कुणबी कुळातला कुलगुरू

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचा एक उपक्रमशील माणूस आणि एक आस्थावान कुलगुरू म्हणून नावलौकिक आहे. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या कार्याचा हा आढावा.
डॉ. अशोक ढवण
डॉ. अशोक ढवण


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण काल (ता. ६) निवृत्त झाले. एक उपक्रमशील माणूस आणि एक आस्थावान कुलगुरू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या कार्याचा हा आढावा...


ढवण या आडनावाचं धवन या आडनावाशी साम्य असल्यामुळं सुरुवातीला मला हा कोणीतरी उत्तर भारतीय माणूस असावा असं वाटलं होतं. पण सरांशी जवळून संबंध आला तेव्हा लक्षात आलं की सर याच मातीतले, याच परिसरातले, याच विद्यापीठात शिकलेले आणि आपल्यातूनच मोठे झालेले असे एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी हे आहे. एका कष्टवंत शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबात पन्नास-साठ माणसांमध्ये बालपण गेल्यामुळे आपोआपच त्यांच्या मनामध्ये एक समूहभाव तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सतत शेतात राबणाऱ्या वडिलांचा हा मुलगा कदाचित आपल्या वडिलांच्या शेतात राबण्याच्या व्यथा-वेदना पाहून त्याच्या मनात, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे अशी भावना तयार झाली असावी.

एकेकाळी कुणबिकीत मुरलेला, शेतात काम करत शिकलेला मुलगा पुढे कृषी विद्यापीठाचा कुलगुरू होतो. म्हणूनच कृषी विद्यापीठाला एका नव्या वळणावर घेऊन जातो. १९७४ मध्ये सर परभणीच्या कृषी विद्यापीठात शिकायला आले. १९७२ मध्ये सुरू झालेलं हे विद्यापीठ तेव्हा दोनच वर्षांचं होतं. तेव्हापासून गेली ४८ वर्षे सरांचा या कृषी विद्यापीठाशी संबंध आहे. इथं चार वर्षांची पदवी घेताना त्यांना तेव्हा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असलेले दत्ताजी साळुंखे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वानं भारून टाकलं होतं. दत्ताजी साळुंखे हे एकेकाळचे थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नातजावई आणि अमेरिकेत जाऊन कृषी शास्त्राचं शिक्षण घेऊन आलेले कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा सर्वांग परिपूर्ण प्रभाव सरांच्या मनावर पडला. दत्ताजी साळुंखे यांनी एकदा आजचे जगप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांना परभणीच्या विद्यापीठात बोलावून त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्या व्याख्यानात स्वामिनाथन यांनी समोरच्या विद्यार्थ्यांना या पुढचं शिक्षण आणि एकूणच शेतीविषयक संशोधन तुम्हाला मूलभूतपणे करायचं असेल तर तुम्ही दिल्लीच्या पुसा विद्यापीठात यायला हवं असं आवाहन केलं. ते मनावर घेत पुढच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सर दिल्लीत पोहोचले. तिथेच त्यांनी संशोधनही केलं. विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली. या काळात कृषिविषयक शिक्षण तर मन लावून सरांनी केलंच केलं पण दिल्लीत महाराष्ट्राचा मानबिंदू असलेले यशवंतराव होते आणि त्यांचं आकर्षण पण सरांना होतं. त्यांनी यशवंतरावांविषयी पुष्कळ वाचलेलं होतं. आणि यशवंतरावांचीही सगळी पुस्तके वाचली होती. आजही यशवंतराव हा विषय निघाला तर ते तासन् तास बोलू शकतील एवढा त्यांनी यशवंतरावांच्या साहित्याचा अभ्यास केलेला आहे. अलीकडच्या काळात यशवंतरावांच्या शताब्दीच्या वर्षात त्यांनी काही ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्यावर व्याख्यानं पण दिलेली आपणाला पाहायला मिळतात.
दिल्लीतील शिक्षण संपल्यावर सर कृषी अधिकारी झाले. पण त्यात त्यांना रस नव्हता. १९८५ मध्ये सर कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. जवळपास दहा वर्षे १९९५ पर्यंत सरांनी पदवीच्या मुलांना शिकवलं. १९९५ मध्ये त्यांना एक परदेश शिष्यवृत्ती मिळाली आणि शास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेला
जाण्याची संधी मिळाली. तिथे गेल्यावर त्यांनी अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठात जाऊन शेतीविषयक नव्या संशोधनाचा अभ्यास केला. परत आल्यावर १९९५ ते २००५ अशी दहा वर्षे त्यांनी पदव्युत्तर वर्गांना शिकवलं. या काळात त्यांचं संशोधनही सुरू होतं. २००५ नंतर त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर, उस्मानाबाद आणि बदनापूर या महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

