Tomato Market : आता नकोच ‘लाल चिखल’

Tomato Market Rate : टोमॅटोसह इतरही भाजीपाला पिकांच्या मार्केटिंगबरोबर मूल्यवर्धन, प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यायला पाहिजे.
Tomato Market
Tomato MarketAgrowon

Tomato Market Price Update : कांद्याला वर्षभरापासून योग्य दर मिळत नाही. कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, परंतु बाजारात नेण्यासाठीचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकात रोटर फिरविला, तर काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या ढिगाचा शेतातच अंत्यविधी देखील केला आहे.

हे सर्व चालू असताना आता टोमॅटोला एक ते दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून देत आहेत. उन्हाळ्यात टोमॅटोला मागणी अधिक असते.

त्यामुळे उठाव होऊन दरही चांगले मिळतात. नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मागील वर्षी उन्हाळ्यात टोमॅटोला चांगले दर होते म्हणून या वर्षी उन्हाळ्यात टोमॅटो काढणीला येतील, असे नियोजन केले.

परंतु आता मागणी घटल्याने दर पडले आहेत. टोमॅटो फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. तसे पाहिले तर मागील वर्षभरापासून कांदा, टोमॅटोच काय कोणत्याही भाजीपाला पिकास अपेक्षित दर मिळत नाही.

टोमॅटो पिकात शेतकरी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत आहेत. प्रचंड मेहनत आणि भरमसाट खर्च करून उत्पादित केलेल्या टोमॅटोचा शेतकऱ्यांनाच ‘लाल चिखल’ करावा लागत असताना त्यामागच्या वेदना आपल्या लक्षात यायला हव्यात.

Tomato Market
Tomato Market : लाल चिखल, दर पडल्याने बांधावर टोमॅटोचा खच

टोमॅटो हे बाजारात सर्वाधिक मागणी असलेले भाजीपाला पीक आहे. टोमॅटोच्या भाजीबरोबर इतरही बहुतांश भाज्यांत थोड्याफार प्रमाणात टोमॅटो वापरले जातात. टोमॅटोपासून चटणी, केचअप, सॉस आदी प्रक्रियायुक्त पदार्थही करता येतात.

त्यामुळे टोमॅटोस बाजारात वर्षभर मागणी असते, याचा उठावही बऱ्यापैकी असतो. परंतु टोमॅटो सर्वाधिक नाशीवंत पीक असल्याने काढणी झाल्याबरोबर ते बाजारात नेऊन विकावेच लागते. टोमॅटोची विक्री लवकर झाली नाही, तर शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूनच द्यावा लागतो.

हे व्यापाऱ्यांनाही चांगले माहीत आहे. त्यामुळे हंगामात आवक वाढली, की व्यापारी मागणी असली तरी ती दाखवत नाहीत. भाव पाडून कमीत कमी दरात टोमॅटोची खरेदी करण्याचा त्यांचा डाव असतो.

टोमॅटोसह इतरही भाजीपाला घेताना ग्राहक प्रचंड घासाघीस करतात. टोमॅटो पाच रुपये प्रतिकिलो एवढ्या कमी दराने विकत असले, तरी ग्राहक तीन रुपये किलोने मागणी करतात.

हाच ग्राहक दुकानात किंवा मॉलमध्ये मिळणाऱ्या किराणा, कापड, औषधे, वह्या-पुस्तके किंवा तत्सम अनेक जीवनावश्यक वस्तू दुकानदार सांगेल त्या किमतीत घेतात. मात्र हातावर पोट असलेल्या शेतकऱ्याचा भाजीपाला खरेदी करताना केवढी घासाघीस करतात.

टोमॅटोचा सातत्याने लाल चिखल होत असेल तर शेतकऱ्यांनी हंगामनिहाय अभ्यास करून, आढावा घेऊनच लागवडीचे नियोजन करावे. यासाठी त्यांना कृषी, पणन विभागाचे सुद्धा मार्गदर्शन मिळायला हवे. नाशीवंत अशा टोमॅटोची साठवणूक, टिकवणक्षमता वाढविणे, विक्री आणि प्रक्रिया यावर फारसे काम झालेच नाही.

टोमॅटो उत्पादक पट्ट्यात साठवणूक, तसेच टिकवणक्षमता वाढविण्याच्या सोयीसुविधा वाढवाव्या लागतील. जगभरात मागील दीड-दोन दशकांपासून अतिनील किरणांच्या वापराद्वारे टोमॅटोच नाही, तर विविध फळ-भाजीपाल्यांची टिकवणक्षमता दीड-दोन महिन्यांपर्यंत वाढविण्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.

Tomato Market
Tomato Crop Damage : नुकसानग्रस्त टोमॅटो पिकांचा पंचनामा करून मदत द्यावी

असे प्रयत्न आपल्याकडे झाल्यास कमी दर असताना टोमॅटो अथवा इतरही भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येणार नाही. टोमॅटो विक्रीत व्यापारी-मध्यस्थ कार्टेल करणार नाहीत, ही काळजीही घ्यावी लागेल.

टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग वाढायला हवेत. टोमॅटोसह इतरही भाजीपाला पिकांच्या मार्केटिंगबरोबर मूल्यवर्धन, प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यायला पाहिजे.

ताजे टोमॅटो तसेच टोमॅटोचे प्रक्रियायुक्त पदार्थ यांची निर्यातही शेजारील देशांबरोबर आखाती, युरोपियन देशांत वाढायला हवी. टोमॅटो, कांदा आणि बटाटा या नाशीवंत शेतीमालाच्या भावांतील चढ-उतारावर मात करून उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन्स’ अभियानाची केंद्र शासन पातळीवरून घोषणा सुमारे पाच वर्षांपूर्वी झाली, याचा अभियानाचा लाभ नेमका कोणाला मिळाला, हेही एकदाचे स्पष्ट झाले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com