टिळा तेजाचा

इंद्रजित भालेराव माझे गुरुजी आहेत. त्यांनी मला विद्यार्थी आणि मित्र म्हणून जपलेलं आहे. २१ वर्षांपूर्वी माझे वडील गेल्यानंतर मी परभणीजवळ वडिलांनी घेतलेला नऊ एकराचा जमिनीचा तुकडा कसू लागलो. तेव्हा मी फारच एकटा राहत असे. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर वावरात अंधारपडेस्तोवर गड्यासोबत राबत असे. वावराला 'मळा' करण्याच्या नादापायी आई आणि मी रानात मरमर करीत असू. एकापाठोपाठ अकाली गेलेल्या भावाची आणि वडिलांची स्मृती जतन करण्याचा आमचा तो प्रयत्न होता.
टिळा तेजाचा

मराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी इंद्रजित भालेराव यांच्या जन्मषष्ठ्यब्दीपूर्ती वर्ष १ जानेवारी २०२२ ला झाली. वयाची साठ वर्षे पूर्ण करूनही या कवीराजाचा चेहरा तेजोमय दिसतो. कवीच्या काळजातली कविता आणि बाह्यचेहरा सदैव तेजोमय राहिलेला असून आपणासही तो टवटवीत दृष्टी दाखवतो. मराठी भाषेला 'तेजाचा टिळा' लावणारा हा सर्वमुखी कवी साहित्य विश्वात ताजेतवाणेपणा देणारा आहे. विचार आणि आचार जपून कवितेसह अनेकांच्या जीवनाला अर्थ व आशय देणारे गुरुजी सर्वांनाच प्रभावित करतात. इंद्रजित भालेराव माझे गुरुजी आहेत. त्यांनी मला विद्यार्थी आणि मित्र म्हणून जपलेलं आहे. २१ वर्षांपूर्वी माझे वडील गेल्यानंतर मी परभणीजवळ वडिलांनी घेतलेला नऊ एकराचा जमिनीचा तुकडा कसू लागलो. तेव्हा मी फारच एकटा राहत असे. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी पाच  वाजेच्या नंतर वावरात अंधारपडेस्तोवर गड्यासोबत राबत असे. वावराला 'मळा'  करण्याच्या नादापायी आई आणि मी रानात मरमर करीत असू. एकापाठोपाठ  अकाली गेलेल्या भावाची आणि वडिलांची स्मृती जतन करण्याचा आमचा तो प्रयत्न होता. त्यावेळी भालेराव गुरूजी घरी आले. प्रत्यक्षात महाविद्यालयीन(colloge) जीवनात मी त्यांच्या वर्गात(class) एकदाही शिकायला बसलेलो नाही. पण ते घरी आले आणि माझी जीवन शाळा समृद्ध करून गेले. 'श्रमातून-निगुतीने राब आणि शब्दांशी दोस्ती कर', अशी साधी पण सात्विक साद घालून गेले. शब्दांचा बाप असलेल्या माणसाने अशी साद घातल्यानंतर मी अधिकच कष्टवंत झालो. विविधांगी वाचन करत गेलो. शब्दांना आपलं मानत गेलो. दु:खातून बाहेर पडलो. भालेराव गुरूजी विद्यार्थ्यांना ३०० पुस्तकांची(books) यादी देऊन त्यांचं वाचन करून घेत. मी सखोल वाचन करून त्यांच्या तळकाळजात जाऊन बसलो. त्यांच्या काव्यवाचनाच्या व साहित्यिक उपक्रमांच्या कार्यक्रमांना ते मला घेऊन जायचे. मी त्यात एकरूप होऊन जायचो. गाडीत बसल्यावर ते एकदम खुलायचे. 'आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने' ही गो. पु. देशपांडे(p.l.deshpande) यांनी संशोधन व निरूपण केलेली, ज्योती सुभाष यांचे दिग्दर्शन लाभलेली आणि ठाशीव संगीताने उज्ज्वल करणारी संगीतकार समीर दुबळे यांची ध्वनिमुद्रिका त्यांनी मला पहिल्यांदा ऐकवली. लता मंगेशकर यांची 'शिवकल्याणराजा' ऐकवून त्यांनी माझ्या कानाची नीट मशागत करून घेतली. गाडी मौसमात येऊन पळायला लागली की, ते ही मूडमध्ये यायचे. गाणी-गोष्टी छान रंगायच्या. या प्रवासात त्यांनी शेकडो गझला- लोकगीतं- भावगीतं- भक्तिगीतं- क्रांतीगीतं- कविता- नाट्यपदं