लेखा-मेंढा आणि देवाजी तोफा

मी दोन दिवसांपूर्वीच लोखा-मेंढा गावचे देवाजी तोफा यांची भेट घेतली. ही भेट मला अनेक गोष्टी शिकवून गेली. गाव असावा तर असा आणि त्याचा राव असावा तर तोही असाच! वाटलं आता आयुष्याचे उरलेले दिवस अशाच गावात जाऊन राहावं.
लेखा-मेंढा आणि देवाजी तोफा
Forest RightsAgrowon

इंद्रजित भालेराव

पूर्वार्ध

..........

मोहन हिराबाई हिरालाल हे गांधीजींची ग्रामस्वराज्य ही कल्पना राबविण्यासाठी एकमतानं काम करणारं गाव शोधत असताना १९८८ मध्ये त्यांना मेंढा-लेखा हे गाव सापडलं. या गावातील एकीनं मोहन यांनाही मोहून टाकलं. मोहन हे जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करणारे कार्यकर्ते होते. ते मूळचे चंद्रपूरचे. एका व्यापारी कुटुंबात जन्मलेले गृहस्थ. त्यांनी मूळचाच हिरा असलेल्या मेंढा या गावाला आणि तिथले ग्रामप्रमुख देवाजी तोफा यांना पैलू पाडले आणि मेंढा हे गाव वनहक्क मिळवणारं भारतातलं पहिलं गाव ठरलं. तत्कालीन केंद्रीय वनमंत्री जयराम रमेश आणि सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, वनमंत्री यांनी गावात येऊन २०११ साली त्यांना वनहक्काची सनद सुपूर्द केली. हे हक्क मिळावेत म्हणून मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा यांना २५ वर्ष संघर्ष करावा लागला. अर्थातच, तो संघर्ष त्यांनी अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने केला.

वनरक्षक हे नेहमीच वनांचं आणि आदिवासींचं शोषण करत असतात. त्यांना वनरक्षक कसं म्हणावं? सरकारही पेपरमिलच्या लोकांना बांबू कटाईची कंत्राटं देऊन कायद्याचा भंग करत होतं. खरं तर, २००६ मध्येच वन हक्क कायदा पास झाला होता. पण प्रत्यक्ष आदिवासींना याचा पत्ताही नव्हता. या कायद्यानं सगळ्या वनोपज वस्तूंवर आदिवासींचा अधिकार असताना आदिवासींना या वस्तूंची चोरी करावी लागे व पकडल्यास शिक्षाही भोगावी लागे. पण मोहन हिराबाई हिरालाल यांच्या साह्याने संशोधन आणि चर्चा करून देवाजी तोफा आणि मेंढा गावाने शांततेच्या मार्गाने संघर्ष करून हे हक्क मिळवले. आता ही एक वनचळवळच झालेली आहे. आणि अनेक आदिवासी गावांनी वनहक्क मिळवायला सुरुवात केलेली आहे.

सुप्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार मिलिंद बोकील यांनी या संघर्षावर आणि गावाने केलेल्या प्रगतीवर ‘गोष्ट मेंढा गावाची’ या नावाचं एक सुंदर पुस्तक २०१२ मध्येच लिहिलंय. गडचिरोलीपासून अवघ्या तीस किलोमीटरवर मेंढा हे गाव आहे. मी आवर्जून मेंढा-लेखा या गावाला भेट दिली. योगायोगानं देवाजी तोफा गावाशेजारच्याच टोल्यात सापडले आणि एक सुंदर भेट झाली. या वेळी सोबत प्रा. डॉ. विनायक शिंदे सर, माझे विद्यार्थी मित्र बबन आव्हाड आणि त्र्यंबक वडस्कर हेही होते.

पूर्वी गावाची एकी हे गावाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. आता खरं तर गावागावातून एकीच नाहीशी झाल्यामुळे गावांचा विकास अशक्य आणि अधोगती सुसाट सुरू झालेली आहे. पण मेंढा गावचा कुठलाही निर्णय बहुमताने नव्हे तर एक मतानंच घेतला जातो. कारण बहुमतामध्ये काही लोकांच्या का होईना मनाविरुद्ध गोष्टी होतात आणि तीच मंडळी पुढे विघ्न निर्माण करतात. म्हणून मेंढा-लेखा गावानं सर्वसंमतीचा आग्रह सतत धरलेला आहे. त्यामुळेच या गावाला हा संघर्ष करणं शक्य झालं.

