
Valentine's Day Special : आज १४ फेब्रुवारी. जगभर हा दिवस व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. खासकरून प्रेमीयुगुल आणि मित्रांमध्ये या दिवसाचे मोठे महत्त्व आहे.
प्रेमाचे प्रतीक असलेला लाल गुलाब (Rose Flower), मैत्रीचे प्रतीक असलेला पिवळा गुलाब व त्यागाचे प्रतीक असलेला पांढरा गुलाब अशा तीन प्रमुख रंगांच्या दर्जेदार गुलाब फुलांची व्हॅलेंटाइन डे साठी जगभरातून मागणी (Flower Demand) वाढलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गुलाब उत्पादनाच्या (Rose Production) अनुषंगाने हा दिवस महत्त्वाचा आहे.
व्हॅलेंटाइन डे हा गुलाब फूल उत्पादक तसेच निर्यातदारांसाठी सुगीचा काळ मानला जातो. या काळात गुलाबाला देशांतर्गत तसेच जगभरातून मागणी वाढत असल्याने दामही दुपट्टीने मिळतात.
त्यामुळे व्हॅलेंटाइन डे साठी शेतकऱ्यांचे गुलाब फुलांचे उत्पादनाचे नियोजन तीन-चार महिने आधीपासूनच सुरू होते. एकेकाळी राज्यातून फुलाची जगभर मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती.
परंतु अलीकडच्या काळातील बदलते हवामान, वाढलेला उत्पादन खर्च आणि अनिश्चित बाजारपेठ याचा मोठा फटका फुलशेतीला बसून निर्यात ठप्प आहे.
व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर दरवर्षी एकट्या मावळ तालुक्यातून ७० ते ८० लाख फुलांची निर्यात होत होती. यावर्षी ती निम्म्यावर येऊन ठेपली आहे. वाहतूक, निर्यातीच्या वाढलेल्या दराचा हा परिणाम आहे.
देशातही लग्नसराई सुरू असल्याने गुलाबासह इतर फुलांना मागणी आहे. निर्यातीचे दर आणि देशांतर्गत दर समान असल्याने फुल उत्पादकांचा कल देशांतर्गत बाजारातच फुले पाठविण्याकडे दिसून येतोय.
खरे तर राज्यातील फुलशेतीला मागील दशकभरापासूनच ग्रहण लागलेले आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये पॉलीहाऊस तसेच उघड्यावरील फुलशेतीचे दरवर्षीच मोठे नुकसान होते. २०१६ मधील नोटबंदी आणि त्यानंतरची जागतिक मंदीनेही फुलशेतीला चांगलाच फटका बसला.
कोरोना महामारीत शेती क्षेत्रात सर्वाधिक फटका फुलशेतीला बसला. कोरोना काळात राज्यातील फुलशेतीला बसलेल्या फटक्यातून अजूनही बरेच जण सावरले नाहीत. कोरोनानंतर फुलशेती व्यवसाय कसा बसा सावरेल अशी आशा होती.
परंतु निविष्ठांचे खासकरून विद्राव्य खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढलेले दर, देशांतर्गत तसेच निर्यात वाहतुकीत झालेली प्रचंड वाढ आणि त्या तुलनेत गुलाब, जरबेरा, कार्नेशन यांसह झेंडू, शेवंती, गुलछडी अशा कोणत्याच फुलांना दर मिळत नसल्याने ही फुलशेती तोट्याची ठरतेय.
पॉलीहाऊस उभारणीचा सुरुवातीचा खर्च खूप अधिक असतो. कर्ज काढून शेतकरी यासाठीचे भांडवल उभे करतात. पॉलीहाऊस उभारणीनंतरही फुलांचे उत्पादन घेण्यासाठी रोपं खरेदीपासून ते विक्री-निर्यातीपर्यंतच्या खर्चातही प्रचंड वाढ झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीत पॉलीहाऊसचे नुकसान झाल्यास अनेक वेळा भरपाई देखील मिळत नाही. पॉलीहाऊस साठी लागणारी विद्राव्य खते, फिल्म तसेच इतर साहित्य बरेचदा बाहेरून आणावे लागते, त्यावर असलेल्या जीएसटीचा भुर्दंड ग्राहक शेतकऱ्यांवरच बसत आहे.
एवढेच नाही तर फुलांच्या वाहतुकीवरही १८ टक्के जीएसटी आकारली जातेय. विमानाने फुले निर्यातीचे दरही मागील दोन वर्षांत खूपच वाढले असून त्यावर शासनाची कोणतीही सवलत मिळत नाही.
प्लॅस्टिकच्या फुलांच्या उठलेल्या बाजारानेही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या उत्पादित फुलांची मागणी घटून त्यांना कमी दर मिळतोय. या सर्व बाबींचा केंद्र-राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून फुलशेती वाचविण्यासाठीचे धोरण जाहीर करायला पाहिजे.
यामध्ये नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास तत्काळ भरपाई मिळायला हवी. गुलाबासह इतरही फुलशेतीचा खर्च कमी करण्यासाठी शक्य तिथे जीएसटीत पूर्णपणे सवलत द्यायला हवी. फुलांच्या निर्यातीसाठी अनुदान नाही तर दरात सवलत द्यायला पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणास घातक अशा ‘चायना मेड’ प्लॅस्टिकच्या फुलावर बंदी घातली पाहिजेत. असे झाल्यास गुलाबासह इतरही फुलांची लाली वाढून त्यांचा दरवळ जगभर पोहोचेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.