Crop Nutrient : पिकांच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनाची पंचसूत्री

अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर टॉनिकसारखा केला पाहिजे. कमीत कमी रासायनिक खतांमध्ये पीक उत्पादन घेण्याचे शास्त्रीय ज्ञान घेऊनच त्याचा वापर झाला पाहिजे.
Crop Nutrient
Crop Nutrient Agrowon

उत्तरार्ध

पारंपरिक पद्धतीला पूर्णपणे मूठमाती देऊन रसायनांच्या चक्रव्यूहामध्ये बळीराजा अडकलेला आहे. जमिनीला, पिकाला फक्त रासायनिक खत (Chemical Fertilizer) पाहिजे, असा आग्रह काही जण करीत असल्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सरकारच्या तिजोरीतून दोन लाख कोटी रुपये फक्त रासायनिक खतांच्या अनुदानावर (Fertilizer Subsidy) जात असताना आणि भविष्यात ती कितीतरी पटीने वाढणार आहे याची जाणीव असल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता, शास्त्राचा आधार न घेता, कोणताही अभ्यास- संशोधन न करता बिनाखर्चाची शेती (Zero Budget Farming), विनारासायनिक खतांची शेती, नैसर्गिक शेती (Natural Farming) याचा धडाक्यात प्रचार करण्यासाठी कृषी विद्यापीठे- कृषी विभागांना सूचना दिल्या. संशोधन तसेच विस्तार संस्था मात्र अडकित्त्यात सापडल्या आहेत. रासायनिक खतांच्या वापरामुळे नक्कीच आपल्या जमिनीची, पर्यावरणाची तसेच मानवी आरोग्याची फार मोठी हानी झाली आहे. पण फक्त रासायनिक खतांवरच खापर फोडून मोकळे होण्याअगोदर आपणही आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

Crop Nutrient
गंधक : एक आवश्यक अन्नद्रव्य

खरं तर रासायनिक खतांचा वापर म्हणजेच अन्नद्रव्ये व्यवस्थापन नव्हे. पिकांच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनाची पंचसूत्री आहे. या पंचसूत्रीचा वापर करण्याची गरज असताना आपल्याकडून फक्त रासायनिक खत वापरून पीक उत्पादन वाढविणे या एकाच सूत्रावर जास्त भर दिल्यामुळे पुढचे रामायण- महाभारत घडले. परंतु आता वेळ आली आहे हे सर्व थांबविण्याची! रासायनिक खतांच्या वापरामुळे सेंद्रिय खतांचा वापर कमी होऊन बंद झाला, उत्पादन खर्चात वाढ होत गेली. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ०.३ टक्क्यापर्यंत कमी झाले. रोग-किडींचे प्रमाण वाढल्यामुळे कीटकनाशकांचा वापर वाढून विषमय अन्नामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले. पुढील दोन दशकांनी देशाची लोकसंख्या १६५ कोटींपर्यंत जाईल. देशाची लाखो एकर शेतजमिनी देशाच्या प्रगतीच्या नावाखाली पिकाखालून काढून घेतल्या जात आहेत. यात आणखी भर म्हणजे हवामानातील बदलामुळे पीक उत्पादनामध्ये घट येत असताना रासायनिक खतांना पूर्णपणे बाजूला करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने आपण अन्नधान्याबद्दल स्वावलंबी कसे होणार, याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. जमिनीच्या गुणप्रतीनुसार योग्य खतांचा वापर, पीक पद्धतीचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, जिवाणू खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर या पंचसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म चांगले ठेवून जमिनीचे कमीत कमी एक टक्का सेंद्रिय कर्ब, एक पेक्षा कमी क्षारता आणि ७ ते ८ च्या दरम्यान सामू या तीन मूलभूत बाबी सांभाळल्यानंतर पिकाचे चांगले उत्पादन हमखास येते.