ऐकवली. शब्दांनी आणि संगीताने न्हाऊमाखू घातल्यामुळे मन आणि मेंदूला उधाण यायचं. त्यांनी मला सतत १२ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात बीजभाषणं, साहित्यमेळा, साहित्य परिषदा, व्याख्यानमाला, प्रचारसभा, पुस्तकांच्या दुकानांना भेटीगाठीसाठी नेलं. अनेक विषयांवरच्या गप्पाटप्पा, अनुभव आणि अंदाज यातून मी स्वतःला संपन्न करू शकलो. त्यांचा सहवास माझी ऊर्जा बनली. भालेराव गुरुजींच्या कवितेतील एक ओळ 'आम्ही कष्टाचंच खातो' मला मौलिक वाटते. हे अमरतत्त्व जगताना जपलं पाहिजे, याची खुणगाठ पक्की बांधली. भालेराव गुरूजी म्हणतात, 'कुणब्याच्या पोरा लढायला शिक'. मी अनेक गोष्टींशी पंगा घेतला आणि पुढंही घेत राहीन. 'शिवाजी अंडरग्राऊंड इन  भीमनगर मोहल्ला' नाटकाच्या सादरीकरणास परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली.  मी लढलो. परभणीत अभूतपूर्व दर्दी व गर्दीचा उच्चांक या नाटकानं मोडला. मळ्यातल्या सुबाभळीचा पाला चोरून नेणारा चोर पकडून नीट केला. अनेकदा 'काट्याकुट्याचा रस्ता'  तुडवीत गेलो. जीवनातले काटे-कुटे मोडून काढले. माणसांना 'लळा' लावायला त्यांच्याकडून शिकलो. शेतीत चांगले करण्याच्या वेडापायी महाराष्ट्र व देशभरातले 'सारे रान'  पालथे घातले. 'पीकपाणी' बहरास आणले. 'माझा शेतकरी बाप'  गीतसंग्रह लोकमतासाठी लेख लिहून लोकार्पण करण्याचे धाडस केलं. रा. रं. बोराडे सरांनी लेख वाचून ध्वनिफीत मागवली. 'तिफणसाज' असाच साजीवंत केला. 'गाऊ जिजाऊस आम्ही' म्हणून शाळेत मुलांकडून 'एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक'ची पारायणं केली. स्मृतिरंजनात अडकून न पडता मुलगी 'इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन, किरगिस्तान' येथे डॉक्टर होण्यासाठी पाठवली. भालेराव गुरुजींचे अनेक शिष्योत्तम लढणारे आहेत. कथाकार आसाराम लोमटे, कवी केशव खटिंग, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कथा लेखक बबन आव्हाड, कवी व आकाशवाणी निवेदक सुरेश हिवाळे, नाटककार त्र्यंबक वडस्कर ही नावं प्रातिनिधिक आहेत.         जगाच्या जंजाळात न अडकणारे कवी भालेराव शब्दांच्या गोतावळ्यात सदोदीत रमतात. कधीकधी स्वतःची बायको शारीरिक दुखण्याने रात्री-बेरात्री एकटीच निपचित पडून राहताना कवी मात्र मनासारखे शब्द लिहिल्यानंतर किंवा वाचन  केल्यानंतर समाधीस्थ व्हायचे. 'कुणी हे लिहिले, ते वाचले' म्हटल्यानंतर चटकन त्याच्याशी एकरूप होणारे हे इतर संसाराधीनांच्याकडे  निर्विकारपणे नुसतेच पाहणार. त्यांचा चेहरा मासूम वाटतो पण ते जास्तच तेजस्वी आहेत. या माणसाने शब्दाखातर जगण्यासाठी अनेकांना प्रसंगोचित फटकारलेही. फणफण करून शब्दांत तनमनरूपी होण्यात ते अतिशय एकटेच शब्दलुब्ध!         बुडबुडया जगात शब्दांचे झरे वाहते ठेवत जगणाऱ्या, शब्दांसाठी भटकंती करणाऱ्या, सृष्टीतील गवत- दगडानांही वाचा देणाऱ्या या कवीला आत्ताही  जन्माने माणसात राहावे लागते नाही तर हा 'रानसखा' आहे. या माणसाशी फक्त अन् फक्त शब्दांमुळेच दोस्ती किंवा बोलती राहते. शब्दाबाहेरच्या  गोष्टीत 'मला काय कळतंय ते'  किंवा 'तू-तुम्ही यासाठी  तिकडे  जा. त्यांना ते कळतंय', असे म्हणून आपल्याला नकळतपणे जाणीवपूर्वक दूर करणारे ते सौम्य शब्दांत समज देणार. स्वत: ढोरं  वळल्यामुळे वासराला ‘दोस्त' म्हणणार. 