कृषी पर्यटनातून साधा ग्रामीण विकास

कृषी पर्यटनावर २० व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप तसेच उत्तर अमेरिकेमध्ये मोठा प्रमाणात काम सुरू झाले. कृषी पर्यटनातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्या, तरी भारतात त्यावर फारशी चर्चा होत नाही.
Agro Tourism
Agro TourismAgrowon

डॉ. भास्कर गायकवाड

उत्तरार्ध

देशामध्ये शहरीकरण वाढत असताना आर्थिक सुबत्ता आल्यामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रात चार टक्के वाढ होत असताना भारतात मात्र या क्षेत्रात दरवर्षी १० टक्के वाढ होत आहे. जगामध्ये भारताचा पर्यटनामध्ये पहिल्या दहा देशांमध्ये समावेश होतो. अर्थात पर्यटनामध्येही मोठा बदल होत आहे. पर्यटकांना सतत नवनवीन ठिकाणे किंवा संकल्पना पर्यटनासाठी आवडतात. याचा विचार करून नवनवीन क्षेत्रांचा समावेश पर्यटनामध्ये होत आहे. पर्यटन हा आनंद मिळविण्यासाठी असला तरी त्यातून आपल्या संस्कृतीचा, ग्रामीण तसेच शेती क्षेत्राचा अभ्यास करणारा असेल तर आनंदासोबतच ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. पर्यटनाला गती देण्यासाठी कृषी पर्यटनाची जोड द्यावी लागेल हे फार पूर्वीच अनेक देशांच्या लक्षात आले. कृषी पर्यटनावर २० व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप तसेच उत्तर अमेरिकेमध्ये मोठा प्रमाणात काम सुरू झाले. भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात मालेगाव, बारामती येथे कृषी पर्यटनावर काम झाले. आजही कृषी पर्यटनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असला तरी याबद्दल जास्त चर्चा होताना दिसत नाही किंवा प्रसारमाध्यमांमध्येही याची जास्त प्रसिद्ध होत नाही. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये लहान- मोठे अशी ३२८ कृषी पर्यटन केंद्रे असून, दरवर्षी जवळपास आठ लाख पर्यटक याचा लाभ घेत आहेत. अर्थात, भारतासारख्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी हा आकडा फार मोठा नाही. भारताचा विचार केला तर ६.५० लाख गावांमध्ये १४.५० कोटी शेतकरी राहतात; म्हणजेच ५८ टक्के समाज गावात राहतो. महाराष्ट्राच्या ४५ हजार गावांमध्ये १.२० कोटी शेतकरी राहतात. शेतकऱ्‍यांचे प्रमाण एवढे असूनही देशाच्या एकूण सकल उत्पन्‍नात त्याचा वाटा फक्त १३ टक्के आहे.

शेती तसेच ग्रामीण क्षेत्राला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी विविध संकल्पना किंवा योजना राबविल्या जातात. परंतु एकट्या पीक उत्पादनावर किंवा कृषिपूरक व्यवसायांवर शेतकऱ्‍यांचे उत्पन्न वाढविणे शक्य नाही. ग्रामीण तसेच शेती अर्थव्यवस्था अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती क्षेत्राला आधार देण्यासाठी कृषी पर्यटनाला प्रोत्साहन दिले तर पर्यटन क्षेत्रालाही गती मिळेल. आपला देश कृषी तसेच ग्रामीण पर्यटनाला फारच अनुकूल आहे. जगातील एकूण २० कृषी हवामान विभागांपैकी १५ कृषी हवामान विभाग भारतात आहेत. जगातील एकूण ६० प्रकारच्या जमिनींपैकी भारतात ४६ प्रकारच्या जमिनी आहेत. पिकाखालील जमिनीचा विचार केला तर भारत जगात दुसऱ्‍या क्रमांकावर आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, कोलकोत्ता ते मुंबई या चारही बाजूंचा विचार केला तर जैवविविधता, पशु-पक्षी, नदी-नाले, वाळवंट, बर्फवृष्टी होणारा प्रदेश यामुळे पिकांची विविधता आहे. त्याचमुळे भारताला जगाचे ‘बोटॅनिकल गार्डन’ असे संबोधले जाते. ही सर्व जमेची बाजू असताना आणखी दोन समस्या किंवा संधी भारतामध्ये तयार होत आहेत. भारतामध्ये शहरीकरणाचा वेग वाढत असून, पुढील ३० वर्षांत ५२ टक्के समाज शहरात, तर ४८ टक्के समाज गावात राहणार आहे. वाढते शहरीकरण ही समस्या मानण्याऐवजी कृषी पर्यटनासाठी ती संधी कशी होईल, याचा विचार करावा लागेल.

