Monsoon : पुढेही समाधानकारक मॉन्सूनचे संकेत

एल निनो भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल आणि ला निना अनुकूल मानला जातो. सध्या प्रशांत महासागरावर ला निना आहे आणि तो आणखी काही महिने टिकेल असे पूर्वानुमान आहे. यंदाचा मॉन्सून सामान्य राहील, असे दर्शवणारा हा एक चांगला संकेत आहे.
Monsoon
Monsoon Agrowon

नैर्ऋत्य मॉन्सूनच्या (Monsoon) आगमनाची सरासरी तारीख आपल्याला ठाऊक असली तरी दरवर्षी तो नेमका त्याच तारखेला येतो असे नाही. कधी तो काही दिवस उशिरा, तर कधी तो काही दिवस लवकर येतो. मॉन्सूनच्या परतीचेही (Monsoon Update) तसेच असते. मात्र मॉन्सूनच्या पर्जन्यमानाची (Monsoon Rain) आकडेवारी तयार केली जाते ती नेहमी १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी. मॉन्सून लवकर येओ किंवा उशिरा परत जाओ, या तारखा पुढेमागे केल्या जात नाहीत. असा चार महिन्यांचा निश्‍चित कालावधी ठरवल्याने मॉन्सूनचे सांख्यिकी विश्‍लेषण करणे सोपे जाते. त्याशिवाय एका वर्षीच्या मॉन्सूनचे दुसऱ्या वर्षीच्या मॉन्सूनशी तुलना करणेही सुलभ होते.

यंदाच्या वर्षी नैर्ऋत्य मॉन्सून केरळवर त्याच्या सामान्य तारखेच्या तीन दिवस आधी म्हणजे २९ मे रोजी दाखल झाला. तो महाराष्ट्रावरही थोडा लवकर दाखल होईल अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने तयारीही सुरू केली होती. पण अपेक्षेप्रमाणे झाले नाही. कोकण व गोवा उपविभागात मॉन्सूनने ११ जूनला प्रवेश केला, मराठवाड्यात १३ जूनला, तर विदर्भात १६ जूनला. तरीही महाराष्ट्रात मॉन्सूनचे दमदार असे आगमन जूनमध्ये झाले नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत राहिले आणि अनेक जागी पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चालू झालेल्या पावसाने खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येऊन त्या पूर्ण झाल्या आहेत.

पावसाचे विषम वितरण

मॉन्सूनच्या पावसाविषयी हे लक्षात घेतले पाहिजे, की देशभरात सर्वत्र समसमान पाऊस सहसा पडत नाही. तो काही प्रदेशात जोरदार असतो तर काही प्रदेशात हलका असतो. जून महिन्यात महाराष्ट्रात पाऊस कमी असताना आसाम-मेघालय आणि इतर पूर्वोत्तर राज्यांत भरपूर पाऊस पडला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली. लाखो लोक बेघर झाले. त्याच वेळी राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यात पावसाअभावी उद्‍भवलेल्या उष्ण लहरींनी जनता बेजार झाली.

Monsoon
शेतकऱ्यांसाठी मॉन्सून आणि सरकारही नॉट रिचेबल

१ जून ते ३० जून दरम्यान, देशभरात सामान्यापेक्षा ८ टक्के कमी पाऊस पडला होता. पण देशातील विविध प्रदेशांत परिस्थिती निराळी होती. पूर्वोत्तर राज्यांत तो २० टक्के अधिक होता, दक्षिणेकडील भागात २० टक्के कमी होता, तर देशाच्या मध्यवर्ती भागात तो सामान्यापेक्षा ३० टक्के कमी होता. देशाच्या मध्यवर्ती प्रदेशात तसेच महाराष्ट्र राज्यात दमदार पाऊस पडण्यासाठी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे गरजेचे असते. असे एक कमी दाबाचे क्षेत्र पहिल्यांदाच जुलैच्या सुरुवातीस निर्माण झाले. त्यानंतर महाराष्ट्रावरील पावसाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. जून महिन्यात अनेक धरणात आणि तलावात पाण्याचा साठा खूप खालावला होता. पुण्यासारख्या काही शहरांत पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली होती. पण जुलैच्या सुरुवातीस झालेल्या पावसानंतर त्यांतील पाण्याची पातळी लगेच वाढली. एवढी, की धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला. शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरला. खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा एकदा वेग आला.

