मूल्यसाखळी विकासाचे ‘मॅग्नेट’

मॅग्नेट प्रकल्पात समाविष्ट फळे-भाजीपाल्यात उत्तम काम करणाऱ्या कंपन्यांनी यात सहभागासाठी पुढे यायला पाहिजेत. शासनाने देखील चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचाच यात सहभाग असेल, ही काळजी घ्यायला हवी.
मूल्यसाखळी विकासाचे ‘मॅग्नेट’
HorticultureAgrowon

वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि कीड-रोगांचे वाढलेले प्रमाण यामुळे शेतीमालाचे उत्पादन घटत आहे. याचा सर्वाधिक फटका हा फळे-भाजीपाला-फुले या शेतीमालास बसत आहे. हे कमी की काय या शेतीमालाची काढणीपश्‍चात हाताळणी, विक्री नीट होत नसल्याने जवळपास ३५ टक्के फळे-भाजीपाला नाश झाल्याने फेकून द्यावा लागतो. हाती आलेल्या शेतीमालाचे हे हजारो कोटींचे शेतकऱ्यांचे थेट नुकसान आहे. अशावेळी राज्यातील महत्त्वाची फळे केळी, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी तर भेंडी, मिरची (हिरवी, लाल) आणि फुले या शेतीमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्यसाखळी विकसित करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

हा प्रकल्प जानेवारी २०२२ पासून कार्यान्वित झाला असून, यांत ७० टक्के निधी हा आशियायी विकास बॅंकेकडून कर्ज स्वरूपात उभारला जाणार आहे. तर उर्वरित ३० टक्के निधी राज्य शासन देणार आहे. शेतीमालाचे केवळ काढणीपश्चात नुकसान कमी करणे, एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नाही तर देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचा शेतीमाल पाठविणे, त्यास उत्तम मूल्य मिळवून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. मूल्यसाखळी विकसित करण्यामध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा प्रकल्प असून, यांत शेतकरी उत्पादक कंपन्यांसह कृषी व्यावसायिकांनाही मोठ्या संधी आहेत. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात ३० संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे २३० कोटींचे प्रकल्प सादर करण्यात आले असून त्यामधील ७२ कोटींच्या अनुदानास संस्था नुकत्याच पात्र झाल्या आहेत.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत ११ फळपिकांचे काढणीपूर्व ते काढणीपश्‍चात ग्राहकांपर्यंत ही फळपिके पोहोचेपर्यंत जेथे जेथे त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. नाशिवंत फळपिकांचा दर्जा कायम ठेवत त्यांचा टिकाऊक्षमता वाढविणे यावर या प्रकल्पाचा भर असणार आहे. हे साध्य करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेताना यातील तज्ज्ञांकडून मूल्यसाखळी विकासाचे सर्वेक्षण करून घेतले गेले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नेमके कसे पुढे जायचे, यासाठीचा हा अभ्यास होता. यामध्ये शेतीमाल काढणी करताना घ्यावयाची काळजी, प्राथमिक प्रक्रिया, माल एकत्रित गोळा करणे, तेथे स्वच्छता-प्रतवारी-पॅकिंग पुढे हा शेतीमाल जास्त कुठे हाताळला जाणार नाही, ही काळजी घेण्यात येणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळपिकांवर प्रक्रियेसाठीची अद्ययावत तांत्रिक माहितीसुद्धा दिली जाणार आहे. या सर्वांसाठी पायाभूत सुविधा उभारणे, या पायाभूत सुविधांचा नेमका वापर कसा करायचा याबाबतही मार्गदर्शन होणार आहे. एवढेच नव्हे तर पायाभूत सुविधांच्या उभारणीपासून ते शेतीमाल खरेदीसाठी भांडवल निधी शेतकरी उत्पादक कंपन्यांसह यात सहभागी संस्थांना पुरविला जाणार आहे. या संस्थांना संस्थात्मक खरेदीदारांना जोडून देण्याचे कामही मॅग्नेट प्रकल्पांतर्गत होणार आहे. शेतीमालाचा उठाव होऊन त्यांना चांगला दर मिळण्यासाठी मूल्यसाखळी विकास ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या प्रकल्पांत इतरही फळे-भाजीपाला पिकांचा सहभाग राज्य शासनाने वाढवायला हवा.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना मॅग्नेट प्रकल्पात सहभाग घेण्यासाठी त्यांची सभासद संख्या २५० ठेवणे, कंपनीचे ऑडिट वेळच्या वेळी करून घेणे, आतापर्यंतचा शेतीमाल खरेदी-विक्रीच्या अनुभवाची व्यवस्थित नोंदणी ठेवणे या बाबी गरजेच्या आहेत. मॅग्नेट प्रकल्पात समाविष्ट फळे-भाजीपाल्यात उत्तम काम करणाऱ्या कंपन्यांनी यात सहभागासाठी पुढे यायला पाहिजेत. शासनाने देखील चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचाच या प्रकल्पात सहभाग असेल, ही काळजी घ्यायला हवी. असे झाले तरच मॅग्नेटअंतर्गत यशस्वी मूल्यवर्धन होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यासह कंपन्यांना पण होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com