खरा तो एकची धर्म - आदिनाथ चव्हाण

ज्याच्याकडं सत्ता नाही, जो कोणाचा नियंता नाही असा एक स्वार्थी, पण मनपरिवर्तन झालेला जर्मन भांडवलदार १२०० ज्यूंना जीवनदान देण्यासाठी आपली सारी संपत्ती पणाला लावतो, स्वतःचं जगणंही धोक्यात आणतो. हे कसं झालं हे समजून घ्यायचं असेल तर ‘शिंडलर्स लिस्ट’ वाचायलाच हवं.
shindlers list
shindlers listAgrowon

जगाच्या संघर्षशाली इतिहासात काही मोजकेच पराकोटीचे उन्नत क्षण असे आले की तेव्हा माणुसकीचा गहिवर पुरत्या दुनियेच्या वर दशांगुळं उरला. ज्याच्याकडं सत्ता नाही, जो कोणाचा नियंता नाही असा एक स्वार्थी, पण मनपरिवर्तन झालेला जर्मन भांडवलदार १२०० ज्यूंना जीवनदान देण्यासाठी आपली सारी संपत्ती पणाला लावतो, स्वतःचं जगणंही धोक्यात आणतो. हे कसं झालं हे समजून घ्यायचं असेल तर ‘शिंडलर्स लिस्ट’ वाचायलाच हवं.

shindlers list
युद्धाच्या ज्वाळा अन् प्रेमाचा सेतू - आदिनाथ चव्हाण

‘एक जीव वाचवण्याचं महत्त्व सगळ्या जगाला वाचवण्याइतकं मोठं आहे!’
- ज्यू धर्मग्रंथातील एक वचन

ही पोलंडमधली गोष्ट. खरीखुरी बरं का, काल्पनिक नव्हे! काळ अर्थातच दुसऱ्या महायुद्धाचा. विनाशकारी महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेले. अवघ्या युरोपातले ज्यू भयचकित झालेले. आहे तिथंच राहावं की देश सोडून परागंदा व्हावं हा सुरवातीला त्यांना पडलेला पेच, पुढं वेळीच का नाही या नरकातून बाहेर पडलो, या पश्चातापापर्यंत पोचलेला. जर्मन नाझींनी युरोपचा बहुतांश भाग काबीज करून तिथल्या ज्यूंना गुलामासम वागणूक द्यायला सुरवात केलेली. पुढे हा खेळ ज्यूंच्या सामूहीक शिरकाणापर्यंत पोचला. जगाच्या इतिहासातलं हे सगळ्यात काळं पर्व. उन्मादावस्थेला पोचलेल्या नाझींनी ज्यूंच्या छळाच्या नवनवीन पद्धती शोधून काढलेल्या. एखाद्या नाझी सैन्याधिकाऱ्यानं अगदी मौज म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून जाता जाता एखाद्या ज्यूला गोळी घालण्याच्या घटनांमध्येही नावीन्य राहिलं नव्हतं. सामूहीक हत्याकांडासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलंडमधील आॅश्टविझसारख्या कुख्यात छळछावण्या तर मृत्यूचे कारखानेच बनलेले. तिथल्या अग्निसंहारातून ज्यूंच्या कातडी-मांसाची करपट दुर्गंधी घेऊन बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराला काही ठिकाणी चांगुलपणाची चंदेरी झालरही लागलेली. ती समजावून घेणं माणूस म्हणून आपलं कर्तव्य. अशानंच आपला माणुसकीवरचा, चांगुलपणावरचा विश्वास दृढ होतो ना!