दुसरा विषय म्हणजे देशामध्ये वाढत असलेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या. एकूण लोकसंख्येच्या २० टक्के समाज ज्येष्ठ नागरिक होतील. याला आपण शहराची किंवा देशाची समस्या न मानता त्यांचा विचार करून कृषी तसेच ग्रामीण पर्यटनासाठी त्यांचा हातभार लागेल काय याचा विचार होण्याची गरज आहे. शहरांमध्ये लोकसंख्येचा फुगा फुगत असताना शहराच्या बाजूला ५० ते १०० कि.मी.च्या परिसरामध्ये पेरी अर्बन फार्मिंगला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. शहरातील पाण्यावर तसेच घनकचऱ्‍यावर प्रक्रिया करून त्याचा वापर शेतीसाठी करता येईल. तसेच शहराभोवती शेती करत असताना नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ अशा प्रकारच्या शेती उत्पादनांवर भर देता येईल. या प्रकारचे पीक उत्पादन घेण्यासाठी फार्म उभे राहत असतांनी कृषी पर्यटनाचा विचार करून त्याची रचना केली तर त्याचा दुहेरी फायदा होईल. एक तर अशा फार्ममधून तयार झालेले शेती उत्पादन ताज्या स्वरूपात शहरामध्ये पुरवठा करता येईल. या फार्मवर काम करण्यासाठी शहरामध्ये झालेले अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध होईल. या प्रकारचे फार्म कृषी पर्यटनाचा विचार करून सुरू केलेले असतील तर शहरातील नोकरदार, महिला शाळा- कॉलेजचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेटी देण्यासाठी उपयुक्त होईल.

खरे तर पर्यटनातून पर्यटकांना काहीतरी नवीन बघायला आवडते. पर्यटन केंद्रात मनोरंजन तसेच करमणुकीचे कार्यक्रम असतील तर त्यांचा वेळ चांगला जातो. पर्यटकांना त्यांचे बजेटमध्ये राहण्याची सोय झाली तर प्रतिसादही चांगला मिळतो. दररोजच्या जेवणाऐवजी वेगळ्या पद्धतीचे जेवण मिळाले तर सोने पे सुहागा. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पर्यटन करत असताना त्या ठिकाणी काहीतरी विकत घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे शॉपिंग केली तर आणखीनच आनंद. या सर्व गोष्टी कृषी पर्यटनातून सहज शक्य होतात. ग्रामीण पर्यटन हा मोठा विषय समोर ठेवून अनेक पद्धतीने पर्यटन केंद्र उभे करता येऊ शकते. उदा. कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, नैसर्गिक पर्यटन, साहसी पर्यटन, आरोग्य पर्यटन, ग्रामीण महोत्सव पर्यटन, शेती उत्पादन महोत्सव पर्यटन यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित पर्यटन केंद्रांची उभारणी झाली तर पर्यटकांनाही वेगळेपणा अनुभवता येतो. ग्रामीण पर्यटनामध्येही एक ठिकाण केंद्रस्थानी ठेवून त्याच्या आजूबाजूला विविध तंत्रज्ञान, पिके, व्यवसाय, उद्योग यांच्यासोबत नेटवर्क केले तर पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार विविध बाबींचा आनंद घेता येतो. त्यांच्यासोबत राहून ते काम करून शिक्षण घेता येते किंवा त्यातून आनंदही घेता येतो. यासाठी मुख्य पर्यटन केंद्रामध्येच जास्त पायाभूत सुविधा तयार करून इतर नेटवर्कच्या पर्यटन केंद्रामध्ये लहान स्वरूपात परंतु वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविता येईल. अशा प्रकारचे सामुदायिक ग्रामीण पर्यटन केंद्र मोठ्या गावामध्ये सुरू करून पर्यटकांना आकर्षित करता येईल. या प्रकारच्या पर्यटन केंद्राचा उपयोग शहरी भागातील सर्वच स्तरातील समाजाला होईल.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या आणि त्याबरोबरच निर्माण होणारे प्रश्‍न यांचा विचार केला तर अशा पर्यटन केंद्रामध्येच ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी किंवा काही ठरावीक कालावधीसाठी राहण्याची सोय करता येईल. शहरामध्ये त्यांच्या दैनंदिन खर्चापेक्षा निश्‍चितच अशा कृषी पर्यटन केंद्रामध्ये खर्च कमी असेल. अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे आर्थिक उत्पादनाचे साधने आहेत. परंतु त्यांना त्यांच्या मनासारखे राहून आनंद घेता येता नाही. नक्कीच अशा कृषी किंवा ग्रामीण पर्यटनातून त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध चांगला होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक कुवतीनुसार पर्यटन केंद्रामध्ये त्याच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार विविध प्रकारच्या सेवा सुविधा निर्माण करून देता येतील. अर्थात, अशा प्रकारच्या चर्चा आज अनोख्या किंवा वेगळ्या प्रकारच्या वाटत असतील तसेच काहींना या कल्पना नाही आवडणार. परंतु आता मळलेल्या वाटेवरून जाण्याऐवजी नवीन वाट शोधावी लागेल ती शेती आणि ग्रामीण विकास करून शहरी समाज सुखी ठेवण्यासाठी. भविष्याचा वेध घेऊन निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून सर्व समाजाचे आनंदी आणि शाश्‍वत जीवन राहण्यासाठी पुढील ३० वर्षे कृषी आणि ग्रामीण पर्यटनाची वाट धरावीच लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com