इचार काय हाय तुमचा...

विचार करण्याची प्रक्रिया कधीच शुद्ध नसते, तिच्यात अनेक उणीवा, त्रुटी असतात. आपल्या श्रद्धांचं, धारणांचं समर्थन करण्यासाठी आपण पुरावे शोधत राहतो, न की पुराव्यांवर आधारित आपल्या धारणा तयार होतात! त्यातून वैचारिक गफलती होतात आणि त्याचे फटके आपल्याला सोसावे लागतात.
इचार  काय हाय तुमचा...
Book ReviewAgrowon

मला भावलेलं पुस्तक
----------
‘एखादं मूर्खपणाचं विधान पाच कोटी लोकांनी केलेलं असलं तरीही ते मूर्खपणाचंच असतं.’
- डब्ल्यू. सॉमरसेट मॉम, प्रसिद्ध साहित्यिक

या जगात टाळता न येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यात ‘विचारा’चा समावेश आहे. ही एक अशी गोष्ट आहे की जी सकाळी उठल्यापासून रात्री बिछान्यात अंग टाकेपर्यंत आपला पिच्छा सोडत नाही. काही वेळा तर ती झोपेचंही पार खोबरं करते. वैचारिक आंदोलनं आपलं मन सतत अस्थिर करतात. ती पेलायची क्षमता नसेल तर परिस्थिती गंभीर बनते. अस्ताव्यस्त विचारांमागं मन चंचलतेनं धावत असतं. म्हणूनच आपल्या बहिणाबाई चौधरी म्हणतात,

मन वढाय वढाय
उभ्या पिकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर

वैचारिक क्षमता येते विवेकातून. त्यासाठी हवं भवतालाचं सम्यक आकलन. माणूस विचारांनीच घडतो आणि (चुकीच्या) विचारांमुळं बिघडूही शकतो. विचारांचं सामर्थ्य आपल्याला राजा बनवू शकतं आणि त्याचा अभाव आपल्याला निष्क्रिय किंवा अपयशी ठरवू शकतो. तर मग विचार कसा केला पाहिजे, कसा करणं चुकीचं आहे हे सांगणारं उत्तम पुस्तक उपलब्ध आहे. विख्यात जर्मन लेखक रॉल्फ डोबेली यांचं ‘The Art Of Thinking Clearly’ हे पुस्तक या विषयावर खूपच उपयुक्त आणि मोलाची माहिती देतं. वीस लाखांवर प्रती खपलेलं हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. मराठीत मधुश्री प्रकाशनानं ते प्रकाशित केलं आहे. डोबेली यांनी या पुस्तकात दाखवून दिलेल्या वैचारिक उणिवा गांभीर्यानं समजून घेतल्या तर आपली विचारप्रणाली अधिक निर्दोष होऊ शकते.

विशेष म्हणजे डोबेली यांनी दिलेलं हे आध्यात्मिक प्रवचन नाही. ते प्रत्येक मुद्दा शास्त्रीय कसोटीवर पारखून घेतात. मानवी वर्तनाचा दुवा मानववंशशास्त्राशी जोडून अनेक जगप्रसिद्ध उदाहरणं देत ते ताकदीनं विषयाची मांडणी करतात. त्यामुळं तिला मजबूत वैचारिक अधिष्ठान लाभलं आहे. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलं असल्याचं लक्षात येतं. शिवाय यातली बरीच उदाहरणं आपण कुठे तरी पाहिलेली, वाचलेली असल्यानं आपण लेखकाच्या मांडणीशी जोडले जातो, समरस होतो. डोबेली यांनी या विषयाचा ठोकळेबाज अभ्यास केलेला नाही, तर माणूस करीत असलेल्या प्रत्येक वैचारिक चुकीची नेमकी व्याख्या आणि तिचं रोचक नामकरण केलेलं आहे. त्यामुळं या पुस्तकाचा शास्त्रीय पाया अगदी पक्का झाला आहे. आपण नेहमी करणाऱ्या ९९ गफलतींविषयी त्यांनी विस्तारानं आणि सोदाहरण भाष्य केलं आहे आणि ते आपल्याला पटणारं आहे. उदाहरणार्थ, चौथ्या प्रकरणात त्यांनी सामाजिक पुरावा (Social Proof) या विषयावर केलेली ही मांडणी पाहा...

