तिला समजून घेताना...

काही पुस्तकं आपल्याला चकित करतात. प्रत्येक वाक्य, परिच्छेद, पानं आपल्याला भरभरून नवं नवं असं काही सांगत राहतात आणि आपण थक्क होतो. स्त्री मुक्तीचं ‘बायबल’ समजलं जाणारं सिमोन द बोव्हुआर हिचं ‘द सेकंड सेक्स’ त्याच जातकुळीतलं. मूलभूत, अस्सल असं काही वाचायला मिळाल्यानं आपण हरखून जातो.
The Second Sex Book
The Second Sex BookAgrowon

‘स्त्री जन्म घेत नाही, तर ती घडवली जाते.’

- सिमोन द बोव्हुआर, प्रख्यात फ्रेंच साहित्यिक

...........

युरोप म्हणजे बुद्धिमत्ता आणि प्रज्ञेची खाणच जणू! जगाचं अक्षर दालन समृद्ध करणारे तगडे साहित्यिक, मानवी जीवन सुकर करणारे वैज्ञानिक, विचारांचा अवकाश भारून टाकणारे विचारवंत, अवघ्या मानवजातीचं भावविश्‍व उन्नत करणारे चित्रकार, शिल्पकार अशा मातब्बरांनी गजबजलेली ही भूमी. जगाला दिशा देण्याचं काम या खंडातील चिमुकल्या देशांतील प्रज्ञावंतांनी केलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीचं देन तर राजकीय इतिहासातील मैलाचा दगडच. विल्यम शेक्सपिअर, चार्ल्स डिकन्स, जॉर्ज बर्नार्ड शॉ, फ्रँझ काफ्का, आल्बेर काम्यू, ज्याँ पॉल सार्त्र आदी दिग्गजांनी इथल्या साहित्यिक वैभवाचं नेतृत्व केलं. त्यांनी जे लिहिलं ते अस्सल होतं, जगाला नवं भान देणारं होतं. त्यांच्या लिखाणाचे भले-बुरे पडसाद जगभर उमटले. प्रसंगी युद्धखोर, जुलमी सरकारांना गुडघ्यावर आणण्याचं काम या बोरूबहाद्दूरांनी केलं; त्याचबरोबर स्वतःच्याच मस्तीत चालणाऱ्या समाजपुरुषाची पाळंमुळं गदगदा हलवण्याचं सामर्थ्यही त्यांनी दाखवलं. अनेक छोट्या-मोठ्या युद्धांनी आणि अवघा युरोप बेचिराख करून टाकणाऱ्या दोन महायुद्धांनी मानवजातीच्या अस्तित्वालाच दिलेलं आव्हान, त्यातून निर्माण झालेली अस्थिरता इथल्या कलावंतांच्या प्रेरणेचा अक्षय स्रोत ठरली.

सिमोन द बोव्हुआर ही विदुषी युरोपातील प्रज्ञावंतांच्या नामावलीत आघाडीचं स्थान राखून आहे. ललित साहित्यात तिचं कर्तृत्व मोठं, पण ती जगभर गाजली ते ‘द सेकंड सेक्स’ या स्त्रीवादाची समग्र नवी मांडणी करणाऱ्या वैचारिक ग्रंथामुळं! स्त्री मुक्ती म्हणजे काही तरी थोतांड आहे, असा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत बहुतेकांचा समज. त्याला सप्रमाण खोडण्याचं काम सिमोननं स्त्री मुक्तीचं ‘बायबल’ मानल्या गेलेल्या या ग्रंथाच्या माध्यमातून केलं. बहुतांश पुस्तकांत आपल्याला जे ठाऊक आहे तेच कमी-अधिक प्रमाणात वाचायला मिळतं. आपण जेव्हा पट्टीचे वाचक बनतो तेव्हा एखाद्या कथानकात पुढे काय होऊ घातलंय याचा अंदाज बांधता येतो, वाक्याच्या सुरुवातीवरूनच त्याच्या शेवटाचा अदमास येतो. काही पुस्तकं मात्र आपल्याला चकित करतात. प्रत्येक वाक्य, परिच्छेद, पानं आपल्याला भरभरून नवं नवं सांगत राहतात आणि आपण थक्क होतो. सिमोनचं ‘द सेकंड सेक्स’ त्याच जातकुळीतलं. मूलभूत, अस्सल असं काही वाचायला मिळाल्यानं आपण हरखून जातो. लेखिकेचा व्यासंग, प्रत्येक मुद्दा स्पष्ट करण्यासाठी केलेलं सप्रमाण विश्‍लेषण, तिच्या वाचनाची, अभ्यासाची व्याप्ती आपल्याला पदोपदी जाणवत राहते. स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ करणारं हे पुस्तक आहे आणि ते लिहून सिमोननं मानवजातीवर मोठेच उपकार केले आहेत. पुरुषांनाच नव्हे तर स्त्रियांनाही स्त्री समजून सांगणारं हे अक्षर वाङ्‍मय; त्याचं मोल करता येणं कठीणच!

