सबसे बडा रूपय्या...

देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हा एका डॉलरची किंमत चार रुपये होती. आज ती ७७.४५ वर येऊन पोहोचली आहे. २०१२ ते २०२२ या दहा वर्षात रुपया ३८ रुपयांनी कमजोर झाल्याचे स्वतः रिझर्व्ह बँकेने मान्य केले आहे.
सबसे बडा रूपय्या...
Indian RupeeAgrowon

‘करन्सी के साथ देश की प्रतिष्ठा जुडी होती है, जैसे-जैसे करन्सी गिरती है वैसे-वैसे देश की प्रतिष्ठा गिरती है.’ असं वक्तव्य दिवंगत खासदार सुषमा स्वराज यांनी २९ ऑगस्ट २०१३ रोजी संसदेत केलं होतं. आज भारतीय रूपयाच्या घसरगुंडीवर सगळीकडे स्वराज यांची हीच व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. महागाईचा आगडोंब उसळल्याने रस्त्यावर उतरलेल्या जनतेने केलेले लंकादहन आणि दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन झाल्याने भारतात वाढलेली प्रचंड महागाई. दोन्ही शेजारी राष्ट्रात एकाच वेळी घडलेल्या घटनांना योगायोगच म्हणावं लागेल. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या भारतीयांना रुपयाच्या अवमूल्यनामुळे आणखी महागाईचे चटके सोसावे लागणार यात शंका नाही. कारण मागील काही दिवसांपासून उताराला लागलेला रुपया थांबायचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी एका डॉलरची किंमत ७७.४५ रुपये इतकी नीच्चांकी नोंदवली गेली होती. आजवरची रुपयाची ही सर्वांत मोठी घसरण आहे.

रूपयाच्या घसरण्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. कारण विदेशातून जे सामान आपण खरेदी करतो त्याचे मूल्य डॉलरमध्ये होत असते. रुपयाची किंमत घसरली की, आयात केल्या जाणाऱ्या सामानाकरिता अधिक पैसे मोजावे लागतात. उदाहरण डॉलरची किंमत जेव्हा सत्तर रुपये होती तेव्हा शंभर डॉलर किमतीच्या वस्तू करिता सात हजार रुपये द्यावे लागत होते. आता डॉलरची किंमत ७८ रुपये झाल्याने तितकं सामान घेण्याकरिता सात हजार आठशे रुपये मोजावे लागतात. त्यामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होणे स्वाभाविक आहे.

रुपयाच्या अवमूल्यनामुळे वाढत असलेली महागाई सर्वसामान्यांसह रिझर्व्ह बँकेपुढेही मोठे आव्हान निर्माण करत आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याकरिता रिझर्व्ह बँकेने व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या झोळीत अतिरिक्त पैसा येणार असला तरी सर्वसामान्य कर्जदारांचा खिसा मात्र रिकामा होणार हे स्पष्ट आहे. यासोबतच डॉलर आणि रुपयाचे संतुलन साधण्याची तारेवरची कसरतही रिझर्व्ह बँकेला करावी लागत आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात स्वतःकडे असलेली विदेशी मुद्रा खर्च करावी लागत आहे. मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेने २० अरब डॉलरपेक्षाही अधिक विदेशी मुद्रा खर्च केली आहे. या निर्णयाने एकंदरीत रिझर्व्ह बँकेच्या जमापुंजीला मोठी खिंडार पडली आहे.

रुपया घसरल्याने भारताच्या क्रूड ऑइल (कच्चे तेल) खरेदीवरही विपरीत परिणाम झाला आहे. कारण भारत क्रूड ऑइलची सर्वाधिक आयात करीत असतो. याच क्रूड ऑइलपासून पेट्रोल आणि डिझेल बनविले जाते. त्यासोबतच भारत एलपीजी आणि सीएनजी गॅस सुद्धा आयात करीत असतो. त्यामुळे रुपया जसजसा घसरतो तसतसा या वस्तू खरेदीकरिता अधिक पैसा मोजावा लागतो. त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होत असतो. मागील काही दिवसांत पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीमध्ये जी वृद्धी बघत आहोत त्यासाठी रुपयामध्ये होणारी घसरण हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव वाढणे म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढणे, वाहतुकीचा खर्च वाढणे म्हणजे वाहतूक भाड्यात वाढ होणे, पर्यायाने वहन केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंच्या किमतीत वाढ होणे. हे साधे अर्थशास्त्रीय समीकरण आहे. बरं भारत फक्त पेट्रोल, डिझेल आणि गॅसच आयात करत नाही तर रासायनिक खते आणि