तुम्ही एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी निघाला आहात. वाटेत एका चौकात आकाशाकडं टक लावून उभा असलेला लोकांचा घोळका दिसतो. जराही विचार न करता, तुम्ही पटकन वर दृष्टिक्षेप टाकता. का? ‘सामाजिक पुरावा’. संगीताच्या मैफिलीत एखादा कलाकार आपलं कसब दाखवत असा काही सूर लावतो, की कोणीतरी टाळ्या वाजवू लागतं आणि अचानक सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होतो. तुम्हीसुद्धा त्यात सामील होता. का बरं ? ‘सामाजिक पुरावा’. ‘सामाजिक पुराव्या’ला सर्वसाधारणपणे ‘कळपाची मनोवृत्ती’ असंही म्हटलं जातं. त्याच्या प्रभावामुळं लोकांची धारणा होते, की आपण इतरांसारखं वागलो तरच आपलं वर्तन बरोबर असेल. थोडक्यात, जितके जास्त लोक एखादी कल्पना उचलून धरतील, तितकीच ती कल्पना अधिक चांगली व खरी वाटू लागते. जितके जास्त लोक एखादं वर्तन अंगीकारतील, तितकंच ते इतरांना जास्त योग्य वाटू लागतं. हे खरंच हास्यास्पद आहे. शेअर बाजारातील आभासी बुडबुडे व भयानकतेच्या मागे हेच ‘सामाजिक पुराव्या’चं दुष्टचक्र आहे. फॅशन, मॅनेजमेंटची तंत्रं, छंद, धर्म, खाण्यापिण्याची पथ्ये या सगळ्यांत तुम्हाला तेच दिसेल. टी.व्ही.वरील विनोदी आणि चर्चात्मक कार्यक्रमात हे तंत्र वापरतात. मोक्याच्या जागी ते पूर्वध्वनिमुद्रित हास्याचे आवाज पेरतात, ज्यामुळं प्रेक्षकही हसू लागतात.

आपण असं का वागतो? प्राचीनकाळी, जीवित राहण्यासाठी इतरांचं अनुकरण करणं हा नामी उपाय होता. समजा, पन्नास हजार वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या शिकारी दोस्तांसोबत सेरेन्गेटीच्या जंगलात फिरत असताना, अचानक ते सर्व धूम पळून गेले तर तुम्ही काय केलं असतं? डोकं खाजवत तिथंच ठाम उभे राहिला असता काय? ‘हे नक्की काय दिसत आहे? सिंह की सिंहासारखा कोणी प्राणी - कदाचित निरुपद्रवी. नक्कीच नाही! तुम्हीही मित्रांच्या मागोमाग पळ काढला असता. नंतर सुरक्षिततेची खात्री पटल्यावर तुम्ही विचार केला असता, की ‘नेमकं काय झालं होतं?’ अर्थातच काही जण नक्कीच वेगळे वागले असणार. त्यांची जनुकं खात्रीनं वेगळी असणार. आपण मात्र ‘अनुकरण’ करणाऱ्यांचे वंशज आहोत. या प्रकारच्या वर्तनाची मुळं आपल्यात इतकी खोलवर रुजली आहेत, की तग धरून राहण्यासाठी त्याचा या जमान्यात फायदा नसला तरीही आपण तसंच वागतो.

‘जगावं की मरावं, हा खरा प्रश्‍न आहे,’ हे शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’चं स्वगत साहित्यात मानाचं पान पटकावून आहे. असे गंभीर किंवा साधेसुधेही प्रश्‍न प्रत्येकाला पडत असतात. त्यांची उत्तरं सोपी नसतात. हे उत्तर बरोबर की ते, असं करावं की तसं केलेलं बरं, असे प्रश्‍न समोर उभे ठाकतात. ते आयुष्याचा कीस पाडतात. आपल्याला छळ छळ छळतात. त्यामुळं भेदरलेली अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आढळतात. त्यात आपले मित्र, नातेवाईकही असतात. शिक्षणापासून करिअरपर्यंत आणि व्यक्तिगत जीवनापासून ते सामाजिक व्यवहारांपर्यंत सतत चुकीचे निर्णय घेऊन उद्‍ध्वस्त झालेल्या लोकांचीही कमतरता नसते आपल्या भवतालात! आपण बऱ्याचदा त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्नही केलेला असतो, पण यांची गाडी कायम रुळावरून घसरलेलीच राहते. शिवाय यातले बरेच जण परिस्थितीला दोष देऊन वर स्वतःला ग्रेटही समजत असतात. यांनी केलेली घाण साफ करणं हे आपलं कामच आहे, असंही यांना खात्रीनं वाटायला लागतं. त्यामुळं ते सतत आपल्याला लटकून राहतात आणि त्यांच्याबरोबर आपल्यालाही खाईत खेचत राहतात. अशांपासून अंमळ दोन हात दूर राहिलेलंच बरं!