Crop Nutrient
गंधक : उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य

जमिनीची योग्य वेळी योग्य प्रकारे मशागतही महत्त्वाची असते. जास्त मशागत केली तरीही जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो. झिरो टिलेज म्हणजेच पहिले पीक काढल्यानंतर कोणतीही मशागत न करता दुसरे पीक घेतले तरीही जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये एकाच प्रकारची पिके सतत घेऊन जमिनीच्या तीनही गुणधर्मांवर वाईट परिणाम होत असतो. म्हणून पिकांची फेरपालट, आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तरीही जमिनीचे संवर्धन तर होतेच तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचा चांगल्या प्रकारे वापर होतो. जमिनीमध्ये ४५ टक्के खनिजे, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी असेल तर जमीन सुपीक समजली जाते. शेतीतून आलेल्या पिकातून त्याला जे पाहिजे ते घेऊन पिकांचा राहिलेला भाग परत निसर्गाला अर्पण करणे हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजेच धान्य घेऊन भुस्सा जमिनीला अर्पण करणे, ऊस घेऊन पाचट जमिनीला अर्पण करणे, कापूस घेऊन पऱ्‍हाट्या जमिनीला अर्पण करणे. परंतु हे सर्व होत नसल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.४ पर्यंत कमी झाले आहे. आज आपल्या देशात ५० कोटी टन पिकांचे अवशेष तयार होतात.

Crop Nutrient
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

यापैकी मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष जाळले जातात. या वेळी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळतात, जिवाणू व गांडुळेही मरतात. या संपत्तीला काडी लावून आपल्याच पायांवर आपण कुऱ्‍हाड मारून घेतो. सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करणे, ते बारीक करून जमिनीत गाडणे, त्यापासून कंपोस्ट तयार करून जमिनीत वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थ गोळा करून त्यांपासून बायोचार तयार करून त्याचा वापर जमिनीत केला तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुधारण्याबरोबरच पीक उत्पादन वाढविण्यास फार मोठी मदत होईल. बायोचारमुळे जमिनीत टाकलेली खते साठवून गरजेनुसार त्याची पिकांना उपलब्धता होते, जमिनीची जलधारण क्षमता वाढल्यामुळे पाण्याची बचत होते तसेच जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म सुधारतात. अर्थात कमी अधिक प्रमाणात हेच फायदे जमिनीत कोणत्याही माध्यमातून सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यामुळे होतात. जिवाणू खतांचा वापर म्हणजे एक प्रकारचे विरजण आहे. रसायनांच्या जास्त वापरामुळे कमी झालेले जिवाणू वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर गरजेचा आहे. अनेक प्रकारचे जिवाणू पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये हवे त्या ठिकाणी, हव्या त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.

पंचसूत्रीचा सर्वांत शेवटचे सूत्र म्हणजे रासायनिक खतांचा वापर. जमिनीचा प्रकार, तिची प्रत, गुणधर्म, जमिनीत घ्यावयाचे पीक, अपेक्षित उत्पादन या सर्वांचा विचार करूनच रासायनिक खतांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. खतातून पिकाला अन्नद्रव्ये मिळणार असली तरी ती नैसर्गिक नाही, ते एक रसायन आहे जे आपण जमिनीत भूमातेच्या शरीरात टाकणार आहोत. याचा चांगला-वाईट परिणाम कसा होणार आहे याचा विचार करून रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. खरं तर अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा वापर टॉनिकसारखा केला पाहिजे. कमीत कमी रासायनिक खतांमध्ये पीक उत्पादन घेण्याचे शास्त्रीय ज्ञान घेऊनच त्याचा वापर केला पाहिजे. खतांचा कमी प्रमाणात अनेकदा वापर केला तर जमिनीवर जास्त अनिष्ट परिणाम होत नाही. युरिया खताचा प्रमाणात वापर करणे तसेच मुख्य अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला तर रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविता येते.

रासायनिक खतांवर देण्यात येणारे अनुदान तसेच परकीय चलन शेतकऱ्‍यांना आपल्या पारंपरिक खत व्यवस्थापन तसेच सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्यासाठी उपलब्ध करून दिले तर चांगले परिणाम दिसतील. जमिनीतील पाणी जमिनीत, गावातील पाणी गावात, राज्यातील पाणी राज्यात याप्रमाणे जलसंवर्धनाचे काम झाले. त्याचमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जमिनीत, गावातील सेंद्रिय पदार्थ गावात, राज्यातील सेंद्रिय पदार्थ राज्यात याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ संवर्धनाचे काम झाले तर आपली भूमाता सुपीक होऊन रासायनिक खतांचे परावलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. जमीन, पर्यावरण रक्षणाबरोबरच अन्नधान्य स्वावलंबनासाठी आणि दुसऱ्या शाश्‍वत हरितक्रांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com