निरक्षराची ‘अक्षर’ कहाणी

निरपराध्यांना ते केवळ ज्यू आहेत म्हणून मारायचं, यामागचं युद्धोत्तर काळातील अपराधीपण सतत झेलत राहणं सोपं नसतं. हानाची कहाणी हेच तर सांगते. एकीकडे हा अपराध आणि दुसरीकडं आपलं ‘गुपित’ लपवण्याचा दबाव, यात तिची होणारी घुसमट आपल्याला अस्वस्थ करते, छिन्नमनस्क करते!
निरक्षराची ‘अक्षर’ कहाणी
The ReaderAgrowon

मला भावलेलं पुस्तक

तो तसा अडनिड्या वयातला, साधारण पंधरा-सोळाचा. ती छत्तीशीची. दुनियादारीच्या प्रवाहातील दोन ओंडक्याप्रमाणं ते एकमेकांना भेटतात आणि ऋणानुबंधांच्या वेगळ्याच गाठीत बांधले जातात. या गाठी दोघांनाही शेवटपर्यंत कचत राहतात, काचत राहतात. नात्यातल्या आनंदासवे येणाऱ्या अघोरी वेदना नाइलाजानं पदरात घ्याव्या लागतात. एका टप्प्यावर ती सुटते, तो मात्र अश्वथाम्यासारखा पुरी जिंदगानी स्वतःला तासत राहतो, कोसत राहतो. दोघांची ही ‘अक्षर’ कहाणी अस्वस्थ करणारी, सुन्न करणारी. जगणं असंही असतं तर, याचं भान आणून देणारी. धक्कादायक, पण थरारक नव्हे! नाट्यमयता नसलेली, तरीही अस्वस्थ करणारी. आपण छोट्याछोट्या दुःखांना कुरवाळत बसतो. हे असं जगावेगळं काही वाचलं की मात्र आपल्या कोतेपणाची लाज लाज वाटावी! ही अशी कहाणी आहे, की जी कृष्ण-धवल स्वरूपात जोखता येत नाही. सतत न्यायाचा तराजू हातात घेवून (फक्त) दुसऱ्यांना त्यात तोलण्याची सवय असलेल्यांनी या पुस्तकाच्या वाट्याला न गेलेलंच बरं. नितिमत्तेचं सोवळं पांघरलेल्यांनाही या कादंबरीचं कथानक झेपणारं नाही. युद्ध वाङमयातलं अक्षर दालन समृद्ध करणाऱ्या या मुलखावेगळ्या कादंबरीचं नाव आहे, ‘द रीडर.’

या कथेची सुरवात होते सन १९५८ ला. तेव्हा दुसरं महायुद्ध संपून एक तप लोटलं होतं. या महायुद्धानं युरोपच्या उरा-खांद्यावर झालेल्या जखमांवर खपली धरत असली तरी काही ठिकाणी त्या भळभळत होत्या. विशेषतः महायुद्धात सहभागी झालेली किंवा त्याला मूक पाठींबा देणारी जर्मनांची पिढी; युद्धकाळात बालपण गेलेली आणि नंतर त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांचं विश्लेषण करणारी, त्यावर चर्चा करणारी जर्मनांची पुढची पिढी यांच्यातलं फाटलेपण अद्याप कायम होतं. किंबहुना ते वाढत होतं. विवेकी जर्मनांमध्ये हिटलरच्या नादाला लागून आपण काय करून बसलो, अशी कशी माणुसकी विसरलो हा अपराधगंड बळावला होता. युद्धात छळछावण्यांमधील जबाबदार नाझी अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर ठिकठिकाणी खटले सुरू होते. दोस्त राष्ट्रांनी युद्ध गुन्ह्यात सहभागी झालेल्या नाझी अधिकाऱ्यांवर न्यूरेंमबर्ग या जर्मनीतील शहरात विशेष न्यायालय स्थापन करून खटले गुदरले होते. ‘न्यूरेंमबर्ग ट्रायल’ म्हणून ते प्रसिद्धी पावले. ही सारी या कथानकाची पार्श्वभूमी.

