भूक, भाकर अन् भय

जगात लोकसंख्येने दुसऱ्या मोठ्या भारत देशाची भूकही मोठी आहे. त्यामुळे आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबित्व परवडणारे नाही.
Food Security
Food SecurityAgrowon

आज आपण पाहतोय सगळं जग हे भाकरीभोवती फिरतेय. भाकरीची गरज नसती आणि मानसाला पोटच नसतं तर भूक आणि जगण्यामधलं महाभारत उभंच राहिलं नसतं. सगळा संघर्ष भाकरीसाठीचा! सर्व धडपड, वणवण भटंकती भाकरीसाठीच! त्यामुळे तर भुकेला टाळून वगळून जगाचा, मानसाचा अन् पोटाचा विचार अशक्यच! म्हणून तर म्हणतात ना रिकाम्यापोटी सांगितलेलं तत्त्वज्ञान व्यर्थ. अशा या भुकेच्या भीतीने आज संपूर्ण जगाला ग्रासले आहे. शेतीसह इतरही क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केल्यानंतर २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात जगाला आपली भूक मिटविण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे कोणाच्या ध्यानीमनी देखील आले नसेल. परंतु भुकेचे हे वास्तव कोणालाही आता नाकारता येणार नाही.

Food Security
National Food Security Act : उत्तर प्रदेश, गुजरातला हवा वाढीव गहू

तब्बल दोन वर्षे संपूर्ण जगावर कोरोनाने राज केले. या काळात जगभर शेती सोडून इतर बहुतांश निर्मिती उद्योग-व्यवसायांचे उत्पादन घटले. काहीही झाले तरी शेती थांबू शकत नाही, म्हणून हे क्षेत्र चालू होते. या काळात भारतासह इतर काही देशांत उत्पादनवाढ झाली. परंतु अन्नधान्यांची जागतिक बाजारपेठ पूर्णपणे ठप्प होती. त्याचा मोठा फटका शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांना बसला. या जागतिक महामारीच्या धक्क्यातून अनेक देश सावरत असतानाच रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठ ठप्प झाली.

Food Security
Food Security : अन्नसुरक्षेला गृहीत धरणे पडेल महागात

रशिया आणि युक्रेन मोठ्या प्रमाणात गहू, मका, तेलबिया उत्पादन करून त्याची जगभर निर्यात करणारे देश आहेत. परंतु त्यांच्यामधील युद्धामुळे या दोन्ही देशांचा इतर देशांशी असलेला व्यापार विस्कळीत झाला. त्यामुळे देखील त्यांच्यावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये भुकेची समस्या वाढली. कोरोना आणि युद्ध या दोन मोठ्या जागतिक संकटांने सर्वच देशांनी आपली आपली भूक भागविण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रामुख्याने अन्नधान्याच्या निर्यातीत बहुतांश देशांनी हात आखडता घेतला. या सर्वांच्या परिणामस्वरूप जागतिक बाजारात अन्नटंचाई भासू लागली, अन्नधान्यांचे दरही वधारले अन् बहुतांश देशांत भुकेचे भय वाढले.

हे सर्व कमी की काय मागील दोन वर्षांपासून प्रतिकूल हवामान परिस्थितीचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. तशी तर हवामान बदल आणि त्याचा जगभरातील शेतीवर विपरीत परिणाम तीन दशकांपासून सुरू आहे. परंतु याची तीव्रता अलीकडे फारच वाढली आहे. युरोपियन युनियनमधील देशांतील पिकांना यंदा कधी नव्हे तो पहिल्यांदाच अतिउष्णता आणि कमी पावसाचा फटका बसत आहे. अतिउष्णता आणि त्यात पाणीटंचाई यामुळे तेथील पिकांची फुलगळ वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गहू, बार्ली, मका, सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल अशा अन्नधान्य आणि तेलबियांचे उत्पादन घटणार आहे.

त्यातच ‘इंटरनॅशनल ग्रेन कौन्सिल’ने २०२२-२३ या हंगामात हवामान बदलामुळे जागतिक धान्य उत्पादन दोन टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक व्यापार मागच्या वर्षाच्या तुलनेत ३.८ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे.भारतासह दक्षिण आशियायी देशांना तर हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असल्याचे यापूर्वीच यात काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगून ठेवले आहे. त्याचे परिणामही मागील जवळपास दशकभरापासून अधिक तीव्रतेने आपण भोगतोय. आपल्या देशात वादळे, ढगफुटी, अतिवृष्टी, अति उष्णतामान अशा विपरीत हवामानामुळे हंगामी पिकांचे नुकसान वाढले आहे.

२०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९७५ कोटी तर भारताची लोकसंख्या १६५ कोटीपर्यंत जाईल. आजचे जगभरातील अन्नधान्य उत्पादन दुपटीने वाढविले नाही तर जगातील २५ टक्के लोक भूक, कुपोषण, रोगराईने ग्रस्त असतील. या सर्व बाबींचा विचार करून भुकेच्या समस्येला भिडले पाहिजे. जगात लोकसंख्येने दुसऱ्या मोठ्या भारत देशाची भूकही मोठी आहे. त्यामुळे आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबित्व परवडणारे नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com