मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते!

खरं नसलेलं बोलणं एवढाच खोटेपणाचा अर्थ नसतो. तर खरं असेल त्याहून अधिक काही बोलणं आणि मानवी मनाच्या संदर्भात आपल्याला जाणवतं त्याहून अधिक काही बोलणं, हा खोटेपणाचा अर्थ आहे. किंबहुना, हा जास्त महत्त्वाचा अर्थ आहे. आपण सगळेच जगणं सुलभ करण्यासाठी रोज असं वागत असतो.
Book Review
Book ReviewAgrowon

‘सुख म्हणजे काय याचा शोध घ्यायला गेलात तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही आणि जीवनाचा अर्थ शोधायला गेलात तर तुम्ही कधीच जगू शकणार नाही.’

- आल्बेर काम्यू

मनात येईल तसं तुम्ही वागू शकता का, बोलू शकता का? उत्तर देण्याआधी थोडा विचार करा! कोणीही टिकोजीराव असलात तरी या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला ‘नाही’ असंच द्यावं लागेल, हे लक्षात घ्या! मनाच्या काळकोठडीत अनेक गोष्टी रटरटत असतात. त्या बाहेर आल्या तर नितिनियमांनी बद्ध समाजशील प्राणी म्हणून असलेली आपली ओळख तुम्हाला पुसावी लागेल. याचाच दुसरा अर्थ असा की कोणी कितीही दावा केला तरी आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक नसतो. उदाहरणार्थ, कार्यालयात आपण साहेबावर खार खाऊन असतो, पण बोलताना मात्र आदरभावच व्यक्त होतो. बॉसचा शब्द झेलायच्या स्पर्धेत मागं राहणं कोणालाच परवडणारं नसतं, बॉस! कोणी तरी मनापासून खूप आवडत असतं, पण अशा अप्राप्य गोष्टींपासून दूर राहण्याचा संयम, समंजसपणा अंगी बाणवावा लागतो. काही जणांना ‘जानी दुष्मन’ असतात. त्यांच्या नरडीचा घोट घ्यावा, असं त्यांना सतत वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं करण्याचं धारिष्ट्य होत नाही. अगदीच अति झालं तर शिविगाळ करण्याचा थोडा कमी सभ्य मार्ग अवलंबता जातो. काही जण प्रत्यक्ष हिंसाही करतात, पण तो अपवाद असतो, नियम नव्हे! मनात आलेल्या क्रूर किंवा कटू-गोड विचारांना चाळणी लावून समाजशील मार्गानं व्यक्त करण्याचं कठीण काम मेंदू नावाचा अवयव करत राहतो. म्हणून तर आपल्याला सभ्यतेचा, सुसंस्कृततेचा मुखवटा मिजाशीनं मिरवता येतो.

असा कोणी तरी, कुठे तरी असतो, जो खरंच मनात येईल तसं बोलतो आणि वागतोही. कदाचित तोच खरा (रूढार्थानं सभ्य नसला तरी) स्वतंत्र, प्रामाणिक म्हणवून घ्यायला पात्र ठरावा. फ्रेंच लेखक आल्बेर काम्यू याच्या ‘दि आउटसायडर’ किंवा ‘दि स्ट्रेंजर’ या दोन्ही नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कादंबरीचा नायक मेर्सो या अर्थानं प्रामाणिक म्हणून गणला जाऊ शकतो. ही कादंबरी समजून घेण्याआधी आल्बेर काम्यूचा जीवनप्रवास थोडक्यात जाणून घ्यायला हवा. त्याचं आयुष्य जणू एका कादंबरीचं कथानक होतं. वडील शेतमजूर, आई गृहिणी. आल्बेर लहान असतानाच वडील पहिल्या महायुद्धात मारले गेले. नंतर या मायलेकरांचं जिणं अत्यंत हलाखीचं झालं. शाळेत तो हुशार विद्यार्थी. पण दारिद्र्यामुळं नाना व्यवसाय, नोकऱ्या कराव्या लागल्या. त्यातूनही आपलं फुटबॉलचं आणि नाटकाचं वेड त्यानं जोपासलं. काही काळ पत्रकारिताही केली. जाँ पॉल सार्त्र या प्रख्यात लेखकाशी त्याचं मैत्र होतं. तो कम्युनिझमचा भोक्ता होता, पण अंधभक्त नव्हता.

