
State Government : महाराष्ट्र शासनाने तीन वर्षे कालावधीचा ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’ हा अभ्यासक्रम नुकताच सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाच सत्र अधिक एक प्रशिक्षण सत्र असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे.
प्रतिवर्षी ६० विद्यार्थी एवढ्या प्रवेश क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. या पदविकेसाठी इयत्ता बारावी (शास्त्र) अर्हता निश्चित केली आहे. सोबत सुविधा असलेल्या व सुरू करण्याची इच्छा असलेल्या संस्था चालकांना परवानगी देण्यासह अभ्यासक्रम निश्चित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
इतर निर्णयात हा डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम इंग्रजीत राहणार, सुविधा-मनुष्यबळ-प्रयोगशाळा याचे धोरण माफसू ठरवणार, त्यासाठी पशुसंवर्धन विभागातील सहआयुक्त दर्जाचा अधिकारी समाविष्ट सदस्य समिती व पायाभूत सुविधा उपलब्धता पडताळणी, परीक्षा- निकाल-गुणपत्रक हे सर्व स्वतंत्र परीक्षा मंडळ स्थापन करून विद्यापीठ स्तरावर ठरवण्यात येणार आहे.
देश, राज्य पातळीवर पशुसंवर्धन या विषयाला आलेले महत्त्व त्याचा एकूण जीडीपीतील वाढत असलेला टक्का आणि पौष्टिक अन्न पुरवठ्यातील सहभाग जर पाहिला तर येणाऱ्या काळात तज्ञ आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील दहावी पास ‘पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन’ या पदविका प्राप्त सेवादात्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. दुसरे असे की आज पशुसंवर्धन विभागातील प्राणिजन्य उत्पादनाचा एकूण निर्यातीतील वाटा हा नगण्य आहे.
या निर्णयामुळे पुढील काळात मनुष्यबळ उपलब्ध होईल पण पूर्वीप्रमाणे सरसकट ही मंडळी खेड्यातून उपचार करत बसली तर ‘आगीतून फुफाट्यात’ अशी परिस्थिती निर्माण होईल.
त्यासाठी नवीन पदविकाधारक मंडळी ही लसीकरण, डाटा एन्ट्री, पशुप्रथमोपचार, शस्त्रक्रिया मदतनीस, चारा-वैरण उत्पादन, पशुखाद्य व त्याचा दर्जा अशा विषयाशी निगडित कामकाजाशी संलग्न ठेवल्यास त्यांचा वापर योग्य राहील आणि फायदेशीर ठरेल.
त्याला आनुषंगिक अभ्यासक्रम असेल तर आज राजरोसपणे उपचार शस्त्रक्रिया करून ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याला आळा बसेल. प्रतिजैविकाच्या अनिर्बंध वापरामुळे वाढत चाललेल्या प्रतिजैविकांची प्रतिरोधकता ही मोठी समस्या बनत चालली आहे, त्यालाही आळा बसू शकेल.
या अभ्यासक्रमात दैनंदिन पशुव्यवस्थापन व सलग्न विषय असतील तर त्यांच्याकडून पूरक कामकाज होऊ शकेल. १९८४ च्या कायद्याप्रमाणे सर्व संस्थाप्रमुख हे पदवीधर नेमून या मंडळींना जर मदतीसाठी उपलब्ध केले तर पशुवैद्यकीय सेवा सुधारेल.
जाता जाता या मंडळींनी ‘डॉ.’ उपाधी न लावता अभ्यासक्रमाचे नाव पूर्वीप्रमाणेच ‘पशुधन व्यवस्थापन व दुग्ध व्यवसाय’ किंवा इंग्रजीमध्ये ‘डिप्लोमा इन ऍनिमल हजबंडरी’ असे ठेवून गुजरात राज्याप्रमाणे पशुवैद्यक शास्त्रातील सर्व तांत्रिक विषयांची फक्त तोंडओळख करून, परवानगी दिलेल्या सर्व संस्थांचे जर ‘नॅक’ (National Assessment and Accreditation Council) च्या धर्तीवर मूल्यमापन करत गेले तर चांगले मनुष्यबळ पशुसंवर्धन क्षेत्रात उपलब्ध होईल व सुरळीत कामकाज चालेल.
त्यासाठी आता हे धनुष्य ‘’माफसू’’ कसे पेलते हे पाहावे लागेल. किंबहुना त्यांना या सर्व गोष्टीचा सर्वंकष विचार करून पूर्वीच्या १०१ इतक्या संख्येने सुरू केलेल्या आणि आता बंद केलेल्या दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांचा अनुभव विचारात घ्यावा लागेल, अन्यथा पशुपालकांचे मोठं नुकसान होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.