पौगंडावस्थेतील शाळकरी मुलगा आणि एका प्रौढेच्या अजब दोस्तान्याने कथानकाची सुरवात होते. १५ वर्षांचा मायकेल, काविळीचा संसर्ग झाल्यानंतर अनेक महिने शाळेत जावू शकत नाही. एकदा तो बाहेर पडतो अन उलट्यांनी बेजार होतो. तिथं त्याला हाना श्मिट्झ ही ट्राम कंडक्टर मदत करते. बरा झाल्यावर तो आभार मानायला तिच्या घरी पोचतो. तिथंच त्यांचे भावबंध जुळतात आणि ते रत होतात. हळूहळू ते दररोजच दुपारच्या सुटीत भेटायला लागतात. त्यासाठी मायकेल शाळेतील तासाला बुट्टी मारून तिच्याकडे धाव घेत राहतो. या संबंधांना उभयतांच्या साहित्य प्रेमाची एक हळवी किनारही आहे. प्रत्येक भेटीत हाना मायकेलकडून पुस्तक वाचून घेते. त्याच्या तोंडून ऐकणं हा तिच्यासाठी आनंदाचा सोहळा. होमरची ‘इलियड’ आणि ‘ओडीसी’ ही ग्रीक महाकाव्यं, अर्नेस्ट हेमिंग्वेचं ‘दी ओल्ड मॅन अँड दी सी’ आदी अभिजात पुस्तकं तो तिच्यासाठी वाचतो. त्यावर दोघं चर्चा करतात. दिवस पुढे सरकत जातात. हे ‘अक्षर’ नातं सुरुच असतं, मात्र त्याला अंत असतो. एके दिवशी हाना अचानक गायब होते. मायकेल तिचा शोध घेतो, पण व्यर्थ. तिच्या नाहीशा होण्याची बोच मायकेलच्या मनाला लागून राहते. काही करून हाना त्याला हवी असते, पण ती तर न सापडण्यासाठीच गायब झालेली असते.

यथावकाश मायकेल तारुण्यात प्रवेश करतो. कायद्याच्या अभ्यासासाठी विधी महाविद्यालयात दाखल होतो. अभ्यासाचा एक भाग म्हणून त्याला नाझी छळछावणीतील माजी महिला सुरक्षा रक्षकांच्या खटल्याचं कामकाज अभ्यासण्यासाठी पाठवलं जातं. तिथं युद्ध गुन्ह्यातील आरोपी म्हणून हानाचं दर्शन होतं आणि तो हादरतो. एका चर्चमध्ये बंदिस्त असलेल्या ज्यू महिला कैद्यांवर विमानातून बॉम्बवर्षाव होतो आणि चर्चला आग लागते. नाझी महिला सुरक्षा रक्षकांनी दरवाजे बाहेरून बंद केलेले असल्यानं तीनशेपेक्षा अधिक महिला आगीत मृत्युमुखी पडतात. या आगीतून बचावलेली एक महिला आणि तिच्या मुलीच्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षकांविरोधातील खटला सुरू झालेला असतो. छळछावण्यांतील अत्याचारांबाबत या मुलीनं लिहिलेलं पुस्तक पुरावा म्हणून पुढं येतं. आगीच्या घटनेचा अहवाल हानानेच लिहिला असल्याचं न्यायालयात सांगितलं जातं. सुरवातीला हाना ते नाकारते. हस्ताक्षर तपासणी करण्याचा आदेश न्यायाधीश देतात, तेव्हा हाना अचानक माघार घेते आणि हा अहवाल आपणच लिहिल्याचं कबूल करून टाकते. खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या मायकेलला तिच्या या कृत्याचा धक्का बसतो. मग त्याच्या लक्षात येतं एक विचित्र वास्तव. त्याचं लेखकानं पुस्तकात केलेलं वर्णन आपल्यासाठीही धक्कादायक ठरतं. मायकेल आपल्या भावना नोंदवताना म्हणतो...

‘त्या तिथे ते मला लख्ख समजलं. हाना निरक्षर होती. तिला लिहिता अगर वाचताही येत नव्हतं. म्हणूनच ती इतरांना वाचून दाखवायला बोलवायची. त्यामुळेच आमच्या सायकलवरल्या सफरीत तिनं लिहिण्या-वाचण्याची गरज पडेल असलं सर्व काम मला दिलं होतं; आणि हॉटेलमध्ये मी लिहिलेली चिठ्ठी तिला सापडली तेव्हा काय लिहिलं आहे ते तिला समजणारच असं मी गृहीत धरीन आणि आपण उघड्या पडू या धास्तीमुळे तिचा स्वत:वरला ताबा सुटून ती बेभान संतापली होती. ट्राम कंपनी तिला जी वरची जागा देऊ करीत होती ती त्यामुळेच तिनं नाकारली होती. कंडक्टरचं काम करताना ती आपली निरक्षरपणाची कमतरता लपवू शकत होती, पण चालकाचं काम पत्करायचं तर ती लपवणं शक्य झालं नसतं. या कारणामुळेच सिमेन्स कंपनीत मिळणारी वरची जागा तिनं नाकारली होती आणि तिनं हे छळछावणीतील पहारेकऱ्याचं काम पत्करलं होतं.

