Diwali Nostalgia : दिवाळीच्या रम्य आठवणी

दिवाळीच्या आनंदाचं परिमाण बदलत गेलं तरी बालपणीच्या गावातल्या आठवणी मात्र सततच सोबत असतात. दरवर्षीच्या दिवाळीच्या आनंदात या आठवणी भर घालीत असतात.
Diwali Nostalgia
Diwali NostalgiaAgrowon

इंद्रजित भालेराव

८४३२२२५५८५

कुठल्याही आनंदाची परिमाणं नेहमीच बदलत असतात. एक तर बाह्य वास्तवात बदल होत असतात, तसेच आपल्यात देखील बदल होत असतात. आपलं वय वाढतं. आपली समज बदलत जाते. आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. तसतशी आपल्या आनंदाची परिमाणंही बदलत जातात. मी लहानपणापासून पाहिलेली दिवाळी आठवू लागलो की मला खूप हुरहुर वाटते. माझं लहानपण गावाकडं गेलेलं आहे. त्या कोवळ्या संस्कारक्षम वयात गावाकडची जी दिवाळी मी पाहिली, ती आठवली की मनाला नेहमीच हुरहुर वाटते.

एक गोड शिरशिरी अंगावरून लहरत जाते. किती रम्य त्या आठवणी! आमच्या दिवाळीच्या आनंदाचं पहिलं परिमाण म्हणजे नांदायला गेलेल्या सगळ्या बहिणींना माहेराला घेऊन येणे. मला चार बहिणी आहेत. वछुबाई, चतुरबाई, मुक्ताबाई आणि लताबाई. दिवाळीला आम्ही सगळे एकत्र यायचो. गावाकडं असताना तर येत होतोच पण आज आम्ही सगळे साठीचे सत्तरीचे असताना, आजोबा पणजोबा झालेलो असतानाही आम्ही सगळे एकत्रित येतो आणि दिवाळी साजरी करतो.

Diwali Nostalgia
Farmer Diwali : शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाय कधी शोधणार ?

भाऊ गाडी जुंपून एकेका बहिणीला आणायला जायचा. चार बहिणी गोळा व्हायच्या. सगळ्यात आधी दूरच्या बहिणीला आणलं जायचं. बऱ्याचदा गाडीत बसून भावासोबत मीही बहिणीला आणायला जायचो. नंतर सगळ्या बहिणींच्या गावाला यष्ट्या सुरू झाल्या तेव्हा बहिणींना आणायचं काम माझ्यावर येऊन पडलं. ते मी अतिशय आनंदानं करायचो. रोज एका बहिणीच्या गावाला जायचं आणि तिला घेऊन यायचं. यष्टया गावाला सुरू झाल्या असं जरी म्हणालो तरी प्रत्यक्ष गावापर्यंत एसटी नसायची. दुरून कुठून तरी बहिणीच्या गावी पायी जावं लागे.

अशावेळी शिवारातून केलेले प्रवास आणि बहिणीसोबत केलेल्या गुजगोष्टी मला अजूनही आठवतात. बहिणीची सामानाची पिशवी, एखादं लेकरू तिनं काखेला घेतलेलं, एखादं लेकरू मी खांद्यावर घेतलेलं, आणि आम्ही भरलेल्या पिकातून जिव्हाळ्याच्या गोष्टी एकमेकांना सांगत दिवाळीसाठी निघालेलो आहोत, हे दृश्य मला अजूनही आनंद देऊन जातं. या सगळ्या बहिणी, त्यांची लेकरं, म्हणजे भाचे मंडळी यांना शेतात घेऊन जाणं हे देखील काम माझ्याकडं असायचं. मग शेतामध्ये जे काही असेल, नुकताच खायला आलेला ऊस असेल, पसऱ्या भुईमुगाच्या शेंगा असतील, आणखी काही असेल, गाई वासरं या सगळ्यांसोबत मजा आणि मजा करणं ही दिवाळीच्या आनंदाची आणखी एक परिणती असायची. घरात आईनं स्वयंपाकाचे घाणे सुरू केलेले असायचे. चार भाऊ, चार बहिणी, आई वडील, बहिणींची, भावांची लेकरंबाळं, असे मिळून आमचं पंचविसेक जणांचं मोठं खटलं होतं. त्या सगळ्या खटल्याला लागणारे दिवाळीचे पदार्थ डाल भरून करावे लागायचे. त्यामुळे आई रोज एक एक पदार्थ बनवायची.

