असं असावं मधमाश्यांचं गाव

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील दुसरं एक गाव आहे मांघर. हे मांघर गाव अलीकडेच देशातील पहिलं मधमाश्यांचे गाव ठरलं आहे.
Honey Bee Village
Honey Bee VillageAgrowon

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील दुसरं एक गाव आहे मांघर. हे मांघर गाव अलीकडेच देशातील पहिलं मधमाश्यांचे गाव ठरलं आहे. या गावातील प्रत्येक घरामध्ये मधमाशी पालनातून मधाचं उत्पादन घेतलं जातं. भारत सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यात एक मधमाश्यांचे गाव निर्माण करण्याचं ठरवलं आहे. नॅशनल बी बोर्ड, खादी ग्रामोद्योग मंडळ, कृषी विद्यापीठं, कृषी विभाग तसेच काही खासगी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रयोग यशस्वी करता येईल. यासाठी तरुणांचे गटसंघटन करावे लागेल. गावामध्ये समविचारी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविता येईल. या गटांच्या माध्यमातून गावाच्या मधमाशी पालनाला उपयुक्त होईल, असा पिकाचा आराखडा तयार करता येईल.

मधमाशीला वर्षभर फुलोरा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील नाल्यांवर योग्य ठिकाणी आणि योग्य अंतरावर बंधारे बांधून जलसंधारण कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. वर्षभर फुलोरा उपलब्ध होण्यासाठी व शेतकऱ्यांना फळांचे उत्पादन मिळण्यासाठी शेवगा, आवळा, जांभूळ, चिंच, डाळिंब, पपई, आंबा, पेरू, बोर, संत्रा, मोसंबी, लिंबू, हादगा, अंजीर यासारख्या फळझाडांचे नियोजन करता येईल. खरीप हंगामात बाजरी, मका, ज्वारी, सूर्यफूल, कारळ (खुरासणी), तीळ, तूर, भुईमूग, मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, वेलवर्गीय भाजीपाला, टोमॅटो, भेंडी, वांगी, कांदा, मिरची अशा पिकांची लागवड करावी. रब्बी हंगामात ज्वारी, मका, सूर्यफूल, करडई, जवस, धने, ओवा, मोहरी, गहू, हरभरा, कांदा बीजोत्पादन, बाजरी अशा पिकांची लागवड करावी. उन्हाळी हंगामात सूर्यफूल, खरबूज, कलिंगड, वेलवर्गीय भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, बाजरी या पिकांची लागवड करावी. पडीक जमिनी, डोंगर, टेकड्या, नदीनाल्यांचे काठ या ठिकाणी हिरडा, बेहडा, शिकेकाई, कडुनिंब, करंज, बेल, कदंब, रिठा, कवठ, करवंद यासारख्या मधमाशीप्रिय, मानवी आहार- आरोग्य योग्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लागवड करावी. मधमाशीचा आणि पिकांच्या फुलोऱ्याचा विचार केला तर महिन्यानुसार मधमाश्यांसाठी वर्षभर फुलोरा उपलब्ध झाला पाहिजेत.

जानेवारी : कांदा, सूर्यफूल, मोहरी, करडई, धने, डाळिंब, फळझाडे, फुलझाडे. फेब्रुवारी : सूर्यफूल, मोहरी, कांदा, डाळिंब, जांभूळ, शेवगा. मार्च : शेवगा, सूर्यफूल, डाळिंब, कांदा, आवळा, नारळ, जांभूळ, कडुनिंब. एप्रिल : सूर्यफूल, वेलवर्गीय भाजीपाला, कडुनिंब, जंगली झाडे, शोभेची झाडे, लिंबू. मे : सूर्यफूल, वेलवर्गीय भाजीपाला, जंगली झाडे, शोभेची झाडे. जून : नारळ, शेवगा, शोभेची झाडे, जंगली झाडे. जुलै : नारळ, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, जंगली झाडे. ऑगस्ट : बाजरी, ज्वारी, मका, कापूस, शेवगा, पेरू, डाळिंब, नारळ, तीळ, कारळ, सूर्यफूल. सप्टेंबर : बाजरी, ज्वारी, मका, कापूस, तूर, शेवगा, डाळिंब, पेरू, नारळ, सूर्यफूल, कारळ. ऑक्टोबर : सूर्यफूल, ओवा, अॅस्टर, नारळ, करडई, जवस. नोव्हेंबर : ओवा, सूर्यफूल, पेरू, शेवगा, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, मोहरी, जवस, करडई. डिसेंबर : सूर्यफूल, मोहरी, धने, शेवगा, आंबा, डाळिंब, पेरू, करडई, संत्रा, मोसंबी, लिंबू. प्रत्येक शेतकऱ्याने तीन-चार नारळाची झाडे लावावीत. जिथे शक्य आहे तिथे घराभोवती झेंडू, अॅस्टर, गुलाब, गुलछडी, बॉटल ब्रश, आईस्क्रिम वेल अशी झाडे लावावीत. सूर्यफूल व मोहरीच्या लागवडीमध्ये १०-१५ दिवसांचे अंतर ठेवावे. त्यामुळे फुलोरा जास्त दिवस

उपयोगात येईल.