आणि न्यायालयात हस्ताक्षरतज्ज्ञाला सामोरं जायला लागू नये म्हणूनच तिनं स्वत:च तो अहवाल लिहिल्याचं मान्य केलं होतं. आणि याच कारणामुळे खटल्यातली मुख्य गुन्हेगार म्हणून स्वत:ला अडचणीत येऊ दिलं होतं का? त्यातलं एक कारण, त्या मुलीनं लिहिलेलं पुस्तक आणि त्यात केलेले आरोप अर्थातच तिला वाचता आले नव्हते, त्यात कोणत्या त्रुटी आहेत की ज्यांच्यामुळे स्वतःचा बचाव करता येईल हे अर्थातच तिला कळू शकलं नव्हतं. म्हणून तिला बचावाची तयारीच करता आली नव्हती का? आपल्याला लिहिता-वाचता येत नाही याची तिला शरम वाटत होती हे मी समजू शकतो. समाजात शिष्टमान्य नाही अशी वर्तणूक झाल्यामुळे वाटणारी शरम नि चोरटेपणा, दुसऱ्याला दुखवल्यामुळे शरमिंदं वाटणं, असल्या कारणांनी शरम वाटू शकते हे तर मी स्वत:च अनुभवलं होतं. पण छळछावणीत अगर खटल्याच्या वेळी केवळ निरक्षर असल्याची वाटणारी शरम हे पुरेसं कारण होतं? निरक्षरपण उघडकीस येऊ नये म्हणून गुन्हेगार असल्याचा आरोप मान्य करीत होती ती? त्याकरता गुन्हेही? हे सारे प्रश्न किती वेळा मी विचारलेत स्वत:ला, तेव्हा नि नंतरही. गुन्हेगार म्हणवून घेणं हा भयंकर पर्याय पटला तिला, साधंसरळ निरक्षर म्हणवून घेण्यापेक्षा? असं वाटलं का तिला की ते कधीच उघडकीस येणार नाही?

मायकेल उशिरा लक्षात आलेल्या या वास्तवामुळं हादरून जातो. हानाला आजन्म कारावासाची शिक्षा होते. पुस्तकाचा शेवटचा भाग खटल्यानंतरचं मायकेलचं जीवन, त्याचा अयशस्वी विवाह आणि तुरुंगात हानाशी संपर्क करण्याचा निर्णय याबद्दल आहे. हानाचं तुरुंगातील आयुष्य सुखकर जावं यासाठी तो अनोखा मार्ग अवलंबतो. अभिजात पुस्तकांचं वाचन करून ते ध्वनिमुद्रित करतो. या ध्वनिफिती तो तुरुंगात हानाला ऐकण्यासाठी पाठवत राहतो. हे तब्बल १८ वर्ष चालतं. नंतर हानाची शिक्षा कमी होते, तेव्हा तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी मायकेलनं घ्यावी असं तुरुंगाधिकारी सूचवतात. मायकेलही ती मान्य करतो. अखेर तो मुक्तीचा दिवस येतो. मायकेल तिला आणायला तुरुंगात जातो तेव्हा वेगळंच वास्तव त्याची वाट पाहात असतं. ते काय असतं हे पुस्तकातच वाचलेलं बरं!

जर्मन हेरकथा लेखनात उस्तादी मिळवलेल्या बर्नाड श्लिंक यांनी ‘द रीडर’ मध्ये एकदम हटके विषय हाताळला. ही कृती म्हणजे जर्मनीतच जन्मलेल्या बर्नाड यांच्या व्यक्तिगत आयुष्याची पडछाया असल्याचं मानलं जात असलं तरी तसं त्यांनी कुठं मान्य केलेलं नाही. ही कादंबरी जर्मनीतच नव्हे तर अमेरिकेतही प्रचंड लोकप्रिय ठरली. मराठीसह ३९ भाषांत अनुवादित झाली. मराठी आवृत्ती राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केली आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या यादीत दीर्घकाळ अव्वलस्थानी राहण्याचा पराक्रम करणारी ही पहिलीच जर्मन कादंबरी.

