काळाबाजार करणाऱ्यांवर करा कडक कारवाई

शेतकऱ्यांनी बाजारातून मिश्र खते विकत आणण्याऐवजी घरीच सरळ खतांचे मिश्रण करून दर्जेदार मिश्र खते तयार करायला हवीत.
काळाबाजार करणाऱ्यांवर करा कडक कारवाई
fertilizeragrowon

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील राज्यात बियाणे, रासायनिक खते यांचा तुटवडा भासणार नाही, असे आश्‍वासन कृषी विभागाने दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाण्यांचा पुरवठा व्हावा, याबाबत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश राज्यस्तरीय खरीप(Kharif) आढावा बैठकीत दिले आहेत. शेताच्या बांधावरील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यात कापूस, सोयाबीनसह इतरही पिकांच्या बियाण्याचे दर वाढले आहेत. रासायनिक खतांच्या दरातही २० ते ८० टक्केपर्यंत वाढ झाली आहे. हे कमी की काय, राज्यात खते, बियाण्यांमधील गैरप्रकारही मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. रासायनिक खतांचा (प्रामुख्याने मिश्र खते) काळाबाजार करणाऱ्यांचीही राज्यात कमी नाही. खतांच्या (fertilizers)काळाबाजाराला कृषी विभागातूनच पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्वतः विशेष पथके नेमून राज्यात टाकलेल्या धाडीमध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. या पथकाने प्रमाणित खतांच्या विक्रीत गुंतलेल्या सहा कंपन्या शोधल्या असून, त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाईचे निर्देश राज्य सरकारला(State Government) दिले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उत्पादनवाढीसाठी बियाण्‍यानंतर दुसरी महत्त्वाची निविष्ठा म्हणून रासायनिक खतांचा वापर होतो. काही भ्रष्ट अधिकारी आणि नफेखोर कंपन्या यांच्या संगनमताने या दोन्ही निविष्ठांत मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळताना दिसत नाही. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळू नयेत, यापेक्षा दुर्दैवी बाब तरी कोणती म्हणावी? रासायनिक खतांची दरवाढ, त्यांचे केले जात असलेले लिंकिंग,(Linking) त्यात होत असलेली भेसळ आणि त्यांचा निकृष्ट दर्जा याचा राज्यातील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून चांगलाच फटका बसत आहे. निविष्ठा नियंत्रण यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमत-सहमतीशिवाय हे सर्व गैरप्रकार चालत नाहीत, हेही सत्य आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून केंद्र सरकारच्या धाडीमधून पुढे आलेल्या खतांचा अनधिकृत व्यापार करणाऱ्यांची राज्य सरकारने कसलीही गय न करता तत्काळ कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलायला हवे.

संयुक्त दाणेदार खतांबद्दल शेतकऱ्यांना फारशी माहिती नव्हती, त्या वेळी मिश्र खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. त्या वेळी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश अशा सरळ खतांचा वापरही अधिक होता. त्यामुळे केंद्र-राज्य शासनानेच मिश्र खतांची(Mixed fertilizers )निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला शासनाच्याच काही अंगीकृत संस्था मिश्र खते बनवीत होत्या. पुढे मिश्र खतांची वाढती मागणी आणि निर्मितीची सोपी प्रक्रिया पाहून यात स्थानिक उद्योजक उतरले. सरळ खतांचे भौतिक मिश्रण करून मिश्र खते निर्माण केली जातात. सरळ खतांचे हे एक प्रकारे फावडा मिश्रण असल्याने यांत भेसळ करण्यास, त्यांचा दर्जा निकृष्ट राखण्यास मोठा वाव आहे. काही नफेखोर कंपन्यांनी मिश्र खतांत भेसळ करून, कमी दर्जाची खते निर्माण करून आपला गल्ला भरण्याचे काम केले. संयुक्त दाणेदार खतांच्या तुलनेत मिश्र खते थोडी स्वस्त असल्याने पेरणीच्या वेळी याचा वापर शेतकऱ्यांकडून होत असताना ती उत्तम दर्जाचीच बाजारात येतील, याची काळजी शासनाने घ्यायला हवी. शेतकरी आपल्या घरीदेखील सरळ खतांचे मिश्रण करून दर्जेदार मिश्र खते बनवू शकतो. कोणत्या सरळ खतांचे किती प्रमाणात मिश्रण केले म्हणजे कोणते मिश्र खत बनते, याचा एक चार्ट सुद्धा कृषी विभागाने(Department of Agriculture) केला आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना घरीच मिश्र खते तयार करून वापरावीत. मिश्र खतांच्या ऐवजी नामांकित कंपन्यांच्या संयुक्त दाणेदार खतांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. संयुक्त दाणेदार खते थोडी महाग असली तरी ती रासायनिक मिश्रणाने बनविली जात असल्याने त्याचे चांगले परिणाम शेतकऱ्यांना मिळतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com