Flex Fuel Engine : फ्लेक्स फ्यूएल इंजिनचे भवितव्य

जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागेच जैवइंधन धोरण आणले आहे. या धोरणानुसार देशात इथेनॉलनिर्मिती आणि वापर यांस प्राधान्य दिले जातेय.
Flex Fuel Engine
Flex Fuel EngineAgrowon

जीवाश्म इंधनावरील (Fossil Fuel) आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागेच जैवइंधन धोरण (Bio Fuel Policy) आणले आहे. या धोरणानुसार देशात इथेनॉलनिर्मिती (Ethanol Production) आणि वापर यांस प्राधान्य दिले जातेय. मागील दोन-तीन वर्षांत या धोरणानुसार देशात इथेनॉलचे उत्पादन आणि वापरही वाढला आहे. पेट्रोलमध्ये जसजसा इथेनॉलचा वापर वाढेल, तसा या इंधनाला पूरक असा बदल वाहनांच्या इंजिनमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. याबाबतचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे मागील दोन वर्षांपासून सातत्याने देत आहेत.

वर्षभरापूर्वी त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगासाठी फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर काही कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावर फ्लेक्स फ्यूएल इंजिन निर्मितीला सुरुवात देखील केली आहे. येणाऱ्या काळात ऑटोमोबाईल उद्योगातील विविध कंपन्यांनी अशी इंजिने निर्माण करावीत, असे आवाहन केंद्र सरकारने नुकतेच केले आहे. त्यामुळे फ्लेक्स फ्यूएल इंजिनांचा वापर देशात वाढेल, यात शंकाच नाही.

Flex Fuel Engine
Flex Engine : वाहन कंपन्यांकडून फ्लेक्स इंधन इंजिनची प्रायोगिक निर्मिती सुरू

सध्या आपल्याकडील ऑटोमोबाईल इंजिने पेट्रोल-डिझेलवर किंवा पेट्रोलमध्ये थोडेफार इथेनॉल मिश्रणावर चालणारी आहेत. फ्लेक्स फ्यूएल इंजिन म्हणजे १०० टक्के पेट्रोल-डिझेलबरोबरच असे इंजिन १०० टक्के इथेनॉलवर देखील चालतील. महत्त्वाचे म्हणजे असे इंजिन पेट्रोलमध्ये कितीही टक्के इथेनॉल मिश्रण वाढवत नेले, तर त्यास ते अॅडजेस्ट (समायोजित) करणारे असेल. अशा प्रकारच्या इंजिनामुळे देशात इथेनॉलचा वापर वाढेल. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला देखील चालना मिळणार आहे.

Flex Fuel Engine
Ethanol Production: इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. इथेनॉल हे पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे ग्राहकांवर सध्या पडत असलेला अतिरिक्त भुर्दंड वाचून त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे आपण आयात करीत असलेल्या इंधन तेलावर जवळपास १५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन खर्च होते. देशात फ्लेक्स फ्यूएलमुळे इथेनॉलचा वापर वाढला तर देशाचे मोठे परकीय चलन आपण वाचवू शकतो. प्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे आपल्या देशातील शेतीलाही चालना मिळू शकते.

कारण यासाठी लागणारे इथेनॉल शेतीतूनच निर्माण होणार आहे. केवळ ‘फूड’च नाही तर ‘फ्यूएल’ उत्पादन करणारी शेती असा शेतीचा कायापालट होऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारणार आहे. फ्लेक्स फ्यूएल इंजिनला लागणारे इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला देखील हातभार लागणार आहे. फ्लेक्स फ्यूएल इंजिनचे असे सर्वव्यापी फायदे लक्षात घेऊन ऑटोमोबाइल उद्योगाने याच्या निर्मितीवर भर द्यायला हवा. यामुळे इंधनामध्ये देश आत्मनिर्भर तर होणार नाही, परंतु आपले इंधनावरील अवलंबित्व नक्कीच कमी होणार आहे, ही बाब ऑटोमोबाइल उद्योगाने लक्षात घेतली पाहिजे.

ब्राझील हा देश इथेनॉलवर फार पूर्वीपासून वाहने चालवितो. अशावेळी या देशाकडून फ्लेक्स फ्यूएल इंजिन बनविण्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन घ्यायला हवे. इथेनॉल हे अतिशय आर्द्रता शोषक असल्यामुळे इंधन टाकीत पाणी साठण्याची शक्यता असते. शिवाय इथेनॉलचा उष्मांकमूल्य पेट्रोलच्या तुलनेत कमी असल्याने ‘मायलेज’ची (मैल-अंतर) समस्या निर्माण होत असल्याचेही यातील काही जाणकारांचे मत आहे. फ्लेक्स फ्यूएल इंजिनमध्ये वाहनांचे मायलेज कसे वाढेल, हेही पाहावे लागेल. असे झाले तर आपले फ्लेक्स फ्यूएल इंजिन तंत्रशुद्ध, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर देखील होईल. बायो-इथेनॉलवर वाहनांचे नाहीतर ट्रेन चालविण्याचे तंत्रज्ञान जर्मनीने सिद्ध केले आहे. इथेनॉलची उच्च आवृत्ती विमान वाहतूक उद्योगात देखील वापरली जाऊ शकते. पुढच्या टप्प्यात इथेनॉलचा असा विविध उद्योगांतही कसा वापर वाढविता येईल, हे पाहावे लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com