Edible Oil : खाद्यतेल, डाळींमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्ट २०२२ रोजी निती आयोगाची सातवी वार्षिक सभा संपन्न झाली. या वेळी पंतप्रधानांनी खाद्यतेल आयातीवर दरवर्षी एक लाख कोटी रुपये खर्च होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ही आयात कमी करण्यासाठी काय करता येईल, ते पाहूया...
Edible Oil
Edible OilAgrowon

भारत हा सात लाख खेड्यांतून पसरलेला देश असून, कृषी व्यवसाय (Agriculture Business) हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अन्नधान्य उत्पादनात (Food Grain Production) वाढ आणि कृषी आधारीत ग्रामीण उद्योगास प्रोत्साहन या दोन गोष्टीतून आपण भविष्यातील अन्नसुरक्षा (Food Security) आणि रोजगार निर्मितीचे (Challenge Of Employment Generation) आव्हान पेलू शकतो.

पहिली हरित क्रांती

स्वातंत्र्यप्राप्तीपासून २५ वर्षे भारत अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता. अमेरिका आपल्याला गहू पुरवीत असे. १९६५ आणि १९७१ च्या भारत- पाक युद्धात, अमेरिकेच्या पाकधार्जिण्या धोरणामुळे अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होण्याची गरज भारतात निर्माण झाली. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी याबाबत ठोस कार्यक्रम हाती घेतले. भरपूर उत्पन्न देणाऱ्या गव्हाचे वाण निर्माण करणारे आणि त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळविणारे डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांतून १९८० च्या सुमारास भारत तृणधान्याच्या बाबतीत (गहू, तांदूळ, ज्वारी इ.) स्वावलंबी तर झालाच आणि गहू- तांदूळ याची निर्यातही करू लागला, हीच पहिली हरित क्रांती होय.

Edible Oil
Pulses : कडधान्यांमधील तेजी कितपत टिकाऊ ?

प्रयत्न दुसऱ्या हरितक्रांतीसाठी

खाद्यतेल आणि डाळी हे आपल्या अन्नाचे दुसरे प्रमुख घटक. या घटकांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र शासनाने तेलबिया मिशन (१९८५) आणि डाळी मिशन (१९८७) अशी दोन मिशन्स सुरू केली. ही मिशन्स सुरू होऊन २० वर्षे झाली तरी उत्पादनात वाढ होत नव्हती. भूकबळीच्या बातम्या येत होत्या. यावर डॉ. स्वामिनाथन यांनी "Towards Hunger free India` हा विस्तृत लेख प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी 1994 मध्ये आपण खाद्यतेलाच्या घरगुती उत्पादनाच्या केवळ १० टक्के खाद्यतेल आयात केले होते. २००४ मध्ये आपण घरगुती उत्पादनाइतके म्हणजे १०० टक्के खाद्यतेल आयात केले. डाळीचे उत्पादन स्थिर आहे. डाळींची आयात वाढत आहे.’’ असे विचार मांडले. तेलबिया आणि डाळी ही मिशन्स गेली ३५ वर्षे अस्तित्वात आहेत. परंतु खाद्यतेल आणि डाळी यांची आयात दरवर्षी वाढत आहे.

भारताची खाद्यतेलाची वार्षिक गरज २५० लाख टन. घरगुती उत्पादन १०० लाख टन. दरवर्षी १५० लाख टन खाद्यतेलाची आयात आपण करतो. यापैकी ९० लाख टन खाद्यतेल- पाम ऑइल, इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांकडून आणि ६० लाख टन खाद्यतेल, सूर्यफुलाचे आणि सोयाबीनचे, युक्रेन, ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून आयात करतो. दरवर्षी एक लाख कोटी रुपये खाद्यतेलाच्या आणि २५,००० कोटी रुपये डाळींच्या आयातीवर खर्च होत आहेत. तेलबिया आणि डाळींचे भारतातील हेक्‍टरी उत्पादन हे जागतिक हेक्‍टरी उत्पादनाच्या केवळ ४० ते ५० टक्केच आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, शेतमजुरी इ. खर्च वाढत आहे. पिकांचे हेक्‍टरी उत्पादन मात्र स्थिर आहे. काही बाबतीत घटत आहे. जे तंत्रज्ञान वापरून आपण तृणधान्य उत्पादनात क्रांती केली तेच तंत्रज्ञान वापरून तेलबिया, डाळी आणि इतर पिकांमध्ये हेक्‍टरी उत्पादन का वाढत नाहीये!

Edible Oil
Edible Oil : खाद्यतेल कंपन्यांचं मापात पाप बंद होणार?