अस्तित्ववादी लेखक, तत्त्वज्ञ म्हणून हा पाश्‍चात्त्य लेखक प्रसिद्ध आहे. अर्थात, अस्तित्ववादी ही आपली ओळख काम्यूला अजिबात मान्य नव्हती. दि स्ट्रेंजर’ आणि ‘दि प्लेग’ या त्याच्या कादंबऱ्यांनी जागतिक अभिजात साहित्यात मानाचं पान मिळवलं. या कृतींनी आणि त्यासाठी वापरलेल्या लेखनशैलीनं अवघं साहित्यविश्‍व हादरलं. रोखठोक कोरडी भाषा हे त्याचं वैशिष्ट्य. त्याच्या साहित्यात घटना घडतात, पण त्या क्रमवार नसतात. तार्किकता असतेच असं नाही. तरीही त्यांचं वाचन करणं हा थरारक अनुभव असतो. मानवी दुःखाची अपरिहार्यता आपल्याला अस्वस्थ करते. विशेषतः ‘दि स्ट्रेंजर’च्या नायकाचं अलिप्तपण, भावनाशून्यता आपल्याला हादरवून सोडते. परिणामांची, सामाजिक संकेतांची पर्वा न करता जे खरं आहे, जे अंतर्मनात आहे तेच बोलण्याचं त्याचं धाडस केवळ थक्क करणारं! मधुश्री प्रकाशनानं अलीकडेच काम्यूची ही कलाकृती मराठीत आणली आहे. अवधूत डोंगरे यांनी ‘परका’ या नावानं तिचं सरस मराठी भाषांतर केलं आहे.

‘दि स्ट्रेंजर’चं कथानक उत्तर आफ्रिकेतील अल्जिरियाची राजधानी अल्जियर्स या भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवरील शहरात घडतं. तेव्हा अल्जिरिया ही फ्रान्स वसाहत होती. मेर्सो हा कादंबरीचा नायक फ्रान्सचा नागरिक. कादंबरीच्या पहिल्या भागाची सुरुवातच नायकाच्या धक्कादायक निवेदनानं होते...

आज आई वारली. किंवा कदाचित काल असेल, मला माहीत नाही. तिच्या वृद्धाश्रमातून मला एक तार आली. ः ‘आई गेल्या. उद्या अंत्यविधी. तुमचा विश्‍वासू.’ यावरून काहीच अर्थ लागत नाही. हे कदाचित कालचंही असेल.

Book Review
Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

आईच्या अंत्ययात्रेत तो पारंपरिक पद्धतीच्या शोकाचं कोणतंच प्रदर्शन करत नाही. तिच्या मृतदेहासमोर तो कॉफी पीत आणि सिगारेट ओढत बसतो. दुसऱ्याच दिवशी त्याच्या कार्यालयात पूर्वी काम करणाऱ्या मारीशी त्याची गाठ पडते. ते समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करतात आणि अखेर रत होतात. त्यानंतरच्या काही दिवसांत मेर्सो त्याचा शेजारी असलेल्या रेमंड सिंटेसला त्याच्या व्यभिचारी मैत्रिणीला अद्दल घडवायला मदत करतो. या प्रकरणात त्याच्या हातून समुद्र किनाऱ्यावर एका अरबाचा खून होतो. त्या क्षणी त्याच्या भावना काय होत्या किंवा गोळी झाडताना त्याला काय वाटलं याबद्दल तो काहीही सांगत नाही. त्याऐवजी फक्त उन्हाच्या झळा आणि त्या उष्णतेनं होणारा त्रास याचंच वर्णन करत राहतो.

