Vulture : ‘स्वच्छतादूतांना’ वाचवा

गिधाडांच्या नैसर्गिक अन्नसाखळीत बाधा आल्यामुळे त्यांना अन्न उपलब्ध होत नाही. त्यामुळे देखील त्यांची संख्या घटत आहे.
Vulture
VultureAgrowon

गेल्या दोन दशकांत देशातील जवळपास ९० टक्के गिधाडे संपली आहेत. गिधाडांच्या काही प्रजाती देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पुढे आली आहे. निसर्गामध्ये प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिवाची निसर्ग संवर्धन संरक्षण-संवर्धनात काही ना काही भूमिका असते. त्यामुळे निसर्गातून कोणताही जीव नष्ट होणे, हे संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोकादायक मानले जाते. गिधाडे तर मृत जनावरांचे मांस खाऊन त्यावर आपली उपजीविका भागवितात. याद्वारे ते एकप्रकारे निसर्गचक्रामध्ये ‘स्वच्छतादूत’ म्हणूनच काम करतात. त्यांना सफाई कामगारदेखील म्हटले जाते. अशाप्रकारे स्वच्छतादूत असलेली गिधाडे नामशेष झाली, तर पर्यावरणास ते खूप हानिकारक ठरेल. गिधाडांची संख्या कमी झाल्याने पाळीव तसेच वन्य जनावर मृत पावल्यानंतर त्यांच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. वन्य जनावरांत साथीचे आजार पसरत आहेत. खरे तर देशातून गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याची चाहूल आपल्याला तीन दशकांपूर्वीच (१९९० मध्ये) लागली. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) पाहणीनुसार १९९२ ते २००७ या काळात विविध प्रजातींच्या गिधाडांची संख्या ९६.८ ते ९९.९ टक्क्यांनी घटत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही आत्तापर्यंत या संस्थेसह इतरही काहींनी गिधाडांचे सर्व्हेक्षण केले, त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी उपाय सांगितले. परंतु देशातील गिधाडांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

Vulture
मंडणगडात गिधाडे अन्नाच्या शोधात

देशात गिधाडांची संख्या कमी होण्यामागची अनेक कारणे असून, त्यातील केवळ एक-दोन कारणांवरच ‘फोकस’ केला जात आहे. जनावरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डायक्लोफेनॅक या औषधामुळे गिधाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्याचा एक संशोधनात्मक अभ्यास सांगतो. परंतु या औषधाच्या वापरावर २००६ मध्ये, तर उत्पादनावर २०१५ मध्ये देशात बंदी घालण्यात आली असून देखील गिधाडांची संख्या घटत आहे. याचा अर्थ या दोन्ही बंदीची देशात प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जनावरांसाठीच्या डायक्लोफेनॅकवर बंदी असली, तरी मनुष्यावर उपचारासाठी देखील हे औषध वापरले जाते. अशावेळी मनुष्यासाठीचे डायक्लोफेनॅक घेऊन ते जनावरांत वापरले जात असल्याची शक्यताही आहे.

पूर्वी पाळीव जनावर मृत झाल्यानंतर त्यांना गावाबाहेर उघड्यावर फेकले जात असे. त्यामुळे गिधाडांना गावपरिसरात अन्न उपलब्ध होत होते. परंतु शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत मृत जनावरे पुरणे आता बंधनकारक केले आहे. तसेच पाळीव जनावरे ठरावीक वयानंतर कत्तलखान्याला पाठविली जात आहेत. त्यामुळे गिधाडांच्या नैसर्गिक अन्नसाखळीत बाधा आली आहे. गिधाडांना अन्न उपलब्ध होत नसल्याने देखील त्यांनी मरतूक होत आहे. हेही एक कारण गिधाडांची संख्या कमी होण्यामागचे आहे. अशावेळी गिधाडांना नैसर्गिकरीत्या अन्न कसे उपलब्ध होईल, हेही पाहावे लागेल. अलीकडे गिधाडे मोठ्या प्रमाणात मरण्यामागचे कारण मलेरिया असल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. मलेरियाग्रस्त गिधाडे शोधून त्यांच्यावर योग्य उपचार केले तर ती बरी होतात. अशावेळी या दिशेने वन, पशुसंवर्धन या विभागांनी पावले उचलायला हवीत. महत्त्वाचे म्हणजे गिधाड संवर्धन-संरक्षणात वन विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यात योग्य समन्वय दिसत नाही. हा समन्वय वाढवावा लागणार आहे. मागील काही वर्षांपासून केंद्र-राज्य सरकारचा भर प्रजनन-संवर्धन केंद्रांद्वारे गिधाडे वाचविण्यावर आहे. यावर मोठा निधीही खर्च केला जातोय. परंतु अशी केंद्रे ही केंद्र-राज्य सरकारच्या असमन्वयातून कागदावरच शोभून दिसत असून, त्याद्वारे प्रत्यक्ष कृती काहीही होताना दिसत नाही. शिवाय प्रजनन-संवर्धन केंद्रे स्थापन करण्याला फारच मर्यादाही पडतात. अशावेळी देशातील विविध भागांत विविध प्रजाती असलेल्या गिधाडांचे नैसर्गिकरीत्या प्रजनन आणि संवर्धन होईल, याची काळजी घेतली पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com