‘कस्तुरी’ गंध दरवळावा सर्वत्र

एकीकडे एका विशिष्ट ब्रॅण्डने भारतीय कापूस जागतिक पातळीवर नेऊन पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कापसाचे उत्पादन आणि निर्यातही घटत चालली आहे.
Cotton
CottonAgrowon

भारतीय कापसाला (Indian Cotton) जगभरात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कस्तुरी ब्रॅण्डने कापसाची (Cotton Kasturi Brand) विक्री केली जाणार आहे. खरे तर याची घोषणा सुमारे दोन वर्षांपूर्वी (७ ऑक्टोबर २०२०) तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दुसऱ्या जागतिक कापूस दिनाच्या दिवशीच केली होती. त्यावेळी त्यांनी कापसाच्या कस्तुरी ब्रॅण्डच्या लोगोचेही अनावरण केले होते. भारतीय कापसाची शुभ्रता, तेजस्विता, तलमता, शुद्धता, चमक, वेगळेपणा आणि भारतीयत्व या गुणवैशिष्ट्यांची ओळख जगाला होण्यासाठी कस्तुरी ब्रॅण्ड काम करणार आहे. कोणताही शेतीमाल जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग होणे गरजेचेच आहे.

भारत हा देश कापसाची जन्मभूमी मानला जातो. चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक कापसाचा वापरही भारतात होतो. कापूस निर्यातीतही आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो. परंतु मागील काही वर्षांपासूनच्या घटत्या उत्पादनाने निर्यात कमी झाली आहे. असे असताना कापसाचा ब्रॅण्ड विकसित करून जागतिक बाजारात पोहोचण्यासाठी आपल्याला खूपच उशीर झाला आहे. ब्रॅण्डच्या घोषणेनंतर भारतीय कापसाचा दर्जा काय, हे सांगण्याबरोबर प्रमाणीकरण आणि ब्रॅण्ड प्रमोशनकरीता निधीची उपलब्धता यासाठी तीन वेगळ्या समित्यांची स्थापना आता करण्यात आल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

Cotton
Cotton : कापूस आयात कापड उद्योगाच्या अंगलट का आली?

एकीकडे एका विशिष्ट ब्रॅण्डने भारतीय कापूस जागतिक पातळीवर नेऊन पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कापसाचे उत्पादन आणि निर्यातही घटत चालली आहे. मागील हंगामात कापसाच्या क्षेत्रात झालेली घट, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीने देशात कापसाचे उत्पादन ३१५ लाख (सर्वसाधारण उत्पादन ३५० लाख गाठी) गाठींपर्यंत खाली आले आहे. कापसाचे उत्पादन घटत असताना देशांतर्गत मागणी मात्र वाढत आहे. मागणी-पुरवठ्यातील तफावतीने कापसाचा शिल्लक साठा घटत चालला आहे.

Cotton
Cotton : कापूस निर्यातदर ही ओळख पुसली जाणार?

गेल्या हंगामात तर आपली गरज भागविण्यासाठी कापसाची आयात करावी लागली. ५ ते १० टक्के अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आपण सुदान, इजिप्त, अमेरिकेतून आयात करतो. परंतु आता आपली कापसाची आयात १५ ते २० टक्क्यांवर गेली आहे. दुसरीकडे निर्यात मात्र घटत आहे. हे असेच चालत राहिले तर आपल्या ब्रॅण्डिंगला काहीही एक अर्थ उरणार नाही. यातील दुसरा मुद्दा म्हणजे रुपयाच्या होत असलेल्या अवमूल्यनाने कापसासह सर्वच शेतीमालाची आयात आपल्याला खूप महागात पडतेय. त्यातच आयातीला नेहमीच अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय.

अशा परिस्थितीत आपल्याला कापसाचे उत्पादन वाढवावे लागेल. उत्पादन वाढविण्यासाठी कापसाची उत्पादकता वाढली पाहिजे. आपली कापसाची उत्पादकता केवळ ४६९ किलो कापूस प्रतिहेक्टर एवढी कमी आहे. चीन, ऑष्ट्रेलिया, अमेरिका या देशांची कापूस उत्पादकता आपल्या दुपटी-तिपटीने अधिक आहे. कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्याला या पिकाखाली मोठ्या प्रमाणात असलेले जिरायती क्षेत्र हंगामी सिंचनाखाली तरी आणावे लागेल. शिवाय गुलाबी बोंडअळीचे प्रभावी नियंत्रणही करावे लागेल. कापसाचे काही देशी वाण उत्तम गुणवत्तेची असून त्यात सघन लागवडीने उत्पादन वाढ शक्य आहे. अशावेळी देशातील १५ ते २० टक्के कापसाचे क्षेत्र देशी वाणांच्या सघन लागवडीखाली आणावे लागेल. जागतिक सेंद्रिय कापसाच्या ५३ टक्के उत्पादन भारतात होते. या कापसाचे देखील ब्रॅण्डिंगही झाले पाहिजे. कापसाचे जागतिक पातळीवर ब्रॅण्ड प्रमोशन करताना या देशातील कापूस उत्पादकांचे देखील भले होईल, अशी ध्येयधोरणे राबवायला हवीत. त्यासाठी कापसाच्या उत्पादन खर्चानुसार त्याला परवडणारा दर मिळाला पाहिजे. कापूस लागवड ते वेचणी यात यांत्रिकीकरणाला खूप वाव आहे, ते कामही देशात झाले तर उत्पादकांचे कष्ट वाचून उत्पादन वाढण्यास हातभारच लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com