आमच्या गावात आम्हीच सरकार

देशात सरकार जी कामं करतं ती सगळी काम लेखा-मेंढा गावात ग्रामसभा करते. सर्वसंमतीने निर्णय घेणं, गाव विकासाची कामं करणं, न्यायदान करणं, यासाठी मंत्रिमंडळाइतकीच मंडळं या गावात आहेत. त्यात स्त्रिया आणि तरुण यांचाही मोठा वाटा आहे.
आमच्या गावात आम्हीच सरकार
Rural DevelopmentAgrowon

इंद्रजित भालेराव

उत्तरार्ध

लेखा-मेंढा या गावात राहणारे सगळे आदिवासी गोंड (Tribal Gond) आहेत. त्यांना माडिया (Madiya), कोया (Koya) असंही म्हटलं जातं. मध्य भारतातल्या या घनदाट जंगलातून ते इकडं आले म्हणून माडिया म्हटलं जातं. कोया म्हणजे माणूस. त्यामुळे देवाजी तोफा (Devaji Tofa) सांगतात, ‘‘आम्ही केवळ माणूस आहोत. कोणत्याही जातीचे नाही. कोणत्याही धर्माचे नाही. आदिवासींची संस्कृती (Tribal Culture) ही मानवतेची संस्कृती आहे. इथला सगळा समाज एकमय असल्याने इथं स्पृश्य-अस्पृश्य, वरची-खालची असल्या वस्त्या नाहीत.’’ या गावात फिरताना आम्हाला कुणीही मोबाईल खेळत आहे असं दिसलं नाही. लहान मुलं मुक्तपणे मैदानात खेळत होती. जसे लहानपणी आम्ही गावाकडे खेळायचो. खरं तर तोफाजींच्या अनेक मुलाखतीचे व्हिडिओ यू-ट्यूबवर आहेत. पण स्वतः देवाजीदेखील साधाच फोन वापरतात.

गावाच्या एकोप्याला भावनिक ओलावा आहे. सुखदुःखात सगळं गाव एकत्र येतं. दुःखिताला पूर्णपणे आधार दिला जातो. कुणाचं लग्न असेल तर गाव सगळ्या गोष्टी पुरवून ते लग्न पार पाडतो. कुणाच्या घरी मृत्यू झाला असेल तर सगळं गाव शोकात बुडतं आणि घरच्या माणसांना आधार देतं. कुणालाही एकटं किंवा परकं वाटणार नाही याची काळजी आदिवासी समाजात परंपरेनेच घेतली जाते. माझं ते सगळ्या गावाचं आणि गावाचं ते माझं, हा समूहभाव या गावात खोलवर रुजलेला दिसला.

गावात सध्या संपूर्ण दारूबंदी आहे. कुणी दारू गाळत नाही, विकत नाही की पीत नाही पण एकेकाळी गाव दारूच्या आहारी गेलेलं होतं. तरी गाव पुढाऱ्यांनी दारूबंदी गावावर लादली नाही. वर्षभर चर्चा, चिकित्सा करून सर्वांना पटल्यानंतरच सर्वसंमतीने गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला. गोंड समाजाचा पारंपरिक असलेला पण बंद पडलेल्या गोटूलचं मेंढा गावानं पुनरुज्जीवन केलं.

गोटूल म्हणजे युवकांचं संस्कार केंद्र. तिथं त्यांना नाच-गाणं, कथा सांगणं, सामूहिक जगणं, समाजाच्या प्रथा, परंपरा, संस्कृती यांचं शिक्षण देणं आणि विवाहासाठी आपण आपल्या जोडीदाराची निवड करणं अशा सगळ्या गोष्टी गोटूलात केल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा नव्या गोटूलाचं बांधकाम सुरू होतं. अर्थात ते संपूर्ण लाकडी असतं. मेंढा गावाकडे पाहून आता गावोगाव गोटूलाचं पुनरुज्जीवन होऊ लागलेलं आहे. गोटूल म्हणजे एका अर्थानं ‘यूथ क्लब’चं असतो.

दिल्ली-मुंबईत आमचे सरकार

आमच्या गावात आम्हीच सरकार

जल जंगल जमीन यावर

गाव समाजाचाच अधिकार

या घोषणेतच मेंढा-लेखा गावाचं सगळं सार आणि रहस्य दडलेलं आहे. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’, ही केवळ घोषणाच नाही तर देशात सरकार जी कामं करतं ती सगळी काम गावात ग्रामसभा करते. सर्वसंमतीने निर्णय घेणं, गाव विकासाची कामं करणं, न्यायदान करणं, यासाठी मंत्रिमंडळाइतकीच मंडळं गावात आहेत. त्यात स्त्रिया आणि तरुण यांचाही मोठा वाटा आहे.

