Livestock : नैसर्गिक आपत्तीत पशुधन दुर्लक्षितच

नैसर्गिक आपत्तींमध्ये पिकांच्या नुकसानीबाबत पाहणी, पंचनामे करून मदतीसाठीच्या हालचाली लवकरच सुरू असतात. मात्र यात पशुधनाचे झालेले नुकसान दुर्लक्षितच राहते.
Animal Care
Animal CareAgrowon

राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पूरग्रस्त भागातील पिके वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी पशुधनही वाहून जातेय. पूरपरिस्थितीतून बचावलेल्या पशुधनाचे आरोग्य धोक्यात येते. त्यातही मोठ्या प्रमाणात पशुधन मृत्युमुखी पडते. महसूल विभाग संबंधित इतर विभागांशी समन्वय साधून अतिवृष्टी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून सर्वांना सूचना, मदत, पंचनामे अशी उपाययोजना करत असतो. त्याला अनुसरून पशुधनासह वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासन निर्णयानुसार मदत, अनुदान देण्याची व्यवस्था आहे, परंतु त्यात खूपच असमन्वय दिसून येतो.

पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) दरवर्षी मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून अतिवृष्टी (Heavy Rain), गारपीट, वीज पडणे, पूरपरिस्थिती (Flood) या काळात पशुधनाची घ्यावयाची काळजी (Precaution Of Livestock) याबाबतीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करीत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून याबाबतीत प्रबोधन सुरू असते. मृत पशुधनाच्या शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केलेले असते. त्यातील अनेक बाबी या ग्राम पंचायत, महसूल, वन विभाग व संबंधित पशुपालकाशी निगडित असतात. मात्र ‘मार्गदर्शन आणि अंमलबजावणी’ याचा मेळ या ठिकाणी बसत नाही.

Animal Care
जनावरे गुदमरून का मृत्यु पावतात ?

पूरपरिस्थिती, अतिवृष्टी या काळात पशुधनाचा झालेला मृत्यू, गोठा, निवारा याचे झालेले नुकसान हे संबंधित पशुपालकाचे कंबरडे मोडणारे असते. शासनाचा वन व महसूल विभाग हा राज्यांमध्ये अशा बाधित कुटुंबांना मदत देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या ‘राज्य आपत्ती प्रतिसाद निधी’च्या माध्यमातून मदत देण्याविषयी शासन निर्णय निर्गमित करतो. त्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकारी त्याची अंमलबजावणी करत असतात. महसूल विभाग हा इतर विभागाच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीच्या मागे असतो. तथापि समन्वय साधताना कुठेतरी गोंधळ होताना दिसतो.

Animal Care
जनावरे बसण्याची जागा कशी असावी? | cow seating arrangement in shed | ॲग्रोवन

पशुपालक हा पशुधनाच्या बाबतीत पशुसंवर्धन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधत असतो. अशावेळी समन्वयाने परिस्थिती ओळखून एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक ठरते. विशेषतः शवविच्छेदन अहवाल ग्राह्य धरताना किंवा काही वेळा २४ तास उलटून गेल्यानंतर शवविच्छेदन अहवालाचा आग्रह न धरता संबंधित ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांच्या समितीचा अहवाल ग्राह्य धरल्यास पशुपालक मदतीपासून वंचित राहणार नाहीत. अनेक वेळा वाहून गेलेल्या, मृत पावलेल्या जनावरांच्या संख्येवरून वाद होतात. अशावेळी त्याची नोंद कुठेतरी असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपक्षी यांची देखील अद्ययावत नोंदी या ग्राम पंचायत, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात असतील तर काही विपरीत घडले तर त्यांना मदत देताना अडचणी येणार नाहीत. त्यामुळेच शासन निर्णयात पशुधनाच्या संख्येवर बंधन घातले जाते जे पशुपालकाला अडचणीचे ठरू शकते.

मृत जनावरांची विल्हेवाट लावताना देखील संबंधित ग्राम पंचायत, महसूल विभागाने योग्य ती साधनसामग्री पुरवताना दक्षता घेतली तर निश्‍चितपणे रोगराई प्रसार रोखता येऊ शकतो. संभाव्य परिस्थिती ओळखून आपत्ती काळात जर आपले पशुधन स्थलांतरित केले, कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर पक्षी न भरता मोकळे ठेवले तर मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता येणे शक्य आहे. स्थलांतरित पशुधनाच्या खाद्य पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दुष्काळातील चारा छावणी पद्धतीने जर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्‍चितपणे पशुधन हानी टाळता येईल. प्रशासन हे जनतेसाठी असते. त्यामुळे पूरपरिस्थिती हाताळणारे आणि संबंधित जनतेला आधार देणारे सर्व विभाग समन्वयाने काम केल्यास, एकमेकांच्या तांत्रिक बाजू समजावून घेतल्यास निश्‍चितपणे पशुधन आणि त्याद्वारे देण्यात येणारी आर्थिक मदत कमी करता येईल व सर्व बाबतीत होणारे नुकसान टाळता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com