थेट विक्रीचा जावळे पॅटर्न

उत्पादक ते ग्राहक या साखळीत दर तिप्पट-चौपट वाढलेले असतात. थेट शेतीमाल विक्रीत हा दरवाढीचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडतो.
थेट विक्रीचा जावळे पॅटर्न
MangoAgrowon

आज आपण पाहतोय नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamity) शेती करणे, शेतीमालाचे उत्पादन (Agriculture Production) घेणे फारच कठीण झाले आहे. परंतु यावर मात करीत ज्वारी, सोयाबीनपासून (Soybean) ते द्राक्ष (Grape), डाळिंबापर्यंत (Pomegranate) दर्जेदार शेतीमालाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. परंतु या शेतीमालाच्या विक्रीची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गहन होत चालली आहे. नाशिवंत शेतीमाल शेतकरी जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही, आर्थिक अडचणींमुळे बहुतांश शेतकऱ्यांना तत्काळ शेतीमालाची विक्री करावी लागते. या दोन अडचणींमुळे व्यापारी दराबाबत शेतकऱ्यांची कायम कोंडी करीत आला आहे. गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, हरभरा अशा धान्य पिकांचे ऐन हंगामात दर पडलेले असतात. किंबहुना, व्यापारी ते मुद्दाम पाडतात. या शेतीमालास हमीभावाचा आधार आहे. परंतु बाजार समित्यांमध्ये बहुतांश वेळा काही ना काही कारणे सांगून हमीभाव डावलला जातो. बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांची मनमानी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची लूट तर जगजाहीर आहे.

आंबा, द्राक्ष, केळी, डाळिंब अशा फळपिकांच्या खेडा खरेदीतही व्यापारी आडून भाव मागतात. एवढेच नाही तर अशा खेडा खरेदीच अनेक शेतकऱ्यांची फसवणूकही होते. काही शेतकरी पीक पद्धतीत बदल करून उच्च मूल्य असलेल्या फळे-भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. परंतु अशा फळांच्या खरेदीस देखील अनेक वेळा व्यापारी तयार होत नाहीत. तयार झाले तर भाव पाडून मागतात. अशावेळी उगीच आपण पीक पद्धतीत बदल केल्याची खंत शेतकऱ्यांना वाटून जाते. काहीसा असाच अनुभव वणी, जि. यवतमाळ येथे प्रांत अधिकारी असलेल्या डॉ. शरद जावळे यांना पण आला. त्यांनी सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांना बगल देत केसर आंब्याची लागवड केली. या वर्षी आंब्याच्या पहिल्याच उत्पादनात विक्रीच्या अडचणी त्यांच्या समोर आल्या. त्यांनी पिकविलेले केसर आंबे निर्यातक्षम दर्जाचे असले तरी माल कमी आहे, गुजरातचा केसर यंदा खूप आलाय, अशी कारणे सांगून व्यापारी भाव पाडून मागत होते. यामुळे डॉ. जावळे यांच्याबरोबर त्यांच्या वडिलांची देखील आंबा विक्रीची चिंता वाढली होती.

अशावेळी प्रांतअधिकारी असलेले डॉ. जावळे थेट आंबा विक्रीत उतरले. केसर आंब्याचे व्यवस्थित पॅकिंग करून त्यांनी बागेचे, आंबा तोडतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले असता त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ९० रुपये प्रतिकिलोने व्यापाऱ्यांनी मागितलेले आंबे त्यांनी स्वतः मार्केटिंग करून १७० रुपये किलो दराने थेट ग्राहकांना विकले. त्यांचे हे काम अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी तसेच दिशादर्शक आहे. शेतकरीसुद्धा थेट शेतीमालाची विक्री करू शकतात, हा आत्मविश्‍वास त्‍यांच्यामध्ये निर्माण करणारे आहे. आजही आपण पाहतोय शेतकरी अथवा त्यांची मुले थेट शेतीमाल विक्रीसाठी तयार होत नाहीत. जग-समाज काय म्हणेल, अशी भीती त्यांच्या मनात असते. ही भीती शेतकऱ्यांनी, त्यांच्या मुलांनी मनातून काढून टाकायला पाहिजेत. ज्यांना शेतीमालाची थेट विक्री करणे शक्य आहे, त्या शेतकऱ्यांनी स्वतःच विक्री केली पाहिजेत. डॉ. जावळे यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांची जी मुले शहरात सरकारी-खासगी नोकरीत आहेत, त्यांनी आपल्या घरच्या शेतात पिकलेल्या शेतीमाल विक्रीत उतरायला पाहिजेत. थेट शेतीमाल विक्रीचा जावळे पॅटर्न राज्यात सर्वदूर पोहोचायला हवा. उत्पादक ते ग्राहक या साखळीत दर तिप्पट-चौपट वाढलेले असतात.

थेट शेतीमाल विक्रीत हा दरवाढीचा लाभ उत्पादकांच्या पदरात पडतो. बाजार व्यवस्थेतील लूट, फसवणूकही थेट शेतीमाल विक्रीने थांबते. सोशल मीडियाने आता ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. आपला माल उत्तम दर्जाचा असेल आणि आपली सेवा चांगली असेल तर थेट शेतीमाल विक्री हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com