांचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी गाभण गाईंचे लसीकरण करून घेतले नाही. काही जनावरे शेतकरी आणि पशुसंवर्धन विभाग अशा दोन्ही पातळ्यांवर झालेल्या दुर्लक्षामुळे लसीकरणातून सुटले. अशा जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे.
पशुधनाचे लसीकरण झाले, तरी त्यात प्रतिकारशक्ती निर्माण व्हायला महिन्याचा कालावधी लागतो. या काळात लसीकरण झालेले जनावर बाधित जनावराच्या संपर्कात आले, तर त्यांना महिनाभरात लम्पीची बाधा होऊ शकते. अशाही काही केसेस राज्यात आढळून येत आहेत. तर काही जनावरांमध्ये लसीकरण झाल्यावर महिन्यांनतरही लम्पी स्कीन होतोय. सध्या देण्यात येणारी लस ही लम्पी स्कीनवरची नसून हा रोग टाळण्यासाठी देण्यात येणारी पर्यायी (गोट पॉक्स) लस आहे. जागतिक पातळीवर या लसीची ८० टक्क्यांपर्यंत परिणामकारकता सिद्ध झालेली असून, बहुतांश देशांत हीच लस वापरली जात आहे. त्यामुळे १५ ते २० टक्के बाधित जनावरे असेही आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर लसीकरण राहिलेले पशुधन शोधून काढून त्यांना महिनाभरात लस देणे, यांस पशुसंवर्धन विभागाचे प्राधान्य हवे. यांत पशुपालकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. वासरू असो, गाभण गाय असो की कुठल्याही वयोगटातील जनावर असो त्याचे लसीकरण पशुपालकाने करून घ्यायला हवे. लहान वासरांत प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजेत. लहान वासरू बाधित जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नये.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने वासरांना स्वच्छ, संरक्षित आणि उबदार ठिकाणी ठेवले पाहिजेत. बाधित जनावरांच्या विलगीकरणात पशुपालकांच्या पातळीवर अडचणी येत आहेत. परंतु लम्पीला दूर ठेवायचे असेल तर हे गरजेचे आहे. जनावरांचे विलगीकरण झाल्यानंतर गोठा निर्जंतुक करणे ही बाबही थोडीफार दुर्लक्षित होतेय. गोठ्याचे योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण होईल, ही काळजी देखील पशुपालक आणि पशुसंवर्धन विभागाकडून घेतली गेली पाहिजे. लम्पीचा प्रसार कीटकांमार्फत होत असल्याने `माझा गोठा स्वच्छ गोठा’ हे अभियान सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवे. विविध कारणांनी अजूनही जनावरांची
चोरीछुपी वाहतूक होत असून त्यावर प्रतिबंध आवश्यक आहे. बैलगाडा शर्यत सुरू करताना पशुसंवर्धन विभागाची शिफारशी विचारात घ्यायला हव्या. नियंत्रणात्मक उपायांमध्ये सुरुवातीलाच योग्य औषधांचा वापर पशुवैद्यकांनी करायला हवा. पशुसंवर्धन विभागातील रिक्तपदांमुळे जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना रिक्त पदे तत्काळ भरायला हवीत. लम्पीशी लढताना पशू संवर्धन, महसूल, कृषी, ग्रामविकास, नगर प्रशासन या सर्व विभागाने समन्वयाने काम करायला हवे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.