ही वाट दूर जाते...

कठीण मार्गावर वाटचाल करणाऱ्यांची संख्या नेहमीच कमी असते. असा मार्ग कोणाला सहसा भावत नाही, पेलवत नाही. त्यावर वाटचाल करायची असेल तर ज्ञानाची कास धरायला हवी, विवेकाचा तराजू तोलायला हवा, संयमाचा काढा पचवायला हवा, अन्यांविषयी प्रेमाची भावना जोपासायला हवी. ‘हे विश्‍वची माझे घर’ हे म्हणणं सोपं आहे, पण ते अमलात आणणं महाकर्मकठीण.
ही वाट दूर जाते...
Book ReviewAgrowon

मला भावलेलं पुस्तक

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I -
I took the one less traveled by,
And that has made all the difference
- Robert Frost, American Poet

आयुष्यात बऱ्याचदा अशी काही वेळ येते, की जेव्हा प्रश्‍न उभा राहतो... हे करावे की ते? इकडे जावे की तिकडे? तेव्हा किंकर्तव्यमूढ होणाऱ्यांची संख्या अधिक. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतो तसं, न मळलेली वाट पकडण्याचं धाडस कोणी करू धजत नाही. चाकोरीतली चाकरी आणि भाकरीच प्रत्येकाला प्रिय असते. त्यामुळं घाण्याचा बैल बनणाऱ्यांची संख्या एकूणच समाजात अधिक, म्हणजे तब्बल ८० टक्क्यांपेक्षाही जादा. न मळलेली वाट निवडायची ठरवली तर मोठा फरक पडण्याची शक्यता असते. पण ती शक्यताच असते, खात्री नसते. त्यामुळं या वाटेच्या वाटेला कोणी जात नाही. आजूबाजूला पाहा, असे चाकोरीत अडकलेले अनेक लोक दिसतील तुम्हाला! कदाचित त्यात आपणही एक असू शकतो. जगणं तसं सोपं नसतं आणि ते आणखी अवघड करून घेण्याची कोणाची तयारी नसते. ‘पाडस’ कादंबरीत गरीब बाप दुनियादारीचे रट्टे खाऊन आलेल्या आपल्या पोराला, ज्योडीला म्हणतो, ‘पोरा, जीवन खूप सुंदर आहे, मात्र ते सोपं नाही!’

दुसरीकडं मळलेल्या वाटेवरून चालतानाही आलेल्या आव्हानांनी, कटू अनुभवांनी कातावलेल्यांची संख्या अधिक. काही मूकपणानं अश्रू ढाळतात, तर काही तमाम दुनियेला दोषी ठरवतात. प्रख्यात शायर साहिर लुधियानवी यांची ही नज्म प्रसिद्ध आहे...

तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम
ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम।
लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उमीद
लो अब कभी गिला न करेंगे किसी से हम।

प्रश्‍न तोच आहे. या जालिम दुनियेत जगायचं कसं, तगायचा कसं आणि त्यासाठी वागायचं कसं? खरं तर हा दीर्घ चिंतनाचा विषय. त्यावर कितीही मंथन केलं तरी ते अपुरंच! जगभरातल्या आध्यात्मिक गुरूंनी, विद्वानांनी, प्रेषितांनी या विषयावर प्रचंड वैचारिक घुसळण केली. लक्षावधी पुस्तकं लिहिली गेली. विविध धर्मांत त्यासाठीची कर्मकांडं तयार झाली. मानव जातीला, समाजाला नियंत्रित करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला, आजही होतो आहे. त्यातून स्वातंत्र्याचा संकोच झाला. नियंत्रकांच्या हाती शोषणाची सूत्रं सोपवणारी व्यवस्था तरारून फणा काढती झाली. विद्येची फळं चाखणारे त्याचे लाभार्थी ठरले. वर्णव्यवस्था म्हणजे याच व्यवस्थेची विकृत परिणती. इतकं सारं झालं तरी व्यक्ती म्हणून जगावं कसं या प्रश्‍नाचं अंतिम उत्तर काही आजतागायत बहुतेकांच्या हाती लागलं नाही. ते तसं मिळणंही कठीण. ही शोधयात्रा आहे. तिला शेवटचा थांबा नाही. अधिकाधिक उन्नत होत जाणं एवढंच हाती उरतं, अर्थात असा उन्नयनाचा मार्ग स्वीकारायची आपली तयारी असेल तरच!