पुस्तकाच्या विषयवास्तूत प्रवेश करण्यापूर्वी ही सिमोन कोण आहे, हे समजून घ्यायला हवं. प्रत्येक कलाकृतीत तिच्या निर्मात्याचं व्यक्तिगत आयुष्य डोकावत असतं. म्हणून सिमोन किती बंडखोर होती हे समजलं तरच ‘द सेकंड सेक्स’सारखं समाजपुरुषाला हादरवून टाकणारं पुस्तक ती कशी काय लिहू धजली हे समजून घेता येईल. पुढं फ्रेंचमधला प्रख्यात साहित्यिक ठरलेला ज्याँ पॉल सार्त्र आणि सिमोन पॅरिसमधील एका महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे सहाध्यायी. तो कुरूप, ठेंगणा तर ही उंच, देखणी. दोघंही बुद्धिमान, तत्त्वज्ञानासह विविध विषयांवर गप्पांचे फड रंगवण्यात माहीर. वर्गात त्यांचा पहिला, दुसरा क्रमांक. अखेर जीवनसाथी बनायचा निर्णय त्यांनी घेतला आणि रूढ सामाजिक संकेतांना फाट्यावर मारून विवाह न करताच सहजीवन सुरू केलं. अर्थात, ते सध्यासारखं ‘लिव्ह इन’ही नव्हतं. ती कुठे तरी हॉटेलवर राहायची, कधी त्याच्या घरी लेखनकामाठीसाठी जायची. वेगवेगळ्या नोकऱ्या करून दोघांनीही नंतर लेखनालाच आपल्या चरितार्थाचं मुख्य साधन बनवलं. पॅरिसमधील एखाद्या कॅफेमध्ये दोघंही कॉफीपान करत वेगवेगळ्या टेबलांवर दिवसभर लेखन करत. सायंकाळी मित्रांच्या मैफलीत मनसोक्त मद्यपान हा सार्त्रचा आवडता उद्योग. दोघांचंही एकमेकांवर अतोनात प्रेम, पण परस्परांच्या व्यक्तिगत जीवनात नाक खुपसायचं नाही हा अलिखित संकेतही त्यांनी पाळला. त्यातून दोघांनीही लैंगिक स्वातंत्र्याचा पुरेपूर लाभ घेतला. रूपानं आपण कुरुप असलो तरी बुद्धीच्या जोरावर आपण स्रियांना वश करूच, असा संकल्प सार्त्रनं तरुणपणातच सोडला होता. तो शेवटपर्यंत या संकल्पाला जागला. त्याच्या बुद्धिचातुर्यावर भाळून अनेक ललना पाघळल्या, त्यात त्याच्याहून निम्म्या वयाच्या विद्यार्थिनीही होत्या. परस्परांच्या या मुक्त संबंधांचं प्रतिबिंब सिमोनच्या काही पुस्तकांतही उमटलं. एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करीत बहरलेलं हे प्रेमाचं नातं थेट सार्त्रच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे तब्बल अर्धशतक टिकलं.

The Second Sex Book
Cotton Boll Worm : यंदाही कापूस पीक बोंड अळीच्या संकटात

सार्त्रच्या नियतकालिकात सिमोननं स्रियांविषयी लेखमाला सुरू केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. पुढं जाऊन त्याचं ‘द सेकंड सेक्स’ हे जागतिक विचारविश्‍वाला कलाटणी देणारं पुस्तक झालं. सिमोनच्या अफाट बुद्धिमत्तेची, प्रचंड व्यासंगाची प्रचिती या पुस्तकातून येते. सार्त्रसारख्या दिग्गजाच्या सावलीत आपलं कर्तृत्व खुरटणार नाही याची काळजी सिमोननं घेतली. सार्त्रनंही तिला त्यासाठी मदत केली. म्हणून तिही त्याच्यासारखी अजोड पाश्‍चात्त्य साहित्यिकांच्या मांदियाळीत जाऊन बसली.