खाद्यतेल सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करीत असतो. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया जसा कमकुवत होत जाईल, तसा या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ नोंदवली जाईल, हे स्पष्ट आहे. (भारत निर्यातीपेक्षा आयात अधिक करत असल्याने ही स्थिती ओढविल्याचे दिसून येते.) मात्र एप्रिल २०२२ मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये २० टक्क्यांची वृद्धी होऊनही व्यापारी तोटा कमी होण्याऐवजी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ मध्ये भारताची व्यापारी तूट जीडीपीच्या २.७ राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

त्यातच दिवसेंदिवस रुपयाच्या सुरू असलेल्या घसरणीमुळे शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी १.३८ लाख करोड रुपयांचे शेअर्स भारतीय बाजारातून काढून घेतले आहे. तर दुसरीकडे रुपयांच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने अमेरिकन बाजारातील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. मोठा गाजावाजा करून बाजारात उतरविलेला एलआयसीचा IPO तोंडघसी पडला आहे. इतकंच नाही तर ज्या विदेशी बँका व संस्थांकडून भारताने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले ते कर्ज किंवा त्यावरील व्याज फेडताना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

वित्त मंत्रालयाने मार्च २०२२ मध्ये जारी केलेल्या त्रैमासिक अहवालानुसार ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या कालावधीपर्यंत भारतावर ६१४.९ बिलियन अमेरिकन डॉलरचे कर्ज आहे. तर याच कालावधीत पाकिस्तानवर ५१.७२४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे कर्ज आहे. येथे पाकिस्तानची आकडेवारी देण्याचा उद्देश हा की भारतातल्या एका मोठ्या घटकाला आपल्यापेक्षा पाकिस्तानवर अधिक कर्ज आहे, याचा अघोरी आनंद होत असतो. तर आपला शेजारी चीनवर कुठलेच कर्ज नसून उलट त्यानेच जगभरातील साठच्यावर देशांना दीर्घ मुदतीचे कर्ज दिले आहे. चीनच्या या कर्जाच्या सापळ्यात अनेक देश अडकलेत आहे. पुरते कंगाल झाले आहेत. (श्रीलंकेचे उदाहरण ताजे आहे.)

प्रत्येक देशाचा एक विदेशी मुद्रा कोष असतो आणि ज्यामध्ये डॉलर पर्याप्त मात्रेत असणे गरजेचे असते. श्रीलंकेचा हाच कोष रिक्त झाल्याने त्यांच्यावर दिवाळखोरीचे संकट ओढवले होते. कारण जगभरातील ८० टक्के व्यापार हा डॉलरमधेच होत असतो. विदेशी मुद्रा कोषामध्ये डॉलर मोठ्या प्रमाणात असल्यास त्या देशाचे चलन वधारलेले असते. भारताचा का कोष रिक्त झाला नसला तरीही मागील तीन हप्त्यात सहा अरब डॉलरने कमी झाला आहे. सध्या भारताचा विदेशी मुद्रा कोष सहाशे बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षाही कमी आहे.

अशातच युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदारांनी अमेरिकन बाजारातून डॉलर बाहेर काढला नाही. त्यामुळेही बाजारात डॉलरची टंचाई जाणवत आहे. त्यातच रूपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक बाजारातून पैसा काढून तो अमेरिकन मार्केटमध्ये गुंतविला आहे. त्यामुळे रुपयाची घसरण अधिक झाली आहे. रुपयाची घसरण आणि देशात वाढलेली प्रचंड महागाई यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याकरिता विद्यमान सरकार ज्ञानवापी मस्जिद विवाद, ताजमहाल, कुतुबमिनार, हनुमान चालीसासारखे वाद उकरून काढत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट २०१३ रोजी गांधीनगर येथील सभेला संबोधित करताना तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री (विद्यमान प्रधानमंत्री) नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक वक्तव्य येथे नमूद करावेसे वाटते. ते म्हणाले होते, ‘केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेशी, महागाईशी आणि घसरणाऱ्या रुपयांशी काही देणे-घेणे नाही, त्यांना केवळ आपली खुर्ची वाचवायची आहे. नेतृत्व जेव्हा दिशाहीन असतं तेव्हा देशाला असे दिवस बघावे लागतात.’ प्रधानमंत्र्यांना स्वत:च्या याच वक्तव्याचे स्मरण शक्य तितक्या लवकर व्हावे, अशी अपेक्षा करूया. कारण सगळी सोंगं आणता येतात मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही. शेवटी एवढंच की, ‘बाप बडा न भैय्या, सबसे बडा रूपय्या.’

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com