स्पष्ट विचारशक्तीचा अभाव ही तर सार्वत्रिक समस्या आहे. आपल्या मर्यादित आणि चुकीच्या आकलनातून होणाऱ्या हानीपासून कोणीही वाचू शकलेलं नाही. चुकीच्या गृहीतकांवर विसंबून बेसावधपणे विचार करण्याच्या सवयीमुळं दिशाभूल करणारे निष्कर्ष निघतात आणि त्या आधारे घेतले जाणारे निर्णय आपल्याला खड्ड्यात घालतात. निर्णय चुकण्याची भीती असल्यानं अनेक महाभाग निर्णय घ्यायचंच टाळतात. निर्णय न घेणे हादेखील कळत- नकळत घेतलेला एक निर्णयच असतो. अर्थात, तो व्यक्तीची अकार्यक्षमता दाखवून देतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक जण निर्णयाच्या प्रक्रियेला वळसा घालून शांतचित्त राहणारे आत्मे आढळतील. निर्णय न घेण्यास सोकावलेली अशी अनेक माणसं अधिकारपदावरही असतात. त्याचा आपल्याला त्रासही होतो. बऱ्याचदा जबाबदार व्यक्तीनं निर्णय नाही घेतला तर दुसऱ्या कोणाला तरी तो घ्यावा लागतो. तो योग्य ठरला तर ठीक, अन्यथा ज्याने तो घेतला त्याची शंभरी भरलीच म्हणून समजा! पुढारपण सगळ्यांनाच हवं असतं, मात्र त्याबरोबर येणारी जबाबदारी कोणाला नको असते, ही एक वेगळीच समस्याच आहे.

डोबेली यांनी दिलेली आणखी काही वैचारिक चुकांची, चुकीच्या मानवी प्रवृत्तींची उदाहरण पाहणं रोचक ठरेल...
------------
‘कृतीची प्रवृत्ती’
(Action Bias)

फुटबॉलमधील पेनल्टी कॉर्नरच्या वेळी खेळाडूनं किक मारल्यावर गोलकडं पोहोचायला चेंडूला ०.३ सेकंद लागतात. चेंडूचं मार्गक्रमण कसं होतंय ते जोखायला गोलकिपरसाठी हा वेळ पुरेसा नाही. बॉलला किक मारण्याआधीच त्याला हा निर्णय घ्यावा लागतो. पेनल्टी कीक मारणारे फुटबॉलचे खेळाडू चेंडू १/३ वेळा गोलच्या मध्यभागी, १/३ वेळा डाव्या व १/३ वेळा उजव्या कडेशी मारतात. गोलरक्षकांनी हे नक्कीच ताडले असेल, पण ते काय करतात? ते डावी किंवा उजवीकडे झेप घेतात. अदमासे १/३ वेळा बॉल मध्यभागी येऊन थडकत असला तरी ते तिथेच ठिय्या धरून उभे राहात नाहीत. मग त्या पेनल्टीचा धोका ते का पत्कारतात? साधे सोपे उत्तर - देखावा. एकाच जागी ठोंब्यासारखे उभे राहून बॉल बाजूने सुर्रऽऽकन जाताना पाहत राहण्यापेक्षा चुकीच्या बाजूला झेप घेणे जास्त रुबाबदार, आकर्षक आणि कमी लाजिरवाणे दिसते. हा ‘कृतीच्या प्रवृत्तीचा’ परिणाम. काहीही निष्पन्न झाले नाही तरी चालेल, पण काहीतरी करतोय असे भासवा.

