बनावट अडत्यांना दाखवा बाहेरची वाट

बाजार समित्यांतील शेतकऱ्यांची फसवणूक, लूट कमी करायची असेल तर मूळ अडते किंवा खरेदीदार व्यापारी यांनी स्वतः व्यवसाय केला पाहिजेत.
APMC
APMC Agrowon

कृषी निविष्ठांच्या (Agriculture Inputs) वाढत्या किमती, मजुरीचे वाढलेले दर(Agriculture Labor Charges), इंधन दरवाढीमुळे (Fuel Prices) वाढलेला मशागत ते वाहतूक खर्च यामुळे शेतीमाल उत्पादन खर्च (Agriculture Production Cost) प्रचंड वाढला आहे. हे कमी की काय, त्यात सातत्याच्या नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity), कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे कष्ट अन् खर्च करूनही शेतीमाल उत्पादन हाती येण्याची कुठलीही शाश्वती राहिली नाही. अशा जोखीमयुक्त शेतीतून पिकविलेला शेतीमाल बाजारात नेला तर तेथेही शेतकऱ्यांची प्रचंड लूट होतेय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बनावट (डमी) अडत्यांकडून (Fake Adatiya) भाजीपाला उत्पादक (Vegetable Producer) तसेच पुरवठादार शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच पुढे आला आहे.

APMC
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

काही शेतकऱ्यांचे पैसे दोन-तीन वर्षांपासून अडते-व्यापाऱ्यांकडे थकीत आहेत. पैसे मागण्यासाठी फोन केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली असता त्याचाही फारसा फायदा होताना दिसत नाही. पुणे असो की राज्यातील इतर कुठल्याही बाजार समित्यांमध्ये बहुतांश अडते-व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाडेतत्त्वावर दिलेले असून त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर व्यवहार करणारा हा मीच मूळ अडत्या अथवा खरेदीदार-व्यापारी असल्याचे भासवितो.

APMC
APMC Election : ‘शेतकऱ्यांना मतदाना’वरून भाजपमध्येच दोन मतप्रवाह

असे बनावट अडते-व्यापारी काही दिवस सुरळीत व्यवहार करतात अन् उधारी वाढली की पैसे देण्यास टाळाटाळ करतात. अशा प्रकरणात बाजार समितीकडे तक्रार झाली तरी पावती मूळ गाळा मालकाच्या नावे असते, व्यवहार करणारा बनावट अडत्या दुसराच असतो. त्यामुळे बाजार समितीकडील तक्रारीतून काही साध्य होत नाही, ह्या सर्व बाबी गंभीर आहेत.

बाजार समित्यांतील शेतकऱ्यांची फसवणूक, लूट कमी करायची असेल तर मूळ अडते किंवा खरेदीदार व्यापारी यांनी स्वतः व्यवसाय केला पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपला गाळा अथवा जागा भाड्याने देणे, भाडेकरूमार्फत व्यवसाय करणे थांबविले पाहिजेत. ज्या अडते किंवा व्यापाऱ्यांचे गाळे मागील अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहेत, त्यांचे गाळे बाजार समित्यांनी काढून घ्यायला हवेत. आणि हे गाळे नवीन होतकरू, जे स्वतः व्यवसाय करतील अशा अडते, व्यापाऱ्यांना द्यायला हवेत.

निवडणुकीमध्ये अडत्यांना स्पर्धक होऊ नयेत किंवा मतदार वाढू नयेत म्हणून देखील बाजार समित्यांतील लायसेन्सची संख्या वाढू दिली जात नाही. अडते-व्यापारी यांच्याकडे लायसेन्स नसेल तर शेतकऱ्यांची लूट केली तरी ते कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या पेमेंटविषयी वाद निर्माण झाला तर तो सोडविण्यासाठी कायद्याने वांदा कमिटीची स्थापना केलेली असते. वाद वांदा कमिटीकडे गेले की, ही कमिटी कायदेशीर ऑर्डर करते. परंतु अडत्या-व्यापारी डमी असेल, त्याच्याकडे लायसेन्स नसेल तर वांदा कमिटीदेखील काही करू शकत नाही. मग तो फौजदारी गुन्हा ठरतो. पुढे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. असा गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्यास बराच वेळ लागतो.

यातून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ न्याय मिळत नाही. त्यामुळे बाजार समित्यांनीच ज्यांनी अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर गाळे दिलेले आहेत, अशा लोकांना बाहेर काढले पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा नोंदणीकृत, परवानाधारक अडते अथवा व्यापाऱ्यांनाच माल दिला पाहिजेत. नोंदणीकृत, परवानाधारक अडते, व्यापारी यांचे फलक बाजार समिती आवारात ठळकपणे लावले गेले पाहिजेत. असे झाल्यास बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना पण नेमका आपला शेतीमाल कुणाला द्यायचा हे लक्षात येईल.

मुळात बाजार समित्यांच्या गहाळ कारभारामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी बाजार तसेच थेट शेतीमाल विक्रीचे चांगले पर्याय शेतकऱ्यांपुढे आहेत. आत्ताच एक तृतिअंश शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय बाजार समित्यांच्या तावडीतून गेला आहे. अडते-व्यापारी असेच भानगडी करून शेतकऱ्यांना लुटू लागले तर बाजार समित्या एक दिवस ओस पडतील, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com