Madhavrao More : मुलूख मैदानी तोफ

शेतकरी संघटनेचे विचार सर्वदूर पोहोचविण्यात माधवराव खंडेराव मोरे यांचे मोलाचे योगदान होते.
Madhavrao More
Madhavrao MoreAgrowon

शेतकरी संघटनेचे विचार सर्वदूर पोहोचविण्यात माधवराव खंडेराव मोरे (Madhavrao More) यांचे मोलाचे योगदान होते. शेतकरी संघटनेची मुलूख मैदानी तोफ म्हणूनही त्यांचा नावलौकिक सर्वत्र होता. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा संक्षिप्त दृष्टिक्षेप...

शेतकरी संघटनेच्या ‘त्रिमूर्तीमधील एक मूर्ती माधवराव खंडेराव मोरे ऊर्फ माधवराव नाना यांचा देह बुधवारला (ता. २) पंचतत्वात विलीन झाला. शेतकरी संघटनेने आपला अजून एक मोहरा, शेतकरी योद्धा माधवरावांच्या रूपाने गमावला आहे. शेवटी जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हेच खरे. माधवराव मोरे यांनी १९८० च्या काळात शरद जोशी यांच्या सोबतीने शेतकरी संघटनेची स्थापना करून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा यासाठी लढा उभारला.

Madhavrao More
Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon | ॲग्रोवन

कृषिमूल्य आयोग बरखास्त करा, कांद्याला मंदी तर उसाला बंदी, या मागण्यांसाठी १० डिसेंबर १९८० ला संपूर्ण महाराष्ट्रभर मोठे आंदोलन उभारले होते. याची दखल‌ बी.बी.सी.सारख्या विख्यात परदेशी वृत्तसंस्थेने त्याकाळी घेतली होती. या आंदोलनात राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. ऊस, कांदा या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण राज्यभर शरद जोशी, माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड, निफाड सहकारी साखर कारखान्याचे व महाराष्ट्र राज्य साखर संघाचे त्या वेळचे अध्यक्ष स्व. माधवराव ऊर्फ तात्यासाहेब बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली होती. शेतकरी आंदोलने चिरडण्यासाठी त्यावेळी सरकारकडून लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार यांचा वापर केला जात होता.

१० डिसेंबर १९८० रोजी झालेल्या रेल रोको आंदोलनाचा आढावा व पुढील आंदोलनाच्या लढाईची रणनीती ठरविण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे अतिविराट असा शेतकरी मेळावा पार पडला. इतर नेत्यांची भाषणे झाल्यावर मुलूख मैदान तोफ माधवराव मोरे भाषणास मंचावर उभे ठाकले तेव्हा मेळाव्यातील वातावरण एकदमच स्फूर्तिदायक झाले होते. शेतकऱ्यांचा जोश ओसंडून वाहत असल्याच ते चित्र होते. याचवेळी मेळावास्थळी महाराष्ट्र शासनाचे दोन हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होते. मेळाव्यातील मुख्य मंचाच्या पायरीवर विदर्भातील युवा नेते श्रीकांत तराळ बसलेले होते. माधवरावांचे भाषण संपताच शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी पुढील आंदोलनाच्या लढाईची घोषणा करणार होते. तेवढ्यात एक व्यक्ती सरळ मंचाजवळ पोहोचली. या व्यक्तीने शरद जोशी साहेबांना भेटावयाचे आहे, असे मंचाच्या पायरीवर बसलेल्या तराळ यांना सांगितले. तेव्हा तराळ यांनी त्यांना भेटीमागचं कारण विचारले.

Madhavrao More
Soybeans Market : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

त्या व्यक्तीने सांगितले, की मी नाशिकचा जिल्हाधिकारी आहे. हा निरोप मंचावर तराळ यांनी शरद जोशींना सांगितला. शरद जोशींनी त्यांना मेळावा संपल्यावर भेटू असा निरोप तराळ यांच्यामार्फत दिला. त्या वेळी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ उलट टपाली निरोप दिला, की राज्याचे मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांनी शरद जोशी व सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आपल्या मागण्यांच्या वाटाघाटीसाठी २० डिसेंबर १९८० रोजी सकाळी ९ वाजता वर्षा बंगल्यावर आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांनी शरद जोशींना तसे लेखीपत्र दिले. शरद जोशींनी मुख्यमंत्र्यांच्या निरोप उपस्थित जनसमुदायासमोर जाहीर केला, की आजचा मेळावा हा पुढील आंदोलनाच्या घोषणेऐवजी विजयी सभेमध्ये परिवर्तित झाला.