अध्यात्माच्या पलीकडं जाऊन मानसशास्त्रानंही या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. जगभरातील नाणावलेल्या मानसशास्त्रज्ञांनी अनेक वर्षं संशोधन करून या विषयावर शोधनिबंध लिहिले, पुस्तकं लिहिली. मानवी मनाचा वेध, त्याचं विश्‍लेषण, मनोविकृतीवरचे उपचार हा बहुतांश मानसशास्त्रावरील पुस्तकांचा गाभा. मानववंशास्त्रानंही काही मूलभूत काम केलं, ज्याचा मानवी वर्तनाचा अर्थ लावायला मदत झाली. मानवाची उत्क्रांती माकडापासून झाली, या चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड वॉलेस यांच्या सिद्धांतांमुळं एकोणिसाव्या शतकात प्रचंड खळबळ उडाली. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी वेगळा असून तो विश्‍वनिर्मात्यानं खास निवडलेला आहे. त्याचं निश्‍चित असं काहीतरी जीवनकार्य आहे. त्यामुळं मानवी उत्क्रांतीचा विषय विज्ञानाचा नसून धर्मज्ञानाचा आणि अध्यात्माचा आहे, या जुन्या मतप्रणालीला डार्विन-वॉलेस सिद्धांतानं जबरदस्त आव्हान दिलं. जैवविज्ञानात हा सिद्धांत मान्य झाला असला, तरी उत्क्रांतीच्या सिद्धांताला अमान्य करणाऱ्या अनेक विरोधी विचारधारा आहेत. मानवजातीतील बहुतेकांचं वर्तन मर्कटासारखं असलं तरी त्यांना पूर्वज म्हणून स्वीकारायला आपण अंमळ कचरतोच!

गेल्या शतकातील अमेरिकन मनोविकृतितज्ज्ञ मॉर्गन स्कॉट पेक यांनी लिहिलेलं ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड’ हे पुस्तक या विषयाची मानसशास्त्रीय अंगानं चिकित्सा करते. अर्थात, यात शंभर टक्के मानसशास्त्राचा आधार घेतला आहे असंही नाही. पुस्तकाच्या अखेरच्या भागात लेखकानं मुक्तचिंतन आणि अध्यात्माचा आधार घेऊन विषयाची मांडणी केली आहे. त्यामुळं त्याचा शास्त्रीय आधार थोडा हलल्यासारखा झाला आहे. असं असलं तरी त्याच्या विश्लेषणाचं मोल कमी होत नाही. हे पुस्तक म्हणजे ललित वाङ्‍मय नव्हे. त्यामुळं भाषिक आनंदाची किंवा मनोरंजनाची अपेक्षा करता येणार नाही. १९७८ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या मराठीसह विविध २३ भाषांमध्ये एक कोटीहून अधिक प्रति विकल्या गेल्या. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकांच्या यादीत त्यानं तब्बल दहा वर्षं स्थान राखलं.

लेखक मानसोपचारतज्ज्ञ असला तरी मानसशास्त्रीय व आध्यात्मिक विकासात तो भेद करीत नाही. जीवनात परिपूर्णता व परिपक्वता आणणं हे विकासाचं उद्दिष्ट असतं. ही प्रक्रिया दीर्घ असते. ती झटपट करून विकास साध्य होणार नाही. त्यासाठी आरोग्यदायी, अर्थपूर्ण व दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण करण्याची प्रक्रिया तो उलगडून दाखवितो. पुस्तकाची मांडणी चार भागांत केली आहे. पहिला भाग आत्मनियंत्रणावर भर देतो. जीवनमूल्यांमधील हे सर्वोच्च मूल्य. भावनिक, आध्यात्मिक व मानसशास्त्रीय विकासाचा पाया आत्मनियंत्रणात आहे. लेखक म्हणतो, की आत्मनियंत्रण करता येत नसेल तर कुठल्याच समस्येचं निराकरण होणार नाही. काही प्रमाणात आत्मनियंत्रण करता येत असेल तर काही समस्या सोडविता येतील. संपूर्ण आत्मनियंत्रणानं मात्र सर्व समस्यांचं निराकरण होऊ शकतं. आत्मनियंत्रण अंगी बाणवलं तर आपण स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी स्वतः घेण्यास शिकू, सत्याची कास धरणे शिकू तसेच समतोल राखणेही शिकू, असं त्याचं सांगणं आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात प्रेमावर भाष्य आहे. प्रेम हा विषय सतत आपल्या अवतीभवती असतो. कुटुंबातील नातेसंबंध हा त्यातील महत्त्वाचा भाग. हजारो हिंदी चित्रपट, कथा-कादंबऱ्यांतील प्रेमकहाण्या यांचे अमीट संस्कार आपल्यावर झालेले असतात. त्यात काही चुकीच्या धारणाही असतात. त्या कोणत्या हे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. अनेक मानसशास्त्रीय संकल्पना मांडून लेखक आपल्या मनातील प्रेमाविषयीची कोळीष्टकं दूर करतो, तेव्हा आपणही चकित होतो. पुस्तकातील हा उतारा तुम्हाला त्याची प्रचिती देईल...