आपल्याला सगळ्या गोष्टी ‘ब्लॅक ॲन्ड व्हाईट’मध्ये लागतात. नायक म्हणजे सर्वगुणसंपन्न, खलनायक म्हणजे दुर्गुणांचं आगार. या दोन्हीचं मिश्रण असलेला नायक स्वीकारणं अंमळ जडच जातं. आपल्या कथा, कादंबऱ्या नायक आणि खलनायकाचं असंच चित्र शतकानुशतकं रंगवत आलेल्या. चित्रपटांतही यापेक्षा काय वेगळं असतं? बऱ्याचदा दुर्गुणी खलनायकाला त्याच्याच पातळीवर उतरून नायक ठोकून काढतो. ही म्हणजे सुष्टानं दुष्टावर केलेली मात आहे, असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्ष भवतालात नजर टाकली तर मात्र वेगळंच चित्र दिसतं. कुणी असा सद्गगुणांचा पुतळा आपल्याला दिसत नाही. लोक थोडं चांगले असतात, त्याचबरोबर त्यांच्यात काही अवगुणही असतात. चांगुलपणाचं प्रमाण जितकं अधिक तितका माणूस सुसह्य होत जातो, सदगृहस्थाच्या पदवीला पात्र ठरतो. आपल्याला हवाहवासा वाटतो. प्रत्यक्षातलं जग हे असं संमिश्र असतं, काळं-पांढरं असतं.

एखाद्याचं मूल्यमापन आपण त्याच्या बऱ्या-वाईट सवयी, गुणावगुण यावरून करतो. बऱ्याचदा या भाबडेपणामुळं गफलत होऊ शकते. व्यवस्थापनशास्त्रात एक चकवा देणारी चाचणी घेतली जाते. तुम्हाला तिघांतून एक चांगला नेता निवडायचा आहे. पहिला नेता कुटिल राजकारण्यांच्या वर्तुळात वावरणारा. त्याचा फलज्योतिषावर नको तितका विश्वास. दोन बायकांचा तो दादला आहे. दररोज मद्याचे आठ-दहा पेग तरी रिचवतो. दुसऱ्या नेत्याला दोन वेळा कामावरून काढून टाकलं आहे. तो दुपारपर्यंत बिछान्यात लोळत राहतो. महाविद्यालयात शिकत असताना तो अफूच्या आहारी गेला होता. दररोज संध्याकाळी तो व्हीस्कीची एक बाटली रिकामी करतो. त्याच्या तोंडात सतत सिगार शिलगावलेली असते. तिसरा नेता युध्दातला कसलेला सेनानी. तो शाकाहारी आहे. तो धूम्रपान आणि मद्यपानही करत नाही, कधी तरी बिअर घेतो. तो बाईलवेडाही नाही. आता या साऱ्या वर्णनावरून कोणाला निवडावं या प्रश्नाचं सोपे उत्तर म्हणजे...तिसरा नेता. आता हे कोण आहेत ते जाणून घ्या. पहिला नेता म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे नेतृत्व केलेले अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट. दुसरा नेता म्हणजे या युध्दात मित्र राष्ट्रांना निर्णायक विजयापर्यंत नेणारा विन्स्टन चर्चिल आणि तिसरा नेता म्हणजे जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारा क्रूरकर्मा ॲडाल्फ हिटलर. आता बोला!

