Sugar Industry : उद्योग समृद्ध उत्पादकांचे काय?

ऊस कारखानदारी ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत असली तरी ऊस उत्पादकांच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही.
Sugar Industry
Sugar IndustryAgrowon

यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशात साखर हंगाम (Sugar season) सुरू झाला असला तरी महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये लांबलेल्या पावसाने १५ दिवस हंगाम लांबला. गेले वर्ष (२०२१-२२) हे भारतीय साखर उद्योगासाठी (Indian Sugar Industry) समृद्ध ठरले, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षात ऊस गाळप (Sugarcane Crushing), साखर उत्पादन, निर्यात, इथेनॉल उत्पादन (Ethanol production) अशा सर्वच क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित झाले. गेल्या हंगामात ३९४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्यांपैकी ६० लाख टन साखर इथेनॉलसाठी (Ethanol) वापरण्यात आली.

अर्थात निव्वळ साखर उत्पादन झाले ३३४ लाख टन! गेल्या हंगामात भारताने ११० लाख टन अशी विक्रमी साखर निर्यात केली. यावर्षीचा गळीत हंगाम सध्या मध्यावर येऊन ठेपला आहे.

यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा उसाचे उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे वर्ष २०२२-२३ या गळीत हंगामात आधी ३५७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत प्रतिहेक्टर पाच ते सात टनांचे घटते उत्पादन पाहता ३४३ लाख टन साखर उत्पादित होईल तर ४५ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाईल, असा सुधारीत अंदाज आहे.

१५ जानेवारी २०२३ पर्यंत देश पातळीवर ५१५ साखर कारखान्यांनी जवळपास १६० लाख टन साखरेचे उत्पादन केले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडे अधिक आहे.

गेल्यावर्षी १५ जानेवारीपर्यंत ५०४ साखर कारखान्यांनी १५० लाख टन साखर उत्पादन केले होते. देशाच्या ऊस गळीत हंगामात महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे.

१५ जानेवारी अखेर महाराष्ट्राने ६० लाख टन साखरेचे उत्पादन केले असून प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशच्या साखर उत्पादनापेक्षा हे उत्पादन २० लाख टन अधिक आहे.

ऊस आणि साखर उत्पादनातही आघाडीवरच्या महाराष्ट्र राज्यात उसाची सरासरी उत्पादकता खूपच कमी आहे. ऊस कारखानदारी ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत असली तरी ऊस उत्पादकांच्या आर्थिक परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही.

राज्यात काही शेतकरी एकरी १०० टनांच्या वर ऊस उत्पादन घेत असले तरी राज्याची सरासरी उत्पादकता ३५ टनांच्या आसपासच आहे. अर्थात ऊस उत्पादकांनी शुद्ध बेण्याच्या निवडीपासून ते काढणीपर्यंत प्रगत लागवड तंत्राचा अवलंब करून उत्पादकता वाढवायला हवी.

कारखान्यांनी वेळेत ऊस तोड होईल, ही खबरदारी घेतली पाहिजे. मागील वर्षी तोडणी लांबल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात वाळून नुकसान झाले.

Sugar Industry
Sugar Export : अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी नाही?

तोडणी झाली तरी वजन, उताऱ्यात घट येऊनही त्याचा फटका उत्पादकांनाच बसला. मजुरांकडून ऊस तोडणीसाठी यावर्षी देखील अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर्षी यंत्राने ऊस तोडणीचे नियोजन करून राज्यातील संपूर्ण ऊस वेळेत तुटेल, ही काळजी घ्यायला हवी.

९०० ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासन मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली असताना त्याचा पाठपुरावाही वेळेत करायला हवा.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगाला दिलेल्या सूचनांनुसार कारखान्यांनी साखरेबरोबर इथेनॉल आणि इतरही उपउत्पादनांचे उत्पादन वाढीसाठी तांत्रिक कार्यक्षमता वाढवायला हवी.

अनेक कारखाने एफआरपीचे पैसे उत्पादकांना वेळेत देत नाहीत. उत्पादकांना उसाचे पैसे वेळेत मिळतील याचेही नियोजन झाले पाहिजेत. यावर्षी कमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त साखरेच्या निर्यातीबाबत केंद्र सरकार हात आखडता घेत आहे.

यंदाच्या हंगामात केंद्र सरकारने ५४९ साखर कारखान्यांना ६१.५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. केंद्र सरकार अजून ४० लाख टनांपर्यंत साखर निर्यातीला परवानगी देईल, अशी उद्योगाची अपेक्षा होती.

त्यामुळे केंद्र सरकारने साखर उत्पादनाबाबत येत असलेल्या उलटसुलट अंदाजांवर विश्वास न ठेवता वास्तविक विश्लेषण करून अतिरिक्त साखर निर्यातीचा निर्णय घ्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com