कादंबरीच्या दुसऱ्या भागाची सुरुवात मेर्सो तुरुंगात असताना होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलाला मेर्सोचा शांतपणा आणि उदासीनता पाहून त्याला कोणताच पश्‍चात्ताप होत नाही किंवा अपराधी वाटत नाही हे लक्षात येतं. मग हा वकील खून कसा झाला यापेक्षा त्याच्या आईच्या प्रेतयात्रेच्या वेळी तो का रडला नाही, तो कसा भावनाहीन आहे, यावरच युक्तिवाद करण्यावर सगळं लक्ष केंद्रित करतो. शेवटी मेर्सोला आत्माहीन माणूस ठरवून त्याला मृत्यूचीच शिक्षा योग्य आहे, अशी मांडणी करतो. मेर्सोचा वकील त्याला वाचवण्याचा आणि शिक्षा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो. न्यायाधीश मेर्सोला भर चौकात लोकांसमोर फाशी द्यावं, असा निवाडा देतात.

पुढं शिक्षेच्या अंमलबजावणीआधी देवाला शरण जाण्याची विनवणी करणाऱ्या ख्रिश्चन पाद्र्यावर मेर्सो भडकतो. माणसाची अॅबसर्ड अवस्था आणि स्वत:च्या अस्तित्वाची निरर्थकता यावर बेधडक बोलतो. शेवटी तो सांगतो, ‘माझी एकच इच्छा उरली आहे - ती म्हणजे माझ्या फाशीच्या वेळी जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि माझ्याविषयी तिरस्कारानं आरोळ्या ठोकून मला निरोप द्यावा!’ अस्वस्थ करणाऱ्या या कादंबरीचा असा शेवट होतो. थोडक्यात, सभोवतालची परिस्थिती बदलता येत नसेल तर त्याकडं उदासीनपणानं दुर्लक्ष करण्याऐवजी ती स्वीकारून निर्णयात्मक पद्धतीनं पुढं जायला हवं असं काम्यू सूचित करतो. दुसऱ्या महायुद्धामुळं युरोपभर पसरलेल्या नैराश्याचं सावट या कादंबरीभर आढळतं. मेर्सो अत्यंत प्रामाणिक आहे. मनात येईल ते बोलताना कोणाचीही तमा तो बाळगत नाही. त्याच्या या भावनिक अनास्थेमुळं तो समाजात एक त्रयस्थ किंवा ‘स्ट्रेंजर’ ठरतो. त्याचा प्रवास निष्क्रिय असणं, तटस्थ असणं आणि उदासीन असणं अशा मार्गानं जाऊन पुढे परिस्थिती बदलता येत नसेल तर ती स्वीकारण्याकडे आणि शांतपणे मरण्यापर्यंत जातो.

Book Review
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

आपल्या कविवर्य सुरेश भटांनी म्हटलं आहे...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते!

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते?

