अस्थिर जीवन अन् अनिश्‍चित मानव विकासदर

‘अनिश्‍चित वेळा, अस्थिर जीवन : बदलत्या जगात आमच्या भविष्याला आकार देण्याबाबतच्या उद्दिष्टावर आधारित मानव विकास निर्देशांक अहवालातील नोंदी तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते.
संपादकीय
संपादकीयAgrowon

गत दोन वर्षांपासून जगभरातील अब्जावधी लोकांना अनिश्‍चितता (Uncertanity), असमानता आणि असुरक्षितता या संकटातून मानसिक तणाव, दुःख आणि चिंता या विकृतींना सामोरे जावे लागतेय. या पार्श्‍वभूमीवर ‘अनिश्‍चित वेळा, अस्थिर जीवन : बदलत्या जगात आमच्या भविष्याला आकार देण्याबाबतच्या उद्दिष्टावर आधारित मानव विकास निर्देशांक (Human Development Index) अहवालातील नोंदी तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते.

संपादकीय
Cotton Crop : अतिपावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण

संयुक्त राष्ट्रसंघस्थित युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) या संस्थेने अलीकडे प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांक (HDI) २०२१-२२ नुसार ९० टक्के देशांमधील मानव विकास निर्देशांकाचा दर्जा घसरला आहे. कोरोना पाठोपाठ रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि हवामान बदलाचे संकट यामुळे जागतिक मानव विकासाचा दर गेल्या ३२ वर्षांत प्रथमच ठप्प झाला आहे.

संपादकीय
Soybean Rate : सोयाबीन दरातील चढ-उतार कायम | Agrowon | ॲग्रोवन

अहवालाचे मानदंड

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हिजन, युनेस्को, जागतिक बॅंक यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गोळा केलेल्या विविध माहितींच्या आधारे मानव विकास निर्देशांक मोजला जातो. मानव विकास निर्देशांक मानवी विकासाचा संमिश्र निर्देशांक आहे, की जो दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षण आणि एक सभ्य जीवनमान या तीन मूलभूत परिमाणांमध्ये जन्माच्या वेळचे आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न या चार निकषांवर मोजला जातो. हा निर्देशांक ० ते १ या दरम्यान मोजला जातो. ज्या देशाचा निर्देशांक ० आहे त्या देशात मानव विकास झालेला नाही. तर ज्या देशाचा निर्देशांक १ आहे त्या देशाचा पूर्ण मानव विकास झालेला आहे असे मानले जाते.

संपादकीय
Cotton Crop Damage : ‘आकस्मिक मर’ने कापूस उत्पादक हैराण

जगभर चिंताजनक घसरण

जगभर कोविड पाठोपाठ युक्रेनमधील युद्ध आणि हवामान बदलातून मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक बदलातून सुमारे नव्वद टक्क्यांहून अधिक देशांच्या मानव विकास निर्देशांकात घट दिसून आली आहे. अनेक देश मानवी विकास श्रेणीमध्ये स्थिर आहेत किंवा खाली जात आहेत. फिलिपिन्स आणि व्हेनेझुएलासारख्या उच्च एचडीआय अर्थव्यवस्था मध्यम विकास श्रेणीत घसरल्या आहेत. तर लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियाला जोरदार फटका बसला आहे. तसेच कमी आणि मध्यम मानव विकास निर्देशांक आणि उच्च मानव विकास निर्देशांक देशांपैकी सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त देशांची घसरण झाल्याचे अहवालाचे निरीक्षण आहे. १९१ देशांच्या क्रमवारीत स्वित्झर्लंडने ०.९६२ मूल्यासह पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर नार्वे ०.९६१ मूल्यासह दुसऱ्या, तर आइसलॅंड ०.९५९ मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये चीन ७९ व्या क्रमांकावर, तर भूतान १२७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १६१ व्या क्रमांकावर बांगलादेश १२८ व्या, तर दक्षिण सुदान १९१ व्या क्रमांकावर असल्याचे दिसते.

संपादकीय
Tur cultivation: अर्धरब्बी तूर लागवडीचे तंत्र जाणून घ्या

भारत मध्यम मानव विकासदराचा देश

भारताच्या मानव विकास निर्देशांक स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण दिसून आली आहे. देशाचे मानवी विकासमूल्य २०२० मधील ०.६४५ वरून २०२१-२२ मध्ये ०.६३३ पर्यंत घसरल्याने भारत मध्यम मानवी विकास देशांच्या क्रमवारीत समाविष्ट झाला आहे. देशाचा १९१ देशांमध्ये १३२ वा क्रमांक आहे. भारतातील शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे ११.९ वर्षे, तर सरासरी वर्षे ६.७ वर्षे आहेत. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न पातळी ६,५९० डॉलर (५.२५ लाख रुपये) असल्याचे अहवालातून दिसते. भारताने लैंगिक विकास निर्देशांकात १३२ वे स्थान कायम असले, तरी महिलांचे आयुर्मान २०२० मधील ७१ वर्षांवरून २०२१-२२ मध्ये ६८.८ वर्षांपर्यंत घसरले आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी भारतीयांचे सरासरी आयुर्मान हे ६९.७ वर्षांवरून ते आता ६७.२ पर्यंत घटलेय. भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (एमपीआय) मध्ये ०.१२३ गुण मिळवले असून त्याचे एकूण गुणोत्तर २७.९ टक्के आहे, तर ८.८ टक्के लोकसंख्या गंभीर बहुआयामी दारिद्र्याखाली आहे. गेल्या दशकभरात तब्बल २७१ दशलक्ष लोकांना भारताने बहुआयामी दारिद्र्याबाहेर काढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

