युद्धाच्या ज्वाळा अन् प्रेमाचा सेतू - आदिनाथ चव्हाण

मानव हा तसा सदासंघर्षशील प्राणी. संघर्षानं संयमाची मर्यादा ओलांडली, की तो हिंसाचारात रूपांतरित होतो. म्हणून मानवजातीचा इतिहास पाहिल्यास तो लढाया, युद्धं, महायुद्धांनी भरलेला दिसतो. पृथ्वीतलावर कोठे ना कोठे सतत लढाया, युद्धं, शीतयुद्धं सुरू असतात. अशा संघर्षाचं नेतृत्व करणारे स्वतःचा ‘अहं’ गोंजारत, महत्त्वाकांक्षेला तेलपाणी घालत सामान्य माणसाला युद्धाच्या खाईत खेचत राहतात, त्याची फरफट करतात हे इतिहासानं पाहिलं आहे, नोंदवलं आहे. तरीही आपण इतिहासापासून काही शिकत नाही.
‘फॉर हूम दि बेल टोल्स’book
‘फॉर हूम दि बेल टोल्स’book

युद्धाच्या ज्वाळा अन् प्रेमाचा सेतू - आदिनाथ चव्हाण ------------ मार्था गेलहॉर्न पहिल्यांदा प्रख्यात साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेला भेटली तेव्हा ती ऐन तारुण्यात होती, तर हेमिंग्वे उभा होता चाळिशीच्या उंबरठ्यावर! तरीही ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ अशी काहीशी त्याची अवस्था झाली. हेमिंग्वे एव्हाना जागतिक साहित्य क्षेत्रातील उभरता तारा म्हणून उदयाला आला होता. फ्लोरिडातल्या की वेस्टजवळ तो राहायचा. तिथल्या स्लॉपी जोज बारमध्ये मनमुराद मद्यपान करायचा. तिथं येणारे पर्यटक त्याला भेटायला, पाहायला धडपडत, स्वाक्षरीसाठी गराडा घालत. एके दिवशी हेमिंग्वेची चाहती असलेली मार्था ही पत्रकार त्याला भेटायला आली. ती यादवी युद्धाचं वार्तांकन करायला स्पेनला निघाली होती. जाण्यापूर्वी तिला हेमिंग्वेचे आशीर्वाद घ्यायचे होते. हा पठ्ठ्या मात्र या देखण्या चाहतीवर प्रथमदर्शनातच लट्टू झाला. तिच्याबरोबर आपणही यादवी युद्धाचं वार्तांकन करायला जावं अशी उबळ त्याला आली. लागलीच ‘अमेरिकन नॉर्थ’ या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून तो स्पेनला रवानाही झाला. स्पेनमधल्या यादवी युद्धाबरोबर त्यांचं प्रेमही फुलत गेलं. ते वर्ष होतं १९३७. पुढे १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या जागतिक कीर्तीच्या ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ या अभिजात कादंबरीची प्रेरणा ही मार्था ठरेल असं तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं. या कादंबरीतील नायिकेचं पात्र हेमिंग्वेनं मार्थाच्या व्यक्तिमत्त्वावर बेतलं. युद्ध आणि प्रेमाचं मनोज्ञ चित्रण करणारी ही कादंबरी आॅक्टोबर १९४० मध्ये प्रकाशित झाली आणि काही महिन्यांतच तिच्या लाखो प्रति हातोहात खपल्या. याच वर्षी त्यानं दुसरी पत्नी पॉलिनशी काडीमोड घेतला आणि मार्थाबरोबर तो तिसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढला. त्याचं हे लग्नही चार-पाच वर्षांवर टिकलं नाही. मात्र ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ नावाचं एक अस्सल साहित्यरत्न जगाला सापडलं ही या प्रेमाची, लग्नाची कमी मोलाची फलनिष्पत्ती नव्हती! शिवाय मार्थाही यथावकाश तोलामोलाची कादंबरीकार आणि अनेक युद्धांचं वार्तांकन करणारी विसाव्या शतकातील आघाडीची युद्धवार्ताहर म्हणून गाजली. तिची ओळख तिनं स्वतंत्रपणे तयार केली. हेमिंग्वेच्या सावलीत आपली वाढ खुरटू दिली नाही. पुढे वयाच्या ८९ व्या वर्षी आजारपणाला कंटाळून तिनं हेमिंग्वेसारखाच आत्मघात करून घेतला.       