‘द सेकंड सेक्स’ गाजण्याची, जगभर स्वीकारलं जाण्याची अनेक कारणं आहेत. स्रीत्वाविषयी इतकी सखोल, मूलभूत आणि विस्तृत मांडणी करणारं दुसरं कोणतंही पुस्तक विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रसिद्ध झालेलं नव्हतं. कोणताही भावनिक मुलामा न देता, आकांडतांडव न करता सिमोननं तटस्थपणानं केलेली मांडणी लोकांना भावली. पुरुषाला सतत प्रथम स्थानी ठेवून स्त्रीची मांडणी दुय्यमत्वानं केली जाते, हे तिनं सप्रमाण दाखवून दिलं, म्हणून या पुस्तकाचं नाव ‘द सेकंड सेक्स’. स्त्रीला सातत्यानं पुरुषाच्या संदर्भातच पाहिलं जातं, तपासलं जातं, तिचं मूल्यमापन केलं जातं; जणू काही ती पुरुषांची दासी म्हणूनच जन्मली आहे, या वास्तवाकडं तिनं लक्ष वेधलं. लहानपणापासून आईच भेदभावाला सुरुवात करते. त्यातून मुलांना चांगली वागणूक मिळते, तर मुलींच्या वाट्याला अवहेलना, तुच्छत्व आणि बंधनांचे नकारच येतात. ते कसं याबाबत सिमोननं केलेली तपशीलवार मांडणी कोणीही विचारी माणूस नाकारू शकणार नाही. स्त्री जीवनाची सुरुवातच अशी झाल्यावर त्याचा मध्य आणि शेवट काय असणार हे वेगळं सांगायलाच नको. साज-शृंगार किंवा नट्टापट्टा करणं स्त्रीला का आवडतं, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लैंगिकतेकडं बघण्याचा तिचा दृष्टीकोन कसा असतो, विवाहबाह्य संबंधात तिला आणि पुरुषाला कसं वेगवेगळ्या तराजूंत तोललं जातं, ती प्रेमात स्वतःला कशी उधळून देते याचं मर्मग्राही विश्लेषण सिमोन करते. दोन विभागांत विस्तृतपणे पसरलेल्या या पुस्तकात मानववंशशास्त्रापासून ते मानसशास्त्रापर्यंत, धर्माच्या भेदभावी दृष्टिकोनापासून ते जीवशास्त्रीय फरकापर्यंत, ऐतिहासिक वास्तवापासून ते स्त्री खरंच गूढ आहे का इथंपर्यंत अनेक विषयांचा धांडोळा घेतला आहे. तो जसा अनेक प्रकारचं धक्कादायक वास्तव समोर आणतो, तसाच काही तरी छान कळल्याचा बौद्धिक आनंदही देतो. त्यासाठी तरी हे पुस्तक जरूर वाचायला हवं.