शिवारातही तळी, बांध, सामूहिक विहिरी अशी काम केलेली आहेत. काही कामं श्रमदानातून सामूहिक केली जातात. सरकारी निधी गुत्तेदारामार्फत नव्हे तर गावामार्फत काम करून खर्च केला जातो. त्यामुळे अपेक्षित कामापेक्षा कितीतरी जास्त काम होतं आणि निधीही शिल्लक राहतो.

न्यायदानाचे काम गावच करतो. त्यामुळे गावात आत्तापर्यंत एकही पोलीस केस झालेली नाही. गुन्हा करणाऱ्याला नाममात्र दंड केला जातो. तोच गुन्हा पुन्हा झाला तर दुप्पटीने, तिसऱ्या वेळी झाला तर तिप्पटीने दंड आकारला जातो. गुन्हा करणाऱ्याला अपराधी वाटेल असं वागवलं जात नाही. ग्रामसभेत प्रत्येक कुटुंबाची उपस्थिती आवश्यक असते. प्रत्येक निर्णयाची भरपूर चिकित्सा करूनच सर्वसंमतीनं निर्णय घेतला जातो. सगळी घरं सारखीच दिसतात. कुणाचंही घर भव्यदिव्य असं दिसलं नाही. सगळी घरं बांबू, लाकडापासून बनवलेली दिसली. एका अर्थानं गाव पूर्ण समतावादी विचारच इथं राबवताना दिसले.

या गावची शाळा चौथीपर्यंतच आहे. तालुक्याचं गाव अगदी जवळ आहे. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना तिथं जाता येतं. पण फार मुलं पुढच्या शिक्षणासाठी जात नाहीत. तरी इथं मुलं बेकार फिरत नाहीत. त्यांच्या हाताला काम आहेच. तरीही पुढच्या शिक्षणाचे प्रमाण वाढायला हवे. मधल्या काळात एक गोंड आदिवासी गुरुजी दहा-बारा वर्षांसाठी या गावात बदलीवर येऊन गेले. त्यांनी इथलं शैक्षणिक वातावरण छान घडवलं. त्यांच्यामुळे इथल्या मुलांमध्ये खेळाची संस्कृती रुजली. इथली मुलं शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीवर चमकली. त्यांनी बक्षिसंही मिळवली.

हे गाव उगाचच राजकारणाची चर्चा करत बसत नाही. त्यामुळं गावात फळ्या नाहीत. म्हणूनच गावाचा एकोपा टिकून आहे. पण याचा अर्थ इथल्या लोकांना राजकारण कळत नाही, असा नाही. उलट त्या संदर्भातली त्यांची जाण सखोल आहे. आपण मुंबई आणि दिल्लीचं राजकारण चालवायला निवडलेले प्रतिनिधी नीट वागत नसतील तर अहिंसक मार्गानं त्यांना कसं वाटेवर आणायचं ते या गावाला नीट माहीत आहे. गावाच्या भल्यासाठी असलेल्या सगळ्या योजना पदरात पाडून घेण्याची अक्कल गावाला नक्कीच आहे. त्यासाठी न चिडता, न भांडता, चिकाटीनं, कायद्यानं, संयमानं, रीतसर संघर्ष करण्याची त्यांची तयारी असते.

कुठंच न दिसणारं महात्मा गांधींचं ग्राम स्वराज्याचं स्वप्न मला इथं साकारताना दिसतं. ‘गावाकडं चला’ अशी गांधींनी हाक दिली होती. त्यासाठी ग्राम स्वराज्याचा आणि स्वयंपूर्ण गावाचा मंत्रही दिला होता. पण देश गांधींना आणि त्यांच्या स्वप्नांना विसरून गेला. मेंढा-लेखा हे गाव मात्र गांधींच्या मार्गानं जाताना दिसतं. गोंड आदिवासींच्या परंपरा या मुळात निसर्ग पर्यावरण संवादीच होत्या. त्यामुळं त्या गांधी विचारांशी मिळत्या-जुळत्याच होत्या. सुदैवानं मोहन हिराबाई हिरालाल गांधींचा ग्राम स्वराज्याचा विचार घेऊन या गावात आले आणि परंपरा आणि नवतेचा छान संगम घडून आला. गावांचा विकास कुठल्या दिशेनं व्हावा याचं लेखा-मेंढा हे एक आदर्श उदाहरण आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com