हे सारं इथं सांगण्याचं कारण म्हणजे ‘शिंडलर्स लिस्ट’ या कादंबरीचा नायक असाच ‘सर्वगुणसंपन्न’ आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणं ही कादंबरी खऱ्या पात्रांवर, सत्य घटनांवर आधारीत आहे. युद्धस्थितीचा फायदा घेऊन वारेमाप नफा कमवायला सोकावलेला संधीसाधू उद्योजक आॅस्कर शिंडलर अट्टल मद्यपी आणि पक्का बाईलवेडा. देखणा. सेक्रेटरीसह अनेक ललनांशी रत होणारा. वर्तनावरून त्याला जोखायला गेलात तर नक्कीच गफलत होईल. दुसऱ्या महायुद्धात शेकडो ज्यूंना जीवनदान देणारा तो मसिहा ठरला. खरं तर इतिहासात त्याचं कर्तृत्व झाकोळलंच गेलं असतं. पण ज्यांना त्यानं वाचवलं त्या लोकांनी तसं होऊ दिलं नाही. म्हणून तर दुसऱ्या महायुध्दाच्या काळ्या इतिहासातलं हे सोनेरी पान यथावकाश झळाळू लागलं. त्याचं श्रेय जातं आॅस्ट्रेलियन लेखक थॉमस केनेली यांना. या प्रतिभावंतानं पहिल्यांदा कादंबरीच्या रुपात शिंडलरची कहाणी जगापुढं आणली सन १९८३ मध्ये. प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान तिला लाभले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टिव्हन स्पिलबर्ग या प्रख्यात दिग्दर्शकानं याच नावानं काढलेला चित्रपट ‘होलोकास्ट’वरचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून जगभर गौरवला गेला. त्याला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शनासह विविध वर्गवारीत तब्बल सात आॅस्कर पुरस्कारांचं भरजरी कोंदण लाभलं. तो पाहणं हा आयुष्यातला थरारक अनुभव, कधीच न विसरता येण्यासारखा!

shindlers list
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे! : आदिनाथ चव्हाण

