काय तो पाऊस, काय ते बेड, काय ती पिकं, सगळं ओकेमधे...

यवतमाळ जिल्ह्यातील चिखलीचे राजू भोयर म्हणतात, ‘‘गेल्या वर्षीपासून मी ‘बीबीएफ’ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतोय, मोठ्या पावसाचं कसलंच टेन्शन नाही, पाऊस पडून गेला की पाण्याचा लगेच निचरा होतोय आणि पिकाचे नुकसान टळतेय.
BBF Soybean
BBF SoybeanAgrowon

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project) सुरू झालेल्या प्रभावी विस्तार कार्याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यात आणि विदर्भात सोयाबीन (Soybean), तूर (Tur), कापूस (Cotton) आणि हरभरा पिकांची पेरणी (Sowing Of Kharif Crop) आणि टोकन सपाट जमिनीवर न होता गादीवाफ्यावर म्हणजेच बेडवर (Broad Bed Furrow Method) होण्यास सुरुवात झाली आहे. मागील तीन वर्षांच्या प्रयत्नाने प्रकल्पातील गावांबरोबरच राज्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना गादीवाफ्यावरील लागवडीचे महत्त्व हळूहळू लक्षात येऊ लागले आहे.

अशी एक सारखी विचारणा होत असते की. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी अशी कोणती गोष्ट किंवा जादूची कांडी आहे की काहीही झाले तरी शेती आणि पिके वाचू शकतील? प्रकल्पातून असे काय केले जात आहे की शेतकरी अशा विपरीत हवामान परिस्थितीतदेखील तग धरू शकेल? या प्रश्नांची उत्तरे निश्चितच ‘बे एके बे’ स्वरूपात नाहीत, कारण शेतीतल्या प्रत्येक गोष्टीवर हवामानापासून ते बाजारभावापर्यंत अनेक घटक परिणाम करत असतात आणि शेतीचे गणित कधी जमते, कधी बिघडते किंवा कधी कधी जमता जमता बिघडते.

पण एक मात्र खरे आहे की जे प्रश्न अनेक वर्षांपासून नव्हे दशकांपासून धोपट किंवा प्रचलित मार्गांनी सुटले नाहीत त्या प्रश्नांसाठी वेगळा आणि प्रसंगी विपरीत वाटणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि नेमके असेच मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. यातील दोन शाश्वत मार्गांपैकी पहिला म्हणजे पिकांची पेरणी गादीवाफ्यावर करणे आणि दुसरा म्हणजे एकदा केलेले गादीवाफे न मोडता त्यावरच पुढील पिकांची टोकन करणे! मग ह्या मार्गांनी शेतीमधल्या कोणत्या समस्या सुटत आहेत किंवा भविष्यात सुटू शकतील?

पहिली समस्या म्हणजे सध्याच्या लहरी पावसामुळे पिकांची पेरणी कधीही आणि कशीही केली तरी पिके वाया जाण्याची भीती. मागील वर्षातील आणि चालू पावसाळ्यात आपण बघत आहोत की कमी दिवसात मोठा पाऊस पडत आहे, परिणामी नेहमीच्या पद्धतीने पेरलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी बेडवर पिके पेरली किंवा टोकन केलेली आहेत त्यांची पिके अक्षरशः वाचली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील चिखलीचे राजू भोयर म्हणतात, ‘‘गेल्या वर्षीपासून मी ‘बीबीएफ’ने पेरणी करतोय, मोठ्या पावसाचं कसलंच टेन्शन नाही, पाऊस पडून गेला की लगेच पाण्याचा निचरा होतोय आणि पिकाचे नुकसान टळतेय.

BBF Soybean
Soybean : सोयाबीन हंगामात दडलंय काय?

यवतमाळ जिल्ह्यातीलच खडकदरीचे युवक शेतकरी अमोल ढोकणे यांनी या वर्षी अडीच एकरवर बेडवर टोकन पद्धतीने सोयाबीन केले असून त्यांचे त्याच बेडवर पुढील हंगामात हरभरा टोकण्याचे नियोजन आहे. आत्ताच्या जोराच्या पावसातदेखील पीक वाचल्याचा त्यांना आनंद आहे. परभणी जिल्ह्यातील मानवतचे मंगेश देशमुख मागील वर्षापासून १४ एकर सोयाबीन बीबीएफने पेरतात आणि अति पावसात काही नुकसान झाले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील रामनगरचे मंगेश त्रिकाळ यांचे सोयाबीन तर अतिपावासानंतर चांगलेच बहरले आहे. थोडक्यात जो बेडवर लावेल पीक। तोच एक शाहणा।। अशी प्रचिती येऊ लागली आहे.