मधमाशीच्या गावाबद्दल चर्चा नुकतीच सुरू झाली आहे. परंतु पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक येथील 'बसवंत मधमाशी उद्याना'मध्ये दोन वर्षांपासूनच या मधमाशीच्या गावाची प्रतिकृती मांडली आहे. या गावात मधमाश्यांसाठी आवश्यक झाडे व पिके यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच मधमाशी गावाचा पीक आराखडा, रोजगार निर्मिती, कृषिपूरक उद्योग आणि एकूणच शेतीचे अर्थशास्त्र याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्रातील अॅपिअरीमध्ये भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांच्या पाच प्रकारांपैकी चार प्रकार बघायला मिळतात. इटालियन, सातेरी, फुलोरी व ट्रायगोना हे ते चार प्रकार आहेत. (आग्यामाश्या अतिशय तापट स्वभावाच्या असतात. त्यांना कोणी चुकून जरी त्रास दिला तरी त्या जोरदार हल्ला करतात. त्या शक्यतो उंच झाडांवर किंवा इमारतींवर पोळी बांधतात.) फुलोरी माश्या सुद्धा पाळता येत नाहीत. परंतु त्यांनी या बागेत वसाहती तयार केल्या आहे.

गावातील काही तरुण-तरुणी, प्रौढ शेतकरी व महिला यांनी मधमाशी पालनाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे. जास्त शेतकऱ्यांनी एक दिवसाचे तरी प्रशिक्षण घ्यावे. गावातील १०-१५ तरुण शेतकऱ्यांनी पाच दिवसांचे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या गटाने सुरुवातीला ५० वसाहती आणाव्यात. मधमाशी आपल्या वसाहतीपासून सुमारे दोन कि.मी. अंतरापर्यंत मकरंद व परागकण जमा करण्यासाठी जाऊ शकते. गावातील क्षेत्र व मधमाशीची क्षमता लक्षात घेऊन शिवारातील तीन-चार ठिकाणी वसाहती ठेवाव्यात. मधमाश्या गावातील सर्व पिकांचे परागीभवन करतील. तसेच मध आणि इतर पदार्थाचे उत्पादन मिळेल. गरजेनुसार गावातच परागीभवनासाठी मधमाश्याच्या पेट्या भाड्याने देता येईल. आणलेल्या वसाहतींमध्ये काही वसाहती इटालियन मधमाशीच्या व काही सातेरी मधमाश्यांच्या असाव्यात. पॉलिहाऊसची शेती असेल तेथे ट्रायगोनाच्या वसाहती ठेवाव्या. पहिल्या वर्षापासून शेतकऱ्यांना मधाचे व परागकणांचे उत्पादन मिळेल. तसेच पेटीच्या भाड्यातूनही उत्पादन मिळेल. गावातील पिकाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होईल. उत्पादित झालेले सूर्यफूल, भुईमूग, मोहरी, कारळे , तीळ, जवस अशा तेलबियांपासून लाकडी घाण्यामधून तेल काढता येईल. गावामध्ये गटाच्या माध्यमातून अशी सोय उपलब्ध करता येईल. लाकडी घाण्याच्या तेलाला प्रचंड मागणी आहे आणि त्याला भावही चांगला मिळतो. त्याचप्रमाणे तूर, मूग, उडीद, चवळी, मटकी इ. कडधान्यांच्या डाळी तयार करण्यासाठी डाळमील सारखा व्यवसाय सुरू करता येईल. विविध फळ पिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी एक छोटा उद्योग उभा राहील. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकेल. उत्पादनाचं व्यवस्थित ब्रॅण्डिंग करून त्याची विक्री व्यवस्था चांगली केली तर त्याला शहरातून चांगली मागणी वाढू शकेल. अशा प्रकारे विविध माध्यमातून आणि उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकेल. सुशिक्षित बेरोजगारांसाठी यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मधमाशीचे गाव ही संकल्पना आज छोटी वाटत असली तरी यातूनच शेतीचा, शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागाचा आणि एकूणच समाजाचा विकास होणार आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त रजिस्ट्रार आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com