सुरेश भट जगण्याच्या संघर्षाविषयी, प्रेमाविषयी भाष्य करतात. काम्यूचा नायक मात्र या साऱ्यापलीकडं गेला आहे. जीवन निरर्थक आहे. त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नका. जगण्याचा आनंद लुटा, आताच क्षण साजरा करा, असा संदेश काम्यू या कथानकातून देतो. काम्यूच्या लिखाणात असंख्य अविस्मरणीय अवतरणं आढळतात. ती त्याच्यातील अस्सल तत्त्वज्ञाची ओळख करून देतात. मानवाच्या ढोंगीपणाविषयी तो म्हणतो, ‘आपलं आहे ते अस्तित्व न स्वीकारणारा मानव हा एकमेव प्राणी असावा.’ सभ्यपणाचा मुखवटा सांभाळताना माणसांच्या होणाऱ्या दमछाकीकडे लक्ष वेधताना त्यानं म्हटलंय, ‘काही लोक फक्त ‘नॉर्मल’ राहण्याकरिता प्रचंड ऊर्जा आणि श्रम खर्ची टाकतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही.’ ‘आत्महत्या करण्यापेक्षा जगण्यासाठी अधिक धैर्य लागतं,’ असंही निरीक्षण तो नोंदवतो. ऐनवेळी रेल्वे प्रवासाचा बेत रद्द करून ४ जानेवारी १९६० रोजी मोटारीने निघालेला काम्यू अपघातात मरण पावला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं ४६ वर्षं. इतक्या कमी वयात त्यानं केलेलं काम मात्र उदंड होतं. तो कम्युनिझमचा पाठीराखा होता. पण त्याच्या नावाखाली स्टालिनकडून सुरू असलेला नंगानाच त्याला मान्य नव्हता. विशेषतः हंगेरीतील नागरी उठाव चिरडून टाकताना केलेल्या बळाच्या पाशवी वापरावर त्यानं आपल्या लेखनातून जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यामुळं रशियाच्या केजीबी या गुप्तचर संघटनेनं त्याच्या मोटारीचा अपघात घडवून आणल्याची थिअरी मांडली जाते, पण तिची खातरजमा झालेली नाही.

‘दि स्ट्रेंजर’वर जसा कौतुकाचा वर्षाव झाला, तसा टीकेचा भडीमारही झाला. या कादंबरीचा नायक छिन्नमनस्क (स्किझोफ्रेनिक) किंवा मंदबुद्धी असल्याची टीका काही समीक्षकांनी केली. याबाबत कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीला एक स्वतंत्र टिपण लिहून काम्यूनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो...

‘खूप काळापूर्वी ‘परका’चा सारांश मी एका वाक्यात नोंदवला होता, तो असा : ‘आपल्या समाजात स्वतःच्या आईच्या अंत्यविधीला न रडणाऱ्या माणसाला देहदंडाची शिक्षा फर्मावली जाऊ शकते.’ हे वाक्य अत्यंत विरोधाभासी होतं, हे मी कबूल करतो. या पुस्तकाचा नायक प्रचलित नियमांनुसार वागत नाही म्हणून त्याला शिक्षा होते, इतकाच माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. या अर्थी, तो ज्या समाजात राहत असतो तिथे परका ठरतो; एकाकी नि ऐंद्रिय जगण्याच्या बाहेरच्या भागांमध्ये, परिघावर तो भटकत राहतो. त्यामुळे तो समाजाने नाकारलेला आहे, असं मानण्याचा मोह काही वाचकांना झाला. पण त्याच्या वृत्तीचं अधिक अचूक किंवा लेखकाच्या हेतूशी अधिक अनुरूप चित्र स्पष्ट व्हायचं असेल तर, मेर्सो कशा रीतीने प्रचलित नियमांनुसार वागत नाही असा प्रश्‍न स्वतःला विचारायला हवा. याचं उत्तर साधं आहे : तो खोटं बोलायला नकार देतो. खरं नसलेलं बोलणं एवढाच खोटेपणाचा अर्थ नसतो. तर खरं असेल त्याहून अधिक काही बोलणं आणि मानवी मनाच्या संदर्भात, आपल्याला जाणवतं त्याहून अधिक काही बोलणं, हा खोटेपणाचा अर्थ आहे, किंबहुना हा जास्त महत्त्वाचा अर्थ आहे. आपण सगळेच जगणं सोपं करण्यासाठी रोज असं वागत असतो. पण मेर्सो जगणं दिसतंय त्याहून अधिक सोपं करायला नकार देतो. तो जसा आहे तेच बोलतो, तो स्वतःच्या भावना लपवणं नाकारतो आणि समाजाला लगेच धोका उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. शौर्याचा काहीच पवित्रा न घेणाऱ्या आणि सत्यासाठी मरायला तयार असलेल्या माणसाची गोष्ट म्हणून ‘परका’कडे पाहणं फारसं चुकीचं ठरणार नाही.’