कोण हा आॅस्कर शिंडलर? त्याचं काय बरं इतकं कौतुक? कुख्यात आॅश्टविझ छळछावणीत कत्तलीसाठी निवडल्या गेलेल्या बाराशे ज्यूंना नाझींच्या कराल दाढेतून हिकमतीनं वाचवणारा हा माणूस, ज्याला माणसाच्या जगण्याचं मोल समजलं होतं. दाखवायला तो नाझी जर्मन होता, मात्र त्यानं कैवार घेतला तो त्याच्या आर्यन वंशानं ज्यांचा निपःत करायचा विडा उचलला आहे त्या ज्यूंचा! असं का याचं उत्तर हा धटिंगण देऊ शकत नाही. तो फक्त जितक्या ज्यूंना वाचवता येईल तितक्यांना वाचवण्याची पराकाष्ठा करत राहतो. काही माणसांच्या बऱ्या किंवा वाईट कृत्यांची कारणमीमांसा देता येत नाही. पोलंडमधील क्रॅकोव शहरात युध्दकाळात नशीब काढायला आलेला आॅस्कर त्यातलाच. नाझींनी ज्यूंच्या निपःतासाठी उघडलेल्या एकूण ३२० पैकी ३०० छळछावण्या एकट्या पोलंडमध्ये होत्या. सगळ्या देशाचीच जणू बंदीशाळा झालेली. पोलंडवासीयांच्या मनात हिटलरच्या नाझींनी भरलेलं ज्यूद्वेषाचं विष काम करू लागलेलं. नाझींच्या विखारी प्रचारास्रामुळं ज्यूंनी आपले व्यवसाय, रोजगारसंधी बळकावल्याची भावना सर्वत्र बळावलेली. अशातच पोलंडमधल्या स्थानिक जर्मन प्रशासनानं (म्हणजे लष्करानं) ज्यूंसाठी एक आदेश काढलेला. शहराच्या एका भागात तयार केलेल्या घेटोमध्ये (ज्यू वसाहत) ज्यूंनी २० मार्च १९४० च्या आधी आपली घरंदारं सोडून राहायला जावं, अन्यथा... ज्यूंच्या छळाच्या प्रसंगांचं वर्णन करणारे कादंबरीतील परिच्छेद अंगाचा थरकाप उडवतात. त्यातीलच हे एक उदाहरण...
..............
मार्चच्या वीस तारखेच्या आधीचे दोन आठवडे ज्यूंसाठी धावपळीचे गेले. आपापलं सामान ढकलगाड्यांमध्ये टाकून मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबं घेटोच्या दिशेनं निघाली होती. 'स्ट्राडोम' रस्त्याच्या दुतर्फा पोलिश नागरिक, अगदी त्यांची लहान मुलंसुद्धा जाणाऱ्या ज्यूंना शिव्याशाप देत होती. दगडधोंडे, चिखल, जे हाताला येईल ते फेकून मारत होती आणि 'गुडबाय ज्यू' म्हणून आनंदानं किंचाळत होती. शरमेनं मान खाली घालून जाणाऱ्या ज्यूंचं स्वागत घेटोचा एक भला प्रचंड दरवाजा करत होता. दरवाज्याला दोन मोठ्या कमानी होत्या. ट्राम यायला आणि जायला म्हणून त्या अशा उंच होत्या. थोड्याशा अरबी पद्धतीच्या वाटणाऱ्या ह्या दरवाज्यावर एक दिलासा देणारा शब्द लिहिला होता. 'ज्यूईश टाऊन' किंवा 'ज्यू नगरी'. बाजूनं सगळीकडं काटेरी तारांचं कुंपण होतं.
आपापल्या ढकलगाड्या घेऊन येणाऱ्या ज्यूंना घेटोच्या दारातच गृहसमितीचे सदस्य भेटायचे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला राहायची जागा द्यायचं काम या समितीकडे होतं. तुमचं कुटुंब जर आठ-दहा माणसांचं, खूप मोठं असेल तर कशाबशा दोन खोल्या त्या कुटुंबाला मिळायच्या. क्रॅकोवमधले बहुतेक ज्यू सुस्थितीत, चांगल्या घरात राहणारे होते. घेटोतली जागा बघून बहुतेकांची बोलतीच बंद व्हायची. मग त्या जागेचा राग आया आक्रस्ताळेपणे रडणाऱ्या मुलांना धपाटे घालून काढायच्या. तर बाप्ये लोक तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत खिन्नपणे कोपऱ्यात बसून राहायचे. म्हणायचे, "ठीक आहे. देवाची इच्छा !” .............
हे दीर्घ कथानक आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वतः नाझी सदस्य असलेल्या आॅस्करनं ज्यूंना जर्मनांच्या ताब्यातून वाचवण्यासाठी केलेल्या आटोकाट प्रयत्नांची आणि त्याला मिळालेल्या यशाची ही कहाणी. आॅस्कर क्रॅकोवमध्ये लष्करासाठी भांडी बनवायचा कारखाना काढतो आणि त्यात कामगार म्हणून ज्यूंची भरती करतो. त्यांना चांगलं खाणं, चांगली वर्तणूक देतो. त्यामुळं जर्मनीच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या ज्यूंमध्ये आॅस्करच्या कारखान्याचं चांगलं नाव होतं. छळछावणीतील अत्याचारांना आणि निकृष्ट खाण्याला कंटाळलेला प्रत्येक ज्यू तिथं आपली वर्णी लागावी यासाठी धडपडत असतो. आपला व्यवसाय आणि ज्यूंच्या संरक्षणाची व्यवस्था कायम राहावी यासाठी आॅस्कर जर्मन लष्करी अधिकाऱ्यांना मद्याच्या बाटल्या, उत्तम खाद्यपदार्थ, पैसे लाच म्हणून देत असतो. त्यामुळं निर्वेधपणे त्याला आपलं काम चालू ठेवणं शक्य होतं. शेवटी क्रॅकोवमधील सर्व ज्यूंना आॅश्टविझ छळछावणीत मृत्यूदंडासाठी पाठवण्याचा आदेश येतो तेव्हा आॅस्कर हतबल होतो. आपला शेवट जवळ आल्याची जाणीव त्याच्या साऱ्या ज्यू कामगारांना होते. आॅस्कर त्यातूनही मार्ग काढतो. जर्मन अधिकाऱ्याला लाच देऊन या साऱ्या कैद्यांना विकत घ्यायचं ठरवतो. आपल्या सहायकाच्या मदतीनं तो या साऱ्यांची यादी बनवतो. शिवाय आपल्या कारखान्याबाहेरच्याही अनेक ज्यूंचा त्यात समावेश करतो. या बाराशे ज्यूंना तो सहिसलामत झेकोस्लोव्हाकियाला नेऊन तिथं नवा कारखाना सुरू करतो. दोस्त राष्ट्रांनी विजय मिळवल्यावरच तो सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडतो. आॅस्कर शिंडलरची ही यादी दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात अजरामर ठरली.. माणुसकीचं प्रतीक म्हणून तिला मान्यता मिळाली.

