वेळेत पेरणीचा हवा आराखडा

जर पावसाच्या आगमनास उशिरा सुरुवात होणार असा अंदाज प्राप्त झाला तर पेरणीबाबत कोणते निर्णय घ्यावयाचे, तसेच पेरणीनंतर पावसात मोठा खंड पडल्यास कोणती तयारी करावयाची याबद्दलही चर्चा गावपातळीवरील नियोजन बैठकीत करावी.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

उत्तरार्ध

.............

जमिनीची सुपीकता वाढविण्याची आवश्यकता असून त्याबाबतचे उपाय गावकऱ्यांना माहीत असायला हवेत. गावनिहाय जमीन आरोग्य पत्रिका माहितीच्या आधारे गावातील रासायनिक तसेच सेंद्रिय खत वापराचे नियोजन समजावून सांगावे लागेल. गावातील भूमी उपयोगिता, मृदा पोत, मृदा खोली व माती धूप याबाबत कृषी विकास समितीच्या बैठकीतील चर्चा करायला हवी. गावातील जमिनीची सुपीकता कशी आहे याबाबत सुपीकता निर्देशांक तक्त्याच्या साह्याने सविस्तर माहिती देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी मातीची तपासणी करून घेतली आहे त्यांच्यापैकी एका शेतकऱ्याचे विश्लेषण अहवालाचे वाचन करावे आणि त्यामधील सेंद्रिय कर्ब व इतर घटकांची उपलब्धता किती आहे याबद्दल चर्चा करावी. सेंद्रिय कर्बाचे महत्त्व सांगून त्यामध्ये वाढ करण्यासाठी कोणते उपाय करावयाचे याबद्दल माहिती सुद्धा गावकऱ्यांना द्यावी. या उपायांमध्ये जमिनीची कमीत कमी हलवा हलव करणे, जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवणे, हिरवळीच्या खतांचा वापर करणे आदी तंत्रे उपयुक्त ठरतात.

शून्य मशागत तंत्राची माहिती म्हणजेच नांगरणी, कुळवणी व पेरणी न करता गादीवाफ्यावर टोकन पद्धतीने पिकांची लागवड कशी करता येईल याबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन झाले पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांनी शून्य मशागतीद्वारे शेती करण्यास सुरुवात केली त्यांचे अनुभव घ्यावेत.

भाताच्या क्षेत्रामध्ये नांगरणी, चिखलणी आणि रोपांची लावणी ही कामे टाळून सगुणा राइस तंत्राने (एसआरटी) भात लागवडीस प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यात यावे. पिकांसाठी आवश्यक जैविक आणि सेंद्रिय खते घरच्या घरी कशी तयार करावीत याची माहिती आणि त्यासाठी महिला बचत गट तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे नियोजन करावे. सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठी गावातील शेतकरी/ महिला गटांना प्रवृत्त करावे. शेतीपंपासाठी कपॅसिटरचा वापर केल्यामुळे विद्युत मोटर ट्रीप होण्याचे टळते म्हणून सर्व शेतीपंपधारकांना कपॅसिटरचा वापर करण्यासही प्रवृत्त करावे. एका ट्रान्स्फॉर्मरवर जोडणी असलेल्या शेतीपंपधारकांनी एकत्र येऊन पाण्याच्या पाळ्यांचे असे नियोजन करावे की एकाच वेळी ट्रान्स्फॉर्मरवर ताण येणार नाही. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर बंद पडून वीज जाणे, ही समस्या कमी होईल. तसेच पिकास पाणी देण्यात अडथळा येणार नाही. या चर्चेत महावितरणच्या लाइनमनला देखील सहभागी करून घ्यावे.

मागणीनुसार पीकरचना नियोजन

गावातील सध्याची पीकरचना म्हणजेच पीकनिहाय व हंगामनिहाय क्षेत्र उपस्थितांना वाचून दाखवावे. मागील काही वर्षांतील बदलत्या पीकरचनेविषयी चर्चा करून त्याची कारणे समजून घ्यावीत. त्यामुळे होत असलेले फायदे किंवा तोटेही चर्चेमध्ये आणावेत. मागील वर्षी प्रमुख पिकांना मिळालेल्या बाजारभावाची माहिती घ्यावी. पिके बदलण्यामध्ये बाजारभावाचा असणारा प्रभाव किती आणि इतर कारणे किती यावर चर्चा करावी आणि कोणत्या पिकांवर बाजारभावाचा प्रभाव जास्त आहे ते पाहावे. आपल्या भागातील हवामान व जमीन ज्या पिकांना पोषक आहे अशा बाजारात मागणी असलेल्या पिकांची यादी तयार करावी.