The Second Sex Book
Soybean : एकूण पेरणीच्या निम्मे क्षेत्र सोयाबीन

हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुषांच्या कामाची वाटणी ठरली आहे. पूर्वी शिकार, लढाया, संरक्षण ही पुरुषांची प्रमुख कामं होती. त्यानंतर शेती, अर्थार्जन, शिक्षण, कुटुंबाची प्रतिष्ठा, धार्मिक आणि सांस्कृतिक रीतीरिवाजांचं पालन, व्यक्तिगत विकास, कुटुंबाचं प्रमुखपद सांभाळणं अशी शेलकी कामं त्याच्याकडं आली. स्त्रियांकडं मात्र पूर्वापार घरकाम, मुलांना जन्म देणं आणि सांभाळणं, शेती व अन्य कामांत मदत करणं अशी पुरुषाला पूरक आणि कंटाळवाणी, संयमाचा कस पाहणारी कामं आली. ही कामं मुख्यतः शारीर पातळीवरची असून स्त्रियांची बुद्धी आणि विचार यांना चालना मिळण्याची सोय त्यांत नाही. वरवर पाहता ही विभागणी सोयीची वाटली तरी पुढं त्यातून पुरुषाला श्रेष्ठत्व आणि स्त्रीला दुय्यमत्व प्राप्त झालं. नर-नारी ही व्यवस्था नैसर्गिक आहे. मात्र पुरुषप्रधान व्यवस्थेत लिंगभेदभाव (जेंडर) मुद्दाम घडवला गेला. संस्कृतीच्या इतिहासानं मर्दुमकी, पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, निर्भयपणा, बुद्धिमत्ता, धीटपणा या गोष्टी ‘पुरुषी’ ठरवल्या. दुबळेपणा, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा, रडवेपणा, हळवेपणा अशा नकारात्मक प्रतिक्रियांना ‘बायकी’पणाचं लेबल चिकटवलं गेलं. सिमोननं म्हटल्याप्रमाणं, ‘कोणी बाई म्हणून जन्माला येत नाही, पण नंतर तिला बाई म्हणून घडवलं जातं.’ अशा प्रकारच्या विरोधाभासावर उभारलेल्या व्यवस्थेमुळं पुरुषाचा पराक्रम सिद्ध होण्यासाठी स्त्रीला दुबळेपणा स्वीकारावा लागतो. पुरुषाला मोठेपणा, तर स्त्रीकडे कमीपणा, पुरुष स्वामी, तर स्त्री दासी, पुरुष क्रियाशील तर स्त्री निष्क्रिय हे संदर्भ समाजातील मूल्यपद्धतींशी जोडले गेल्याने स्त्रीचे अवमूल्यन झाले, अशी मांडणी सिमोननं केली. शेकडो वर्षं याच तुच्छतेच्या भूमिकेतून स्वतःकडं पाहिल्यामुळं स्वाभिमान, आत्मगौरव, नैपुण्य, आत्मविश्‍वास, स्वातंत्र्य, स्वावलंबन या माणसाच्या नैसर्गिक इच्छा-आकांक्षांना फुलवण्याचं सामर्थ्य स्त्रीला स्वतःमध्ये जोजवता येत नाही.

स्रीसुद्धा पुरुषासारखी एक मानवच आहे, याबाबत सिमोननं केलेला ऊहापोह कोणालाही पटावा. ती म्हणते... ‘धर्मग्रंथ, पुराणकथा या सर्वांमधून स्त्रीच्या दोन टोकाच्या भूमिका रंगवल्या जातात. ती क्षमाशील माता व एकनिष्ठ पत्नी असते किंवा प्रियकराच्या जिवावर उठणारी हडळ व पुरुषाचा विनाश इच्छिणारी सैतान तरी! प्रत्यक्षात या दोन टोकांच्या गुणांपेक्षासुद्धा अधेमधे आढळणारे चांगले-वाईट गुण स्त्रीमध्ये सापडतात. ती सर्व मानवी व्यवहार करणारी माणूस आहे. ती प्रेमळ असू शकते व उच्छृंखलही असू शकते. एखादी स्त्री एकाच वेळी क्रोधीही असते आणि प्रेमळही! ती सत्तालोलुप असू शकते, तर कधी रंजली-गांजलेली गरीब गाय! मनुष्यस्वभावाचे सर्व पैलू स्त्रीमध्ये वास करतात आणि ते बघून पुरुष बुचकळ्यात पडतो. त्याला ती ‘स्फिंक्स’ सारखी गूढ वाटते. स्त्री नक्की कशी असते याविषयी आजही भरभरून साहित्य निर्माण होत असते. पुरुषाला स्त्री थोडीशी गूढ, अगम्यच असावी, असे वाटते. निदान म्हणून तरी तिने लांबलांब, पायघोळ स्कर्ट घालावेत, डोक्यावर जाळीजाळीचा पडदा घालावा, हातात कोपरापर्यंत मोजे घालावेत, दागदागिन्यांनी स्वत:ला झाकावे, असे त्याला वाटते. स्त्री जर त्याला इतर पुरुषांसारखीच अंतर्बाह्य उमजली, तर मग ती परतत्त्व कशी वाटणार? अॅलन फॉरनिएसारखे लोक इंग्लिश स्त्रियांची टर उडवतात. कारण का, तर त्या पुरुषांसारखे मोकळे ढाकळे हस्तांदोलन करतात. फ्रेंच स्त्रियांची सौम्यपणे, कळत-नकळत हस्तांदोलन करण्याची पद्धत त्यांना जास्त आवडते. बायकांनी फार अघळपघळ, खुल्लम खुल्ला वागू नये. स्त्री कशी काहीशी बुजरी, संकोचीच बरी! तरच समाजात तिची प्रतिष्ठा राहते, असे अनेक पुरुषांना वाटते. स्त्रीचा स्वभाव फार सरधोपट असू नये. ती थोडी लहरी असावी. तिने थोडे सुखद आश्‍चर्याचे धक्के द्यावेत. म्हणजे ती जास्त मोहक वाटते. एवढेच काय; पण ती थोडी अल्लड, चंचल असली की जास्त आकर्षक बनते, असंही बऱ्याच पुरुषांनी वाटतं. लपवाछपवी, रहस्यमयता, दुहेरी व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टी स्त्रीमध्ये माफक प्रमाणात असल्या, तर पुरुषास त्या हव्याहव्याशा वाटतात. म्हणून तर स्त्री म्हणजे अनेक आभास निर्माण करणारी माया असते!’