प्रेमात पडण्याचा अनुभव मोठ्या कौशल्याने आपल्याला लग्नाच्या जाळ्यात ओढतो. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा अनुभव कायम टिकेल असा भ्रम. हा भ्रम स्वप्नाळू प्रेमाच्या दंतकथांमुळं दृढ होतो. या प्रेमाचं मूळ आपल्या लहानपणीच्या आवडत्या परीकथेमध्ये असतं, ज्यात राजकुमार व राजकुमारी एकत्र आल्यानंतर कायम सुखानं नांदत राहतात. स्वप्नाळू प्रेमाची दंतकथा आपल्याला सांगते, की जगातील प्रत्येक तरुणासाठी एक तरुणी आहे व प्रत्येक तरुणीसाठी एक तरुण आहे आणि ते एकमेकांसाठीच बनले आहेत. या गाठी पूर्वीच स्वर्गात बांधल्या गेल्या आहेत. त्या व्यक्तीची ओळख तेव्हा होते, जेव्हा आपण प्रेमात पडतो. म्हणून ईश्‍वरानं योजलेल्या व्यक्तीशी भेट झाल्यावर, जोडी अनुरूप असल्यानं आपण एकमेकांच्या सर्व गरजा कायम पूर्ण करून निरंतर आनंदात राहू शकतो. काही काळानंतर मात्र परस्परांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. मग भांडणं होतात आणि आपण प्रेमातून बाहेर येतो. नंतर आपल्या लक्षात येतं, की मोठी चूक झालीय. ईश्‍वरी संकेतांचा आपण चुकीचा अर्थ काढलाय, आपली गाठ चुकीच्या व्यक्तीशी पडली आहे, आपल्याला वाटलेलं प्रेम खरं नव्हतं. आता या परिस्थितीबाबत आपण काहीही करू शकत नाही. यापुढं फक्त दुःखात जगू शकतो किंवा घटस्फोट घेऊ शकतो.

प्रेमात मालकी हक्काची भावना आणि जोडीदारावरचं अतिअवलंबित्व ही मोठी समस्या असल्याचं लेखक सांगतो. त्याविषयीचं विवेचन वाचण्यासारखं आहे...