बाजारात मागणी असलेल्या पिकांचे अर्थशास्त्र, बाजारपेठ आणि विक्रीव्यवस्था याबद्दल समजावून सांगावे आणि प्रायोगिक तत्त्वावर तसेच मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाच्या पिकांची यादी तयार करावी. ज्या शेतकऱ्यांनी बाजारातील मागणीनुसार नवीन पिकाची लागवड करून विक्रीचा अनुभव घेतला आहे, अशा शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून घ्यावेत. गावातील सध्याच्या पीक पद्धतीत अंशतः बदल करणे आणि व्यवसायाभिमुख पिकांच्या लागवड आणि प्रक्रिया उद्योगास असलेला वाव यांची माहितीदेखील मिळवायला हवी. अशा रीतीने बाजारातील मागणीनुसार पीक आराखडा तयार करावा.

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब

बदलत्या हवामानात पिकांचे उत्पादन घेत असताना पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांचे अचूकपणे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. खरीप/ रब्बी हंगामासाठी नियोजित पिकांच्या हवामान अनुकूल वाणांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यामध्ये हवामान अनुकूल गुणधर्म समजावून सांगावेत. लागवडीसाठी विकत आणलेल्या किंवा घरचे ठेवलेल्या बियाण्याची उगवणक्षमता तपासण्याबाबत आणि बीजप्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन करावे. पिकांच्या पेरण्या मोसमी पावसाच्या आगमनावर अवलंबून असल्याने मॉन्सूनच्या आगमनाबद्दल मागील काही वर्षांचा अनुभव उपलब्ध माहितीच्या आधारे विषद केल्यास पेरण्याचा कालावधी ठरवण्यासाठी मदत होते. यासाठी मागील पाच वर्षांच्या पावसाच्या आगमनाच्या तारखा शेतकऱ्यांना सांगायला हव्यात. जर पावसाच्या आगमनास उशिरा सुरुवात होणार असा अंदाज प्राप्त झाला तर पेरणीबाबत कोणते निर्णय घ्यावयाचे तसेच पेरणीनंतर पावसात मोठा खंड पडल्यास कोणती तयारी करावयाची याबद्दलही चर्चा गावपातळीवरील नियोजन बैठकीत करावी. यासाठी मागील वर्षी वेगवेगळ्या वेळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव घ्यावेत. पेरणीची वेळेचा पिकांच्या वाढीवर, कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर, पिकाच्या पक्वतेवर, काढणीची वेळेवर आणि उत्पादनावर कसा परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करावी आणि योग्य वेळेस पेरणी करण्याचे महत्त्व समजावून सांगावे.

उशिरा पाऊस, पावसातील खंड किंवा अतिपाऊस अशा परिस्थितीत कोणत्या तंत्रज्ञानांचा अवलंब केल्यास अडचणीवर मात करता येते आणि पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येते याची देखील शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. पेरणीसाठी उपलब्ध कालावधी मर्यादित असतो, तेव्हा गावातील सर्व साधनांचा व मनुष्यबळाचा वापर करून वेळेत पेरणी कशी करता येईल याकरिता पेरणीचा ढोबळ आराखडा तयार करावा. सर्व शेतकऱ्यांना रुंद वाफा व सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करण्यास प्रवृत्त करावे. बीबीएफ पद्धतीने पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचे नियोजन करावे. यासाठी गावामध्ये किंवा गावसमूहामध्ये चालू असलेल्या अवजारे बँकांशी (भाडेतत्त्वावर अवजारे केंद्र) संपर्क करून बीबीएफ यंत्रांचे बुकिंग करण्यात यावे. बीबीएफ यंत्रधारकांना/चालकांना कौशल्य प्रशिक्षण देणेही तेवढेच आवश्यक आहे. लिंबोळी अर्क तयार करण्यासाठी गावशिवारातील लिंबोळ्या गोळा करण्याचे आणि त्यापासून अर्क तयार करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी महिला बचत गट आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

गावाच्या बाजूस वनक्षेत्र असेल तर जंगली प्राण्यांचा उपद्रव असू शकतो हे लक्षात घेऊन त्या बाजूस गुरे प्रतिबंधक चर आणि बांबू व काटेरी झुडपांची (चिलार इ.) दाट लागवड करण्याचे नियोजन करावे. यालाच जैविक कुंपणदेखील म्हणतात. गाव नकाशाच्या आधारे तसेच चर्चेद्वारे गाव शिवारामध्ये असलेल्या पड जमिनीवर, माळरानावर तसेच बांधावर बांबूसह स्थानिक वृक्षांची (लिंब, करंज, कवठ, जांभूळ, घायपात आदी) लागवड करावी. गाव शिवारातून वाहणाऱ्या ओहोळ, ओढा, नाला किंवा नदीच्या काठावर मोकळ्या पट्ट्यात बांबू लागवडीचे नियोजन करावे याशिवाय इतरही स्थानिक झुडपांची / झाडांची लागवड करण्यासाठी गावकऱ्यांना प्रवृत्त करावे. वृक्ष लागवडीचा समग्र आराखडा तयार करून लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी शेतकरी/ महिला बचत गटांचे सहकार्य घेण्याबाबत बैठकीत नियोजन करावे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने शेती विषयावर अशा प्रकारे चर्चा घडवून आणल्यास शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांची निर्णय प्रक्रिया आणि कार्यक्षमता आणखी चांगली होईल, अशी अशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com