Modern Banking : ‘नोबेल’ने घातला आधुनिक बँकिंगचा पाया

यंदाचा नोबेल पुरस्कार वॉशिंग्टन, डीसी येथील बेन एस बर्नान्के, शिकागो विद्यापीठातील डग्लस डब्ल्यू डायमंड आणि सेंट लुइस येथील फिलिप एच डायबविग यांना संयुक्तपणे दिला जाणार आहे. त्यांच्या संशोधनामुळे बँका, बँक नियमन, बँकिंग संकटे आणि आर्थिक संकटांचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दलची संपूर्ण समाजाची समज वाढली असल्याचे नोबेल अकादमीने नमूद केले आहे.
Modern Banking
Modern Banking Agrowon

गेल्या पंधरवड्यात स्टॉकहोममधील ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या (Royal Swedish Academy Of Science) नोबेल पारितोषिक (Nobel Award) समितीने यंदाच्या आर्थिक विज्ञानातील स्वेरिगेस रिक्सबँक अर्थातच अर्थशास्त्रातील सर्वांत प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली आहे. हा पुरस्कार वॉशिंग्टन, डीसी येथील ब्रुकिंग्स संस्थेतील बेन एस बर्नान्के, शिकागो विद्यापीठातील डग्लस डब्ल्यू डायमंड आणि सेंट लुइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील फिलिप एच डायबविग या अमेरिकन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील ‘बँकां आणि आर्थिक संकट’ या संशोधनासाठी संयुक्तपणे दिला जाणार आहे. हा पुरस्कार १० डिसेंबर रोजी स्वीडन येथे या तिघांना प्रदान केला जाणार असून या पुरस्काराअंतर्गत १० दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच सुमारे नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

Modern Banking
Bangladesh Agriculture : बांगलादेशी शेतकऱ्यांचे जगण्यासाठी जीवतोड प्रयत्न

व्यावहारिक महत्त्व

यावर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या या तीन अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्थेमध्ये असणारी बँकांची भूमिका, बँकांचे नियमन आणि व्यवस्थापन आर्थिक संकटाच्या काळात कसं असावं, या संकटांना कशा पद्धतीने सामोरे जावे, याचा अभ्यास केला आहे. शिवाय बँकिंग व्यवस्थेचे पतन हे अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने अडचणीत आणते आणि बँकांची पडझड टाळणे का महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिले आहे. या तिघांचे आधुनिक बँकिंग संशोधन ‘आपल्याकडे बँका का आहेत? हे स्पष्ट करते.

बँक पतन आर्थिक संकटाचे कारण

बेन एस बर्नान्के यांनी १९८३ मध्ये लिहिलेल्या एका संशोधन पत्रिकेत १९३० च्या जागतिक महामंदीचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि त्या अनुषंगाने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झालेली उलथापालथ यांचे विश्लेषण केले होते. जानेवारी १९३० ते मार्च १९३३ दरम्यान, यूएस मधील औद्योगिक उत्पादन सुमारे ४६ टक्क्यांनी घसरले आणि बेरोजगारी २५ टक्क्यांवर गेली. हे संकट वणव्यासारखे पसरले, परिणामी जगाच्या अनेक भागात आधुनिक इतिहासातील सर्वांत मोठ्या आर्थिक मंदीच्या लाटेत परावर्तित झाले.

विशेषतः ग्रेट ब्रिटनपासून, जर्मनी ऑस्ट्रेलिया, चिलीपर्यंत जिथे जवळपास एक तृतिअंश कर्मचारी नोकऱ्यांपासून दूर गेल्याने बेरोजगारी २५ टक्क्यांपर्यंत वाढली होती तर राष्ट्रीय उत्पन्न तब्बल ३३ टक्क्यांनी घटले. सर्वत्र, बँका कोलमडल्या, लोकांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले शिवाय श्रीमंत देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर उपासमार झाली. बर्नान्केच्या संशोधनापर्यंत बँकांच्या पतनाकडे केवळ आर्थिक संकटाचा परिणाम म्हणून पाहिले जात होते. परंतु बर्नान्के यांनी ऐतिहासिक स्रोत आणि सांख्यिकीय पद्धतींचा आधारे १९८३ च्या संशोधनामध्ये दाखवून दिले आहे की बँकांचे पतन हे आर्थिक संकटाचे परिणाम नसून ते एक कारण आहे. बँकांच्या अपयशाशी थेट संबंध असलेले घटक मंदीला जबाबदार आहेत. जेव्हा ठेवीदार बँकेच्या अस्तित्वाची चिंता करतात आणि आपली बचत काढण्यासाठी घाई

Modern Banking
Cooperative Bank : गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेची मोठी गरुडझेप

करतात, किंवा अनेक लोकांनी हे एकाच वेळी बॅंकेकडे पैशाची मागणी केल्यास, बँकेला ते दिवाळखोरीकडे नेणारे ठरते. याच संशोधनाच्या पार्श्वभूमीवर २००८ मध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या जागतिक वित्तीय अरिष्टाच्या सामोरे जाण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदी बर्नान्के यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी बर्नान्के यांनी ऐतिहासिक मंदीच्या दाखला देत आपल्या संशोधनातून दाखवून दिले की, जोपर्यंत देशांनी अतिरिक्त बँक पॅनिक टाळण्यासाठी शक्तिशाली उपाय लागू केले नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था सावरण्यास सुरुवात झाली नाही. अशा स्थितीत बँकांचे पतन टाळून त्यांची जनमानसातील विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी सरकारच्या वतीने ठेव विमा हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे त्यांनी भूमिका घेतली आहे.

