yashwantrao chavhan
yashwantrao chavhan

महाराष्ट्राचा 'यशवंत' वारसा

स्वातंत्र्यपूर्व काळात गाव खेड्यातील मुलांना गरिबीचा, हाल अपेष्टांचा जो सामना करावा लागत होता तो या छोट्या यशवंतालाही चुकला नाही. बालपणीच वडील सोडून गेले, आईने मोठ्या हिमतीने सांभाळ केलेल्या, शिक्षितकेलेल्या या यशवंतने पुढे देशाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपने पेलली.

आज 12 मार्च, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी, साहित्यिक यशवंराव चव्हाण साहेबांची जयंती. म.गांधी - पं.नेहरु या महामानवांच्या नेतृत्वाखाली ज्यांचं आधुनिक, सुसंस्कृत, सर्वसमावेशक नेतृत्व महाराष्ट्राच्या व पर्यायाने भारताच्या जडणघडणीस कारणीभूत ठरलं ते व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णाकाठचे यशवंतराव बळवंतराव चव्हाण....

स्वातंत्र्यपूर्व काळात गाव खेड्यातील मुलांना गरिबीचा, हाल अपेष्टांचा जो सामना करावा लागत होता तो या छोट्या यशवंतालाही चुकला नाही. बालपणीच वडील सोडून गेले, आईने मोठ्या हिमतीने सांभाळ केलेल्या, शिक्षित(Educated) केलेल्या या यशवंतने पुढे देशाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपने पेलली. देवराष्ट्रे या छोट्या खेड्यात जन्मलेल्या या शेतकरी पुत्राने पुढे महाराष्ट्र आणि भारताच्या प्रगतीसाठी (India's progress)आपले शरीर, वाणी आणि बुद्धी शेवटपर्यंत झिजवली.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून राष्ट्रीय चळवळीत स्वतःला विद्यार्थी दशेत झोकून देऊन करावास भोगणारे, भूमिगत राहून इंग्रजाशी संघर्ष करणारे यशवंतराव तितक्याच तडफेने आणि जिद्दीने स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमता(Political inequality) मिटवण्यासाठी कार्यरत राहिले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या(Indian National Congress) माध्यमातून तळागाळातील जनसमूहाचे प्रतिनिधीत्व त्यांच्याकडे होते, याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. विधिमंडळ, संसदेत ते वेगवेगळ्या पदावर चार दशकभर कार्यरत होते, तिथे कायम सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात सत्तेच्या माध्यमातून चार चांगले दिवस कसे आणता येतील यासाठीच काम करत राहिले.

देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचं महत्व यशवंतराव चव्हाण साहेब जाणून होते, त्यांनी मुख्यमंत्री असताना गाव खेड्यापर्यंत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कसं पोहोचेल यासाठी खूप प्रयत्न केले. आज ज्या खेड्यापाड्यात शाळा दिसतात ज्यामधून लाखो गोरगरिबांची मुलं शिकत होती, आहेत,  त्या शाळा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीचं फलीत होतं. रयत शिक्षण, मराठवाडा शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था अशा महाराष्ट्रभरातील शिक्षण संस्थांना त्यांनी मोठी मदत केली, पाठिंबा दिला. विद्यापीठीय शिक्षणाचं महत्व ते चांगल जाणून होते. उच्च शिक्षणाची कवाडं गोरगरिबांच्या लेकरांना खुली व्हावी म्हणून त्यांनी अनेक धोरनात्मक बाबी सरकारमध्ये असताना केल्या.

 महाराष्ट्राच्या शेतीविकासाची पायाभरणीच यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. आज जी मोठमोठाली धरणं महाराष्ट्रातील शेतीपिकांना आणि वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करत आहेत ती यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच कार्यकुशलतेचा पुरावा आहे. विजनिर्मितीतलं मोठं नावं असलेलं कोयना धरण असो की पुणे - सोलापूरला सुजलाम सुफलाम करणारं उजनी धरण असो की पुण्याच्या अवतीभोवतीची अनेक छोटी मोठी धरणं असो वा खानदेश, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील धरणं असो ही सर्व धरणं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहेत. शेतीमालावर प्रक्रिया उद्योग हा शेतीविकासाचा महत्वाचा टप्पा आहे हे सर्वात अगोदर जर कोणी ओळखलं असेल आणि त्यासाठी अपार कष्ट घेऊन जर कोणी या राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले असेल तर अग्रक्रमानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं नावं घ्यावं लागतं. सहकारी तत्वावरील कारखानदारी महाराष्ट्रात उभी राहिली तिच मुळी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली.  अर्थ तज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, बँक तज्ज्ञ वैकुंटभाई मेहता, जिद्दी शेतकरी, कुशल संघटक विठ्ठलराव विखे पाटील अशा मंडळींची मोट बांधून देशाला अहमदनगरच्या छोट्या लोणी गावातून यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकाराची प्रेरणा दिली. ज्यामुळे या देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक नवी पहात उगवली. पशुपालन, शेती शिक्षण, शेती संशोधन, खते - बी बियाणे निर्मिती, शेतीसाठी पतपुरवठा या सर्वांचा एक आकृतिबंध यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रापुढे ठेवला.

