Animal Husbandry : पशुसंवर्धन संस्थांचा राज्यात दुष्काळच

देशात आयसीएआर अंतर्गत काम करणाऱ्या अनेक संशोधन संस्था आहेत. परंतु 'पशुसंवर्धन' विषयक संशोधनाचे काम करणारी आयसीएआरची एकही मुख्य संस्था राज्यात नाही, हे खेदाने नमूद करावे वाटते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

आपल्या देशातील भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council Of Agriculture Research) (आयसीएआर) ही आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनात (International Agriculture Research) उच्च स्थान असणारी सर्वोच्च संस्था आहे. आयसीएआरची स्थापना १९३० मध्ये झाली. तेव्हापासून भारतीय शेतीच्या उत्पादन (Agriculture Production) वाढीबरोबर संलग्न कृषी, पशुसंवर्धन (Animal Husbandry) व इतर विभागातील शिक्षण आणि विस्तार उपक्रम राबवण्यासाठी ही संस्था पुढाकार घेत आहे. संपूर्ण जगात सद्यःस्थितीत अनेक बदल वेगाने घडत आहेत.

वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण व वेगाने होणारे हवामानातील बदल यामुळे कृषी-पशुसंवर्धन समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. सुरुवातीच्या काळात आपल्या खंडप्राय देशातील जनतेला पुरेसे अन्न पुरवण्याचे आव्हान होते, आता ते पोषक, आरोग्यपूर्ण, विषमुक्त कसे मिळेल हे आव्हान आहे. त्यासाठी विज्ञान, विज्ञानातील नवनवीन संशोधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

त्याच प्रकारे भारतीय कृषी संशोधन परिषद ही संस्था संशोधनाचा वापर हा देशातील गोरगरीब जनता, पशुपालक, शेतकरी, उद्योजक, ग्राहक यांच्यासाठी करताना दिसते. देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही संस्था स्वतःचे धोरणात्मक निर्णय घेते. त्या पद्धतीने स्वतःचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून नावीन्यपूर्ण सर्वसमावेशक संशोधन देशातील वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या संलग्न संस्था मधून करत असते.

देशात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत निरनिराळ्या राज्यात एकूण चार 'अभिमत विद्यापीठे' आहेत. पैकी दोन पशुसंवर्धन विषयक संशोधन करणारी राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल (एनडीआरआय) व भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्था, इज्जतनगर (आयव्हीआरआय) या ठिकाणी कार्यरत आहेत. 'संशोधनात्मक संस्था' एकूण ६५ आहेत, त्यांपैकी पशुसंवर्धन विषयक संशोधन व विस्तार कार्य करणाऱ्या एकूण १० संस्था आहेत.

'राष्ट्रीय संशोधन केंद्र' या नावाने एकूण १४ संस्था कार्यरत आहेत, त्यांपैकी पशुसंवर्धन विषयक कामकाज सहा संस्थांमध्ये चालते. 'नॅशनल ब्युरो' या नावाखाली एकूण सहा संस्था असून त्या अंतर्गत फक्त एकच कर्नाल येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो ( NBAGR) या संस्थेत पशुसंवर्धन विषयक कामकाज चालते. त्याचबरोबर एकूण १३ संचालनालयांपैकी (Directorate) दोन ठिकाणी भुवनेश्वर येथे लाळ खुरकूत व हैदराबाद येथे कुक्कुटपालन संशोधन निर्देशालय आहे.

Animal Husbandry
Animal Care : सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होणारे आजार

बाकी सर्व प्रत्येक संस्थानिहाय उर्वरित संस्था शेती व मत्स्यव्यवसाय संबंधित संशोधन प्रकल्पावर आधारित कामकाज करतात. या सर्व पशुसंवर्धन विषयक संशोधन करणाऱ्या संस्था पैकी आपल्या महाराष्ट्रात फक्त नऊ वेगवेगळ्या संस्था 'कृषी विषयक' संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. परंतु 'पशुसंवर्धन' विषयक अशी एकही मुख्य संस्था थेट भारतीय कृषी संशोधन परिषदेखाली काम करणारी नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.

अभिमत विद्यापीठ 'राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल' ची विभागीय शाखा बंगळुरु येथे आहे. आणि 'भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्था, इज्जतनगर' याची प्रशिक्षण आणि शिक्षण (ट्रेनिंग अँड एज्युकेशन) केंद्र हे पुणे येथे आहे. याद्वारे पश्चिम विभागातील पशुपालक, शेतकरी, पशुसंवर्धन व संलग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी सोबत कृषी विज्ञान केंद्र, सेवाभावी संस्था, आत्मा अशा संस्थांशी निगडित अधिकारी, कर्मचारी यांना नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाबाबत अवगत करून त्यांची क्षमता बांधणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे.