बॅंकांकडूनच विसंगती सोडविता येईल

अभूतपूर्व २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापासून, बँकांनी लोकांच्या नजरेतून त्यांची चमक गमावली आहे. त्यांना अनेकदा पैसे हडप करणाऱ्या संस्था म्हणून पाहिले जाऊ लागले. परंतु बॅंका या कर्जदार तसेच ठेवीदारांना नफा मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असतात किंबहुना बँका नसलेल्या जगात दीर्घकालीन गुंतवणूक करणे अशक्य आहे. डग्लस डायमंड आणि फिलिप डाइबविग यांनी १९८३ मध्ये लिहिलेल्या संशोधन पत्रिकेत डायमंड -डाइबविग यांच्या सैद्धांतिक प्रतिमानानुसार दीर्घकालीन मत्ता आणि अल्पकालीन दायित्व यातून निर्माण होणारा असमतोल हा वित्तीय अरिष्टांना कशाप्रकारे कारणीभूत होतो याचे विवेचन केलेले आहे.

Modern Banking
Nobel For Peace " मानवाधिकार कार्यकर्त्यासह युक्रेन-रशियन संघटनांना शांततेचे ‘नोबेल’

त्यांनी विकसित केलेले हे प्रतिमानानुसार ठेवीदार (बचतकर्ते) आणि गुंतवणूकदारांच्या गरजा यांच्यात मूलभूत संघर्ष आहे. ठेवीदारांना (बचतकर्त्यांना) अनपेक्षित वापरासाठी अथवा संकटासाठी त्यांच्या बचतीच्या किमान काही भागामध्ये नेहमी हवा असतो; याला रोखतेची गरज असेही म्हणतात. तर गुंतवणूकदारांना (कर्जदारांना) विशेषतः जे घर बांधण्यासाठी किंवा रस्ता बांधण्यासाठी कर्ज घेतात, त्यांना जास्त काळ पैशाची गरज असते. जर अल्प नोटीसवर पैसे परत मागता आले तर कर्जदार काम करू शकत नाहीत. अर्थात बँक ही एक मध्यस्थ आहे जी दीर्घ मुदतीच्या मालमत्तेचे अल्प मुदतीच्या बँक खात्यांमध्ये रूपांतर करते.

याला ‘मॅच्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन’ म्हणतात. डायमंड आणि डायबविग यांनी दाखवून दिले की बँकांसारख्याच संस्थांकडून या विसंगती मॅच्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन याद्वारे उत्तम प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात. बँकेच्या मालमत्तेची परिपक्वता दीर्घ आहे. कारण ती कर्जदारांना वचन देते की त्यांना त्यांची कर्जे लवकर परत करण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे, बँकेच्या दायित्वांची मुदत अल्प असते. ठेवीदार त्यांना हवे तेव्हा त्यांचे पैसे मिळवू शकतात.

एकंदरीत त्यांच्या या संशोधनामुळे १९२९ च्या वॉल स्ट्रीट क्रॅश, नंतर आलेली जागतिक महामंदी आणि २००८ चे जागतिक आर्थिक संकटाची उकल होण्याबरोबर कोरोनासारख्या काळात जगभराला आर्थिक संकट टाळण्यासाठी त्यांच्या अभ्यासातील अंतर्दृष्टीमुळे महत्त्वपूर्ण मदत झाली आहे. असे असूनही हे संशोधन आज आर्थिक व्यवस्थेचे बदलते स्वरूप पाहता वित्तीय प्रणालीचे नियमन नेमके कसे केले जावे, याचे सखोल स्पष्टीकरण देत नाही कारण ठेव विमा नेहमीच हेतूनुसार कार्य करत नाही, हे बँकांना अनेकदा धोकादायक सट्टा लावण्यास प्रोत्साहित करू शकते.

तसेच वित्तीय बाजारांचे नियमन पूर्ण कार्यक्षमतेने होण्यासाठी बचतीचे चॅनेलिंग आवर्ती संकटे निर्माण न करता उत्पादक गुंतवणूक होणे महत्त्वाची ठरते. मात्र ही अनेकदा संशोधक आणि राजकारणी यांच्यातील वादाची बाब राहिली आहे. या संशोधनाने प्रत्यक्ष धोरणे, निर्णय यांसाठी अर्थशास्त्राची विश्वासार्हता वाढविणारे, किंबहूना बॅंकिग क्षेत्रातील गंभीर परिणामांचे दीर्घकालीन नैराश्यात परावर्तित होणारे आव्हान स्वीकारण्यास समाजाला अधिक सुसज्ज बनवते. शिवाय आर्थिक धोका कमी करून सर्वांसाठी एका स्थिर आर्थिक व्यवस्थेसह आधुनिक बँक नियमनाचा पाया प्रदान करते.

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com