बदलत्या हवामानानुसार खरीप पीक नियोजन

प्रत्येक शेतकरी स्वतः वर्षभरात पीकविण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करीत असतो. अशावेळी सर्व शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेतीपद्धतीसाठी प्रवृत्त करणे ही गावाची सामूहिक जबाबदारी आहे.
बदलत्या हवामानानुसार खरीप पीक नियोजन
Kharif SowingAgrowon

बदलत्या हवामानात गावातील शेतीमध्ये अनुकूल बदल घडवून आणायचा असल्याने प्रत्येक गावामध्ये नव्याने शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. गावाच्या शेती विकासासाठी गटीत केलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील कृषी विकास समितीस अशी आवश्यकता वाटणे आणि त्यानुसार कृती कार्यक्रम तयार करणेही गरजेचे आहे. या समितीमध्ये कृषी विभागाचा अधिकारी सदस्य असल्याने त्यांच्या तांत्रिक साह्याने समितीस खरीप तसेच रब्बी हंगामाचे नियोजन करणे शक्य आहे.

सामूहिक निर्णयाची गरज

उपलब्ध माहितीचा उपयोग कशासाठी आहे आणि असेलच तर तो कसा करायचा याबाबत गावांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे तसेच उपलब्ध माहितीची उपयुक्तता पटवून देणे हे खरे आव्हान आहे. हे काम केवळ एक-दोन वेळा चर्चा करून पूर्ण होणार नाही. यासाठी गावातील शेतीच्या समस्यांशी ही माहिती कशी निगडीत आहे आणि त्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध माहितीचा किती चांगला उपयोग होऊ शकतो, हे प्रत्यक्ष उदाहरणावरून तसेच स्वतःच्या अथवा इतरांच्या अनुभवावरून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना पटणे आवश्यक आहे.

पाण्याची समस्या जरी सर्वांना परिचित असली आणि ती स्थानिक पातळीवर सोडविणे शक्य नाही असा दावा गावातील काही व्यक्ती करत असतील तरी या समस्येची शास्त्रीय पद्धतीने आणि सोप्या भाषेत उकल करणे, त्यावरील उपाय गावातील शेतकऱ्यांच्या हातात आहे हे पटवून देणे शक्य आहे. पाण्याबद्दल सखोल चर्चा करताना प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांना नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागते त्यांचे अनुभव समजून घ्यायला हवेत. शाश्‍वत पाण्यापासून वंचित असलेले असे शेतकरी निर्णय प्रक्रियेमध्ये नेहमीच मागे राहतात, परिणामी गावातील मोठ्या वर्गाची शेती उत्पादकतेमध्ये मागेच राहते. पाण्याच्या प्रश्‍नामुळे शेतीच्या नियोजनाकडे गंभीरतेने घेण्यास सुरुवात होऊन आगामी हंगामातील पिकांचे नियोजन आणखी समन्यायी तसेच उपलब्ध संसाधनाचा सुयोग्य वापर करणारे होऊ शकते. याबरोबरच गावात असलेल्या जलसंधारण संरचनांची तसेच गावातील तलावांची देखभाल करण्याची जबाबदारी गावाने घेणे आवश्यक आहे. यामुळे गावात शाश्‍वत स्वरूपात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. ही बाब गावकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे.

पिकांच्या नियोजनामध्ये पाण्याबरोबरच इतरही घटक विचारात घ्यावे लागतात. स्थानिक हवामानास सुयोग्य पिके, पिके लागवडीचे तंत्रज्ञान आणि सल्ला, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि बदलत्या हवामानास तोंड देणाऱ्या बियाण्याची व इतर निविष्ठांची उपलब्धता, काढणी पश्‍चात व्यवस्था, मूल्यवृद्धीच्या संधी, बाजाराभिमुख पीकपद्धती आदी घटकांचाही पाण्याइतकाच गांभीर्याने विचार करावा लागतो. म्हणून उपलब्ध माहितीचे कृतीमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. गावातील निर्णय प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत आणि बुजुर्ग लोकांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्याबरोबरच गावातील युवकांनी तसेच महिलांनी या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. म्हणून या सर्व विषयांवर सार्वमत होण्यासाठी ग्राम कृषी समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा या सर्व पातळीवर विचारविनिमय होणे गरजेचे आहे. याची सुरुवात हंगामापूर्वी प्रत्येक गावामध्ये एका विशेष बैठकीचे आयोजनाने करायला हवी.

हंगाम बैठकीस सरपंच, कृषी विकास समितीचे सदस्य, ग्राम पंचायतीचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, प्रगतिशील व इतर शेतकरी, पशुपालक, शेतकरी/महिला बचत गटाचे सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, कृषी ताई, कृषिमित्र, महावितरणचे लाइनमन, वनपाल, गावाशी संबंधित सिंचन प्रकल्पाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित असायला पाहिजेत.