आमच्या गावात पाच दिवसांची दिवाळी नसायची. असलीच तर ती अशी असायची. वसुबारसेला गाय-वासरांची पूजा केली जात असे. नरकचतुर्दशी केवळ एका दिवशीच उटणं लावून अंघोळ केली जायची. हे उटणंही आम्ही घरीच बनवायचो. दिवाळीच्या आधी आमच्या खारीतला नागरमोथा काढून त्याचे गड्डे आम्ही वाळवायचो. दिवाळीत ते कुटून त्यात तीळ, हळद मिसळून बाया घरीच उटणं तयार करून ठेवायच्या. तेच उटणं अंगाला लावलं जायचं. लक्ष्मीपूजन, भाऊबीज या गोष्टी आमच्या लहानपणी दिवाळीत केल्या जात नसत. भाऊबिजेच्या दिवशी पांडव घातले जात. पण भाऊबीज काही वेगळी असते हे फारसं गावाला माहीत नव्हतं. लक्ष्मीपूजनाचं देखील तसंच होतं. शहरात नोकरीसाठी गेलेल्या गावातील माणसानं शहरात लक्ष्मीपूजन पाहिलं आणि मग ते त्यांनी गावात सुरू केलं. त्याचं पाहून हळूहळू लोक त्या दिवशी आपापल्या दारात दोन खांब उभे करून त्यावर आडवी पाटी टाकून, त्या खांबांना ऊस, तुरी, धानाची धाटं आणून बांधले जात. तेव्हा आमच्या गावात कुणीही केळी लावत नसत, त्यामुळे केळीचे खांब हा प्रकार तेव्हा आमच्या गावात नव्हता. आडव्या पट्टीवर दिवे लावले जात. तेच लक्ष्मीपूजन समजलं जाई.

या दिवाळीच्या काळात आणखी एक गोष्ट आमचा मोठा भाऊ, अण्णा करीत असे. तो रानातल्या रानलहूंची दिवटी तयार करीत असे. दिवाळीच्या सात दिवसांत रोज एकताळ बनवत-बनवत तो सात दिवसांत सात ताळाची दिवटी तयार करत असे. त्यात दिवे ठेवून ओवाळलं जाई. त्याच दिवटीनं रानातल्या गाई ओवाळल्या जात. ज्या दिवशी उटणं लावून आंघोळी केल्या त्या दिवशी घरातल्या माणसांना ओवाळलं जाई. हा एक खास दिवाळीचा उपक्रम असायचा. गाईंना आणि माणसांनाही ओवाळताना,

दिन दिन दिवाळी

गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कोणाच्या

लक्षीमणाच्या

लक्षीमण कुणाचा

माय बापाचा

दे माय खोबऱ्याची वाटी

वाघाच्या पाठीत घालीन काठी

असं गाणं म्हटलं जायचं. दिवाळीपासून भाऊ व्यायामाला सुरुवात करायचे. त्यासाठी आईकडं खोबरं मागायचे आणि ते खाऊन व्यायाम करून मी इतका धष्टपुष्ट होईल की वाघालाही भिणार नाही, त्याच्या पाठीत काठी घालण्याइतकी शक्ती मिळवील. असं त्या गाण्यातून आईला आश्‍वासन दिलं जायचं. पुढे मी कविता लिहू लागलो आणि दिवाळी अंकात माझ्या कविता येऊ लागल्या. माझ्या दिवाळीच्या आनंदात हे एक नवं परिमाण सामील झालं. गावाकडं असतानाच हे दिवाळी अंक पोस्टानं आले की त्यातल्या कविता सगळेजण पाहायचे आणि तोही एक आनंदाचा भाग असायचा. पुढे मला नोकरी लागली. मी शहरात राहायला आलो. तेव्हा माझ्या आईला मी माझ्याकडे आणून ठेवलं. त्या निमित्तानं दिवाळीला सगळे जण माझ्याकडं येऊ लागले.

कोरोनाच्या आधी पाच वर्षे मी माझ्या गावात विचारांची भाऊबीज करायचो. बाबूराव भालेराव यांची ती कल्पना होती. त्यानिमित्तानं गावात पोपटराव पवारांपासून भास्करराव पेरे पाटलांपर्यंत अनेक ग्रामसुधारक लोकांच्या समोर आणून आम्ही उभे केले. शहरात असताना परभणीमध्ये निघणाऱ्या अनेक दिवाळी अंकांचे प्रकाशन समारंभ, हेही एक माझ्या परभणीतल्या दिवाळीच्या आनंदाचं परिमाण होतं. आता गेल्या दोन वर्षांपासून, अजूनही सत्तरी पार केलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना घेऊन, मी हैदराबादला धाकट्या भावाकडं येतो. आम्ही सगळे बहीणभाऊ मिळून इथंच दिवाळी साजरी करतो.

अशाप्रकारे दिवाळीच्या आनंदाचं परिमाण बदलत गेलं तरी बालपणीच्या गावातल्या आठवणी मात्र सततच सोबत असतात. दरवर्षीच्या दिवाळीच्या आनंदात या आठवणी भर घालीत असतात. जमा झालेले आम्ही सगळे बहीण भाऊ त्या जुन्या दिवाळीच्या आठवणीमध्ये रमून जातो. एक काळ असा होता की घरी खूप गरिबी होती. म्हणजे तशी परिस्थिती सगळ्या गावाचीच होती. येलदरीचं धरण झालं आणि आमच्या गावात बऱ्यापैकी समृद्धी आली. कमी खर्चात साजरी करावी लागणारी दिवाळी आनंदानं साजरी होऊ लागली. त्यानंतर आम्ही दोघं भाऊ नोकरीला लागलो. आमच्या आनंदाच्या परिमाणात आणखी बदल झाला. पण या सगळ्या बदलत गेलेल्या परिमाणातही आनंदाची जुनी परिमाणं आठवणीच्या रूपानं सोबत असतातच. त्यामुळे आजची दिवाळी आणखी आनंददायी होते. कारण सुखाच्या असो की दुःखाच्या आठवणी या नेहमीच रम्य असतात.

(लेखक कवी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com