Monsoon
Monsoon : किमयागार मॉन्सून

१५ जुलैपर्यंतची परिस्थिती

१ जूनपासून १५ जुलैपर्यंत देशभरात पडलेला एकूण पाऊस सामान्यापेक्षा १४ टक्के अधिक आहे. ही अतिशय समाधानकारक परिस्थिती म्हणता येईल. महाराष्ट्रापुरते बघायचे झाले तर कोकण व गोवा उपविभागातील १ जूनपासून १५ जुलैपर्यंत १६०० मिलिमीटर इतका पाऊस पडला, जो सामान्यापेक्षा ३४ टक्के अधिक आहे. या दीड महिन्याच्या एकूण कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, केवळ सांगली जिल्हा वगळता, सर्व जिल्ह्यांत पाऊस सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक मोजला गेला आहे. अनेक जिल्ह्यांत तो ५० टक्क्यांहून जास्त आहे. अर्थात, ही परिस्थिती कायम राहू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

मॉन्सूनच्या काळात उत्तर भारतावर राजस्थानपासून बंगालच्या खाडीपर्यंत पश्‍चिम-पूर्व असा एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हा पट्टा ज्या प्रदेशावर असतो त्या प्रदेशावर चांगला पाऊस पडतो. पण हा कमी दाबाचा पट्टा कायम एका जागी स्थिर नसतो. तो कधी थोडा दक्षिणेकडे तर कधी उत्तरेकडे सरकतो. त्याच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्राला चांगला पाऊस लाभला खरा. पण आता हा कमी दाबाचा पट्टा काहीसा उत्तरेकडे गेल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झालेली आहे. पावसाचे प्रमाण अशा प्रकारे कमी-जास्त होत राहणे सामान्य आहे. पाऊस आणि उघडीप आलटून पालटून मिळणे हे पिकांच्या वाढीसाठी आणि किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फायद्याचेच असते.

संभाव्य परिस्थिती

भारतीय मॉन्सूनची वातावरणीय प्रक्रिया केवळ भारतापुरतीच मर्यादित नसते. तिचे अनेक जागतिक सहसंबंध आहेत. त्यांपैकी एल निनो व ला निना या दोन प्रक्रिया सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. एल निनो व ला निना हे दोन्ही स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. पण त्यांचे भाषांतर न करता ते आहेत तसे अनेक भाषांत वापरले जातात. प्रशांत महासागराच्या पूर्व भागात जेव्हा सागरी तापमान सरासरीपेक्षा अधिक असते तेव्हा त्या परिस्थितीला एल निनो असे म्हणतात. उलट जेव्हा तेथील तापमान सरासरीपेक्षा कमी असते त्या परिस्थितीला ला निना म्हणतात. साधारणपणे एल निनो भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल आणि ला निना अनुकूल मानला जातो. सध्या प्रशांत महासागरावर ला निना आहे आणि तो आणखी काही महिने टिकेल असे पूर्वानुमान आहे. यंदाचा मॉन्सून सामान्य राहील असे दर्शवणारा हा एक चांगला संकेत आहे.

मॉन्सूनचे अजून दोन-अडीच महिने बाकी आहेत. त्यात पाऊस कसा असेल याविषयीची कल्पना हवामानशास्त्र विभाग वेळोवेळी देत राहीलच. दर शुक्रवारी संध्याकाळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कृषी हवामानाविषयी सल्ला दिला जातो. तो शेतकरी बंधूंनी आणि भगिनींनी अवश्य पाहावा आणि त्यात दिली जाणारी माहिती जाणून घ्यावी.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com