मानव हा तसा सदासंघर्षशील प्राणी. संघर्षानं संयमाची मर्यादा ओलांडली, की तो हिंसाचारात रूपांतरित होतो. म्हणून मानवजातीचा इतिहास पाहिल्यास तो लढाया, युद्धं, महायुद्धांनी भरलेला दिसतो. पृथ्वीतलावर कोठे ना कोठे सतत लढाया, युद्धं, शीतयुद्धं सुरू असतात. अशा संघर्षाचं नेतृत्व करणारे स्वतःचा ‘अहं’ गोंजारत, महत्त्वाकांक्षेला तेलपाणी घालत सामान्य माणसाला युद्धाच्या खाईत खेचत राहतात, त्याची फरफट करतात हे इतिहासानं पाहिलं आहे, नोंदवलं आहे. तरीही आपण इतिहासापासून काही शिकत नाही. एखादा हुकूमशहा येतो, लोकांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्‍न बाजूला सारून राष्ट्रवादाचे गोडवे गात जनतेला पागल बनवतो, संघर्षासाठी तयार करतो. धर्म, जात, वंश, प्रदेश अशा कशाचीही ढाल करून सामान्य जनतेला युद्धाच्या वणव्यात समीधेसारखं स्वाहा करणारे हे नेते स्वतः मात्र सुरक्षित राहतात, यथेच्छ सत्ता भोगतात, वारेमाप संपत्ती कमावतात, विलासी आयुष्य जगतात याचं भान लोकांना सारं उद्‍ध्वस्त झाल्यानंतरच येतं. म्हणून नंतर कितीही भ्रमनिरास झाला तरी त्यांच्या त्यांच्या काळात हिटलर, मुसोलिनीसारखे हुकूमशहा तिथल्या जनतेला महानायक, उद्धारकर्ते वाटत होते. उशिराचं शहाणपण बऱ्याचदा बिनकामाचं ठरतं ते असं! पाश्‍चात्त तत्त्ववेत्ता जॉर्ज सन्तायना म्हणतो तसं, ‘‘जे इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना तो पुन्हा भोगावा लागू शकतो.’’ त्याची भविष्यवाणी खरी ठरवणारी इतिहासाच्या पुनरावृत्तीची अनेक आवर्तनं जगानं, मानवजातीनं पाहिली आहेत आणि अज्ञानाच्या डोहात तरंगणाऱ्या स्वमग्न जनतेमुळं पुढंही ती होतच राहतील. रक्तरंजित इतिहास केवळ इतिहासाच्या पुस्तकांत बंदिस्त राहत नाही. संवेदनशील साहित्यिकांच्या नजरेतूनही तो जगापुढं येतो. काव्यं, महाकाव्यं, कथा-कादंबऱ्या, चित्रपट, नाटकांच्या माध्यमांतून युद्धांत होणारी मानवतेची होरपळ साहित्यिक, कलावंत दाखवत राहतात. जागतिक वाङमयाचं अक्षर दालन अशा सकस युद्धसाहित्यानं नटलं आहे. युरोप, अमेरिकेतल्या अनेक साहित्यिकांनी युद्धाची दाहकता जवळून अनुभवली. बरेच जण या युद्धांत मानवतेच्या बाजूनं लढलेही. अर्नेस्ट हेमिंग्वे त्यातलाच एक. अनेक लढाया, संघर्षातले त्याचे अनुभव साहित्यरूपानं जगापुढं आले, अजरामर झाले. ‘ए फेअरवेल टू आर्म्स’, ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ ही त्याची काही मोजकी उदाहरणं. स्पेनमधील यादवी युद्धावर आधारलेल्या ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ या कादंबरीची दखल जगातील एक अव्वल युद्धसाहित्य म्हणून घेतली गेली नसती तरच नवल! आपल्या अनोख्या अल्पाक्षरी, प्रासादिक शैलीसाठी हेमिंग्वे ओळखला जातो. या शैलीचा कळसाध्याय त्यानं या कादंबरीत गाठल्याचं जगभरातल्या समीक्षकांनी मान्य केलं.         सन १९३६ ते १९३९ दरम्यान स्पेनमध्ये यादवी युद्ध भडकलं होतं. दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी गटानं बंड पुकारलं. या गटाला स्पेनमधील अनेक प्रतिगामी राजकीय पक्षांचा, चर्चचा पाठिंबा होता. फ्रान्सिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केलं. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरनं आणि इटलीच्या बेनितो मुसोलिनीनं पाठिंबा दिला. तत्कालिन सोव्हिएत युनियननं (रशिया) स्पॅनिश प्रजासत्ताक सरकारच्या आणि त्यासाठी लढणाऱ्या गनिमांच्या बाजूनं लढण्यासाठी सैन्य पाठवलं. जगातील सर्वांत रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या या गृहयुद्धात पाच लाख लोकांचा बळी गेल्याचं मानलं जातं. अखेरीस लोकशाही मार्गानं स्थापन झालेलं सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोनं स्पेनमध्ये हुकूमशाही प्रस्थापित केली. