Marigold Flower : झेंडू फुलाचा असाही सन्मान

मेक्सिको या देशात झेंडूचा उपयोग मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या सन्मानासाठी होतो. प्रतिवर्षी १ आणि २ नोव्हेंबरला या राष्ट्रात मोठ्या प्रमाणावर Day of Dead म्हणजेच ‘मृतांचा दिवस’ साजरा करतात. २ नोव्हेंबरला येथे राष्ट्रीय सुट्टीसुद्धा असते.
Marigold Flower
Marigold FlowerAgrowon

सन्मान आणि विनम्रता हे दोन शब्द नेहमीच एकमेकांबरोबर हात गुंफून असतात जेथे विनम्रता असते, तेथेच सन्मान असतो. मात्र त्यासाठी नम्रतेला अनेक वेळा असंख्य अडचणी, त्रासातून जावे लागते आणि यात जो टिकतो तोच सन्मानास प्राप्त होतो. आपल्या झेंडूचेच उदाहरण घ्या ना! शेतात वारा, पाऊस असो की दुष्काळ, फुललेला झेंडू पोत्यात खचाखच भरला जातो.

टेम्पोमध्ये फेकला जातो आणि फुलबाजारात पोत्यातून बाहेर पडतो तेव्हा श्‍वास कोंडलेले हे सुंदर पिवळे केशरी फूल पुन्हा एकदा ताजेतवाने होते. म्हणूनच तर ‘दारी तोरण असावे झेंडूचे’ या सन्मानास हे फूल पोहोचले आहे. झेंडू उत्सव हा नवरात्रीपासून सुरू होतो, दसरा पार पडतो आणि येते पाच दिवसांची दिवाळी. दिवाळीमध्ये प्रत्येक घर झेंडूमय होऊन जाते. ६० च्या दशकात ग्रामीण भागात झेंडू हा दिवाळीच्या आधी अंगणात दोन, तीन बाजूंनी लावला जात असे. क्वचित तो कुणाच्या शेतात सुद्धा असे.

Marigold Flower
Marigold Producers : दर कोसळल्याने झेंडू उत्पादकांना फटका

मात्र तो विकण्यासाठी कधीच नव्हता. नंतर सणवार उत्सवाचे महत्त्व वाढले. एकत्र कुटुंबांचे अंगण फुलविणारे हे पिवळे गर्द सौंदर्य शेतामध्ये गेले. तेथून त्याची रवानगी झाली ती हरितगृहात. आज आपल्या देशात मागील एक दशकात या फुलाने अडीच लाख हेक्टरच्याही वर क्षेत्रावर सरासरी ७५० लाख टनांची मर्यादा पार करून इतर सर्व फुलांना केव्हाच मागे टाकले आहे. फूल निर्यातीमध्येही याचा वाटा आहे. म्हणूनच या सुंदर गेंदाने कोरोनाचा अपवाद वगळता ४०० कोटी रुपयांची पिवळी झळाळी अनुभवली आहे. दिवाळी सोने खरेदीस जेवढी झुंबड त्यापेक्षाही झेंडू खरेदीला जास्त गर्दी असते. दोघेही पिवळे धमक; पण झेंडूची मजाच न्यारी.

Marigold Flower
Flower Market : फूल उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

झेंडू हे फूल मूळचे मॅक्सिकोचे. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ३५० वर्षांपूर्वी त्यास भारतात आणले आणि आज ते भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग झाले आहे. कोलकोत्याच्या हावडा ब्रीजखाली असणाऱ्या मलीक घाटावर १३० वर्षांपासून आशियामधील सर्वांत मोठा झेंडूचा बाजार भरतो. या फुलबाजाराला पश्‍चिम बंगालमधील तब्बल दीड लाख शेतकरी आणि तेवढेच मजूर जोडलेले आहेत. हिमालयीन राज्यांमध्ये लग्न ठरल्यावर सर्व प्रथम वराच्या परसदारी झेंडू लावला जातो आणि लग्न झाल्यावर वधू-वराने घरात प्रवेश करताच त्यांच्यावर झेंडूची फुले उधळली जातात.

आजही अस्थी विसर्जन करताना गंगेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या पाकळ्या सोडल्या जातात. सायंकाळी हजारो दिव्यांच्या प्रकाशात पाण्यावरची झेंडूची पिवळी केशरी झालर मन मोहून टाकते. उत्तर प्रदेशातील कुसुम सरोवरात मध्यभागी श्रीकृष्णाचे मंदिर आहे. या सरोवरात दिवसा भक्त लोक झेंडूची फुले सोडतात, श्रद्धा अशी आहे, की श्रीकृष्ण रात्री तेथे येतात आणि या फुलांची माळ करून ती राधेला घालतात. हिमाचलच्या कुलू व्हॅलीत सुद्धा आर्किडची रेलचेल असतानाही स्थानिक लोक झेंडूचा सन्मान करतात. शीख धर्मात तलवारीच्या टोकावर झेंडू रोवून ठेवण्यास महत्त्व आहे.