राजकारणी, सावकार, व्यापारी या हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी या गावात बेकी निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण गाव अभेद्य राहिले. त्यामुळे सरकारलाही या गावापुढे नमाव लागलं आणि अठराशे हेक्टर म्हणजे चार हजार एकर जमिनीचे हक्क गावाला द्यावे लागले. मध, डिंक, तेंदूपत्ता, औषधी वनस्पती,

गोडंबी, चारोळी, मोहफूल, बांबू, साग यातलं आवश्यक तेवढं सगळं आदिवासी आता मनमुक्त घेऊ शकतात. फक्त त्यांना त्याचा व्यापार, विक्री करता येत नाही. व्यापाराचा हक्क गावाला असतो. हक्क मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी गावानं बांबूच्या व्यापारातून एक कोटी पंधरा लाख रुपये नफा मिळवला. अन्य वन उपजाऊपासून मिळालेला फायदा वेगळा. त्यामुळे गावाचा छान विकास करता आला.

या गावात आम्हाला कोणीही बेकार फिरताना दिसलं नाही. कुणालाही रोजगारासाठी गावाबाहेर जावं लागत नाही. गावात एकही मनोरुग्ण नाही. स्वच्छ अंगण, स्वच्छ रस्ते, स्वच्छ घर आणि गावातही उंच उंच झाडं पाहून गावाबाहेर निघावं असं वाटेचना. आदिवासी संचय करून ठेवत नाहीत. त्यामुळे कसला ताणही नाही. गरजेपुरत्याच जंगलातल्या वस्तू घेतात. त्या घेताना ते व्यापाऱ्यासारखे जंगलाची अंदाधुंद कत्तल करीत नाहीत. त्यामुळे जंगलही वाढत राहतं. त्याचं संरक्षण होतं.

आम्हाला गावात कोणत्याही घरातून धूर निघताना दिसला नाही. नंतर लक्षात आलं, की प्रत्येक घरात गोबरगॅस बसवलेला आहे. घरोघरी गाई आहेतच. त्यामुळे भरपूर शेण उपलब्ध होते. ज्यांच्या घरी गाई नाहीत त्यांना आखर आणि रस्त्यावरच्या शेणाचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे बायकांची धुरापासून मुक्ती झाली. जळणासाठी रानभर भटकायची गरज उरली नाही.ओट्याशेजारी उभं राहून गॅसवर स्वयंपाक करणाऱ्या आदिवासी बाया हे मोठं मनोहरी दृश्य आहे. ते या गावानं आपल्या देशाला दिलं. या गावातल्या महिला दहा-बारा बचत गटही चालवतात. रेशन, रॉकेलचे वाटपाचे काम तर हे गट करतातच, पण या बचत गटाच्या मालकीचा ट्रॅक्टर आणि गिट्टीची एक खदानही आहे. त्याचं व्यवस्थापन हे महिलांचे गटच करतात. फार चांगल्या पद्धतीने त्या ते करतात. हे संपूर्ण गाव आदिवासी असूनही इथं कोणताही जादूटोण्याचा प्रकार चालत नाही.

गावाने लाच देणार नाही आणि घेणारही नाही असा ठराव मंजूर केलेला आहे. कोणी लाच मागितली तर गावकरी त्याला पावती मागतात. काम व्हावं म्हणून दिवसभर तिथं बसून राहतात. संध्याकाळी घरी परतताना लाच मागणाऱ्या साहेबाला सांगतात, मी सगळे नियम पाळूनही तुम्ही माझं काम केलं नाही. उद्या मी माझ्या दहा गावकऱ्यांना घेऊन येतो. दिवसभर तुमच्या टेबलासमोर थांबतो. तरीही तुम्ही काम केलं नाही तर परवा सगळा गाव येईल. एक-दोनदा गावानं एकीनं हे सिद्ध करून दाखवलं आणि साहेबांना अद्दल घडवली. तेव्हापासून लाच न देणारं गाव, अशी या गावाची ख्याती झाली. आता त्यांचं कामही आडत नाही आणि कुणी लाचही मागत नाही. देवाजी तोफा आता एक सेलिब्रिटी झालेले आहेत. चौथी शिकलेला हा माणूस विद्यापीठात व्याख्याने देतो. देशभर आणि जगभर फिरतो. अगदी नेल्सन मंडेलांच्या मांडीला मांडी लावून बसतो. अन्य आदिवासी गावांना वन हक्क मिळविण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि अत्यंत साधेपणानं जगत अजूनही शेतात काम करतो.

(लेखक कवी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com