लोकहो, जगाच्या संघर्षशाली इतिहासात काही मोजकेच पराकोटीचे उन्नत क्षण असे आले की तेव्हा माणुसकीचा गहिवर पुरत्या दुनियेच्या वर दशांगुळे उरला. मानवतेचं निशाण डौलानं फडफडत राहिलं. ज्याच्याकडं सत्ता नाही, जो कोणाचा नियंता नाही असा एक स्वार्थी, पण मनपरिवर्तन झालेला भांडवलदार ज्यूंना जीवनदान देण्यासाठी आपली सारी संपत्ती पणाला लावतो, स्वतःचं जगणंही धोक्यात आणतो. हे कसं झालं हे समजून घ्यायचं असेल तर ‘शिंडलर्स लिस्ट’ वाचायलाच हवं. त्याचबरोबर सरसपणात कादंबरीच्या पुढं चार पावलं जाणारा स्टिव्हन स्पिलबर्गचा सिनेमा पाहायला हवा. चित्रपटांच्या इतिहासातला सर्वाधिक दुखःद अनुभव देणारा चित्रपट म्हणून याची नोंद झाली आहे. रंगीबेरंगी काळात हेतूतः कृष्णधवल स्वरुपात काढलेला हा सिनेमा अक्षरशः अंगावर येतो. मानवी छळाचे नाझींनी अवलंबलेले विकृत प्रकार अंगावर शहारे आणतात. जीव वाचवण्यासाठी धावणारी मुलं, स्त्रिया, वयोवृध्द चित्रपटभर पसरले आहेत. स्री-पुरुषांना नग्न करून त्यांची केलेली विटंबना मानवतेच्या इतिहासातील सर्वांत लाजिरवाणं पर्व ठरावं. लपण्यासाठी प्रसंगी शौचकूपात उतरलेली निरागस मुलं पाहिल्यावर कोणाही सहृदाचे डोळे भरून यावेत. या कहाणीत जसे नाझी नरराक्षस दिसतात, तसेच नराचा नारायण बनलेला आॅस्कर सुद्धा पाहायला मिळतो. मानवी जीवनाच्या इतिहासातला हा अवनत काळ अनुभवलात तर माणुसकीवरचा तुमचा विश्वास कधीच ढळणार नाही.

शालेय जीवनात पाठ झालेली आपल्या साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे...’ ही प्रार्थना तुम्हाला आठवतेय का? या प्रार्थनेतील एका कडव्यात गुरुजी म्हणतात...
..........
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
.........
हेच तर आहे माणुसकीचं सार. जगभरातल्या साऱ्या महामानवांनी हेच आपल्याला सांगितलं आहे. पण जगाच्या इतिहासात वारंवार येणारी अधःपतनाची आवर्तनं आपल्याला सतत मार्गच्यूत करतात आणि आपण पुन्हा पुन्हा हिंसेच्या अरण्यात भ्रमिष्टासारखं फिरत राहतो.

