Cotton : तुटता ‘धागा’

उत्पादनवाढीच्या तुलनेत बीटी कापसाचा उत्पादनखर्च प्रचंड वाढला असून, हे पीक उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरताना दिसत नाही.
Cotton
CottonAgrowon

आठ एकर कपाशीतील चार एकर अति पावसाने आकस्मित मर (Wilt) येऊन गेली. चार एकर बरी आहे. परंतु दोन वेचण्यांत तिही संपून जाईल. त्यातही ३० ते ४० टक्के उत्पादन घट आहे. ही प्रतिक्रिया औरंगपूर, जि. औरंगाबाद येथील शेतकऱ्याची असली, तरी देशातील कापूस उत्पादकांचे (Cotton Producer) वास्तव मांडणारी आहे. कमी पाऊसमान काळात तर बीटी कापसाचे पीक तगच धरत नाही. परंतु अधिक पाऊसमान काळातही कापसाची उत्पादकता, उत्पादन घटत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून गुलाबी बोंड अळी, तसेच ‘लाल्या’ विकृतीने उत्पादक त्रस्त असताना या वर्षी या दोन्ही आपत्तींसह मूळकुज, बोंडसड या रोगांनी कापसाची उलंगवाडी दोन-तीन वेचण्यातच होत आहे. मागील वर्षीपासून कापसाला चांगला दर मिळत आहे. परंतु कापसाचे अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे एक-दोन वेचण्यांनंतर कापूस काढून रब्बीत एखादे पीक घेण्याकडे राज्यातील कापूस उत्पादकांचा कल दिसून येतो. खानदेशात पूर्वहंगामी (लवकर लागवड केलेला) कापूस, तर विदर्भ-मराठवाड्यात हंगामी (वेळेवर तसेच उशीरा) लागवड केलेला कापूस काढून रब्बीचे नियोजन शेतकरी करीत आहेत. देशात बीटी कापसाच्या व्यावसायिक लागवडीला दोन दशके पूर्ण होत आहेत. अशावेळी कापसाची झालेली ही वाताहत चिंतनीय आहे. त्यामुळे बीटी कापूस खरोखरच देशातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरला का? याचा वास्तववादी घेण्याची ही वेळ आहे.

Cotton
Cotton Market: कापसाचा पेरा वाढला, पण उत्पादन वाढणार का? |ॲग्रोवन

आज दोन दशकांपूर्वी बीटी कापसाला व्यावसायिक मान्यता मिळताना कंपनीने केले सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. बीटी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही. झालाच तर १०० दिवसांनंतर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तोही कमी प्रमाणात होईल. नियंत्रणात्मक उपायातून तोही कमी करता येईल. बीटी कापसात कीडनाशकांचा वापर कमी होईल. पहिल्या-दुसऱ्या वेचणीतील चांगले उत्पादन मिळून एकूण कापूस उत्पादकता आणि उत्पादनदेखील वाढेल, असे कंपनीचे दावे होते. हे सर्व दावे आज फोल ठरताना दिसत आहेत. कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ४० दिवसांनंतरच होत आहे. पुढे फुले-पात्या-बोंड लागल्यावर या किडीचा उद्रेक होऊन कीड नियंत्रणात येत नाही, असे उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

Cotton
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगा

पंजाबसारख्या राज्यात पांढऱ्या माशीचा बीटी कापसावर प्रादुर्भाव वाढत आहे. ‘लाल्या’ विकृतीने कापसाची पाने लाल पडून झाडे वाळून जात आहेत. यावर अजूनही प्रभावी नियंत्रणात उपाय देण्यात कृषी तज्ज्ञांना यश आलेले नाही. बीटीच्या आगमनानंतर कापसामध्ये कीडनाशकांचा वापर कमी होण्याऐवजी ३७ टक्क्यांनी वाढला आहे. गंभीर बाब म्हणजे बीटी कापसाच्या अधिक उत्पादनाचे दावेही खोटे ठरले आहेत. २००० ते २००५ या काळात, अर्थात बीटीचे देशात नुकतेच (२००२ मध्ये) आगमन होऊन क्षेत्र केवळ सहा टक्के असताना उत्पादनात ६९ टक्के वाढ झाली आहे. तर २००५ ते २०१५ या काळात बीटी कापसाचे क्षेत्र ९६ टक्क्यांवर पोहोचले असताना उत्पादनात केवळ १० टक्के वाढ झालेली आहे.

ही उत्पादनवाढ सुद्धा बीटीबरोबर देशभर कापसाचे वाढलेले बागायती क्षेत्र, त्यात रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वाढत्या वापराने झाली आहे. त्यामुळे उत्पादनवाढीच्या तुलनेत बीटी कापसाचा उत्पादनखर्च प्रचंड वाढला असून हे पीक उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरताना दिसत नाही. या वर्षी क्षेत्र वाढ आणि चांगल्या पाऊसमानाच्या पार्श्‍वभूमीवर कापसाची उत्पादकता आणि उत्पादन वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाने झालेले नुकसान आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी देखील उत्पादनवाढ होणार नाही. हे असेच चालत राहिले तर बीटी कापसाचा धागा घट्ट होण्याऐवजी तो तूटतच जाईल, यात शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com