'माणसापरीस वासरं बरी'  हे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यावरून आपणास जाणवतं. जन्मानं खेड्यात-मातीत राबल्यामुळे आता शहरात येऊन मातीचे, तेथील सर्वच जित्राबाचे जगणे जगास सांगताना हा माणूस पुन्हा गावाकडे आताही वेधकपणे पाहतोय. मातीच्याच माणसांनी 'स्वयंभूपण'  टिकवले तर  'खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा)' ला चपराक बसेल, हे त्यांना पक्कं कळतंय. पण बेगडी दुनियेला आपली लिपाछीप दुसऱ्यांच्या रंगात रंगून करावीशी वाटते. झिंगलेली माणसं अन् गुंगलेल्या बाया, चिंतामणी दगडासारखी इकडच्या-तिकडच्या बाजूला वळून रमणारी पोरं, गावच्या परक्यापणाला 'आम-दार' 'खास-दार' 'नाम-दार'   अशी  कवाडं करून कोरायलीत हे त्यांना स्पष्ट दिसतंय. इथूनच नव्याने 'गाव करी ते राव काय करी?'ची  मशाल पेटवण्यासाठी त्यांचे शब्द काही पोरांना  कळू लागलीत. कुठल्याही गोष्टीत 'कळणं... शहाणं होणं...'  हे समृद्धीकडं जाणारं असतं. यासाठी कवीचा व्यासंग घेऊन-नवी मेख हातात घेऊन पिढी  चालत आहे. हेच शब्दांचं थोरपण महत्वाचं आहे. कवीला त्याचंच समाधान आहे.     गंभीर कवीला आणि कवितांना त्यामुळे मंचीय व पुस्तकीय साद योग्य लाभते. मंचीय कविता सादरीकरणात कवी नारायण सुर्वे यांच्या नंतर आब राखणारे कवी इंद्रजित भालेराव वाटतात. कवी आणि रसिक एकमेकांत गुंफणे हे या दोघांना लाभले.     इंद्रजित भालेराव या कवीच्या बाबतीत मला एक प्रयोग करायचा होता. त्यांच्यावर सर्व प्रकारचे लेखन/संशोधन/माहितीपट आलेले आहेत. या कवीचे चित्रमय चरित्र अर्थात, फोटो बायोग्राफी (इंद्रजित भालेराव जीवनकाव्य) मला प्रसिद्ध करायचं होतं. २० जानेवारी २०२१ रोजी या अनुषंगाने मी त्यांच्याकडे फोटोंची मागणी केलेली होती. अरूण शेवते यांना गळ घालून त्याचं प्रकाशन कवी गुलजार यांच्या हस्ते करण्याचा माझा इरादा पक्का होता. पण 'वयोमान, प्रकृतिमर्यादा यामुळे गुलजार लाभणार नाहीत', असं शेवतेंनी स्पष्ट सांगितलं. हा एकलहाती प्रयोग असाच एकटा राहिला. कवीसाठी माझ्या दृष्टीने ही कृतज्ञता साध्य झाली नाही, याची काळजातली आस सदैव भळभळेल. चित्रप्रकल्प पु.ल. देशपांडे, सुधीर फडके, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांचे आलेले आहेत...आणि आता जर इंद्रजित भालेराव यांचे आले  असते तर... कवी भालेराव यांनी रसिकता-मानवता-वैचारिकता- गंभीरता-प्रामाणिकपणा-संशोधन- गुणग्राहकता-कृतज्ञता जपणारी मांदियाळी निर्माण केली. मराठी कवितेसाठी 'शब्दसह्याद्री साहित्य सन्मान' चळवळ सुरू केली. लाखो रुपये मदत करूनही सहजता जपली. ते जिथे-जिथे गेले, वाचन- लेखन करणाऱ्याला भेटतात, आपलेसे करतात. द. ता. भोसले, किशोर कदम उर्फ सौमित्र, नारायण सुर्वे, उत्तम कांबळे, अनुराधा पाटील, आर. आर. पाटील अशा दिग्गजांना भेटायला जाताना त्यांनी मला मुलासारखे सोबत नेले. त्या माणसांचे वाचन-वागणे मला भावले. माणूस म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचे ते क्षण मला आजही आठवतात. ---------- अरूण चव्हाळ, परभणी ७७७५८४१४२४, ९१५६७६७६०५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.