आॅस्करची कहाणी कशी जगापुढं आली त्याची कहाणीही रोचक आहे. आॅस्करमुळं बचावलेल्या लिओपोल्ड पेफरबर्ग या ज्यूनं पुढं अमेरिकेतील बेव्हर्ली हिल्स इथं दुकान काढलं. आॅस्ट्रेलियन लेखक थॉमस केनेली बॅग खरेदी करण्यासाठी या दुकानात आले होते. ते लेखक आहेत हे कळल्यावर पेफरबर्गनं त्यांना आॅस्करची कहाणी ऐकवली. आपल्याकडची सारी कागदपत्रं दाखवली. या विषयावर केनेली यांनी कादंबरी लिहावी अशी गळ त्यानं घातली. त्यांना घेऊन तो पोलंडला गेला. सगळी घटनास्थळं दाखवली, आॅस्करनं वाचवलेल्या अनेक ज्यूंची भेट घालून दिली. या साऱ्यातून सन १९८३ मध्ये साकारली ‘शिंडलर्स लिस्ट’ ही अभिजात आणि अस्सल अनुभवांवर, खऱ्या पात्रांवर आधारीत कादंबरी. (मेहता पब्लिशिंग हाऊसनं ही कादंबरी मराठीत आणली आहे. संजय दाबके यांनी अनुवाद केला आहे.) पेफरबर्गच्या जिद्द आणि चिकाटीमुळं जगापुढं आलेली ही कादंबरी केनेली यांनी त्यालाच अर्पण केली आहे. पुढं या पठ्ठ्यानं प्रख्यात दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्गला गाठलं. स्पिलबर्गच्या आईची ओळख काढून तो त्याच्यापर्यंत पोचला. या कादंबरीवर चित्रपट काढण्याची गळ त्यानं स्पिलबर्गला घातली. बऱ्याच प्रयत्नांती तो राजी झाला. पुढं १० वर्षांनी हा चित्रपट आला. जगाला हादरवणारी कादंबरी आणि चित्रपटाच्या निर्मितीमागं हा एक अगदी साधा माणूस होता. आणखी एक महत्वाची नोंद. हा शिंडलर खरंच होता का, त्याची यादी खरी आहे की कपोलकल्पित, असा प्रश्न काही शंकासुरांना पडू शकतो. त्याचं उत्तर सन २००९ मध्ये मिळालं. शिंडलरनं बनवलेल्या टंकलिखित यादीची कार्बन कॉपी सिडनीतल्या एका ग्रंथालयात मिळाली. ॲन फ्रँकच्या डायरीसारखी ही यादीही अस्सल आहे बरं!

या आॅस्करचं पुढं काय झालं? युध्द संपल्यानंतर नाझी असल्यानं आपल्याला दोस्त राष्ट्रांकडून पकडलं जाईलच ही खात्री असल्यानं तो पत्नीसह परागंदा झाला. दुसरीकडं ज्यूंना मदत केल्याबद्दल जर्मनीनं त्याला गद्दार ठरवलं. ज्या ज्यूंना त्यानं वाचवलं त्यांनीच त्याला शेवटपर्यंत साथ दिली. त्यांच्या मदतीनं त्यानं वेगवेगळे व्यवसाय करायचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आलं. कोणतीही कटुता न ठेवता पत्नी एमिली दुरावली. नंतर तो ॲना मारी या जर्मन महिलेच्या प्रेमात पडला. ती शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहिली. जर्मनी आणि इस्रायलमध्ये तो आलटून पालटून राहात होता. आपले पूर्वीचे सारे शौक कायम ठेवून राजासारखा राहिला तो. शेवटपर्यंत न डगमगता मजबूत दारू प्यायचा. इस्रायलसह पाश्चिमात्त्य विश्वानं त्याचा गौरव केला. पुढं लाजेकाजेस्तव जर्मन सरकारनंही त्याचा सन्मान केला. ज्यूंची भूमी इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये त्यानं ९ आॅक्टोबर १९७४ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अखेरच्या इच्छेनुसार त्याचं दफन जेरूसलेममध्येच करण्यात आलं. त्याची कबर मानवतेचा संदेश देत दिमाखात उभी आहे. ज्या बाराशे लोकांना त्यानं वाचवलं ते ज्यू आणि त्यांचे सहा हजार वंशज आज त्याला देव मानतात. देव वेगळा असा कुठं असतो का माहीत नाही, मात्र मानवात मात्र त्याचा अंश असू शकतो याची याद आॅस्करची कहाणी सतत देत राहील. त्याला मानाचा मुजरा!
..........
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com