मेक्सिको या देशात झेंडूचा उपयोग मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या सन्मानासाठी होतो. प्रतिवर्षी १ आणि २ नोव्हेंबरला या राष्ट्रात मोठ्या प्रमाणावर Day of Dead म्हणजेच ‘मृतांचा दिवस’ साजरा करतात आणि त्यास हजारो वर्षांची परंपरा आहे. या दोन दिवशी तेथील सर्व मोठ्या शहरात, गावागावांत झेंडूच्या फुलांची उधळण सुरू असते. २ नोव्हेंबरला येथे राष्ट्रीय सुट्टीसुद्धा असते. झेंडूचा रंग आणि सुवास मृत व्यक्तींच्या आत्म्यांना आवडतो आणि त्या दिशेने ते घरात अथवा स्मशान भूमीत जेथे त्या मृत व्यक्तीस पुरलेले असते तेथे येतात अशी येथे समजूत आहे.

आत्म्यांच्या स्वागतासाठी ख्रिश्‍चन लोक त्यांच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन झेंडूची आरास करतात. काही लोक त्यांच्या निवासस्थानी स्वतंत्र खोलीची निर्मिती करून तेथे घरामधील सर्व मृत आप्तांचे फोटो, त्यांच्या आवडत्या वस्तू, खाद्य पदार्थ ठेवून सर्व खोली झेंडूच्या फुलांनी सजवतात. खोलीबाहेर पाकळ्यांच्या रांगोळ्या तसेच आत्माचा घरामधील प्रवास सुखकारक होण्यासाठी झेंडूचे रस्ते तयार करतात.

मेक्सिकोमधील या झेंडू उत्सवात २००८ मध्ये युनोस्कोने वारसा हक्काचा दर्जा दिला आहे. या नम्र फुलांचा हा असा आगळावेगळा सन्मान मला त्या राष्ट्रात केवळ योगायोगाने पाहावयास मिळाला. मात्र त्या मृत आत्मांच्या खोलीत एका लहान मुलीचा गोड फोटो, त्याला झेंडूची सजावट आणि फोटो जवळ ठेवलेली तिची छोटीशी बाहुली मात्र मला वेदना देऊन गेली. येथील अनेक लोक, मित्र मंडळी, नातेवाईक या दिवशी एकमेकांच्या घरी झेंडूची फुले घेऊन जातात.

या झेंडू उत्सवासाठी मेक्सिकोमध्ये झेंडूची फार मोठी उलाढाल होते. या दोन दिवसात तब्बल एक लाख किंवा त्यापेक्षाही जास्त पॉलीबॅगमधील फुलांनी लगडलेल्या रोपांची विक्री होते. अनेक लोक दोन, तीन महिने आधीच झेंडूची नोंदणी करून ठेवतात. एकट्या मेक्सिको शहराच्या बाहेर हजारो हरितगृहांत फक्त झेंडूचीच निर्मिती सुरू असते. ८ ते १० मोठ्या फुलांचे एक रोप २ ते ४ डॉलर म्हणजे १५० ते ३०० रुपयांपर्यंत विकले जाते. थोडक्यात, एक फूल तब्बल १५ ते ३० रुपयांस विकले जाते.

फुलाच्या या अनोख्या सन्मानास दंडवत का घालू नये? मेक्सिकोमध्ये अशा काळात लाखो डॉलरची उलाढाल होते. अनेक शेतकरी त्यांचे पूर्ण वर्षाचे कृषी उत्पादन फक्त या दोन दिवसांमध्येच वसूल करतात. मर्यादित काळापुरतेच हे फूल उत्पादन असल्यामुळे हे झेंडू उत्पादक शेतकरी अतिशय सुखी आहेत. विशेष म्हणजे येथे ग्राहक आणि उत्पादकांमध्ये दलाल नावाची व्यक्ती नाहीच. लोक स्वतः हरितगृहात जातात आणि हवे तेवढे झेंडू खरेदी करतात. आपल्याकडे मात्र उलट परिस्थिती आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला झेंडू त्याच्या जागेवर तर ३० ते ५० रुपये किलोने विकला जातो. मात्र व्यापाऱ्यांतर्फे ग्राहकांना तोच झेंडू २०० ते ४०० रुपये किलो प्रमाणे विकला जातो. माल विकला गेला नाही तर उत्पादक त्यास फेकून देतात. या नवरात्रात मी गावी जात असताना माळशेज घाटात अनेक ठिकाणी ताज्या झेंडूचे मोठमोठे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ओतून टाकलेले होते. हे अतिशय वेदनादायी चित्र होते.

झेंडूच्या पाकळ्यांपासून कॅरोटीन वेगळे करून त्याचा कुक्कुट खाद्यात वापर करता येतो. झेंडू पाकळ्यांवर विशिष्ट प्रक्रिया करून त्यासुद्धा कोंबड्यांना खाद्य म्हणून देतात. मानवी आहारात सुद्धा झेंडू वापरता येतो. आम्ही लहानपणी झेंडूच्या पाकळ्या काढून खालचा गोलाकार भाग खोबऱ्यासारखा खात असू.

हा झेंडूचा खरा सन्मान आहे. फक्त शेतात पिकवला, टेम्पोत भरला, बाजारात नेला आणि विकला नाही, तर रस्त्यात फेकून दिला हा सन्मानाचा भाग नसून एका सुंदर फुलाचा अपमान आहे. एका राष्ट्रात २ नोव्हेंबरला त्याचा एवढा सन्मान आणि त्याच्या आठ दिवस आधी दिवाळीमध्ये सन्मानाबरोबरच त्याचा होणारा अपमान हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com