Soil Erosion : मातीची धूप गंभीर समस्या

देशभरातील जवळपास अर्ध्या कोरडवाहू क्षेत्रावर धुपीमुळे वाळवंटीकरणाची टांगती तलवार आहे. आपल्या राज्यातही दरवर्षी अब्जावधी टन मातीची धूप होते.
Soil Erosion
Soil ErosionAgrowon

महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत तरी सर्वदूर पावसाचे (Rain Intensity) प्रमाण कमीच आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मात्र मुसळधार पावसाने (Heavy Rain In Sinnar) एकच दाणादाण उडवून टाकली. जोरदार वृष्टीने या परिसरातील वडगावच्या शिवारात दोन शेतकऱ्यांच्या जवळपास ४८ गुंठे क्षेत्रातील काळ्याभोर मातीचा वरचा सुपीक थर वाहून गेला. माती खरवडून गेल्याने त्यांच्या शेतात ओहोळ तयार झाले आहेत. खरीपात सोयाबीन तर रब्बीत कांदा घेणारे हे शेतकरी पिके घेण्यासाठी आता माती कुठून आणायची? असा सवाल शासन-प्रशासनाला विचारत आहेत. मागील तीन वर्षांपासून राज्यात अतिवृष्टी होत आहे. (Soil Erosion Is A Serious Problem)

कमी कालावधीत अधिक पाऊस पडून जातोय. अशा पावसामुळे नदी-नाल्याकाठच्या तसेच डोंगर उतारावरील जमिनीतील मातीचा वरचा थर वाहून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतातील माती वाहून गेल्यास जमीन पूर्ववत अर्थात पीक घेण्यायोग्य होण्यास बरीच वर्षे लागतात. यासाठी खूप पैसाही खर्च करावा लागतो. महत्वाचे म्हणजे जमीन पूर्ववत होईपर्यंत शेतकरी त्यात कोणतेही पीक घेऊ शकत नाही. जमीन खरवडून माती वाहून गेली असताना बहुतांश प्रसंगी तर त्याची दखलच घेतली जात नाही. ज्यांची दखल घेतली जाते, त्यांना उशीराने अत्यंत तुटपूंजी मदत मिळते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी अशा आपत्तीमुळे हतबल होतो.

Soil Erosion
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली तर ती पूर्ववत करण्यासाठी येणारा पूर्ण खर्च शासनाने द्यायला हवा, नाही तर रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या इतर ठिकाणहून सुपीक माती आणून ती टाकून लागवड योग्य करून द्यावी. पीक उत्पादनासाठी सर्वात मुलभूत घटक म्हणून मातीकडे पाहिले जाते. परंतु मातीची होणारी धूप, पाणी-रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, चुकीची मशागत आणि पीक पद्धती आदी कारणांमुळे शेतीच्या या मुलभूत घटकांचा ऱ्हास सुरू आहे. परंतु जागतिक मृदा दिन अथवा आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष केवळ साजरे करण्याइतपतच मातीचे महत्व आपल्या लक्षात राहते.

Soil Erosion
यंदा खरीप पेरण्या ३३ टक्के पिछाडीवर

प्रत्यक्षात माती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत सर्वांमध्येच कमालीची उदासीनता आहे. २०१५ च्या आंतरराष्ट्रीय मृदा वर्षाची थीमच स्टॉप सॅाइल इरोजन, सेव्ह अवर फ्यूचर अर्थात मातीची धूप थांबवा, आपले भविष्य वाचवा ही होती. परंतु सुपीक मातीचा थर वाचविण्याबाबत देशात कोणीही गंभीर नाही, ही बाब दुर्दैवी आहे. राष्ट्रीय मृद संधारण व प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासानुसार देशातून दरवर्षी सुमारे पाच हजार ३०० दशलक्ष टन माती वाहून जात असल्याचे पुढे आले आहे. या मातीबरोबर नऊ दशलक्ष टन पिकास उपयुक्त पोषकद्रव्येही वाहून जातात.

देशभरातील जवळपास अर्ध्या कोरडवाहू क्षेत्रावर धुपीमुळे वाळवंटीकरणाची टांगती तलवार आहे. आपल्या राज्यातही दरवर्षी अब्जावधी टन मातीची धूप होते. मातीच्या धुपीमुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकता घटते. जैवविविधतेचा ऱ्हास होतो. भविष्यात शेती व्यवसाय टिकविण्यासाठी मातीची धूप टाळणे गरजेचे आहे. शेतातील बांधबंधिस्ती, उताराला आडवे बांध (कंटूर बंडिग), नाला बांध, नदीवर बंधारे, बांध-बंधाऱ्यावर वन अथवा फळपिकांची लागवड, शेततळी, शून्य अथवा कमीत कमी मशागत, पेरणीसाठी रुंद-सरी वरंबा पद्धतीचा वापर, आंतरपीक पद्धती, आच्छादनाचा वापर आदी उपाययोजना केल्यामुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते.

धूप प्रवण क्षेत्रात या उपाययोजना प्राधान्याने करायला हव्यात. मातीची धूप रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल. शेतकऱ्यांनी सुद्धा याबाबत जागरुक असायला पाहिजेत. डोंगर-उताराच्या जमिनीवर मातीची धूप रोखण्यासाठी, वनीकरण तसेच कुरण विकासाची कामे करण्यात यावीत. अशा ठिकाणी पिकांऐवजी चारापिके व झुडपांची लागवड करावी. यामुळे पावसाच्या पाण्याचा वाहण्याचा वेग कमी होतो आणि जमिनीत पाणी जास्त मुरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com