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आपल्या युद्धसाहित्याची चाचणी घेण्यासाठी हिटलर आणि रशियानं या यादवीचा उपयोग करून घेतल्याचं मानलं जातं. सध्या रशियाचं युक्रेनच्या बाबतीत काय सुरू आहे, हे आपण पाहतो आहोतच.   अमेरिकेतील एक तरुण प्राध्यापक रॉबर्ट जॉर्डन या युद्धात कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या गनिमांच्या मदतीसाठी स्पेनमध्ये दाखल झालेला असतो. त्याला सुरुंग पेरण्याचं, उडवण्याचं चांगलं ज्ञान असतं. कम्युनिस्ट नेत्याच्या सूचनेनुसार तो माद्रिदजवळच्या पर्वतराजीतील मोक्याच्या रस्त्यावरील एक पूल उडवण्याची मोहीम आखतो. त्यामुळं शत्रूची रसद रोखली जाणार असते. राष्ट्रवादी सरकारबरोबर लढणारे अनेक गनिम पर्वतराजीत लपून बसलेले असतात. त्यांची मदत घेऊन रॉबर्टला पूल उडवण्याची कामगिरी फत्ते करायची असते. तेथील एका टोळीचा म्होरक्या, पाब्लोला पूल उडवण्याची मोहीम पसंत नसते. तो रॉबर्टला विरोध करतो. पण पाब्लोची प्रेयसी पिलार आणि टोळीतील इतरही सदस्य रॉबर्टच्या पाठीशी उभे राहतात. तेथेच रॉबर्टला आपलं प्रेम, मेरिया भेटते. तिच्यावर राष्ट्रवादी सरकारच्या सैन्यानं पाशवी अत्याचार केलेले असतात. तिच्या माता-पित्याचीही निर्घृण हत्या केलेली असते. त्या मानसिक धक्क्यातून ती अद्याप सावरलेली नसते. पूल उडवल्यानंतर लष्करी कारवाईत आपला मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असलेला रॉबर्ट या अनिश्‍चिततेची जाणीव मेरियाला सतत करून देत असतो. तितकाच तो तिच्यावर मनोभावे प्रेम करतो. साधारण साडेतीन दिवसांचं हे कथानक असलं तरी हेमिंग्वेनं ते दीर्घ कादंबरीच्या रूपात सुरेख फुलवलं आहे. रॉबर्ट आणि मेरिया यांच्यातील प्रेमाची वर्णनं, संवाद त्याकाळी अमेरिकेसह जगभर गाजले. ही कादंबरी पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमावलेल्या, नैराश्यात बुडालेल्या तरुण पिढ्यांची बायबल ठरली. उभयतांतील प्रेमवर्णनं, प्रेमविषयक तत्त्वज्ञान, युद्धानं निर्माण केलेल्या अनिश्‍चिततेच्या झळांमध्येही प्रेमाचा जाणवणारा ओलावा याचं प्रभावी चित्रण हेमिंग्वेनं पानोपानी रंगवलं आहे. ते मूळातून वाचणं अधिक चांगलं. त्यातला हा एक उतारा... डोंगरावरच्या माळावरील झुडपांतून ते जात होते. रॉबर्ट जॉर्डनला आपल्या पायांना घासून जाणारी झुडपं कळत होती. मांडीवर टांगलेल्या पिस्तुलाचं वजन कळत होतं. डोक्यावर उन्हं कळत होती. डोंगरावरून येणारा थंड वारा पाठीला कळत होता. बोटांत बोटं अडकवून घट्ट धरलेला मेरियाचा हात कळत होता. तळहाताला तळहात लागलेला, बोटं गुंफलेली, मनगटं एकमेकांशी लागून बसलेली. त्या तळहातांमधून, त्या बोटांमधून असं काही बाहेर येत होतं, असं आल्हाददायक! शांत समुद्रावरून पाण्याची जराही हालचाल न करता हवेची पहिली तरल लहर यावी तसं. इतकं हळवं! ओठांवरून पीस फिरवावं तसं. किंवा हवेत झुळूकही नसताना पान पडावं तसं. इतकं तरल की ते फक्त बोटांनाच कळावं. तरल असून इतकं भारलेलं! इतकं मस्तीला आलेलं! उन्हं तिच्या सोनेरी केसांत चमकत होती. तिच्या मानेच्या कर्दळीवर पडली होती. ............   