त्यानंतर ठरलेल्या वेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अंतुले, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, माधवराव ऊर्फ तात्यासाहेब बोरस्ते, प्रल्हाद पाटील कराड, माधवराव खंडेराव मोरे, तत्कालीन सहकार व कामगार मंत्री नरेंद्र तिडके, तत्कालीन विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक व अन्य नेत्यांसोबत यशस्वी वाटाघाटी झाल्यात. त्या प्रयत्नांची परिणती १९८० मध्ये कधी नव्हे तो पहिल्यांदाच उसाला ३०० रुपये प्रतिटन, कांद्याला १०० रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. या निर्णयानंतर शेतकरी संघटना गावोगावी खेडोपाडी वाडी-वस्तीवर पोहोचण्यास मदत झाली.

Madhavrao More
Sugar Mill : केंद्राच्या लुडबुडीमुळे साखर कारखाने अडचणीत

नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे प्रथम सत्याग्रही स्व. नरेंद्रबापू अहिरे यांच्या १९८२ मध्ये भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ब्राह्मणगाव, ता. सटाणाच्या सोसायटी गोडाउनचे उद्‍घाटक शरद जोशी होते, तर माधवराव मोरे हे प्रमुख पाहुणे होते. तेव्हा माधवराव मोरे आपल्या भाषणात शरद जोशींना उद्देशून म्हणाले, की साहेब गावोगावच्या सेवा सोसायट्या या शेतकऱ्यांचे ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल्स आहेत. जसे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती झालेला रुग्ण परत येण्याची शक्यता नसते, तसे एकदा सोसायटीचे कर्ज घेतलेला शेतकरी या कर्जाच्या जाचातून मुक्त होणे अशक्य आहे.

आज वर्तमानपत्र उघडल्याबरोबर कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या तरुण मुलाने आत्महत्या केली अशा एक ना अनेक बातम्या रोज आपण वाचतो. बघा बरोबर ४० वर्षांपूर्वी माधवरावांनी किती जळजळीत वास्तव सर्वांसमोर मांडले होते. यावरून त्यांच्या विचारातील द्रष्टेपणा दिसून येतो.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव माधवराव मोरे यांनी १९८६ पासून शेतकरी आंदोलनातून माघार घेतली होती तरीही ते शेवटच्या श्‍वासापर्यंत संघटनेच्या विचारांशी बांधील होते. शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत होते. १९८० च्या आंदोलनाला खा. राजू शेट्टी यांनी तशीच धार आणली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘राजू तू लढ मी तुझ्या सोबत आहे,’ असे ठासून सांगायलाही माधवराव मोरे कचरले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एप्रिल २०१६ मध्ये पिंपळगाव बसवंत येथील राज्य कार्यकारिणीच्या अखेरच्या समारोपाला माधवराव हजर होते.

चार-पाच दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रामचंद्रबापू पाटील हे माधवरावांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द बाहेर येत नव्हते पण बापूंच्या बिल्ल्याकडे सारखा अंगुलिनिर्देश ते करत होते. याचाच सरळ अर्थ असा आहे, की माधवराव नावाची मुलूख मैदान तोफ जरी आज थंडावली असेल, तरी १९८० पेक्षाही शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. दिवसागणिक शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. पक्ष, धर्म, जात हे सगळं बाजूला ठेवा. या नावानं होणाऱ्या बेरजा-वजाबाक्या बाजूला ठेवा अन् फक्त शेतकरी म्हणून एकत्र या. फक्त शेतीचा विषय डोक्यात घ्या. ४० वर्षांचा काळात माधवरावांनी हे उघड्या डोळ्यांनी आणि डोळे मिटतानाही बघितले आहे. नाना म्हणायचे मी तुमच्या हातात तराजू देतो.

एका पारड्यात तुमचं आज शेतात उभं असलेलं पीक अन् दुसऱ्या पारड्यात तुमच्या डोक्यावर असलेले सोसायटी, बँकेचे कर्ज ठेवा. विचार करा इतकी वर्षं तुमचं कर्ज कधीच का फिटत नाहीत. सगळं हातातून काढून घेतले जात असताना तुम्ही जागे होत नाही हे दुर्दैव आहे. राज्यातील तमाम शेतकरी नेत्यांनी शेतकरी हितासाठी आपले व्यक्तिगत हेवेदावे विसरून ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणून एक व्हावे. माधवरावांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक पत्रकार, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com