काम्यू हे साधं रसायन नव्हतं. त्याला वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी सन १९५७ मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. रुडयार्ड किपलिंगनंतर इतक्या कमी वयात हा सर्वोच्च सन्मान मिळणारा तो दुसरा साहित्यिक ठरला. हा पुरस्कार स्वीकारावा की नाकारावा, याबाबत त्याची मनःस्थिती द्विधा होती. पुरस्कार स्वीकारला तर आपल्या आगामी साहित्यावर त्याचा वाईट परिणाम होईल, असं त्याला वाटत होतं. मित्रांच्या, आप्तांच्या आग्रहानंतर त्यानं तो स्वीकारायचं ठरवलं. स्टॉकहोममधल्या नोबेल पुरस्कार सोहळ्यात त्यानं केलेलं भाषण त्याची वैचारिक उंची, वेगळेपण स्पष्ट करणारं होतं. काम्यू सारखे प्रतिभावंत किती द्रष्टे असतात, त्यांचे विचार कसे सार्वकालिक असतात याचा प्रत्यय त्यावरून यावा. तो म्हणाला...

‘एका लेखकाची भूमिका इतकीही सोपी नसते. तो इतिहास घडवणाऱ्यांचा सेवक होऊ शकत नाही. ज्यांना या इतिहासाची किंमत चुकवावी लागते त्यांचा (जनता) तो सेवक असतो. तसं नाही झालं तर तो एकटा पडेल आणि आपल्या कलेपासून वंचित राहील. हुकूमशाही सरकारांची लाखोंची फौजही त्याची या एकाकीपणापासून सुटका करू शकत नाही. विशेष करून तेव्हा, जेव्हा तो अतिरेकी विचारांच्या लोकांच्या सुरात सूर मिळवू लागेल! त्या तुलनेत जगाच्या कुठल्या तरी तुरुंगात खितपत पडलेल्या एखाद्या कैद्याचं मौन लेखकाच्या आत्म्याला हादरवू शकतं. हे मौन लक्षात ठेवून आपल्या कलेच्या माध्यमातून लेखकानं त्याला आवाज दिला पाहिजे. खरं तर माझ्या आयुष्यातल्या अनेक वाईट प्रसंगी मला जर कोणी तारलं असेल, त्यातून बाहेर काढलं असेल तर ते माझ्या लेखनानं. सामाजिक बांधिलकी जपणं हेच तर खऱ्या साहित्यिकाचं कर्तव्य असतं. कुठल्याही परिस्थितीत त्यानं लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. खोटेपणा आणि लाचारी या गोष्टींना त्याच्याजवळ कधीच थारा असू शकत नाही. सगळं जग संकटातून जात असतानाही जगाला वाचवण्याचा प्रयत्न साहित्यिकानं शांततेच्या मार्गानं केला पाहिजे. स्वातंत्र्याचं मोल खूप मोठं आहे आणि ते अबाधित राहावं यासाठी निर्धारपूर्वक चालत राहिलं पाहिजे. लेखकाच्या कलेची महानता दोन गोष्टींवरून ठरते... ‘सत्याची सेवा आणि स्वातंत्र्याची सेवा’

विचारांशी प्रामाणिक राहणं ही बोलण्याइतकी साधी गोष्ट नाही. मेर्सोप्रमाणं एखादा क्षण तरी जगून पाहा, समाजमान्य नसलेली एखादी तरी मनासारखी छोटीशी कृती करून पाहा. त्यावर आजूबाजूनं येणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस झेलण्याचं आपलं सामर्थ्य आजमवा. विचारांशी प्रामाणिक राहणं किती कठीण असतं याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. यालाच तर आदिम प्रेरणांचं दमन म्हणत असावेत की जे अनैसर्गिक असतं. पण काम्यू म्हणतो त्याप्रमाणं जगण सोपं करण्यासाठी आपल्याला हा मार्गच अनुकरणीय वाटतो. पामरांनी याच मार्गानं आस्तेकदम चालत राहावं!

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com