
तूरीच्या मुक्त आयातीच्या (Tur Import) धोरणाला केंद्र सरकारने दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीची आणि त्याचा दरावर होणाऱ्या परिणामाची चर्चा सुरू असतानाच तुरीवरील वाढत्या रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादकांना हैराण करून सोडले आहे. मराठवाडा विभागात तुरीवर फायटोप्थोरा ब्लाइट (Phytopthera Blight) रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाची बातमी डिसेंबर शेवटी आली होती. या भागात हा रोग शेतनिहाय ५ ते ५० टक्क्यांपर्यंत पसरला होता.
आता विदर्भातील अमरावती विभागात पाच प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यांत जवळपास १५ टक्के, म्हणजे ७५ हजार हेक्टरवर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन फुले-शेंगा लागण्याआधी तर काही ठिकाणी लागल्यावर तुरीची उभी झाडे वाळत आहेत.
याला ग्रामीण भागात ‘तुरीला उधळी लागली’ असेही म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीचे नुकसान होऊनही या क्षेत्राचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत आधीच सर्व्हेक्षण झाल्याने दुसऱ्यांदा भरपाई मिळणार नाही, असा दावा कृषी विभाग करीत आहे.
अतिवृष्टीत मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी असते. बऱ्याच नुकसानग्रस्तांपर्यंत ती पोहोचत देखील नाही.
गेल्या वर्षीदेखील ३० टक्के तूर क्षेत्राला मर, वांझ रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटले होते. त्यामुळे फायटोप्थोरा, तसेच मर रोगामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तत्काळ द्यायला हवी.
मुळात तुरीचे उत्पादन खूपच कमी मिळते. त्यात मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर हाती काहीच लागत नाही. अशावेळी तूर उत्पादकांना शासकीय मदतीचा आधार मिळायलाच हवा.
तुरीसह हरभरा, टोमॅटो, कापूस, बटाटा, केळी, डाळिंब अशा अनेक पिकांवर मर रोग आढळून येतो. तुरीवरील मर रोगाची फ्युजारियम बुरशी मातीत वास्तव्य करून राहते. रोगाची सुरुवात जमिनीत होऊन बुरशीचे कवकतंतू मुळांवाटे झाडांच्या अन्ननलिकेत शिरतात.
अन्ननलिकेतून अन्नपाणी घेणे बंद होते. त्यामुळे रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून झाड वाळते. पिकांचे १०० टक्के नुकसान करणारा हा रोग आहे. घातक अशा मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणात्मक फारसे प्रभावी उपाय नाहीत.
त्यामुळे शेतात प्रादुर्भाव दिसणे सुरू झाले म्हणजे रोगट झाडे उपटून टाकावीत, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. बाकी सर्व उपाय प्रतिबंधात्मक आहेत.
त्यामध्ये पिकांची फेरपालट करा, असे सांगितले जाते. परंतु या रोगाची बुरशी दोन ते तीन वर्षे शेतात-मातीत राहते. त्यामुळे रोगट झाडे उपटणे आणि पिकांची फेरपालट हे उपायही परिणामकारक ठरत नाहीत.
पीक फेरपालट करायची असेल, तर तुरीचे तसेच फ्युजारियम बुरशीचा प्रादुर्भाव होईल असे कोणतेही पीक चार वर्षांपर्यंत घेतले गेले नाही पाहिजेत.
त्यामुळे हा उपाय शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अवलंबला जाणे कठीणच आहे. शेतकरी फारतर एखाद्या वर्षी पीक फेरपालट करू शकतात. तुरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यांसारखी आंतरपिके घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
हा उपाय शेतकऱ्यांनी अवलंबण्यासारखा असून, त्यावर त्यांनी त्वरित अमल करावा. तूर घ्यायचे ठरलेल्या शेतात उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू देणे, मर रोग प्रतिकारक वाणांची निवड करणे आणि कार्बेन्डाझिम, ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया हे प्रतिबंधात्मक पर्याय आहेत.
अलीकडे मररोग प्रतिबंधक जातीसुद्धा या रोगास बळी पडताना दिसतात. तसेच तुरीसाठी घरचे बियाणे वापरणारे शेतकरीदेखील माहितीअभावी बीजप्रक्रिया करण्याचे टाळतात.
असा हा सगळा तुरीवरील मर रोगाचा गुंता असून, त्यात उत्पादक गुरफटला जात आहे. चार वर्षांपूर्वी जगभरातील तुरीच्या २९२ जातींच्या गुणसूत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यात तुरीमधील वांझ आणि मर या रोगांस कारणीभूत गुणसूत्रेही शोधण्यात आली.
त्यातून तुरीच्या कमी कालावधीच्या, मर-वांझ रोगांस हमखास प्रतिकारक तसेच अधिक उत्पादनक्षम जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, असा विश्वास शेतकऱ्यांना देण्यात आला. देशभरातील तूर उत्पादक अशा तूर जातींच्या प्रतीक्षेत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.