निसर्गात हस्तक्षेप घातक

नदीजोड प्रकल्पाचा हेतू समन्यायी पाणीवाटप, असा उदात्त आहे. परंतु त्याच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी असून हे काम खूपच खर्चिकदेखील आहे.
निसर्गात हस्तक्षेप घातक

नदीजोड प्रकल्पाचा पर्यावरणाप्रमाणे मॉन्सूनच्या चक्रावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा यातील अभ्यासकांनी नुकताच दिला आहे. राष्ट्रीय नदीजोड हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील ३० नद्या जोडण्याची संकल्पना आहे. त्यांपैकी एक म्हणजे केन-बेतवा प्रकल्प. २०२२-२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केन-बेतवा प्रकल्पाला ४४ हजार ६०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांसाठी हा प्रकल्प असून, त्याद्वारे दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमधील १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, लाखो लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल, यावरील विद्युत प्रकल्पांद्वारे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होईल, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. निधी मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, त्याला विरोधही होत आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प आहे. त्यांच्या काळात हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून बरीचशी कामेही झाली. परंतु त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या यूपीए सरकारला या प्रकल्पासाठीचा खर्च आणि त्यास लागणारा कालावधी, यामुळे हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे त्यांच्या काळात नदीजोड प्रकल्प मागे पडला. २०१२ मध्ये नदीजोड प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमाद्वारे राबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन केंद्र सरकारला दिले. २०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन भाजपप्रणीत एनडीएचे सरकार सत्तेत आले. भाजपच्या जाहीरनाम्यात नदीजोड प्रकल्प असल्याने त्यांनी हा प्रकल्प पुन्हा नव्याने हाती घेतला. महत्त्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या जवळपास आठ वर्षांच्या काळात देशात एक-दोन ठिकाणीच नदी जोड प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

मॉन्सूनची दूर देशीची निर्मिती प्रक्रिया, त्याची व्याप्ती पाहता दोन-चार लहान-मोठ्या नदीजोड प्रकल्पाने मॉन्सून चक्रावर विपरीत परिणाम होणार नाही. परंतु असे अनेक प्रकल्प झाले, तर मग मात्र त्याचा मॉन्सूनच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामागचे कारण म्हणजे मॉन्सूनच्या चक्रात नद्यांचे मोठे महत्त्व आहे. पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणी नदी-नाल्यांद्वारे समुद्राला जाऊन मिळते. समुद्राच्या पाण्याचीच वाफ होऊन ढगांची अथवा मॉन्सूनची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. अशावेळी नद्यांतील पाणी आपण जोड प्रकल्पांद्वारे अडवून ते मध्येच फिरवीत राहिलो, समुद्राला जाऊच दिले नाही, तर हे जलचक्र बिघडू शकते. आधीच हवामान बदलामुळे मॉन्सून अनियमित झाला आहे, त्यात नदीजोड प्रकल्पामुळे नद्यांचे मूळ स्वरूप, पाण्याचे नैसर्गिक वहन यातच बदल होणार असून, या बाबी पर्यावरणास पर्यायाने मॉन्सूनला घातक ठरू शकतात.

नदीजोड प्रकल्प एक संकल्पना म्हणून चांगले आहे, त्याचा हेतूही समन्यायी पाणीवाटप असा उदात्त आहे. काही नदी खोऱ्यात जादा पाणी असल्याने ते पाण्याची तूट असलेल्या खोऱ्याकडे वळविणे हे वरकरणी सोपे वाटत असले तरी त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत, शिवाय हे काम खूप खर्चिक देखील आहे. एका विभागातून दुसऱ्या विभागात पाणी नेणे, हे भांडण-तंटे निर्माण करणारेही आहे. पर्यावरणीय जलविज्ञानात कोणत्याही नदी खोऱ्यात जादा अथवा कमी पाणी, हा प्रकारच मानत नाही. नदी खोऱ्यात जे काही पाणी असते ते त्या खोऱ्याच्या पर्यावरणाला साजेसे असते. त्यामुळे नदी जोड प्रकल्पाद्वारे एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे म्हणजे भविष्यात दोन्ही खोऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. दुष्काळावर मात करण्यासाठी धरणे, वॉटर ग्रीड अथवा नदीजोड असे मोठे प्रकल्प नाही तर मृद्‍-जलसंधारणाद्वारे पाणलोट क्षेत्राचा शाश्‍वत विकास, पावसाच्या पाण्याचा छोट्या तलावांत संचय आणि त्याचा प्रत्येकाकडून कार्यक्षम वापर असे उपाय योजावे लागतील, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com