जोडीदारानं, प्रिय व्यक्तीनं नाकारल्यावर किंवा सोडून दिल्यावर एखादी व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते वा तशी धमकी देते किंवा निराशेच्या गर्तेत जाते. तिचं म्हणणं असतं, ‘मला जगायचं नाही, मी जोडीदाराशिवाय जगूच शकत नाही, माझं तिच्यावर / त्याच्यावर खूप प्रेम आहे.’ आणि मी नेहमीप्रमाणे म्हणतो, ‘तुझा गैरसमज होतोय, तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाही.’ रागामध्ये मला प्रश्‍न विचारला जातो, ‘तुम्हाला काय म्हणायचंय? मी आताच सांगितलं, की मी त्याच्याशिवाय /तिच्याशिवाय जगूच शकत नाही.’ मी समजावण्याचा प्रयत्न करतो, ‘तू जे म्हणतेस ते प्रेम नव्हे तर ते ‘बांडगूळत्व’/‘परावलंबित्व'' आहे. जेव्हा तुला जगण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज पडते, तेव्हा तू बांडगूळ असतेस. तुझ्या नातेसंबंधात निवड स्वातंत्र्य नाही, मोकळीक नाही. प्रेमापेक्षा ती तुझी गरज बनलीय. प्रेमात निवड करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं, जेव्हा ते एकमेकांशिवाय जगूही शकतात, परंतु एकमेकांबरोबर जगण्याचा पर्याय निवडतात. ‘माझ्या मते परावलंबित्व म्हणजे पूर्णत्वाचा अनुभव घेता न येणं किंवा कोणीतरी सतत आपली काळजी घेतंय असा विश्‍वास असेल तरच काही करू शकणं. शारीरिक निरोगी व्यक्तीने परावलंबी असणं हा एक प्रकारचा रोग आहे, मानसिक आजाराचं किंवा दोषांचं एक व्यक्त रूप! ‘दुसऱ्यावर अवलंबून राहणं’ या नेहमीच्या गरजेपेक्षा हे परावलंबित्व वेगळं आहे. आपण कितीही नाकारलं तरी आपल्यातील प्रत्येकाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज भासते. आपल्या प्रत्येकालाच इच्छा असते, की आपले लाड व्हावेत, आपण काहीही न करता आपलं पालनपोषण व्हावं, आपली खरी काळजी असणाऱ्या सशक्त व्यक्तीनं आपली देखभाल करावी. कितीही प्रौढत्व आलं तरी आपल्यातील प्रत्येकाला असं वाटतं, की आयुष्यात आईसमान किंवा वडिलांसमान आधार देणारी व्यक्ती असायला हवी. मात्र काही जणांना ही इच्छा प्रबळ नसते. तिला आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान नसतं. जेव्हा ही इच्छा आपल्या आयुष्यावर हुकूमत गाजवते, तेव्हा ती फक्त एक भावना राहत नाही, तर आपणच परावलंबी बनतो. हे परावलंबित्व एक प्रकारचं मानसिक असंतुलन आहे. ज्याला आम्ही ‘परावलंबी व्यक्तिमत्त्वाचं असंतुलन’ असं नाव दिलंय. हे असंतुलन समाजात सर्वांत जास्त आढळून येणारं असंतुलन आहे.
------------
पालकत्वाविषयीचे गैरसमज दूर करणारी लेखकाची मांडणीही आपल्याला गदगदा हलवून जागं करते. लेखक म्हणतो...
-----------
पालक मुलांना म्हणतात, ‘खाण तशी माती.’ किंवा ‘तू अगदी तुझ्या काकांसारखा आहेस,’ जणू काही मुलं त्यांची किंवा कुटुंबातील कोणाची प्रतिकृती आहेत. खरं तर आनुवंशिकतेच्या गुणधर्मानुसार मुलं कोणत्याही एका पालकासारखी किंवा पूर्वजांसारखी नसून भिन्न कुटुंबातील माता-पित्यांचा संयोग झाल्यामुळे अगदी वेगळी होतात. तरीही क्रीडापटू पालक आपल्या बुद्धिमान मुलाला फुटबॉल खेळायला लावतात व बुद्धिमान वडील आपल्या खेळाडू मुलाला अभ्यास करायला लावतात. अशा मुलांना विनाकारणच ताण, अपराधीपणा सोसायला लागतो. एका लष्करातील अधिकाऱ्याची पत्नी आपल्या सतरा वर्षांच्या मुलीची तक्रार करते, “घराच्या एका कोपऱ्यात बसून सॅली दुःखी कविता लिहीत बसते. डॉक्टर, हे खूप भयंकर आहे. ती आमच्याबरोबर समारंभांना यायला स्पष्ट नकार देते. मला काळजी वाटते, की तिला काही तरी मोठी समस्या आहे.’ आकर्षक व उत्साही अशा सॅलीची भेट घेतल्यावर मला समजलं, ती शाळेत एक हुशार विद्यार्थिनी आहे. तिला पालकांसारखं बनण्याची सक्ती करू नका, असा सल्ला मी त्यांना देतो.

हे पुस्तक वाचताना अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतात किंवा ती शोधण्यास वाचक प्रवृत्त होतात. जीवन पारदर्शकपणानं, खरेपणानं, धैर्यानं कसं जगावं, हे ते वाचकांना शिकवतं. प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, शिस्तप्रियता व पारदर्शकता या मूल्यांचं महत्त्व ठसवतं. कठीण मार्गावर वाटचाल करणाऱ्यांची संख्या नेहमीच कमी असते. असा मार्ग कोणाला सहसा आवडत नाही, पेलवत नाही. त्यावर वाटचाल करायची असेल तर ज्ञानाची कास धरायला हवी, विवेकाचा तराजू तोलायला हवा, संयमाचा काढा पचवायला हवा, अन्यांविषयी प्रेमाची भावना जोपासायला हवी. ‘हे विश्‍वची माझे घर’ हे म्हणणं सोपं आहे, पण ते अंमलात आणणं महाकर्मकठीण. त्यामुळं एखाद्या मर्यादा पुरूषोत्तमालाच असं जगणं पेलता येतं. अशा लोकांची संख्या वाढली तर नातेसंबंध सुधारतील, कौटुंबिक स्वास्थ्य वाढीला लागेल, निकोप समाजाची पायाभरणी होईल, समाजातील विषमता दूर होईल, गावकुसाबाहेरचे आपले सगे बनतील. हे होणं अर्थातच सोपं नाही. ते कसं साधता येईल याचं नेटकं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. विशेषतः व्यक्ती म्हणून आपल्याला कसं समृद्ध होता येईल, परिपक्व होता येईल याचा आराखडा ते सादर करतं. म्हणून जगभरच्या लक्षावधी लोकांनी ते डोक्यावर घेतलं. अमलात किती जणांनी आणलं हा वेगळा मुद्दा. त्यापेक्षा आपण काय करणार आहोत हा आणखी कळीचा मुद्दा!
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com