असमानता विकासाला मारक भारत जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम राबवून सामाजिक सुरक्षेला चालना देऊन या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असला, तरी देशाचे एचडीआय मूल्य १९९० च्या १.२ टक्क्याच्या वार्षिक सरासरीवरून सुरुवातीच्या पहिल्या दशकात १.६ टक्क्यापर्यंत वाढले होते, ते २०१०-२१ कालावधीत तब्बल ०.९ टक्क्यापर्यंत घसरलेय तथापि, याच कालावधीत भारताच्या शेजारी देशांमध्ये बांगलादेशचे एचडीआय मूल्यांमध्ये १.६४ टक्क्यानी भूतानमध्ये १.२५ टक्क्यानी, चीनमध्ये ०.९७ टक्क्यानी आणि नेपाळमध्ये ०.९४ टक्क्यानी सुधारणा झाली आहे. तसेच पहिल्या दोन दशकांत निम्म्या झालेल्या शालेय शिक्षणाच्या सरासरी वर्षांतील वाढ २०१० पासून किरकोळ सुधारली असली, तरी ती आता साथीच्या आजाराच्या काळात वाढ खुंटली आहे. शालेय शिक्षणाच्या अपेक्षित आणि सरासरी वर्षांमधील घसरण आणि स्थिरता दीर्घकाळात उत्पादकता आणि उत्पन्नाच्या वाढीवर गंभीर परिणाम करणारी आहे. तसेच असमानता हे मुख्य आव्हान देशापुढे असून आर्थिक विकासाला ते मारक ठरते आहे. अलीकडेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ‘युथ इन इंडिया २०२२’ या अहवालातून २०२१-३६ दरम्यान तरुणांचा लोकसंख्येतील वाटा कमी होऊन वृद्धांचा वाटा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. हे विचारात घेता अधिक व्यापक सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन प्रणालीची शाश्‍वतता सुधारून सार्वत्रिक आरोग्य सेवा आणि यासाठी दीर्घकालीन धोरण महत्त्वपूर्ण ठरेल.

अनिश्‍चिततेतून समृद्धीचा मार्ग

१९९० मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्याच मानव विकास अहवालात ‘लोक हीच राष्ट्रांची खरी संपत्ती आहे’ असे घोषित करण्यात आले होते. याच भूमिकेतून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संस्थेने त्याच्या मानव विकास अहवालांना दिशादर्शक मार्गदर्शन केले आहे, मात्र त्याचे संदेश आणि अर्थ कालांतराने अधिक समृद्ध होत गेले आहेत. परंतु अजूनही जगातील बहुतांश देश त्यांच्या एकूण आरोग्यसेवेच्या अंदाजपत्रकांपैकी केवळ दोन टक्क्यांपेक्षा कमी खर्च लोकांच्या मानसिक आरोग्यावर करतात. त्यामुळे जागतिक स्तरावर नागरिकांसाठी मानसिक आरोग्य सेवांचा प्रश्‍न भेडसावतो. गत दोन वर्षांपासून जगभरातील अब्जावधी लोकांना मानसिक तणाव, दुःख आणि चिंता या मानसिक विकृतींना सामोरे जावे लागतेय ही बाब मुळीच दुर्लक्षित करण्याजोगी नाही. या अनुषंगाने संपूर्ण जगाला संयुक्त राष्ट्र निर्देशित शाश्‍वत विकासाचा २०३० चा अजेंडा आणि पॅरिस कराराच्या महत्त्वपूर्ण वाटाघाटीच्या काटेकोर अंमलबजावणीच्या फेरविचाराची गरज अधोरेखित झाली आहे. या बाबी विचारात घेता हा अहवाल आज उद्‍भवलेल्या अनिश्‍चितता, असमानता आणि असुरक्षितता या संकटातून बाहेर पडण्यावर भर देतो. ज्यायोगे अधिक आशादायक भविष्यासाठी लोकांच्या संधी आणि निवडींवर केंद्रित करून अर्थव्यवस्थेच्या समृद्धतेपेक्षा मानवी जीवनाच्या समृद्धीचा भर देऊन लोकांचे भविष्य सुनिश्‍चित करावे लागेल. यासाठी जगाने जागतिक पक्षाघातातून बाहेर पडून आपल्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या सामान्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानवी विकासाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण धोरणे आखण्याबाबत आवश्यक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किंबहुना, हाच अखंड मानवी समृद्धीचा मार्ग आहे असे अहवाल सुचवितो.

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com