महाराष्ट्राच्या आजवरच्या ओद्योगिक विकासाचा पायाच यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. आज मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद परिसरातील मोठमोठ्या औद्योगिक वसाहती याची साक्ष देत आहेत. शेतीवर या राज्यातील सर्व जनतेला उपजीविका भागवणे याला मर्यादा आहे हे जाणून औद्योगिक वाढीस पोषक धोरण आखून त्याची अंमलबजावणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. टेल्को, किर्लोस्कर, भारत फोर्ब्स, बजाज अशा मोठ्या कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन करण्यास सरकारी पातळीवरील सर्व सहकार्य करण्याकडे यशवंतराव चव्हाण साहेबांचा ओढा होता.

राजकारणातही त्यांनी नेहमी सर्वसमावेशकता जोपासली. तळागाळातील, पददलीत नेतृत्व पुढे आणण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. डाव्या विचारांवर निष्ठा असलेली जेधे -मोरे यांसारखी शेतकरी कामगार पक्षातील मातब्बर मंडळी असो की खोब्रागडे, गायकवाड, कांबळे यांसारखे आरपीआयचे दलित समाजातील दिग्गज नेते असो वा विनायकराव पाटलांसारखे मराठवाड्यातील साधे शिक्षक असो अशा सर्वांना काँग्रेस पक्षाशी जोडून घेऊन नेहमीच बेरजेचे राजकारण केले.

कला साहित्य संस्कृतिच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण साहेबांची रुची अफाट होती. वाचनाचा - लेखणाचा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या साहित्यावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल, इतके विपुल लेखन त्यांनी केले आहे. साहित्यिक, कलावंत, विद्वान मंडळींच्या सांनिध्यात राहणारे यशवंतराव चव्हाण साहेब रसिक, कलासक्त मनाचे संवेदनशील व्यक्तिमत्व होते. त्यांची भाषणं वाचली, पुस्तकं वाचली की याचा प्रत्यय येतो.

भारत चीन युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून अतिशय कठीण काळात जबाबदारी पार पाडलेली देश आजही विसरू शकत नाही. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी कामं पाहिलं आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पहिले उपपंतप्रधान म्हणूनही देश त्यांना कायम आठवणीत ठेवेल.

सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू आणि संघर्षशील अशा यशवंतराव चव्हाण साहेबांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकरवी करून घेतलेल्या मराठी विश्वकोष या कामाने तर त्यांनी मराठी भाषिक पुढील पिढयांवर अनंत उपकार केले आहेत.

जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, बाबू जगजीवनरामजी, इंदिराजी अशा दिग्गज नेत्यांबरोबर काम केलेले यशवंतराव चव्हाण साहेब युवक काँग्रेसचे तत्कालीन युवक कार्यकर्ते असलेल्या शरद पवार व त्यांच्या सहकार्याशीं यांच्याशी तितक्याच प्रेमाने वागायचे, त्यांचं नेतृत्व घडवायचे हे किती महत्वाचं. काँग्रेस संघटनेत नव्या दमाची, नव्या विचारांची नवी तरुणाई  आली पाहिजे हा विचार आणि त्यासाठीची कृती त्यांनी कधीच सोडली नाही.

महाराष्ट्राचा नुसता मंगल कलश आणून न थांबता महाराष्ट्र खरोखर प्रगतीकडे कसा जात राहिल हेच स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेबांनी आयुष्यभर पाहिलं, त्यासाठीच कष्ट घेत राहिले.

आज महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात जोरदार चिखलफेक सुरु आहे. सामान्य जणांना राजकारण यां क्षेत्राविषयी चीड पैदा करणारे वातावरण असताना यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा महाराष्ट्राचा 'यशवंत' वारसा आपण सातत्याने नवीन पिढीसमोर मांडला पाहिजे...

आजच्या राजकारणात सक्रिय माणसाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कराडमधील कृष्णा - कोयनेच्या प्रीतीसंगमावरील समाधीवर माथा टेकवून त्याच्या वारशाचं स्मरण करावं. तो वारसा समजून त्यावर वाटचाल करायचा प्रयत्न करावा, जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन !

सोनाली मारणे,

सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

9545538844

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com