परागीभवन/ परागसिंचन

फुलणाऱ्या पिकांमध्ये बीज अथवा फलधारणेसाठी फुलांतील पूं-बीज आणि स्त्रीबीज यांचे मीलन होणे आवश्‍यक असते. तृणधान्ये ही स्वपरागफलित किंवा वाऱ्यामार्फत पर-परागफलित आहेत. त्यांच्या बीजधारणेसाठी परागसिंचन कीटकांची मुळीच गरज नसते. कदाचित याच कारणाने आपली पहिली हरित क्रांती यशस्वी झाली. परंतु भारतात घेतली जाणारी इतर ७५ ते ८० टक्के पिके मात्र परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर अवलंबून असतात. निसर्गातील या परपरागसिंचन प्रक्रियेत मधमाश्‍यांचे ७५ ते ८० टक्के योगदान असते.

मधमाश्या कार्यक्षम परागसिंचक

मधमाश्यांच्या एका वसाहतीत १५ ते २० हजार मधमाश्या असतात. फुलोऱ्याच्या हंगामात एक मधमाशी आपले खाद्य गोळा करण्यासाठी दिवसभरात ५०० ते ७०० फुलांवरून फिरते आणि जवळपास तितक्‍याच फुलांमध्ये परपरागीभवन होऊन फुलांचे रूपांतर जनुकीय विविधता असलेल्या उत्तम प्रतीच्या भरपूर बियांत होते. मधमाश्यांत सुप्तावस्था नसते. परागीभवनासाठी त्या वर्षभर उपलब्ध असतात. त्यांच्या केसाळ शरीरावर परागकण अडकून परागीभवन हमखास होते. सोयाबीन, काही लिंबूवर्गीय फळे, तूर आदी पिके स्वपरागफलित आहेत. परंतु या पिकांच्या फुलोऱ्याच्या काळात शेतात मधमाश्यांच्या वसाहती ठेवल्यास, वसाहत विरहित क्षेत्रापेक्षा ४० ते ६० टक्के अधिक उत्पादन मिळते, असे ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचे संशोधन आहे. आधुनिक मधमाश्या पालनात, मधमाश्यांच्या वसाहती हव्या त्या संख्येने हव्या त्या ठिकाणी हुकमी परागीभवनासाठी नेता येतात.

अमेरिकेतील व्यावसायिक मधमाशापालक, परागीभवनासाठी मधमाश्यांच्या वसाहती सेवाशुल्क तत्त्वावर देतात. शेतकरी- बागाईतदार एका वसाहतीसाठी एका महिन्याला १०० ते १५० डॉलर्स सेवाशुल्क देतात. वनांमधील बेसुमार वृक्षतोड- वणवे आणि शेतीविभागात कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे उपयुक्त कीटक आणि मधमाश्यांचा संहार होत आहे. परपरागीसिंचन पिकांमध्ये फुलांच्या संख्येनुसार शेतात योग्य संख्येने मधमाश्या नसतील, तर सर्वच्या सर्व फुलांमध्ये परागीभवन न झाल्याने काही फुलात बीजधारणा होत नाही आणि पूर्ण क्षमतेइतके हेक्‍टरी उत्पादन मिळत नाही. मधमाश्यांची अपुरी संख्या त्यामुळे अपुरे परागीभवन हे भारतातील अनेक पिकांचे हेक्‍टरी उत्पादन कमी असण्याचे मुख्य कारण आहे. वाढती लोकसंख्या, खाद्यतेल आणि डाळी यांची वाढती मागणी, वाढती आयात, वाढत्या किमती अशा परिस्थितीत भारत अडकला जात आहे. याचे परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू आदींचे प्रमाण वाढतेय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेच्या २०१७ आणि २०२२ च्या अहवालानुसार भारतातील पाच वर्षांच्या आतील ५० टक्के मुले कुपोषित, कमी वजनाची, लोह कमतरता असलेली आहेत.

उत्तम बियाणे, खते, जलसिंचन आणि कीडनाशके या चार पारंपरिक निविष्ठा वापरून पर-परागसिंचित पिके जेव्हा फुलांत येतात तेव्हा ‘परागीभवनासाठी मधमाश्या या पाचव्या आणि महत्त्वाच्या निविष्ठाला पर्याय नाही. जगात ज्या ज्या देशात मधमाश्यांच्या भरपूर वसाहती आहेत ते ते देश (युक्रेन, अर्जेंटिना, ब्राझील, इस्राईल आणि इतर) अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर तर आहेतच आणि खाद्यतेल, डाळी, फुले आदींचे निर्यातदारही आहेत. मधमाश्या लाखो किलो मध तर तयार करतातच आणि त्याचबरोबर परागीभवन करून वने समृद्ध करतात आणि अनेक पिकांच्या उत्पादनात वाढ करून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालतात. महाराष्ट्रात मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या वेगाने वाढविणे अपरिहार्य आहे. ही गोष्ट २-३ वर्षांत होण्यासारखी नाही. त्यासाठी अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे कार्यक्रम आखून त्यांची एकत्रित अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, कृषी, वन, फलोत्पादन, जलसिंचन, पर्यावरण, कृषी विद्यापीठे आणि काही सेवाभावी संस्था यांचा सहभाग आणि समन्वय देखील गरजेचा आहे.

(लेखक केंद्रीय मधमाश्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com