लाळ्या-खुरकूत रोगमुक्त होऊया

लाळ्या-खुरकूत रोगामध्ये जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी असले, तरी त्यांची उत्पादकता घटून पशुपालकांचे मोठे नुकसान होते.
लाळ्या-खुरकूत रोगमुक्त होऊया
Animal VaccinationAgrowon

पावसाळ्यानंतर थंडीला सुरुवात झाली, की राज्यातील अनेक भागांत लाळ्या-खुरकूत रोग डोके वर काढत असतो. पशुधनास लाळ्या-खुरकूत रोगाची बाधा जेव्हा नैसर्गिक परिस्थिती बदलून शरीरात ताण निर्माण होतो, तेव्हा अधिक असते. लाळ्या-खुरकूत हा विषाणूजन्य रोग गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी खूर असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो. या रोगामुळे जनावरांचे खाणे-पिणे बंद होते. ताप येतो. जनावरांच्या जिभेवर, टाळूवर, तोंडाच्या आतील भागांत तसेच पायांच्या बेचकीतही फोड येतात. रोगाची लागण झालेल्या भागात साथ पसरते. या रोगामुळे जनावरे दगावण्याची देखील शक्यता आहे.

राज्यात मागील वर्षांत विविध ४३ ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला. लसीकरणातील अडचणी हे त्यामागचे कारण आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हा एक पर्याय असला तरी त्यात मोठ्या अडथळ्यांची यादी आहे. रोगाचा विषाणू (कोरोना विषाणूप्रमाणे) आपले अंतरंग बदलत असल्यामुळे आणि दरवर्षी विविध भागांत विविध रंगातून क्रियाशील होत असल्याने लसीकरणाचा फायदा सीमित असतो. संशोधकांना आतापर्यंत या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या लसीची प्रतिकारक्षमता जनावरांत दीर्घकाळापर्यंत टिकवता आलेली नाही. म्हणून केवळ लाळ्या-खुरकूत रोगासाठी वर्षातून दोनदा लसीकरणाचा उपक्रम राबवावा लागतो.

डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत मागील सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात जनावरांचे लसीकरण करण्यात आले असले तरी अजून बरीच जनावरे बाकी आहेत. त्यातच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम जूनपासून सुरू झाला आहे. लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून, त्यात बऱ्याच अनियमितता दिसून येतात, त्या या वर्षी तरी दूर व्हायला हव्यात. मागील टप्प्यात लसीकरण न झालेले अन् दुसऱ्या टप्प्यातील सर्व जनावरांचे सुनियोजित लसीकरण व्हायला हवे.

यांत्रिकीकरण कितीही वाढले तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व अबाधित आहे. असे असताना लाळ्या-खुरकूतमुळे जनावरांची उत्पादकता घटून पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या रोगामुळे पशुपालकांचे आर्थिक गणितच बिघडच नाही तर जोपर्यंत हा रोग आपण पूर्णपणे देशातून हटवत नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम आपल्या प्राणिजन्य पदार्थ आणि वस्तूंच्या निर्यातीवर होत राहणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवळपास तीन वर्षांपूर्वी १०० टक्के केंद्रीय अर्थसाहाय्याह्याने लाळ्या-खुरकूत रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात २०२५ पर्यंत हा रोग नियंत्रणात आणणे आणि २०३० पर्यंत देश लाळ्या-खुरकूत रोगमुक्त करण्याचे धोरण जाहीर केले आहे. आणि हे उद्दिष्ट व्यापक सामुदायिक लसीकरण मोहिमेतूनच साध्य होणार आहे.

आपल्या राज्यात मात्र लाळ्या-खुरकूत प्रतिकारक लसींचा मुळातच कमी पुरवठा आहे. या लसीच्या जिल्हानिहाय वितरणात अनेक त्रुटी आहेत. सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी लस उपलब्ध होत नसल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाते. यात वापराविना लसी मोठ्या प्रमाणात वाया जातात. अशा एक ना अनेक समस्या आहेत. लाळ्या-खुरकूत रोगप्रतिकारक लस आपल्याला एकाच ठिकाणहून तेही बाहेरील राज्यातील कंपनीकडून उपलब्ध होत असल्याने त्याचा गरजेनुसार पुरवठा होत नाही. अशावेऴी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत लाळ्या-खुरकूत रोग प्रतिकारक लसींची निर्मिती झाली पाहिजेत. शिवाय प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी

आवश्यक लसमात्रा, साहित्य, मनुष्यबळ, शितसाखळी याची खात्री राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरील संनियंत्रण समितीने करायला हवी. लसीकरण फेरीचे गाव, तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन झाले पाहिजेत. पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. असे झाले तरच लाळ्या-खुरकूत रोगमुक्त देशाचे आपले उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com