शेतीविषयक नियोजन

अशा नियोजनाच्या चर्चेची सुरुवात पाऊस पाण्याने करावी. गावामध्ये मागील वर्षी पडलेल्या पावसाबद्दल तपशीलवार म्हणजे एकूण पाऊस, महिनानिहाय पाऊस, पावसाचे दिवस अशी माहिती द्यावी. गावासाठीचा पाऊस मोजण्याचे पर्जन्यमापक यंत्र कोठे बसवले आहे तसेच महसूल मंडळाचे ठिकाणी असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे पाऊस, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग व दिशा याबाबत संकलित होत असलेल्या माहितीबद्दल चर्चा करावी. मागील वर्षी गावामध्ये पेरणी झालेल्या पीकनिहाय क्षेत्राची माहिती द्यावी. मागील दोन्ही हंगामात घेतलेल्या पिकांवर पडलेल्या किडी-रोगांची माहिती सांगावी. मागील खरिपातील पिकांची एकरी उत्पादकता किती? गावामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती उत्पादकता आली, याबद्दल माहिती सांगावी.

शेतीसाठी पाण्याचा ताळेबंद

गावाची पाण्याची गरज ठरवताना वापरलेल्या घटकांची (लोकसंख्या, पशुधन, पिके, जमीन उपयोगिता) माहिती द्यावी. पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी पिकाने किती पाणी वापरले, जलसंधारण कामे आणि गावतलावामध्ये किती पाणी साठवले गेले, गावशिवारामध्ये किती पाणी अडवले गेले याची आकडेवारी समजावून सांगावी. अपधाव शिल्लक असल्यास कोणती कामे करावयाची आणि तूट असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल सविस्तर चर्चा झाली पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांची शेते पाण्यापासून वंचित आहेत त्यांना मिळत असलेले उत्पादन हे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेने कसे कमी आहे आणि जर एखादे पाणी मिळाल्यावर उत्पादनात कशी वाढ होते हे गावातीलच इतर भागातील शेतकऱ्यांची उदाहरणे घेऊन समजावून द्यावे. उत्पादनातील फरकाचे गणित आर्थिक स्वरूपात मांडल्यास समजायला आणखी सोपे जाऊ शकते.

कमी उत्पादनाची कारणे समजावून सांगावीत. यावेळी मागील पावसाळ्यातील एकूण पाऊस, पावसाचे दिवस, पावसाचे वितरण, पावसातील खंड, वाढलेले तापमान याबद्दल आकडेवारीसह चर्चा करावी. अशा कमी उत्पादन होत असलेल्या शेतीला किमान एका पिकापुरते पाणी कसे उपलब्ध होऊ शकेल, यावर उपाय सुचवणे हा चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे. हे काम तसे कठीण आहे. यासाठी काही शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा कमी करण्यासदेखील सांगावे लागेल. पण सामूहिकरीत्या या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर उपाय शोधला पाहिजे.

तसेच आहे या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनेही उत्पादन वाढीचे उपाय सुचवावेत. सुचवलेले उपाय स्थानिकरीत्या करण्याजोगे असल्याने त्यासाठी शेतकरी गटांनी किंवा त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. जर गावामध्ये एखाद्या भागात अधिक पाणी लागणारी पिके घेतली जात असल्यास त्यावर कसे नियंत्रण करावे याबाबत चर्चा करावी. यासाठी त्या पिकांऐवजी कमी पाणी लागणारी पिके घेतल्यास उत्पन्नामध्ये मोठी तफावत न होता जास्त शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊन सर्वांच्या जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत होऊ शकते. तसेच कमी कालावधीच्या पिकांचा, वाणांचा विचार करावा व त्यानुसार सध्याच्या पीकरचनेमध्ये करावे लागणारे बदल समजावून सांगावेत. कमी उत्पादकता आलेल्या शेतामध्ये पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात मुरण्यासाठी बांधबंदिस्तीची कामे करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे आणि पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे आणि आता शक्य नसल्यास पावसाळ्यानंतरच्या कामांमध्ये त्यांना समाविष्ट करावे. संरक्षित पाण्यासाठी शेततळे उपयोगी पडतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी शेततळे घ्यावयाचे आहे त्यांना तांत्रिक माहिती द्यावी. याबरोबरच गावातील सर्व विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठीचा आराखडा तयार करावा. गावात अस्तित्वात असलेल्या पाणी साठवण संरचनांमध्ये (उदा. पाझर तलाव, गाव तलाव, छोटी धरणे, बंधारे, इ) गाळ जमा झालेला असल्यास तसेच काही फूटतूट झालेली असल्यास त्याची माहिती घेऊन दुरुस्तीचा किंवा गाल काढण्याचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याबाबत चर्चा करावी. जेणेकरून गावात प्रत्यक्षात उपलब्ध होणारा पाणीसाठा वाढून व त्यानुसार पीक नियोजन करणे सोयीचे होईल. गावातील पाणी साठवण संरचनांची मालकी ही संपूर्ण गावाची असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी ही ग्रामस्थांची असल्याची जाणीव ग्रामस्थांना करून द्यावी.

(लेखक पोकरा योजनेत कृषिविद्यावेत्ता आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com