तुर्कस्तानसह काही देशांनी या पुस्तकावर सरकारविरोधी साहित्याचा शिक्का मारून बंदी आणली. विशेष म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा उदघोष करणाऱ्या अमेरिकेतही सुरुवातीला या कादंबरीवर निर्बंध आणले गेले. तिथल्या टपाल खात्यानं या पुस्तकाची टपालं स्वीकारू नयेत असं फर्मानच काढलं. प्रतिष्ठेच्या ‘पुलित्झर’ पुरस्कारासाठी ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ला सन १९४१ मध्ये नामांकन मिळालं. निवड समितीनं एकमुखानं या कादंबरीची पुरस्कारासाठी शिफारस केली. मात्र निवड समितीचे प्रमुख निकोलस मरे बटलर यांनी ही कादंबरी आक्षेपार्ह असल्याचं सांगून विरोध नोंदवला. शेवटी त्या वर्षासाठी कादंबरी गटात कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला गेला नाही. (पुढे सन १९५२ मध्ये हेमिंग्वेच्या ‘दि ओल्ड मॅन अँड दि सी’ला ‘पुलित्झर’ मिळालं.) जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक दि. बा. मोकाशी यांनी मराठीत ‘घणघणतो घंटानाद’ या नावानं या कादंबरीचा सरस अनुवाद केला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊसनं अलीकडंच प्रकाशित केली आहे.     या कादंबरीवर सन १९४३ मध्ये हॉलिवूडपट आला आणि तो चांगला गाजलाही. सॅम वूड यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. गॅरी कूपर या निळ्या डोळ्यांच्या तगड्या अभिनेत्यानं रॉबर्टची भूमिका संयतपणानं साकारली आहे. स्वीडनची गुणी अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमननं मेरियाच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत. हा चित्रपट यू-ट्यूबवरही उपलब्ध आहे. चित्रपटाला आॅस्करसाठी तब्बल नऊ नामांकनं मिळाली, त्यांपैकी एक पुरस्कार, पिलारची भूमिका साकारणारी ग्रीक अभिनेत्री कॅटिना पॅक्सिनो हिला मिळाला. याशिवाय दोन दूरचित्रवाणी मालिका, एक संगीतिका, आकाशवाणीवरील एक श्रुतिका अशी आशयाची भरभक्कम रसद या कादंबरीनं मनोरंजन क्षेत्राला पुरवली. सन २०१२ मध्ये ‘हेमिंग्वे अँड गेलहॉर्न’ हा या दोघांची प्रेमकहाणी सांगणारा चित्रपट आला. सौंदर्यवती निकोल कीडमननं मार्थाची भूमिका ताकदीनं वठवली आहे. उन्मत्त, रांगड्या हेमिंग्वेच्या भूमिकेत क्लाईव्ह ओवेन हा दूरचित्रवाणीवरचा कलाकार शोभून दिसतो. हेमिंग्वेची ऐट, त्याचा उन्मत्तपणा अनुभवायचा असेल तर हा चित्रपट जरूर पाहावा. इंग्रजी साहित्य विश्वात हेमिंग्वे नावाची जादू एकविसाव्या शतकातही कायम असल्याचंच हे निदर्शक!         मानवी जीवनात कितीही अनिश्‍चितता असली तरी प्रेम अमर असतं, अपार असतं. हृदयाच्या देठातून ते कुणी खुडून काढू शकत नाही. किंबहुना, जगण्याची ऊर्मी म्हणजे प्रेम, जगण्याची ऊर्जा म्हणजे प्रेम! रॉबर्ट जॉर्डनला मरण समोर दिसत असतानाही त्याचा आणि मेरियाचा सुरू असलेला प्रेमोत्सव हेमिंग्वेनं ताकदीनं चितारला आहे. त्याच्या अक्षर वैभवाची मोहिनी कादंबरीभर पसरली आहे. सामान्य माणूस अनिच्छेनंच युद्धाला सामोरं जातो, ती त्याची निवड नसते. त्याला खरी गरज प्रेमाची, आत्मिक समाधानाची आणि शांतीची असते. तरीही जगाच्या दीर्घ कालपटलावर युद्धखोरांचंच वर्चस्व राहिलं आहे. आपला इतिहास आणि वर्तमानही युद्धांनी बरबटला आहे. मानवी आयुष्य मातिमोल ठरवणाऱ्या; स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना तिलांजली देणाऱ्या संगराला नाकारण्याचं धैर्य मानवजातीनं कधी तरी एक होऊन दाखवायला हवं. ‘फॉर हूम दि बेल टोल्स’ रॉबर्ट आणि मेरियाच्या प्रेमकहाणीतून हाच संदेश देऊ पाहते. तो कधी आणि कसा ग्रहण करायचा यावरच आपलं, येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेऊ तो सुदिन!   ................ (लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.) ................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com