‘आत्मगंडाचा प्रभाव’
(Endowment Effect)
वापरलेल्या गाड्या विकणाऱ्या दुकानाच्या आवारात बी. एम. डब्ल्यू. दिमाखात चमकत होती. काही मैल तिच्या ओडोमीटरवर असूनही चांगल्या अवस्थेत दिसत होती. मला वापरलेल्या गाड्यांविषयी थोडीफार माहिती आहे. तिची रास्त किंमत ४०,००० डॉलर्स असावी असं मला वाटत होतं. तो विक्रेता ५०,००० डॉलर्ससाठी खूप आग्रह करत होता. तो तसूभरही किंमत कमी करेना. एका आठवड्याने जेव्हा त्यानं फोन करून ४०,००० डॉलर्सला राजी झाल्याचं सांगितलं तेव्हा मी लगेच व्यवहार करून मोकळा झालो. दुसऱ्या दिवशी एक फेरी मारायला गाडी काढली आणि गॅस भरायला पंपावर गेलो. पंपाचा मालक गाडी पाहून बाहेर आला व वाखाणणी करीत मला लगेच ५३,००० डॉलर्स रोख देऊन गाडी विकत घेण्याच्या गोष्टी करू लागला. मी नम्रपणे नकार दिला. घरच्या वाटेवर लागल्यावर मी किती बावळटपणा केला ते मला समजले. जे माझ्या दृष्टीने ४०,००० डॉलर्सच्या योग्यतेचे होते, ते माझ्या मालकीचे झाले होते. जर मी तर्कशुद्ध सारासार विचार केला असता तर मी ती गाडी लगेच विकली असती. पण अरेरे! मी ‘आत्मगंडाच्या प्रभाव’च्या कचाट्यात सापडलो होतो. एखादी वस्तू ‘आपली’ झाली, की आपण तिला जास्त मूल्यवान मानू लागतो. थोडक्यात, आपण काही विकत असलो, की आपण त्याची किंमत वाढवून सांगतो, पण विकत घ्यायचे झाले तर आपण तेवढी किंमत द्यायला तयार नसतो.

कारणे देऊन समर्थन
(‘Because’ Justification)
तुम्ही जेव्हा तुमच्या वागण्यामागचं कारण देता तेव्हा तुम्हाला जास्त सहकार्य, मदत व सहनशीलता अनुभवायला मिळते. तुमची सबब चांगली आहे की नाही यावर फारसं काही अवलंबून नसतं. फक्त ‘कारण’ असं म्हणणं पुरेसं असतं. जे. एफ. के. विमानतळ, गेट ए ५७, विमानात जाण्यासाठी थांबलो आहे. घोषणा ऐकू येते, ‘फ्लाइट १२३४ साठी थांबलेल्या प्रवाशांनी इकडं लक्ष द्यावं. फ्लाइटला तीन तास उशीर होणार आहे.’ व्वा! मी काय कारण आहे हे विचारण्यासाठी त्यांच्या टेबलाकडं गेलो; पण काही ठोस उत्तर न मिळाल्यानं माझा संताप झाला. काही माहिती न देता उगीच मला थांबवून ठेवण्याची हिंमत कशी करू शकतात ते? दुसरी कंपनी पाहा किती व्यवस्थितपणे सांगतेय; “काही तांत्रिक कारणांमुळं फ्लाइट ५६७८ ला तीन तास उशीर होत आहे.’’ हे कारण खरे म्हणजे अतिशय तकलादू आहे, पण प्रवाशांना शांत करायला तेवढं पुरेसं होतं. ‘कारण’ या शब्दाला लोक फार सोकावले आहेत. असं दिसतं, की गरज नसली तरी आपण तो शब्द वापरतो.

लोकहो, विचारांपासून सुटका नाही. तो सतत करावाच लागणार आहे. तो कसा चुकीचा केला जातो हे समजून घेतलं, तर बरोबर कसा करायचा याचं आकलन होऊ शकतं. त्यासाठी काही पूर्वअटी आहेत. भावनांच्या भरात वाहवून न जाता निर्णय घेता आले पाहिजेत. आपल्या विचारांना रास्त पुराव्यांचं, आकडेवारीचं कोंदण असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत सकारात्मक राहता आलं पाहिजे. आयुष्यात भल्या-बुऱ्या गोष्टी होत राहतात. वाईट काळ आला तरी हिंमत न हरता राखेतून उभं राहण्याची जिद्द बाळगली पाहिजे. अण्णा भाऊ साठेंच्या ‘फकिरा’ या गाजलेल्या कादंबरीतील विष्णूपंत मागासवर्गीय समाजातील गांजलेल्या आणि संकटात सापडेल्या नायकाला, फकिराला आणि त्याच्या साथीदारांना म्हणतात, ‘हिंमत हरू नका. दिवस घर बांधून राहात नाहीत. हेही दिवस जातील. उकिरड्याचेही पांग फिटतात, तुम्ही तर माणसं आहात!’ हा आशावाद खूप मोलाचा आहे, असं मला वाटतं. तुमचा काय विचार आहे

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com