BBF Soybean
Soybean : सोयाबीन हंगामाची स्थिती काय राहील?

दुसरी समस्या म्हणजे जमिनीची घटणारी सुपीकता आणि उत्पादकता. मागील तीन वर्षामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामधील काही शेतकरी प्रकल्पाच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या शेतातील मशागत थांबवून बेडवर ‘सगुणा राईस’ तंत्राने कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, सूर्यफूल, झेंडू पिकांची लागवड करीत आहेत आणि प्रत्येक हंगामात चांगले वाढीव उत्पादन घेत आहेत. अगदी मोठे पाऊस झाले तरी आणि पावसात खंड पडला तरी त्यांना काही फटका बसला नाही, त्याउलट हे सर्व शेतकरी निश्चिंत आणि आनंदी राहिले आहेत. कन्नड तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या मालेगाव ठोकळ गावातील शेतकऱ्यांनी तर हनुमानाच्या मंदिरात शेत न नांगरण्याची शपथ घेतली आहे. ते अभिमानाने सांगत आहेत...

नाही नांगर, नाही औत। आम्ही थांबवली मशागत।।

विचार केला तर बरेच शेतकरी आणि काही शास्त्रज्ञदेखील हे ठामपणे सांगत नाहीत की मशागत थांबवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पण ह्या दोन गोष्टींचा संबंध सोप्या भाषेत उलगडतात टापरगावचे तरुण शेतकरी आणि राज्यामध्ये पहिल्यांदाच शून्य मशागत करून कापूस पिकवणारे अतुल रावसाहेब मोहिते. माझी जमीन चोपण आणि मध्यम खोलीची, फार उत्पादन न देणारी. पण २०१९ पासून मशागत थांबवली, नांगर, वखर सगळं बंद. बेडवर कापूस, झेंडू, मका घेत आहे. आता जमिनीची प्रत सुधारत आहे, कारण या सगळ्या पिकांची आणि तणांची मुळं जमिनीत कुजत आहेत. मी पिकांची कापणी करतो, मुळासकट काढत नाही. आणि तणांसाठी तणनाशके फवारतो. या सर्वांचा परिणाम आमच्या जमिनी अधिक सुपीक बनत आहेत.

तिसरी समस्या म्हणजे मजुरांची टंचाई आणि महागाई. बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगावचे अरुण देशमुख मागील दोन वर्षे खरीप आणि उन्हाळी सोयाबीन घेतात पण एकदाच केलेल्या बेडवर. सोयाबीनचे बियाणे पेरावे लागते, पण त्यांनी बेडवर टोकन केली आणि पाहता पाहता आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बंद करून टोकन सुरू केली. टोकन करण्यासाठी पेरणीपेक्षा अधिक मजूर लागतात हे जाणून ह्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतः आणि घरातील व गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने आणि गरजेनुसार मजुरांच्या साहाय्याने टोकन केली आहे. पण यापेक्षा त्यांना ट्रॅक्टरवर अवलंबून राहावे लागत नाही ह्याचा मोठा आनंद आहे. शिवाय मजुरीच्या खर्चात मोठी बचत होत आहे. फुलंब्री तालुक्यातील बाभूळगावचे रावसाहेब दगडू मोरे सांगतात की मशागत थांबविल्यामुळे अत्यंत कमी खर्चामध्ये मक्याचे विक्रमी उत्पादन मिळाले.

याउपरही निसर्गाच्या प्रकोपापुढे कुणाचाच टिकाव लागत नाही हेसुद्धा लक्षात ठेवावे लागते. पण अशा शेती पद्धती मात्र प्रकोपात सुद्धा नुकसान कमी करण्यास मदत करतात हेही तेवढेच खरे!

(लेखक पोकरा प्रकल्पात मुंबई येथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com