या कादंबरीवर २००८ मध्ये याच नावाचा उत्तम चित्रपट आला. सौंदर्यवती गुणी अभिनेत्री केट विन्स्लेटनं हानाची भूमिका ताकदीनं पेलली. सतत तणावग्रस्त असणारी, स्वच्छतेचं प्रचंड वेड असलेली, आक्रमक प्रेयसी, दर्दी रसिक वाचक (की श्रोता?) ही सारी रुपं तिनं सुरेख साकारली. हा चित्रपट आपल्याला हादरवून सोडणारा अनुभव देतो. साहजिकचं त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘आॅस्कर’वर तिचीच नाममुद्रा उमटली. शिवाय आणखीही प्रतिष्ठित पुरस्कारांनी चित्रपटाचा गौरव झाला. कुमारवयीन आणि प्रौढ मायकेलच्या भूमिका अनुक्रमे डेव्हीड क्रॉस आणि राल्फ फिएन्स यांनी अत्यंत ताकदीनं साकारल्या. म्हणून तर हा चित्रपट अविस्मरणीय ठरतो. ‘नेटफ्लिक्स’वर तो पाहता येईल. मूळ कादंबरीपेक्षा चित्रपट सरस उतरल्याचं अहोभाग्य काही मोजक्या कलाकृतींच्याच वाट्याला येतं; ‘द रीडर’ त्यापैकी एक!

ही कादंबरी वाचण्याचा अनुभवही काही हलका नाही. शेवटाकडे जाईपर्यंत आपण पार खचून गेलेलो असतो. एक मुलगा आणि प्रौढा यांच्यातील शारीर नातं तसं न पचणारंच, पण लेखकानं खुबीनं ही पात्रं रंगवल्यानं त्यात कृत्रिमपणा किंवा गैर असं काही वाटत नाही. पाश्चिमात्य जगात तर त्याचा इतका बाऊ केला जात नाही. लेखक स्वतः कायद्याचा अभ्यासक असल्यानं खटल्याविषयीचं विस्तृत विश्लेषण येतं. कायद्याचे प्राध्यापक एका प्रसंगात वर्गात विश्लेषण करताना सांगतात, ‘समाजाला वाटतं की नैतिकतेमुळं आपलं मार्गक्रमण ठीक सुरू आहे, पण तसं नसतं. समाजजीवन कायद्यामुळं (कायद्याच्या धाकामुळं) सुरळीत चाललेलं असतं.’ कायदा आणि जगण्या-वागण्याबातची लेखकाची अशी भाष्य या कादंबरीला आणखी समृद्ध करणारी ठरतात. शिवाय हिटलर आणि त्यानं घडवून आणलेल्या उत्पाताचे पडसाद जगावर किती दीर्घकाळ पडत राहिले, याचं भान ही कादंबरी आणून देते.

निरक्षर असण्याचा शाप किती मोठा असतो ना! प्रगत समाजात वावरणारी एखादी व्यक्ती आपलं अडाणीपण उघड होऊ नये यासाठी किती टोकाला जाते, हे पचवणं धक्कादायकच! प्रसंगी गुन्हा मान्य करून दीर्घ काळासाठी तुरुंगात जाऊ, पण अडाणीपणाचं किटाळ नको असं हानाला का बरं वाटावं? शिक्षणापासून वंचित असलेल्यांचे किती हाल होत असतील याचा अंदाज यावरून यावा. हानाला अभिजात साहित्याची आवड असते. त्यासाठी पुढे ती तुरुंगात भाषा शिकते. उत्तमोत्तम पुस्तकं वाचत स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्यावर असलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या डागाचं काय? तो तिला अंतर्बाह्य छळत राहतो. निरपराध्यांना ते केवळ ज्यू आहेत म्हणून मारायचं, यामागचं युद्धोत्तर काळातील अपराधीपण सतत झेलत राहणं सोपं नसतं. हानाची कहाणी हेच तर सांगते. एकीकडे हा अपराध आणि दुसरीकडं निरक्षरपणा लपवण्याचा दबाव. असं आयुष्य कोणाच्याही, अगदी दुष्मनाच्या वाट्यालाही ना येवो! दुसऱ्या महायुद्धानं जगाला कित्येक कहाण्या दिल्या. काही खऱ्या, काही काल्पनिक तर काही खऱ्याची आणि काल्पनिकाची सरमिसळ! म्हणून तर पाश्चिमात्त्य साहित्यविश्व समृद्ध झालं. ‘द रीडर’ सारखी पुस्तकं आपल्याला युद्धाच्या भेसूर पडछायांचं भान आणून देतात. युद्ध माणुसकीचा कस पणाला लावतं. खरा माणूस कोणता आणि प्रवाहाबरोबर पतित होणारा कोणता याचं रोकडं आकलनं ते करून देतं. माणुसकी सोडून तत्कालिक फायद्यासाठी दुसरा मार्ग धरू पाहणाऱ्यांना खबरदार करणारं आहे हे पुस्तक!

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com