Animal Husbandry
Animal Care : जनावरांतील घातक परजीवी : गोचीड

ही जरी विभागीय संस्था असली तरी महाराष्ट्र राज्यातील संबंधितांना त्याचा चांगला फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सदर भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्था ही महाराष्ट्रात पुणे येथे सन १८८९ मध्ये बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबरोटरी या नावाने देशातील पशुधनामधील रोगांबाबत संशोधन करत असे. पुढे जाऊन ही संस्था १८९३ मध्ये मुक्तेश्वर (उत्तराखंड) येथे स्थलांतरित झाली व १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ या संस्थेच्या मूळ ठिकाणी म्हणजे पुणे येथे नवीन एक केंद्र असावे म्हणून सदर केंद्राची स्थापना झाली. २० मे २०१५ पासून या संस्थेचे कामकाज सुरू झाले.

केंद्रीय बकरी संशोधन संस्था, मथुरा (Central Institute For Reaserch In Goats) यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत (AICRP) केंद्र म्हणून महाराष्ट्रात उस्मानाबादी या प्रजातीसाठी फलटण व संगमनेरी साठी राहुरी कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.

या ठिकाणी सदर प्रजातीच्या आनुवंशिक सुधारणा सह स्थानिक शेळी पालकांना प्रशिक्षण, क्षमता बांधणी, आरोग्य सुविधा तसेच या प्रजातीच्या उत्पादन वाढीवर संशोधन केले जाते. पश्चिम विभागासाठी एक लाळ-खुरकुत समन्वित संशोधन प्रकल्प औंध, पुणे येथे कार्यरत आहे. तसेच देशात एकूण १७ पशुवैद्यकीय विद्यापीठे आहेत, त्यांपैकी एक महाराष्ट्रात नागपूर येथे आहे.

देशात एकूणच महाराष्ट्र राज्य हे पशुसंवर्धन विषयक अनेक बाबतीत अग्रेसर आहे. गाय वर्गाच्या संख्येत देशात आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. म्हैस वर्गाच्या संख्येत सातव्या क्रमांकावर आहोत. शेळ्यांच्या बाबतीत देखील आपण देशात सहाव्या क्रमांकावर आहोत. तसेच मेंढ्यांच्या बाबतीत आपण सातव्या क्रमांकावर आहोत. कुक्कुट पक्षांच्या ७४.३० दशलक्ष संख्येसह आपण देशात पाचव्या क्रमांकावर आहोत. २०१९ च्या सांख्यिकी अहवालानुसार महाराष्ट्र दूध उत्पादनात ११.६६ दशलक्ष टन उत्पादनासह सातव्या क्रमांकावर आहोत.

मांस उत्पादनात देखील आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. एकूण मांस उत्पादन हे १.०२ दशलक्ष टन आहे. त्याचबरोबर अंडी उत्पादनात आपला सातवा क्रमांक व लोकर उत्पादनात आपण नवव्या क्रमांकावर आहोत. एकूण राज्य हे पशुधन आणि पशुजन्य उत्पादनामध्ये देशात पहिल्या दहा क्रमांकामध्ये आहे. इतके सर्व असताना राज्यात एकही पशुसंवर्धन विषयक केंद्रीय संस्था नसावी याबाबत संबंधितांनी विचार करायची वेळ आली आहे. केंद्रात स्वतंत्र पशुसंवर्धन मंत्रालयाची स्थापना झाली आहे.

अनेक पशुधन विषयक बाबींवर कोट्यवधी रुपयांची तरतूद होऊन त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आपापल्या परीने अनेक आव्हाने पेलत आहेत. पशुसंवर्धन वाढीचा आलेख चढता ठेवायचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी चार-पाच केंद्रीय पशुसंवर्धन विषयक संस्था जर महाराष्ट्रात आल्या तर अजून त्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकते.

केंद्रीय संस्थांचे राज्यात जाळे उभे करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती फार मोठी असावी लागते. सोबत संबंधित अधिकाऱ्यांची दूरदृष्टी ही फार महत्त्वाची आहे. आज पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यात अनेक केंद्रीय संशोधन संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यांचा निश्चितच फायदा या संबंधित राज्यांना होताना दिसतो. त्यामुळेच ही राज्य वरच्या क्रमांकावर आहेत.

राज्य शासनाने देखील अशा प्रकारे राज्यांची गरज ओळखून त्या पद्धतीने प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांचा गट स्थापन करणे, केंद्रात पाठपुरावा करणे आणि अशा संस्था राज्यात उभ्या करण्यासाठी थेट केंद्र सरकारला भिडले पाहिजे. अनेक औद्योगिक प्रकल्पांइतकेच या संस्थांचे महत्त्व पशुपालकांच्या व्यवसायात आहे. त्यामुळे स्थानिक पशुपालकांच्या, पशुवैद्यकांच्या मेहनतीला बळ मिळेल. येणाऱ्या काळात राज्य हे देशात पशुसंवर्धन विषयक बाबींमध्ये पहिल्या तीन क्रमांकात येईल.

(लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com