Madhavrao More : लढवय्ये माधवराव

अभ्यासू अन् तुफानी नेतृत्व, अशी माधवराव खंडेराव मोरे यांची सर्वत्र ख्याती होती. याच बळावर शेतकऱ्यांच्या लाखोंच्या सभा ते गाजवत.
Madhavrao More
Madhavrao MoreAgrowon


अभ्यासू अन् तुफानी नेतृत्व, अशी माधवराव खंडेराव मोरे यांची सर्वत्र ख्याती होती. याच बळावर शेतकऱ्यांच्या लाखोंच्या सभा ते गाजवत.

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांचे खंदे सहकारी माधवराव खंडेराव मोरे - (Madhavrao More) नावाची धगधगती मशाल नुकतीच मालवली आहे. व्यक्ती संपली तरी तिचे विचार कधी संपत नसतात, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. माधवराव मोरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर तो एक विचार होता. प्रसंगानुरूप कठोर अन् तेवढेच मृदू-भावनिक विचार ते सभा, आंदोलनादरम्यानच्या भाषणांत मांडत असत. सुरुवातीच्या काळातील शेतकरी संघटनेची पहिली फळी माधवरावांशिवाय पूर्ण होत नसे. शरद जोशी यांनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर ही संघटना अल्पावधितच गावागावांत आणि घराघरांत पोहोचविण्यासाठी माधवरावांचे मोठे योगदान राहिले. १९८० दरम्यान शेतीमालाच्या भावासाठी कोणी रस्त्यावर येतंय, हे ऐकूनच अनेक जण तोंडात बोटे घालीत. अशा काळात कांदा तसेच ऊसाच्या रास्त दरासाठी माधवरावांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना संघटित केले, त्यांना रस्त्यावर उतरविले.

Madhavrao More
Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon | ॲग्रोवन

शांततेत चाललेल्या आंदोलनाला चिरडण्याचे प्रयत्न त्या काळातही सरकारकडून होत होते. अशावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर अनेक वेळा पोलिसांचा लाठीमार त्यांनी अंगावर घेतला. एक-दोन प्रसंगी गोळीबारातूनही ते बालंबाल बचावले. परंतु प्रचंड धाडसी असलेले माधवराव कधी मागे हटले नाहीत. अभ्यासू व्यक्तिमत्त्व अन् तुफानी नेतृत्व, अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती. याच बळावर शेतकऱ्यांच्या लाखोंच्या सभा ते गाजवून सोडत. शेतकऱ्यांच्या समस्यांची सामाजिक तसेच आर्थिक अशा दोन्ही अंगांनी अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ मांडणी करत. त्यामुळे त्यांच्या सभेत कधी रडण्याचा तर कधी हसण्याचा असा संमिश्र अनुभव शेतकऱ्यांना येत असे.

Madhavrao More
Madhavrao More : माधवराव खंडेराव मोरे यांच्या भावूक आवाहनाने थरारली सभा

आम्हाला आमच्या मायबहिणींसाठी संडास बांधून देता येतील, अशी ताकद तुमच्या अर्थशास्त्रातून काढून द्या. आमचे बापजादे कर्जात गेले, निदान आता आम्हाला तरी या नुकसानीतून बाहेर पडू द्या, असा परखड विचार मांडत त्यांनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात आर्थिकदृष्ट्या उच्च-मध्यमवर्गीयांसमोर १९८३ मध्येच ‘इंडिया आणि भारत’ यातील विषमतेच्या दरीवर बोट ठेवले होते. ३४ वर्षे प्रत्यक्ष शेतीत राबलेले माधवराव शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना चांगलेच जाणून होते. आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या न्‍याय्य हक्कांसाठी लढावेच लागेल, हे माधवरावांनी शेतकऱ्यांच्या मनावर चांगले ठसविले होते. १९८४ मधील परभणी येथील अधिवेशनातील त्यांचे भाषण आजही शेतकऱ्यांच्या स्मरणात राहिले असेल. ‘आम्ही जो घाम गाळतो, त्या घामाचा दाम आम्हाला मिळू नये यासाठी तुम्ही जे कारस्थान करता तेवढं थांबवा. एवढी रास्त व साधी मागणी मान्य करायला तुम्ही तयार नाहीत’, असे शासन-प्रशासनाला सांगून आता युद्ध अटळ आहे, जसा कौरवांचा नाश झाला तसा शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांचा नाश होणार आहे, असे त्यांनी बजावले होते. पुढे शेतकरी संघटनेत चाललेल्या घडामोडींवरून, फाटाफुटीवरून त्यांना विलक्षण वेदना होत होत्या. परंतु हे त्यांनी कधी जाणवू दिले नाही.

Madhavrao More
Madhavrao More : शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन

अलीकडेच २०१७ मध्ये मात्र त्यांनी शेतकरी संप राज्य समन्वय समितीच्या बैठकीत ‘आता तरी जागृत व्हा, एकत्र या,’ असे भावनिक आवाहनही शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती उद्ध्वस्त झाली, तरी आपण अजूनही गाफील, बेफिकीर आहोत. त्यामुळेच कुणीही आपल्या पाठीवर थाप मारून आपला कान कापून घेत आहेत, तरीही आपण बदलण्यास तयार नाही, याची जाणीव शेतकऱ्यांना करून दिली. आजही शेतीमालास रास्त भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी आहेत, शेतीमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान शासनाकडून चालूच आहे. गाव-शहरातील दरी वाढतेय, एकाच समस्येवर विविध संघटना लढत आहेत. पक्ष, वैयक्तिक राजकारण यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेण्याची प्रथाही त्यांच्याकडून वाढीस लागली आहे. अशावेळी सर्वांना शेतकरी म्हणून एकत्र येऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध निर्णायक लढा द्यावा लागणार आहे. हीच माधवराव मोरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com