सुरुवातीपासून सर या विद्यापीठाचे साक्षीदार असल्यामुळं या विद्यापीठानं केलेल्या संशोधनाची तपशीलवार माहिती सरांना आहे. कोणत्या वर्षी कोणता नवा वाण विद्यापीठानं शोधला त्याचा तपशील समोर कागदपत्र न घेता सर्व सविस्तरपणे म्हणूनच सर देऊ शकतात. इतका त्यांचा जीव या विद्यापीठात गुंतलेला आहे. १९९२ मध्ये त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध आला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न बारकाईनं अभ्यास करून त्याची उत्तरं शेतकऱ्यांना कशी देता येतील, याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याकडे जेव्हा हा विषय आला तेव्हा जालना परिसरामध्ये दुष्काळ पडलेला होता. मोसंबीच्या बागा नष्ट होत होत्या. त्यावर काय उपाय करता येईल यासंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क केला आणि ‘विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हे सूत्र घेऊन ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर गेले. ढवण सरांचे हे सगळे काम लक्षात घेऊन पुढे त्यांना विद्यापीठाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कुलगुरुपद मिळालं. आणि या काळात तर त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी विद्यापीठांमध्ये हक्कानं केल्या.
सर, कुलगुरू झाले तेव्हा माझ्या रिधुरा गावात आले. तेव्हा मी भाऊबिजेच्या दिवशी ‘विचारांची भाऊबीज’ हा कार्यक्रम करीत असे. गावाचा विकास व्हावा, लोकांना गावाची उंची वाढवता यावी म्हणून पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील यांच्यासारखी माणसं मी गावाकड नेऊ लागलो. सर - कुलगुरू झाले त्या वर्षी भास्करराव पेरे पाटलांना मी बोलावलं होतं. त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी सरांना येण्याची विनंती केली. सरांनी अत्यंत प्रेमाने होकार दिला.
लॉकडाउनच्या काळात मी माझे जे ऑनलाइन तास घेत होतो त्या तासाचे व्हिडिओ मी सहज माझ्या ग्रुपवर टाकत असे. कुणाला उत्सुकता वाटली तर पाहतील म्हणून, तर अशोक ढवण सरांनी माझे त्या काळातले जवळ जवळ सर्व तास पाहिले. माझा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जेवढ्या मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढी मिनिटं संपली की लगेच सरांचा फोन यायचा, ‘सर माझी हजेरी टाका मी आजचा तुमचा तास केला.’ मला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं त्यामुळे. मी माझे पुढचे सगळे व्हिडिओ एकापेक्षा एक उत्तम केले. ज्यामुळे सरांच्या मनातली माझी प्रतिमा उंचावत राहील. या धास्तीनं माझे हे सगळे तास इतके उत्तम झाले की महाराष्ट्रात पुढे अनेक कुलगुरूंनी, प्राचार्यांनी आणि अनेकांनी त्याला पसंती दिली. त्याच्या पाठीमागे सरांनी मला दिलेलं प्रोत्साहन हे कारणीभूत झालेलं होतं.


सर विद्यापीठाचे कुलगुरू झाले. सरांचा जवळ जवळ ४८ वर्षांपासून या विद्यापीठाशी संबंध आहे. विद्यापीठाचा सध्या सुवर्ण महोत्सव सुरू आहे. अजून विद्यापीठाचं स्वतःचं विद्यापीठ गीत नव्हतं. सर भारतातल्या आणि जगातल्या अनेक विद्यापीठात गेले आणि तिथल्या विद्यापीठाची विद्यापीठ गीतं त्यांनी ऐकली तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना वाटायचं आपल्याही विद्यापीठाचं गीत असावं. मला एक दिवस बोलावून त्यांनी विनंती केली, की आमच्या विद्यापीठासाठी तुम्ही गीत लिहा. मला खूप आनंद वाटला, मी ज्या गावात - एकनाथ नगर (परभणी) राहतो, त्या विद्यापीठासाठी गीत लिहिण्याची संधी डॉ. अशोक ढवण यांनी मला दिली. सरांचं वाचन फार दांडगं आहे. उत्तम मराठी भाषा आणि उत्कृष्ट वक्तृत्व ही त्यांच्या बोलण्याची वैशिष्ट्ये आपणाला सांगता येतील. नुकत्याच उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘शेतकऱ्यांचं साहित्यातील चित्रण’ या विषयावरच्या परिसंवादासाठी म्हणूनच कदाचित अध्यक्ष म्हणून तिथल्या समितीने त्यांना बोलावलेलं. सरांनी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर या सगळ्या धामधुमीत त्यांच्या सख्ख्या भावाचं अपघातात निधन झालेलं होतं. पण तरीही ठरलेले कोणतेच कार्यक्रम सरांनी रद्द केले नाही.‘मढे झाकुनिया करिती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाहे’ हा तुकारामाचा अभंग आपणाला आवर्जून इथं आठवतो.
कुणबिकीची कामं करत करत शिकलेला मुलगा पुढे एका विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकतो हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ही त्यांच्या आयुष्याची प्रेरणादायी कथा सरांनी आत्मकथनातून लोकांसमोर मांडावी. खूप-खूप शुभेच्छा देतो!
(लेखक कवी, ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com