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यानंही, स्त्री म्हणजे न उकलणारं कोडं असल्याचं विधान केलं होतं. प्रख्यात गणिती पायथॅगोरसनं म्हटलं होतं, की ‘या भूतलावर प्रकाश, पुरुष यांसारखी काही चांगली तत्त्वं आहेत, ज्यामुळं सुव्यवस्था तयार होते आणि गोंधळ, अंधार, स्त्रिया यांसारखी काही वाईट तत्त्वंही आहेत.’ सिमोननं या दोघांचीही झाडाझडती घेतली आहे. जगातील बहुतेक धर्मांनी स्त्री म्हणजे नरकाचं द्वार असल्याचा समज धार्मिक वाङ्‍मयातून शतकानुशतके पसरवला. त्यामागची कारणमीमांसा सिमोननं तपशीलानं दिली आहे. धर्मांना स्त्री नकोशी असण्यामागं समाजाचा पुरुषप्रधान दृष्टिकोन कसा कारणीभूत आहे हे तिनं अनेक प्रत्ययकारी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे.

सिमोननं सन १९४९ मध्ये, म्हणजे सुमारे ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकानं युरोपसह अमेरिकेतील जनजीवन ढवळून निघालं. स्त्रीनं संसार चूलमूल यामध्ये न अडकता स्वविकासावर भर द्यावा, असं सिमोनला वाटायचं. तिच्या या बंडखोर विचारांमुळं संस्कृती रक्षकांचं पित्त खवळलं. सिमोनवर प्रचंड टीका झाली. ती पुरुषी, अश्‍लील, विकृत असल्याचे आरोप झाले, धमक्या येत राहिल्या. या काळात सार्त्र तिच्या सोबत राहिला, तिच्या भूमिकेची त्यानं भलामण केली. यथावकाश विचारीजनांनी या पुस्तकात मांडल्या गेलेल्या तथ्यांचा स्वीकार केला. जगभर पुस्तकाचा खप वाढला. इंग्रजीसह अनेक भाषांत ते पोहोचलं. स्त्रीमुक्ती चळवळीला त्यानं बळ दिलं. स्त्रीवादी लेखिका म्हणून सिमोनचं नाव झालं. तिच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांमधील स्त्रिया मात्र सर्वसामान्यच होत्या, तिच्यासारख्या बंडखोर नव्हत्या. त्यामुळंही तिच्यावर टीका झाली. त्यावर, समाजात जे दिसतंय त्याचंच प्रतिबिंब माझ्या साहित्यात उमटतंय, असा युक्तिवाद तिनं केला.

‘द सेकंड सेक्स’चा सुगम आणि सुरेख मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी केला आहे. बर्ट्रार्ड रसेलचं ‘सुखी माणसाचा सदरा’ ताकदीनं मराठीत आणणाऱ्या करुणा यांनी सिमोनच्या या पुस्तकालाही पुरेपूर न्याय दिला आहे, असं म्हणता येईल. पद्मगंधा प्रकाशनानं सन २०१० मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यावरून मराठीतही या पुस्तकाचं चांगलं स्वागत झालं असं मानायला वाव आहे. आत्मभान जागृत असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचलंच पाहिजे. त्याचबरोबर स्त्रीला गृहीत धरू पाहणाऱ्या पुरुषांनीही आपला ‘दृष्टिदोष’ सुधारण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत, नयनी पाणी’ हे म्हणायला छान वाटत असलं, तरी एकविसाव्या शतकात ते मुळमुळीत ठरतं. ‘अर्ध्या जगाला’ टाचेखाली ठेवून कोणीच सुखी होऊ शकणार नाही. स्रीत्वाला न्याय देणारं वर्तन विकसित करणं आणि स्त्रीलाही माणूस म्हणून स्वीकारणारं नवं जग तयार करणं ही आपणां सर्वांची जबाबदारी आहे.

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com